लुप्त होत चाललीत तीर्थरूप माणसे
जाळती स्वत:स जी बनून धूप माणसे
देवपद दशांगुळेच राहिले असे जणू
शोधतात आरशात विश्वरूप माणसे
रोजचे रटाळ रेटण्या रहाटगाडगे
आणतात कोठुनी मनी हुरूप माणसे ?
हक्क-बिक्क सर्व झूट, भूक तेव्हढी खरी
गात्र भागवा, उदर भरा, नि चूप माणसे
व्योम त्यांस धार्जिणा, न क्षितिज त्यांस धार्जिणे
मंडुकांसमान वानतात कूप माणसे
गर्दभे नि श्वान घेउनी जुलूस काढुया
मॉल संस्कृतीत जाहली गुडूप माणसे
सुंभ राहिला न पीळ, राख फक्त राहिली
लावतात का तरी मिशीस तूप माणसे ?
अन्नछत्र अन् विहीर रखडती निधीविना
बांधतात देवळे, मशीद, स्तूप माणसे
कायद्यानुसार पौर सर्वथा समान पण
समजतात खूपशी स्वत:स भूप माणसे
यक्षप्रश्न राहिला अनुत्तरित अखेरचा
का तळे अजून चाखतात खूप माणसे ?
कोण तू, मिलिंद, काय पाड ह्या जगी तुझा ?
रे, भल्याभल्यास घालती न धूप माणसे