सख्खे शेजारी !

          त्या दिवशी एक  तास संपवून मी माझ्या केबिनमध्ये शिरलो आणि खडूचे हात साफ करून टेबलकडे वळलो, श्रमपरिहारासाठी चहा प्यायला जावे की काय अशा विचारात असतानाच माझ्या खोलीत अचानक एका व्यक्तीने प्रवेश केला एकदम त्या व्यक्तीला मी ओळखलेच नाही. असेल कोणातरी विद्यार्थ्याचा पालक असा मी विचार करत असतानाच त्याने नमस्कार करत "नमस्कार काय ओळखल का? " असा प्रश्न विचारला आणि मग ही कोणीतरी परिचित व्यक्ती असावी असा अंदाज केला. मध्यंतरी माझी सोलापुरास बदली झाल्यामुळे त्यापूर्वीच्या ओळखीपैकीच कोणीतरी असणार असा विचार करून जरा स्मृतीला ताण दिला आणि एकदम डोक्यात प्रकाश पडला"अरे हे तर लोटांगणे" मी सोलापूरला जाण्यापूर्वी मी राहत असलेल्या शासकीय निवासस्थानातील माझे शेजारी. शिवाय ते सार्वजनिक नांधकामखात्यातच लिपिक होते.

"ओळखले तर लोटांगणेच ना? " त्याना नमस्कार करत मी म्हणालो.

"अरे वा ! इतक्या वर्षात विसरला नाही "असे म्हणत त्यानी माझ्या नमस्काराचा स्वीकार केला.

खरतर त्यांची नि माझी भेट जवळ जवळ दहा वर्षानंतर पडत होती. जरी शासकीय निवासस्थानात ते माझे शेजारी असले तरी आमचा अगदी जुजबीच परिचय होता. शिवाय मी जरी त्या निवासस्थानात  बारा  वर्षे काढली तरी ते मात्र चारपाच वर्षातच स्वत:चे घर बांधून तिथे राहवयास गेले त्यामुळे परत त्यांची क्वचितच गाठ पडे त्यामुळे अचानक त्याना माझी गाठ घ्यायची उबळ का आली असावी मला समजेना. पण त्यानी फार वेळ मला आचंबित न ठेवता एकदम मुद्द्यालाच हात घातला आणि त्या संशयातून माझी सुटका केली,

"अहो हे सोलारकर तुमच्या परिचयाचे आहेत का? "असा प्रश्न त्यानी मला विचारला. आणि त्यामुळे मी आणखीनच बुचकळ्यात पडलो. कारण ते सोलारकर खरोखरच माझ्या परिचयाचेच होते. आणि त्या व्यक्तिमत्वाशी एकदा परिचय झालेली व्यक्ती त्याना विसरू म्हटले तरी विसरणे अशक्य होते. मग माझे तर काही दिवसापूर्वीच ते अगदी सख्खे शेजारी होते.

              सोलारकर सोलापूरलाही होते पण मी ज्या काळात होतो तेव्हां ते नुकतेच बदली होऊन तेथून गेले होते पण तरी त्यांच्या बऱ्याच आख्यायिका संस्थेत ठेवून गेले होते. पण त्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहिले नसल्याने मला त्यामध्ये फारसा रस नव्हता आणि  आता औरंगाबादला त्यानी माझ्या पाठोपाठ प्रवेश केल्यावरही त्यांची दखल घेणे मला आवश्यक होते अशातला भाग नव्हता,     कारण त्यांच्या आख्यायिका सोलापुरात ऐकल्यामुळे शिवाय त्यांचा विभाग माझ्या अभियांत्रिकीशाखेशी संबधित नसल्यामुळे त्यांच्या जवळ जाण्याचे मला काही कारण नव्हते..

            सोलारकरांनी आल्या आल्या  वसतीगृहात ठाण मांडले होते अशी बातमी वसतीगृह प्रमुख पाटील माझ्या चांगल्याच परिचयाचे असल्याने माझ्या कानावर आली होती. बदली होऊन येणाऱ्या प्राध्यापकास काही दिवस राहण्यापुरता वसतीगृहातील गेस्टरूमचा वापर करता येत असे. पण या सवलतीचा गैरफायदा बहुतेक कोणीच प्राध्यापक घेत नसत पण सोलारकरांनी मात्र आता आपण वसतीगृहातच राहू असा विचार केल्यासारखी त्यांची वागणूक होती कदाचित एकादा वॉर्डन म्हणून आपल्याला राहता येईल अशी त्यांची अपेक्षा असावी. खर तर वॉर्डन म्हणून रहायला ती एकप्रकारची डोकेदुखीच असल्याने सहसा कोणी तयार होत नसे त्यामुळे असा तयार बकरा मिळाला तर पाटलाला हवाच होता. एवढेच काय पण माझी जागेची अडचण पाहून त्याने मला तसा आग्रहही करून पाहिले होते. मात्र सोलारकरला त्याने दोनच दिवसात चांगलेच पारखले आणि याला वॉर्डन म्हणून घेतल्यास मुलांच्या ऐवजी यालाच कसे गप्प करायचे असा आपल्याला प्रश्न पडेल हे त्याने ओळखले आणि ही ब्याद लवकरात लवकर तेथून कशी बाहेर काढायची हाच विचार तो करत होता अशातच कधीतरी माझ्या तोंडून मी राहत असलेल्या बंगल्यात एक जागा रिकामी आहे हे त्यांच्या कानावर घालण्याचा मूर्खपणा माझ्याकडून झाला होता.

          मी ज्या बंगल्यात भाडेकरू म्हणून राहत होतो ती जागा मलाच माझ्या   सहकारी प्राध्यापकाच्या ओळखीतून मिळाली होती. मालकांनी ती केवळ आपल्या जावयाचा मित्र म्हणून मुद्दाम मोकळी करून दिली होती. पुढे त्यानी सेवानिवृत्त झाल्यावर त्यात थोडी वाढ करून त्याच बंगल्यात आणखी दोन खोल्या भाड्याने देता येतील अशी व्यवस्था त्यांनी नुकतीच केली होती आणि ही गोष्ट मी व देशपांडे यांच्या दुर्दैवाने आणि सोलारकरांच्या सुदैवाने नेमकी त्यांची औरंगाबादला बदलून येण्याच्या सुमारासच घडली होती.

        एक दिवस मी व माझी बायको  काहीतरी खरेदीसाठी बाहेर पडलो आणि माझ्या मनात नसले तरी कधी नव्हे ते दोन तीन तास  खरेदीत घालवून आम्ही घरात प्रवेश करताच मालकांनी विजयी मुद्रेने आमचे स्वागत करत आम्हाला बातमी दिली,

"तुमच्या मित्राला शेजारची जागा दिली बरका. " माझ्या मुळीच लक्षात येईना ते काय म्हणत आहेत ते. पण त्यांनी मित्राचे नाव काय हे विचारल्यावर जे उत्तर दिले ते ऐकून पाटलाने मी घरात नाही याचा फायदा घेऊन दावा साधल्याचे ध्यानात आले कारण त्यानी सांगितलेले नाव होते सोलारकर. त्यावेळी इतरांशी विशेषत: अगदी कमी ओळख असताना समोरच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलण्याच्या घनश्यामी (पाहा भावबंधन) वृत्तीमुळे आणखी एक मूर्खपणा माझ्याकडून झाला होता तो म्हणजे सोलारकरांची गाठ पडली असताना त्यांच्या तोंडून ते यवतमाळला होते असा उल्लेख आल्यावर सौ. वतीच्या मातोश्रीही यवतमाळच्या बी. एड. महाविद्यालयात प्राध्यापक होत्या असे मी बोलता बोलता सांगून टाकले होते, माझ्या इतक्या क्षुल्लक चुकीचा पुढे होणारा घोर परिणाम त्यावेळी अजमावणे मला शक्यच नव्हते कारण आमच्या मालकांशी बोलताना लगेच सोलारकरांनी आपली बायको आमच्या सौ. च्या आईची विद्यार्थिनी होती आणि त्या तिच्या आवडत्या प्राध्यापिका होत्या असे तिखटमीठ लावल्यावर त्याना जागा दिल्याचा आम्हाला आनंदच होणार असा मालकांचा हिशोब.

      मालक  आपण आपल्या जावयाच्या आणखी एका मित्राला जागा दिली या आनंदात होते. कारण मी त्याच नात्याने त्यांच्या घरात राहत होतो. "अहो त्या तुमच्या मित्राच्या सौभाग्यवती तुमच्या सासूबाईंच्या विद्यार्थिनी होत्या खूपच तारीफ करत होत्या त्या किती छान शिकवतात याची. "सोलारकर आणि त्यांच्या सौ. नि मालकांच्यावर चांगलीच मोहिनी टाकलेली दिसली. पाटलाने वसतीगृहातली ब्याद अशा प्रकारे माझ्या शेजारी आणून टाकण्याचा डाव तर अगदी सफाईने पार पाडला. मी मात्र आपल्याला अगदी बरोबर त्याच वेळी बाहेर जावे लागल्याबददल नशीबाला बोल लावत बसलो. खर तर मी सोलापूरकरांकडून सोलारकरांविषयी थोडेफार ऐकले होते तो तर केवळ ट्रेलरच होता हे ते प्रत्यक्ष शेजारी रहायला आल्यावर समजू लागले.

  तसे सोलारकर बोलायला फार वाईट होते अशातला भाग नव्हता कधीतर ते फारच गोड बोलत. पण त्या गोड बोलण्यातून एक वेगळीच छटा डोकावे.   घरात त्यांच वागण अगदी विक्षिप्त असे. त्यांच्या सौ. वती आणि त्याचे साधे बोलणेही भांडणासारखेच वाटे.   तशी त्यांची पत्नी त्याना तोडीस तोड होती, तरीही त्यांच्या विचित्र अवतारापुढे तिला माघार घ्यावी लागायचीच. कारण हा गृहस्थ तिच्या अंगावर हात उचलायलाही कमी करणार नाही असे वाटे पण मग ते बाहेर गेले की ती अगदी सूड घेतल्यासारखे वागत असे. त्याकाळात येणाऱ्या बोहारणींना ती नवऱ्याचे अगदी नवे कोरे कपडेही आरामात देऊन टाकायची आणि ते जेव्हां त्याविषयी विचारत तेव्हां अगदी सहजपणे आपली कृती वर्णन करून त्याना सांगे, त्यावर सोलारकरांचा पारा चढून ते अद्वातद्वा बोलू लागत ते इतक्या जोरात की आमच्या घरात तर ऐकू येतच असे पण आजूबाजूच्या घरातही त्याचे प्रतिसाद उमटायचे. पुढे पुढे शेजाऱ्यांना ही अगदी करावाचून करमणूकच झाली.

                      सोलारकरांना आपली बायको सुंदर आहे असे वाटे आणि त्यामुळे तिच्याविषयी सदैव त्यांच्या मनात संशयाचे भूत उभे असे पण त्याचबरोबर तिने नोकरी करावी अशीही त्यांची इच्छा असे. ती बाई हुशार होती आणि तिने चांगले प्रथम श्रेणीत एम. एस. सी केले होते शिवाय आमच्या सासूबाईंच्या हाताखाली त्यानी बी एड पण केले होते त्यामुळे त्याना कोणत्याही महाविद्यालयात सहज प्राध्यापक म्हणून नोकरी मिळण्यासारखी होती. लगेच सोलारकरांनी मोर्चे बांधायला सुरवात केली आणि एका महाविद्यालयाच्या प्राचार्यावर सपत्निक धाड घातली आणि त्यांच्या पत्नीला प्राध्यापक म्हणून नियुक्ती पण करून घेतली पण त्यामुळे तिला घर सोडणे भाग होते अर्थातच सोलारकर महाशयांना घराकडे लक्ष देणे भाग पडले. अगोदरच पत्नीचेही घराकडे लक्ष यथातथाच असलेले त्यात परत तिच्या नोकरीची भर पडलेली. त्यामुळे घर म्हणजे उकिरडा बरा म्हणण्याची पाळी आली. एकदा ती महाविद्यालयात गेल्यावर चहा करण्यासाठी पेटवलेला वातीचा स्टोव्ह हे महाशय तसाच चालू ठेवून कॉलेजात गेले. सुदैव एवढेच की त्यात तेलच कमी असल्याने तो फार काळ जळत राहिला नाही. आणि ही गोष्ट हे गृहस्थच अभिमानाने सांगू लागले.

            या दांपत्यास एक मुलगीही होती ती होती हुशार पण त्यानाच शोभेल अशी गुणी पण होती त्यामुळे ती बाबांविषयी ते नसताना आईला आणि आई नसताना तिच्याविषयी बाबांना काहीबाही सांगून अगोदरच जळत असलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम करत असे. एकदा संशयाच्या पिशाच्चाने झपाटलेल्या सोलारकरने बायकोला रात्रभर घराबाहेर ठेवले आणि तीही तशीच दारात बसून राहिली. दारात पेपर पडला तरी तो आणायचा कोणी याविषयी दोघात भांडणे होत.      

