मांडव-परतणी...!!

घरटं जवळ जवळ पूर्ण होत आलं होतं.. चिऊताई घरट्याच्या आत बसून, आपलं सारं सुबक पणाला लाऊन एक- एक काडी जोडून, ते घरटं विणत होती...

चिमण्याने- चिऊला काडी आणून द्यावी आणि भुर्रकन उडून जावं.. मग चिऊने किंचितसा विचार करून..., कदाचित- त्या काडीची लांबी पाहून, नीट अंदाज घेत घेत, ती काडी योग्य त्या ठिकाणी गुंफावी... अन पुढच्या काडीची वाट पाहावी... कित्येकदा तर बऱ्याच वेळाने चिमण्याने परतावं... तो सुद्धा एक- एक काडी 'छानशी' निवडूनच आणत असावा..

तो येताच चिऊने विचारावं, " फार लांब जावं लागलं का हो? फार नाही लागायच्या काड्या आता, होतंच आलंय पाहा घरटं आपलं... " चिमण्याने हळूच काडी चिऊ च्या चोचीत द्यावी, अन म्हणावं, "अगं, लागतील तितक्या काड्या लागू देत, घरटं आपलं सुंदर झालं पाहिजे! ए पण काहीही म्हण हां, जादू आहे तुझ्या चोचीत, कित्ती सुंदर विणल आहेस, घरटं! अन ऐसपैस झालंय, आपली ५-६ बाळं मावतील की!! "
चिऊनं लाजावं, म्हणावं, " चला जा पाहू, आणा अजून काड्या... "
"अगं माझे राणी, आज साठी पुरे काम, चल जरा बाहेर, एक तळ्याकाठची जागा पाहिलीये, भेळवाल्याने खूप सारे मुरमुरे सांडवलेत, चल जेऊन येऊया... "

"मनू.... मनू, ए मानसी.... अगं तू परत बघत बसलीस नं त्या घरट्याला? पोरीच लग्न ठरलंय, पण बालिशपणा संपत नाही.... अगं अभ्यास कर गं, हे शेवटचं सेमिस्टर तूझं, त्यातूनही शेवटची परीक्षा, एव्हढी पास व्हायलाच हवीये, तरी ह्यांना म्हणत होते आत्ताच नको ठरवूया लग्न, पोरीच लक्ष नाही लागणार अभ्यासात, पण माझ्या मेलीचं कोण ऐकतंय? तू आतल्या खोलीत जा बरं अभ्यासाला... उठ पटकन.... "

मी खोलीत पळाले आईचं खरंच होतं, लग्न ठरल्यापासून मी संसाराच्याच स्वप्नांमध्ये रमायला लागले होते.. दरवर्षी 'विशेष प्राविण्य' घेऊन घेऊन पास होणारी मानसी ह्यावर्षी घसरेल, हे आईला टेन्शन होतं... परीक्षा तोंडावर आली होती, मी अगदी बळेच अभ्यास करत होते! खरं पाहता मला सुद्धा पास व्हायचं होतं पण; अभ्यासाला बसले की मन भरकटत होतं.... मागच्याच महिन्यात माझा 'हेमंत' बरोबर साखरपुडा झाला होता... खरं तर मला इतक्यात लग्न करायचचं नव्हतं.. चांगली वर्ष दीड- वर्षे नोकरी करून मगच लग्नाचा विचार करणार होते.. पण बाबांना वाटलं आतापासून स्थळं पाहायला सुरुवात केली तर वर्षभरात ठरेल लग्न!
पण; कसचं काय?

हेमंत मला पाहायला आला, दोघांचाही असा स्थळं पाहण्याचा हा पहिलाच कार्यक्रम- अन पसंतीच झाली...!! माझ्या भावी सासू- सासऱ्यांना देखील पहिल्याच भेटीत मी आवडले.. अवघ्या ४५ मिनिटांत लग्न ठरलं!! मग काय?? माझे अन हेमंतचे रोज फोन वर तास-न-तास बोलणे.... अन मग कुठला आलाय अभ्यास?
पण आता जरा सिरिअस व्हायला हवंय, परीक्षा- हो शेवटचे पेपर्स द्यायचे आहेत... मनाचा हिय्या करून अभ्यासाला लागले.. ह्या परीक्षेनंतर मी इंजिनीअर होणार ह्या विचाराने स्फूर्ती येत होती!!

