बालकवींच्या कविता

श्रीमती पार्वतीबाई ठोमरे यांनी संपादित केलेले 'समग्र बालकवी' ( व्हीनस प्रकाशन) ह्या पुस्तकातील बालकवींच्या कविता मनोगतवर पुस्तकरूपाने टंकलिखित करतो आहे. याद्वारे बालकवींच्या कवितांचे रसग्रहण करता यावे आणि मनोगतींनी यात सहभागी होऊन कवितांचा आस्वाद घ्यावा यासाठी हा उपक्रम आहे.


१. आनंदी-आनंद


आनंदी-आनंद गडे
इकडे, तिकडे, चोहिकडे.
वरती-खाली मोद भरे;
वायुसंगे मोद फिरे,
नभांत भरला,
दिशांत फिरला,
जगांत उरला,
मोद विहरतो चोहिंकडे;
आनंदी-आनंद गडे

सूर्यकिरण सोनेरी हे
कौमुदि ही हसते आहे;
खुलली संध्या प्रेमानें,
आनंदे गाते गाणे;
मेघ रंगले,
चित्त दंगलें,
गान स्फुरलें,
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!

नीलनभीं नक्षत्र कसें
डोकावुनि हें पाहतसे;
कुणास बघते? मोदाला!
मोद भेटला का त्याला?
तयामधें तो
सदैव वसतो,
सुखे विहरतो,
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!

वाहति निर्झर मंदगति,
डोलति लतिका वृक्षतती,
पक्षि मनोहर कूजित रे,
कोणाला गातात बरे?
कमल विकसलें,
भ्रमर गुंगले,
डोलत वदले-
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!

स्वार्थाच्या बाजारांत
किती पामरें रडतात;
त्यांना मोद कसा मिळतो?
सोडुनि स्वार्था तो जातो-
द्वेष संपला,
मत्सर गेला,
आतां उरला
इकडे,तिकडे, चोहिंकडे
आनंदी-आनंद गडे!







तळटीपः
बालकवी १९१० च्या आरंभी टिळकांकडे गेले. त्यापूर्वी त्यांनी ही एकच निसर्गविषयक कविता लिहिली होती. आनंद या मुलांसाठीच्या मासिकासाठी पहिल्या अंकासाठी भा. रा. तांबे यांनी संपादक वासुदेव गोविंद आपटे यांच्या सांगण्यावरून आनंदी आनंद अशी कविता रचली होती.त्यावरून बालकवींना ही कविता स्फुरली. परंतु निसर्गविषयक अशा कवितेचा शेवट-
स्वार्थाच्या बाजारांत...आनंदी-आनंद गडे!
हा त्यांना कदाचित गृहकलहातील दैनिक कोलाहलातून स्फुरला असावा.
-समग्र बालकवी,समालोचन, पान क्र. ४३.

निसर्गवर्णनातून मानवी पैलूंवर भाष्य केलेले बालकवींच्या काव्यात बरेचदा आढळून येते, ह्यात त्यांचा जीवनमानाचे कंगोरे दिसतात. पण अशी वर्णने इतक्या सहजतेने येतात की वाच्यार्थाशिवायही काही अर्थ दडले आहेत हे सहसा कळत नाही.