२.पारवा - बालकवी


२.पारवा


भिंत खचली,कलथून खांब गेला,
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला;
तिच्या कौलारीं बसुनि पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो.

सूर्य मध्यान्हीं नभीं उभा राहे,
घार मंडळ त्याभवतिं घालिताहे.
पक्षि पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेंत पेंगतात.

तुला नाही परि हौस उडायाची,
गोड हिरव्या झुबक्यांत दडायाची,
उष्ण झळया बाहेर तापतात.
गीतनिद्रा तव आत अखंडीत.

चित्त किंवा तव कोवळ्या विखारें
दुखतखुपतें का सांग, सांग बा रे!
तुला काही जगतात नको मान?
गोड गावे मग भान हे कुठून?

झोंप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची?
दुःखनिद्रें निद्रिस्त बुद्धराज
करूणगीतें घुमवीत जगीं आज.

दुःखनिद्रा ती आज तुला लागे;
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगें.
फिरे माझ्या जगतात उष्ण वारें,
तुला त्याचे भानही नसे बा रे!

---अपूर्ण--



प्रस्तुत पुस्तकात या कवितेवर विवेचन नाही.स्थलकाल लिहून न ठेवण्याच्या बालकवींच्या निष्काळजीपणामुळे ही आणि अशा बऱ्याच कविता बालकवींनी कधी लिहिल्या हे सांगता येत नाही. 
ह्या कवितेतून कवीचे निराशावादी सूर प्रकट होतात असे वाचताना जाणवते. उत्साही शब्दरचना असणाऱ्या निसर्गकवितांऐवजी खचणे,कलथणे,जुनी पडकी, खिन्न, निरस एकांतगीत असे शब्द असणारी वेगळी सुरूवात लगेच कळून येते.
दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यात विरोधाभास आहे. सूर्य उभा असणे, घारीच्या घिरट्या,पानांच्या 'शांत' सावल्या, मध्यान्ह आणि साखरझोप,उष्ण झळया-गीतनिद्रा हे सारे एकत्र वाचताना हा विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो.
चौथ्या कडव्यात पहिल्या दोन ओळीतील बालसुलभ बोल सहजतेने येतात परंतु पुढच्या दोन ओळी मान आणि जगताची भाषा करतात तेथुन स्व-प्रकटन चालू होते असे मला वाटते.
माणसाची झोप ही सुख आनंददायी आहे, पण ती क्षणभंगुर आहे. त्याउअलट बुद्ध मात्र दुःखात निजलाय. ( ही कल्पना बहुदा लेण्यांतील निजलेल्या बुद्धाच्या मूर्तीवरून आली असावी). 'करूणगीतें घुमवीत जगीं आज.' या शेवटच्या ओळीचा मला नीटसा संदर्भ लागला नाही.
यापुढे जाऊन बालकवी म्हणतात की दुःखात रमलेल्या पारव्यासह त्याचे जगही निद्रिस्त झाले आहे. या पहिल्या दोन ओळी प्रतिकात्मक वाटतात कारण शेवटच्या दोन ओळी तोच भाव मांडतात पण ते कवीचे भाव आहेत.वैफल्य/निराशा अशाने ग्रासलेल्या मनातून हे भाव उमटले असावेत.
ही कविता अपूर्ण आहे. पारव्याच्या प्रतिमेद्वारे स्वगत मांडण्याचा हा प्रयत्न असावा. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी रसग्रहणाचा थोडक्यात प्रयत्न केला आहे.चू. भू. द्या. घ्या.






प्रशासकांच्या सांगण्यावरून नवी कविता नवा लेख म्हणून देतो आहे.मूळ उपक्रम व यातील दुवादानाचे कार्य प्रशासक सांभाळतील अशी आशा बाळगतो.