हेमंतने सुद्धा किती समजुतदारपणाने घेतलं, म्हणाला - तुझी परीक्षा संपेपर्यंत आपण फारसं फोन वर बोलायला नको, भेटी तर त्यातून नकोत! फक्त पेपर झाला की एक फोन करत जा, पेपर कसा गेला ते कळवत जा!
.... झालं, ठरलं! - आता तीन आठवडे फक्त अभ्यास एके अभ्यास....
अवघड होतं खरं तर मनाची एकाग्रता करणं... पण करणं भाग होतं - आईचं बारीक लक्ष होतं माझ्यावर - मी थोडी भरकटले की ती "मनू Ss, अभ्यास....???!! " असं कुठून तरी ओरडायची.... मी पटकन डोकं पुस्तकात घालायचे.... आई च्या धास्तीने का होईना अभ्यास मार्गी लागला होता....

आणि एकदाची परिक्षा सुरू झाली..... प्रत्येक पेपर झाला की मी घरी येऊन हेमंतला फोन करत असे, पेपर बद्दल सांगत असे.... मग थोडासा आराम करून पुढच्या पेपरच्या तयारीला लागत असे......

इकडे मी एक -एक पेपर देत होते... तिकडे "घरटं " टुमदार दिसत होतं... एक छोट्टासा संसार सुरू झाला होता!! कित्ती गोड होती ती पाखरं.... सक्काळीच उठायचं... मग फिरून यायचं... येताना न्याहारी करून येत असावेत... मग थोडा वेळ एकमेकांशी गप्पा मारत बसायच्या.... पुन्हा जरा फिरून यायचं..... दुपारच्या जेवणाची सोय करून ठेवायची... मग चिऊताई घर सांभाळणार आणि चिमणा 'पावसाळ्यातल्या' अन्नाची सोय करण्यासाठी एक एक दाणा जमा करून आणणार... चिऊ ते तिच्या घरट्याच्या इवल्या कोठारात जमवून ठेवी.... सायंकाळी जोडपं पुन्हा बाहेर पडत असे, मी पेपर देऊन आले की ते दिसत नसत... मग दिवे लागणीला परत येत...

करता करता, शेवटचा पेपर आला... आणि कसला मस्त गेला तो पेपर.. अगदी अपेक्षेपेक्षा चांगला! वर्षभर कॉलेजवरून घरी आले की, मी रोजचा अभ्यास रोज करत असे - ती सवय कामी आली - म्हणूनच परीक्षेआधी पोटभर अभ्यास झाला नसूनही पेपर मस्तच गेला...!
पेपर सुटला, आम्ही सारया मैत्रिणींनी आज, ह्या कॉलेजच्या शेवटच्या दिवशी कॅंटीन मध्ये भेटायचं ठरवलं होतं - आजच्या दिवसानंतर आम्ही सारया पांगणार होतो... भेटीच्या संधी कमीच उरणार होत्या, त्यात मी तर लग्न करून मुंबईला राहायला जाणार होते...

सगळ्या जमल्या आणि गलबलाटाने कॅंटीन सजून गेलं.. आमचा ‘अण्णा’ प्रत्येकीसमोर येऊन ऑर्डर घेत होता, माझं लग्न ठरलं होतं म्हणून, सगळ्या मुलीनी माझ्याकडून पार्टी उकळायची ठरवलं होतं.. आणि अगदी शिस्तीत - छानपैकी- जणू ठरवून आल्या असाव्यात -पोरींनी मला ‘छेडण्याचा’ सपाटा सुरू केला …. आज मी आमच्या ग्रूप ची "मुर्गी " होते!! इतके दिवस परीक्षेच्या तणावामुळे गप्पं असणाऱ्या कार्ट्याना उफाळून आलं होतं!

'आत्ता काय बाई, मानसी मेड्डम फक्त कार मधूनच फिरणार... ',
' अन मग, आपल्याला ओळख पण नाही दाखवणार 'हेमंत साहेबांसोबत फिरताना! ’,
‘ए तिला मिसेस कुलकर्णी म्हणा गं',
'नक्कोत गं, आपण 'कुलकर्णी बाय, तू कश्शी हाय? ' असं म्हणूयात! ',
'अन काय गं मनू, आज 'विरह' संपला म्हणे? हेमंतजी येण्णारच असतील आज भेटायला! ',
'अगं भेटायला काय म्हणतेस, उभाच असेल बाहेर, आपल्या ह्या 'मधुब्बालेची' वाट पाहत.....! ’,
'ए, बघ - लाजली लाजली कुलकर्णी बाय लाजली! '
'ए मनू, लग्नानंतर विसरून नाही जायचं आम्हाला, आमचं पण ठरणार म्हटलं लग्न लवकरच.... ',
'मनू, बाय द वे, लग्नानंतर कुठे चाललं आहे म्हणे जोडपं????, सांग-सांग.... ओये, नुसतं असं हसून नाही चालणार.... उत्तर हवंय उत्तर'

पुरे गं, कित्ती छळाल मला अजून? चहा- सामोसा- पोहे- भज्जी गार होतंय सगळं, संपवा ते आधी... आणि नाही विसरायची हो मी तुम्हा साळकाया- माळकायांना..
ए पण तुम्ही सगळ्या येताय ना माझ्या लग्नाला?
गलका करून ओरडल्या सारया, "साली आधी घरवालीssss....!! " ह्यांनी हे असं बोलायचं हे ठरवून ठेवलं असणार नक्की!!

काही का असेना, माझा ग्रुप धम्माल होता... कितीतरी वेळ आम्ही त्या कॅंटीन मध्ये खात अन गप्पा मारत बसलो होतो... उद्यापासून कोण काय करणार, ह्याची चर्चा रंगवत..!

उत्साही मनाने घरी परतले, घरी येताना मैत्रिणींचे विचार मागे पडले अन व्यापून राहिला, 'हेमंत' अन माझं लग्न!!

आज मी त्याला भेटीला बोलावणार होते.. पुढच्या आठवड्यात त्याला मुंबईच्या ऑफिस मध्ये रुजू व्हायचं होतं... त्याने तिथे बदली करून घेतली होती, कारण तिथे काम जास्त चांगलं होतं आणि स्वतःच घर पण घेऊन ठेवलेलं होतं... पुढच्या आठवड्यानंतर ते थेट लग्नापर्यंत आमची भेटही होणार नव्हती..... आता लग्नाची तयारी पण जोर पकडेल, बाबारे, कितीतरी खरेदी करायची राहिलीये आहे अजून.. आईने माझी परिक्षा म्हणून जरा आरामात घेतलं होतं... आता, आज तर ती घर आवरायला पण काढेल...

माझ्याच तंद्रीत घरी पोहोचले, तो आई अगदी गेटमध्ये माझी वाट पाहत उभी, 'अगं मने, केव्हढा तो उशीर? मोबाईल पण घरीच तुझा, हेमंतरावांचे दोन फोन येऊन गेलेत! " अगं आई, थांब! तुला सांगून गेले होते ना, आज आम्ही सगळ्या जमणार होतो कॅंटीनला, मग घरी यायला उशीर होईल म्हणून.... 'हो गं मने, पण तरीही... "
अगं आई जरा विचारशील आजचा पेपर कसा गेला ते? अगं बाई, अन घर काढलासच ना आवरायला, कित्ती पसारा झालाय?.
' मनू, लग्न ना राणी तूझं, मग आता रंग द्यायचा घराला.. बरं ते जाऊ देत, पेपर कसा गेला? आणि आधी हेमंतरावांना फोन कर पाहू...
करते गं आई त्याला फोन, पेपर मस्त गेला, आणि आम्ही सारया.... "
"मने, बोल की पुढे थांबलीस का?
आई, घरटं कुठे गेलंय?
"मने, मला वाटलाच तू गोंगाट करणार, ते सोड, आधी हात-पाय धू, जेवायला चल... "
आई नीट सांग, कुठाय घरटं?
"अगं, ऑफिसला जाण्याआधी बाबांनीच ते काढून टाकून दिलं.... "
पण का, आई??
"आता घरात पाहुणे मंडळी येतील तुझ्या लग्नाच्या निम्मित्ताने, त्यांची पोरं-सोरं जमतील, त्यात तो चिमण्यांचा दिवसभर चिवचिवाट, अन पोरांनी पण त्रासच दिला असता त्या चिमण्यांना! "
अगं आई पोर शहाणी आहेत सारी, समजावलं असतं की ऐकली असती, म्हणून तुम्ही घरटं मोडलत? एक- एक काडी जोडून बनवलं होतं ते त्यांनी, खुष होती दोघे त्या इवल्या घरट्यात, आई तू पण बाबांची साथ दिलीस? "मनू, माझ्यामागे कीटकीट करू नकोस, आवर आणि आधी हेमंतरावांना फोन कर, चल मी जेवायला वाढते....

काय सांगू, काय वाटलं? सगळं असून- काहीच नाही असं काहीसं... नकळत त्या पाखरांशी मी जोडले गेले होते, माझ्या एवढ्या मोठ्या घराला ते इवलं घरटं खरच इतकं जड होतं?

जड मनाने हेमंत ला फोन केला पण त्याला फक्त पेपर बद्दल सांगितलं, तो सायंकाळी घरीच भेटायला येतो म्हणाला, माझ्या आई- बाबांचीही भेट घेऊन बरेच दिवस होऊन गेले होते म्हणून!

सायंकाळी हेमंतला आवडणाऱ्या निळ्या रंगाचा ड्रेस घालून तयार झाले, दुपारची मरगळ थोडी कमी झाली होती, हेमंत भेटण्याच्या विचारानेच!
तो आला; नेहमीप्रमाणे त्याच्या असण्याने घर भरून गेलं, प्रत्येकाला खिळवून ठेवणारा त्याचा संवाद असायचा, त्याच्या ऑफिसच्या गमती- जमती ऐकल्या, लग्नाची तयारी कशी सुरू आहे ते कळालं! मग मध्येच म्हणाला, " काय मानसी, आज पेपर छान जाऊनही स्वारी फारशी खुष दिसत नाहीय्ये...! काय चालू आहे मनात? "
हा मला इतका कसा ओळखतो?
आई म्हणाली, " अहो हेमंतराव, आज ते व्हरांड्यातलं घरटं ह्यांनी मोडलं, इवलीशी ती गोष्ट पण हिने मनाला लाऊन घेतली फार, कधी-कधी उगाच हट्टी वागते...! "
"आई, अहो वाईट काय आहे त्यात? सगळ्या सजीवांना हवं ते करण्याचा हक्क आहे, छान जगण्याचा हक्क आहे, मानसीमध्ये ही जाण आहे ते पाहून चांगलंच वाटलं! अगं मानसी, मी आपल्या मुंबईच्या नव्या घराच्या बाल्कनी मध्ये एक लाकडी घर आणून टांगलय- तिथ पाखरं आपलं बस्तान बसवतील, मग तू मज्जा कर! मलाही फार आवडतो पाखरांचा वावर..! "

वॉव हेमंत, सही... मस्त वाटलं ऐकून.. अरे आपण माणसांनी ह्या पशू-पक्ष्यांचा अरण्यावर- अतिक्रमण करून, झाडं तोडून- त्यांची राहती घरं उध्वस्त करून, आपली वस्ती वसवली आहे आणि त्यांना इवलीशी जागा नाही देऊ शकत आपण?
बाबा म्हणाले "ह्या धकाधकीच्या जीवनातही तुम्हा पोरांच्या मनाची ही संवेदनशीलता पाहून खूप बरं वाटलं... मलाही नवं काही शिकायला मिळालं, मानसी बेटा चुकले बरं बाबा तुझे! "
अहो बाबा, असा नका म्हणूत ना प्लीज...
"मग, हास पाहू एकदा.... " आणि माझ्यासोबत सारयांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं.... हेमंत माझ्याकडे पाहून सूचक हसला... गम्मत वाटली...