          आमचे मालक म्हणजे अगदी भोळे सांब. घरात बदल करताना नळाची जोडणी मात्र त्यानी पूर्वीसारखीच ठेवली होती. पूर्वी त्यांच्याकडे असलेल्या स्वयंपाकघरातून नळाची जोडणी सुरू होऊन माझ्या घरातील खोल्यात व त्यांच्या नवीन बांधलेल्या भागात या पद्धतीने नळ नेलेला होता. आता मालकांचे स्वयंपाकघर सोलारकरांच्या वाटणीला आले होते. सकाळी पाण्याची वेळ झाल्यावर पाणी आता प्रथम सोलारकरांच्या नळास येत असे आणि ती सर्व मंडळी अगदी आरामात नळ उघडे ठेवून झोपत असत. त्यांच्या घरातून पाण्याचा व घोरण्याचाआवाज येई पण बाकी इतरत्र पाण्याचा ठणठणाट शेवटी त्यांच्या दारावर ठोकून त्यांना उठवावे लागे. तेव्हां इतरांना पाणी मिळे. म्हणजे आमच्या मालकांची स्थिती खरोखरच "असुनी खास मालक घरचा पाणी ना तयाला" अशी व्हायची.

          सोलारकरांना कितीही सांगितले तरी त्यांच्या दिनक्रमात फरक पडायला तयार नव्हता. आमचे मालकही पाकने कितीही खोड्या काढल्या तरी खलितेच पाठचणाऱ्या सहिष्णू भारतीय मनोवृत्तीचे त्यामुळे यावर आपणच काहीतरी करायला हवे म्हणून मी एक दिवस आमच्या महाविद्यालयातील प्लंबरला घरी आणून अंगणात एक नळ होता त्याला तोटी बसवून घेतली आणि घरात पाणी नेणाऱ्या नळीवर एक झडप बसवून ती बंद करून घेतली आता मालकांसकट सर्वांनाच बाहेरूनच पाणी भरायला भाग पाडले कारण नाहीतरी सोलारकरांच्या आडमुठेपणामुळे मालकानाही पाणी मिळत नसे. या उपायाने सोलारकर वठणीवर नाही तरी सर्वांच्या पातळीवर आले. आता त्यांना बाहेरून पाणी भरणे जड जाऊ लागले त्यामुळे त्यांनी आतून नळ उघडा ठेवणार नाही अशी कबुली दिली आणि मग सर्वांनाच पाणी घरात भरता येऊ लागले.

        पाण्याचा त्रास जरी थांबला तरी सोलारकर पतीपत्नींची भांडणे ही मालकांना मोठी डोकेदुखी होती. सोलारकरांना परोपरीने समजावून सांगितले तरी त्यांच्या भांडणसत्रात काही फरक पडत नव्हता. मुख्य म्हणजे त्यांचे भांडण म्हणजे मालकाना व आम्हाला डोकेदुखी असली तरी शेजारच्या वाड्यातील लोकांना मात्र ती अगदी फुकटात करमणूक झाली होती ते सर्व लोक त्यांच्या  भांडणाची विडिओफिल्म असल्यासारखे हा प्रकार दररोज एंजॉय करायचे. त्यावेळी औरंगाबादला दूरदर्शन आले नव्हते. शेवटी मालकांनी बराच बाबापुता करून ती ब्याद कशीबशी घालवली आणि आम्ही सर्वच जरा शांतपणे जीवन कंठू लागलो.

              आज त्या थोर सोलारकरांची आठवण लोटांगण्यांनी काढली आणि या सर्व प्रकारांची मला आठवण झाली. मी लोटांगणे यांना विचारले, "अहो पण तुम्हाला कशाला हवे आहेत आमचे सोलारकर? "

" काय सांगू साहेब सध्या ते माझ्याकडे भाडेकरू आहेत आणि त्यांच्या भांडणामुळे आम्ही सगळे आणि आमचे सगळे शेजारी त्रस्त आहेत, तेव्हां मला वाटले तुमचा आणि त्यांचा परिचय असेल तर तुम्ही चार शब्द सांगून बघितले आणि त्यांच्यात काही फरक पडला तर पाहावे. "

" बरका लोटांगणे, तुमचा माझ्यावर असलेला हा विश्वास असाच राहावा म्हणून या गोष्टीत मला लक्ष घालायला लावू नका. " मी त्यांना अगदी गोड शब्दात कटवले. अखेर लोटांगण्यानी आपले सार्वजनिक बांधकाम खात्यात असलेले वजन खर्च करून सोलारकरांना शासकीय सदनिकेत जागा मिळवून दिली आणि लोटांगण्यांची सुटका झाली. अर्थात त्यामुळे त्यांच्या शासकीय सदनिकेतील त्यांचे शेजारी मात्र त्यांच्या तावडीत सापदले आणि त्यांची सुटका सोलारकर सेवानिवृत्त झाल्यावरच झाली.