यौवना, खुळ्या, तुझा विजय असो

तुझे राज्य आहे जेथे तिथे जगावरी
यौवना खुळ्या, तुझा विजय असो ।ध्रु।
प्रीतीचा मुकुट शोभतो तुझ्याच रे शिरी
यौवना, खुळ्या, तुझा विजय असो

मोहर चैत्रातिल तू ऽऽ
दुबळ्यांसाठी बल तू ऽऽ
मोहर चैत्रातिल तू - दुबळ्यांसाठी बल तू
वाहत माऽथी
वाहत माऽथी - भार सकल तू
जगताची लज्जा आहे तुझ्या युवा करी ।१।
यौवना, खुळ्या, तुझा विजय असो

तुज कुठले बंधन ना ऽऽ
रीतिरिवाजांकन ना ऽऽ
तुजसाठी बंधन ना -रीतिरिवाजांकन ना
तुजवर काऽही
तुजवर काऽहीच नियंत्रण ना
सर्व रुढींहून तुझी वेगळीच पायरी ।२।
यौवना, खुळ्या, तुझा विजय असो

शैशव मागे वेडे ऽऽ
ज्ञाते वार्धक्य पुढे ऽऽ
शैशव मागे वेडे - ज्ञाते वार्धक्य पुढे
ह्या युगाऽची
ह्या युगाऽची - साथ तुज घडे
आज तुझी दृष्टि असे चंद्र तारकांवरी ।३।।
यौवना, खुळ्या, तुझा विजय असो

टीपा :

४. खरे शब्दशः भाषांतर असे होईल : यौवना, खुळ्या, सदा अमर रहा

१. वृत्त (लगावली) आणि यमकांसाठी खाली पाहा.

२. ह्या कडव्यात अनेक सुधारणा शक्य आहेत. (सुचवाव्या  ) अनेक वेगळे शब्दप्रयोग केलेले आहेत. (सर्व रुढींहून तुझी वेगळीच पायरी ... हे तंतोतंत पाळले आहे  )

३. येथे एक मात्रा कमी आहे. सद्ययुगाऽची ... असे केले तर मात्रांचा हिशेब जमेल. एरवीही चालीत बाध येत नाही.

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच! गाणे उडत्या चालीचे आहे. ढिक्किटाकी टिक्किटाकी असे खेमटा तालात म्हटलेले आहे. वृत्त सैल आहे. ६ - ६- ६- ५ किंवा ६ - ६- ५ अश्या ओळी आहेत. उदा. गागागा गागागा गागागा गालगा - गागागा गागागा गालगा. अनेक ठिकाणी गागागा ऐवजी गालगाल / लगागाल / लगालगा असे अनेक बदल दिसतील (मात्रा वृत्त असावे बहुतेक! ) अर्थात चालीत म्हणायला काही त्रास होत नाही. (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

यमके : ध्रुवपदाची मुख्य दुसरी ओळ आहे पण तिचे यमक नाही. ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीचे यमक सगळीकडे आहे. ठळक केलेला भाग बघावा.

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ..   री शी जमवा बरका! (शक्यतो अरी!)