ते दोन महिने लग्नाच्या तयारीत अन "केळवणं" खाण्यात निघून गेले... मनातलं "घरटं" पण फिक्कं झालं...

माझं लग्न... पार पडलं.. निघताना आई-बाबांच्या मिठीत शिरून खूप रडले.. "कन्यादान" - खूप मोठी गोष्ट होती!.. माझं सासर फार चांगलं होतं म्हणून आई बाबांना फारशी चिंता नव्हती, तरीही - मुलीनं जाणं हे इतकं सहज नसतं... आई बाबा अन त्या मुलीसाठीही!
पण हेमंतने साऱ्यांना जिंकलं होतं... माझ्या आई- बाबांनी निवडलेला माझा 'वर' म्हणजे खरच वरदान होता; त्यांनी निश्चिंत मनाने माझा हात त्याच्या हाती सोपवला- कायमचा....!!

लग्न झाल्यावर काही दिवसांनी मुलीनं माहेरी परत यायचं असतं, तिच्या नवर देवाबरोबर... मांडव-परतणीसाठी!!... तोपर्यंत माहेरच्या अंगणात घातलेला मांडव उतरवता येत नसतो... मी सासरी गेले अन हेमंतच्या ऑफिसच्या कामामुळे दोन महिने मला माहेरी येताच आलं नाही... माहेरच्या अंगणात मांडव ताटकळत होता...

शेवटी दोन महिन्यांनी माझ्या माहेरी निघालो... मी अन हेमंत....

मन मोहरून आलं होतं.. तसं पाहता मला सासरी काहीच कमी नव्हती, पण माहेर म्हटलं की मन 'पाखरू' झालं... आणि मी ट्रेन मध्ये बसल्या बसल्या मनानेच माहेरची पुन्हा एकदा वारी करून आले.... एका अनामिक ओढीनं मन मोहरून आलं होतं...
घरी पोहोचलो... मांडव आतुरला होता... हेमंतचा - घरच्या जावया चा हात लागल्याशिवाय तो उतरणार नव्हता.... गेट मध्येच आई- बाबांनी जोरदार स्वागत केलं... व्हरांड्यात इवल्या- इवल्या काड्यांचा कचरा पाहून मान वर करून पाहते, तो काय?

घरटं!!

अन त्यात इवली इवली पिल्लं! त्यांचा किणकिणता चिमणा नाद... त्या चिवचिवाटाने कित्ती गोड वाटलं म्हणून सांगू.... काही दिवसांपूर्वी मनात आलेली अपराधी भावना दूर झाली...

ह्या गोजिऱ्यांनी तेवढ्याच हिमतीने त्यांचा संसार पुन्हा थाटला होता...! ते जुनंच जोडपं होत की नवीन, ते कळलं नाही मला, पण माझ्या मनाचं समाधान झालं ते घरटं पाहून, हे नक्की!!
ही इवली पाखरं इतक्या हिमतीनं उभं राहतात, पुनःपुन्हा, हे पाहून मी ही माझ्या संसारात- कसल्याही अडचणीत, 'न' डगमगण्याचं ठरवलं... माझ्याच मनाशी..!!

मनाची उभारी 'कायम' ठेवावी, जिंकणं सोपंच असतं... हे शिकले

आईला जाऊन घट्ट बिलगले अन जवळ-जवळ किंचाळलेच "आई, कित्ती छान, पुन्हा नवं घरटं उभं केलं त्यांनी...!! "
बाबा आणि हेमंत पण आनंदले होते, माझ्याकडे पाहून गालात हसत होते....

अंगणातला मांडव हेमंतचा हात लागल्यावर उतरला.... पाखरांना वावरायला मोकळं अंगण मिळालं...

माहेरचे ते दोन दिवस भुर्कन उडून गेले... त्या इवल्या पाखरांचा संसार छान सजला होता.... माझ्या मनातही संसार माझा फुलला होता...

एका समाधानी मनाने माझी 'मांडव-परतणी' झाली... ही आठवण आजही मनात "घरटं" करून आहे.....!!

- वेणू (बागेश्री देशमुख)
Email- VenuSahitya@gmail.com