ओशो आणि मी (चार)

(दिवसातल्या ठराविक वेळात कुणीही समाधीत जाऊन शांतपणे बसू शकतं, फ्री ऑफ चार्ज! या समाधीत मी कितीदा आणि किती वेळ बसलो आहे याचं आज मला स्मरण नाही. )

मी आश्रमात पोहोचलो तेव्हा ओशो जाऊन तीन वर्ष झाली होती.

मी जसजसा ओशोंच्या पुस्तकात आणि प्रवचनात खोल उतरू लागलो तसं माझ्या लक्षात आलं की पोहता येत नसतांना आपण एका अथांग आणि विस्तीर्ण समुद्रात उडी घेतलीय. सत्याचा इतका मोह मला पडला होता की परतीच्या सर्व वाटा बंद झाल्या होत्या, नव्हे परतीचा विचारच मी करू शकत नव्हतो.

आध्यात्मिक प्रवासात माझा एक फायदा झाला ओशोंचं लेखन मला उपलब्ध होतं पण मार्गदर्शन मात्र कुणाचंही नव्हत त्यामुळे माझी दिशा मीच ठरवणार होतो.

कोणतही ध्यान करणं आता मला वेडेपणा वाटायला लागला, डायनॅमिक मेडिटेशन साक्षात्काराप्रत नेईल असं मला वाटेना. शांत बसणं आणि ज्याच्याशी पहिल्या वाचनात सूर जुळेल ते पुस्तक विकत घेऊन वाचणं असा माझा प्रवास सुरू झाला. कोणतंही पुस्तक मी असं काही मन लावून वाचत गेलो की त्यातनं माझ्या मनातले एकेक पेच सुटत गेले. आत्मसात झालेली प्रत्येक गोष्ट मी आचरणात आणत गेलो. वेळ हा भास आहे हे मनोमन पटल्यावर मी जे घड्याळ घालणं सोडलं ते कायमच! माझ्या विचारात आणि आचरणात कमालीची एकसंधता यायला लागली.

मला वाचनाचा एक अफलातून फायदा असा झाला की जगातल्या सर्व आध्यात्मिक प्रणालींची ओळख झाली. तंत्रसूत्र हा महाग्रंथ तर मी किती वेळा वाचला असेल माझं मला माहिती नाही पण त्यातली जवळ जवळ प्रत्येक प्रक्रिया मी करून बघीतली.

भक्तीमार्गा विषयी मला विशेष आकर्षण नव्हतं पण तो मार्ग काय आहे हे समजायला मीरा आणि कबीर वाचले.

सांख्ययोगाचा मानबिंदू आष्टावक्र त्याच्या सहाच्या सहा व्हॉल्यूम्स मधून अक्षरशः कोळून प्यालो.

भगवत गीता सर्वच्या सर्व व्हॉल्यूम्स एकेक करत शांतपणे संपूर्ण जाणून घेतली.

उपनिषदांत काय सांगीतलंय ते शोधलं आणि मला ईशावास्य उपनिषद सर्वात थोर वाटलं.

बुद्धाच्या अफलातून बुद्धीमत्तेचा, त्याच्या शून्याचा वेध घेतला आणि महावीराची अहिंसा जाणून घेतली.

सूफिझम मधलं समर्पण आणि जुन्नेदचं मनातून बाहेर काढणारं व्हर्लींग मेडिटेशन अनेक वेळा करून बघीतलं.

मला सर्वात जास्त उपयोगी काय झालं असेल तर झेन!

एकदा रात्रीचे दीड दोन वाजले असावेत, मी एक झेन कथा वाचत होतो. एक साधक अनेक वर्ष एका गुरूकडे साधना करत असतो पण त्याला सत्याचा बोध होत नाही मग निराश होऊन तो आश्रमातून निघतो. आता काहीही मिळवायचं नाही आणि कितीही केलं तरी काही मिळणार नाही या अवस्थेत तो आश्रमाचं लोखंडी दार उघडतो. तो बाहेर पडणार एवढ्यात गुरू त्याला हाक मारतो : ए, यू!
तो सरळ गुरूकडे बघतो, क्षणभर एकदम अनिश्चीतता निर्माण होते आणि गुरू एकदम म्हणतो 'ईट इज यू! '

मी त्या क्षणी पुस्तक मिटलं, एखाद्या तीरा सारखी माझी जाणिव माझ्याकडे परतून आली आणि मला लक्षात आलं आपण स्वतःलाच शोधत होतो! माझा आध्यात्मिक प्रवास संपन्न झाला होता. एका क्षणात मला सगळ्या आध्यात्मिक ग्रंथांचे अर्थ उलगडले!

आज मागे वळून बघतांना मला वाटतं ओशो मला प्रत्यक्ष भेटले असते तर काय झालं असतं? मी ही त्यांच्या असंख्य साधकां सारखा त्यांच्या झगमगाटानी दिपून गेलो असतो आणि मग कदाचित त्या प्रभावतून बाहेर पडूच शकलो नसतो. ओशो काय म्हणतात हेच मी इतरांना सांगत बसलो असतो आणि स्वतःप्रत आलोच नसतो.

मग वाटतं मी आश्रमात गेलोच नसतो तर? तर मग मी पण त्यांच्या वादग्रस्त व्यक्तीमत्वाबद्दल वाचून आणि ऐकून त्यांची एक काल्पनिक प्रतिमा मनात निर्माण केली असती आणि आध्यात्माच्या अथांग समुद्रात उडीच घेतली नसती. भवसागरात डोलणारी माझी नैया प्रसंगांच्या हेलकाव्यात नुसती भरकटत राहीली असती.

एक खूणगाठ मात्र मनाशी पक्की केलीयं, ओशोंनी केलेली चूक अजिबात करायची नाही, गुरू तुम्हाला साक्षात्काराप्रत नेईल असा चकवा कधीही निर्माण होऊ द्यायचा नाही! कोणताही आश्रम नाही की कुणी शिष्य नाही. पहिल्याच भेटीत प्रत्येकाला सांगायचं 'योर एनलाईटन्मेंट इज योर रिस्पाँसिबिलीटी!

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १