होम्स कथाःठिपकेदार पट्ट्याचे रहस्य

मला सकाळी जाग आली ती दारावरच्या थापांनी. डोळे चोळत दार उघडलं तर होम्स दारात उभा.
'मित्रा, तुझी झोपमोड केल्याबद्दल क्षमस्व. पण घरमालकिणीने मला जागं केलं आणि मी तुला.' इति होम्स.
'झालं काय? कुठे आग बिग लागली का?' -(अजूनही झोपेत)मी.  
'नाही, बाहेर एक बाईसाहेब भल्या पहाटे येउन बसल्या आहेत मला भेटायला. इतक्या पहाटे ती आली म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर बाब असणार. तयार हो आणि चल माझ्याबरोबर दिवाणखान्यात.'


होम्स आणि मी बाहेर आलो. होम्सने त्या स्त्रीला बसायला सांगितले व म्हणाला, 'बाईसाहेब, आपण रात्रीचा प्रवास करुन इतक्या भल्या पहाटे मला भेटायला आला आहात त्याअर्थी बाब तितकीच गंभीर असणार. कृपया आरामात बसा. मी घरमालकीणबाईंना चहाची व्यवस्था करायला सांगतो. आपण थंडीने कुडकुडत आहात.'
ती स्त्री म्हणाली, 'नमस्कार. मी हेलन स्टोनर. आणि मी कुडकुडते आहे ती थंडीने नाही, भितीने.'
'बाईसाहेब, कृपया मला सर्व सविस्तर सांगा. हा माझा विश्वासू मित्र वॅटसन. याच्यासमोर बोलायला काहीच हरकत नाही.'-होम्स.


त्या स्त्रीने सांगायला सुरुवात केली.
'मी माझ्या सावत्र वडिलांबरोबर राहते. माझे वडिल म्हणजे स्टॉक मोरॉनच्या रॉयलॉट घराण्याचे शेवटचे आणि एकमेव वारस. पूर्वी श्रीमंत असलेलं हे घराणं शेवटच्या २-३ पिढ्यांपर्यंत देशोधडीला लागलं. डॉक्टर रॉयलॉट, म्हणजेच माझे वडील त्या काळी भारतात गेले. तिथे त्यांनी काही वर्षे घालवली. माझी आई ही तिथल्या एका लष्करी अधिकाऱ्याची पूर्व पत्नी. ते युद्धात मारले गेले आणि डॉक्टर ऱॉयलॉटनी माझ्या आईशी लग्न केले आणि ती आणि आम्ही दोघी मुली त्यांच्याबरोबर राहू लागलो. आईचा एका आजारात मृत्यू झाला, तिने मी, माझी बहिण आणि आमचे सावत्र वडिल याना दरमहा काही रक्कम मिळेल अशी तरतूद ठेवली. ती गेल्यानंतर ऱॉयलॉट यांच्या सांगण्यावरुन मी आणि माझी बहिण त्यांच्या स्टॉक मोरॉन मधल्या वाड्यात त्यांच्याबरोबर राहू लागलो.'


होम्स डोळे मिटून लक्षपूर्वक ऐकत होता. मधेच तो म्हणाला, 'रॉयलॉट घराण्याबद्दल मी सुद्धा ऐकले आहे.'
हेलन पुढे सांगू लागली,
'डॉक्टर रॉयलॉट हे आसपासच्या भागात एक तापट गृहस्थ म्हणून प्रसिद्ध आहेत. जवळपासच्या लोकांशी अनेक मारामाऱ्या , भांडणं यामुळे त्यांची ख्याती आसपासच्या गावात चांगली नाही. तरीही मी आणि माझी बहिण एकोप्याने आणि येतील ते दिवस एकमेकींच्या साथीने आनंदाने घालवत राहत होतो.  माझ्या बहिणीचे ती मावशीकडे काही दिवस गेली असताना एका तरुणावर प्रेम जडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. रॉयलॉटना हे फारसे आवडले नाही. पण तरीही त्यांनी लग्नाला संमती दिली. पण नशिबात काही वेगळेच वाढून ठेवले होते. माझ्या बहिणीचा लग्नाच्या आदल्या दिवशीच मृत्यू झाला.' हेलनचे डोळे भरुन आले.   


'बाईसाहेब, कृपया मला सर्व सविस्तर सांगा म्हणजे मी तुम्हाला चांगल्याप्रकारे मदत करु शकेन.'
'त्या दिवशी वादळी रात्र होती. मी आणि माझी बहिण रात्री माझ्या खोलीत गप्पा मारत बसलो होतो. ती खूप खूष होती. आम्ही रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या आणि ती झोपायला निघाली.  अचानक तिने वळून विचारले, 'हेलन, तुला कधी रात्री कोणीतरी शीळ घातल्याचा आवाज आलाय का?' मी म्हटलं, 'नाही गं, आणि तुला माहितीच आहे माझी झोप किती गाढ आहे ते.' ती म्हणाली, 'कदाचित तुलाच झोपेत शीळ घालायची सवय वगैरे?' मी म्हणाले, 'नाही गं. का?' ती म्हणाली,'गेले काही दिवस मध्यरात्रीनंतर मला एक शीळ ऐकू येते आणि मी दचकून जागी होते. माझी झोप पण सावध आहे. पण उठून पाहिल्यावर ती शीळ कुठून आली तेच कळत नाही. बरं ते जाऊदे, मी झोपते आता. शुभ रात्री.' आणि ती झोपायला गेली. मी पण खोलीला कुलुप लावून झोपले. रात्री केव्हातरी अचानक मला तिच्या किंकाळीने जाग आली. मी धावत धावत तिच्या खोलीपाशी गेले तर दरवाजा अर्धबट उघडा होता.'


'तुम्ही रात्री खोलीच्या दरवाज्यांना कुलपं लावून झोपता?' होम्सने डोळे न उघडता विचारले. त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे दिसत होते. मी ही चिन्हं ओळखत होतो. त्याच्या विचारांची गाडी मनात भरधाव धावू लागली होती.


हेलन म्हणाली, 'हो. आम्ही कुलपं लावून झोपतो कारण डॉक्टर रॉयलॉटना प्राण्यांची आवड आहे. त्यांना भारतातून येतानाकोणीतरी भेट दिलेले चित्ता आणि एक माकड त्यांनी वाड्यात ठेवले आहे. आम्ही कायम जीव मुठीत धरुन वावरत असतो. हां, तर मी दरवाज्यापाशी गेले आणि दरवाजा हलकेच उघडला. आत माझी बहिण उभी होती. तिचा चेहरा भितीने पांढराफटक पडला होता आणि तिचा तोल जात होता. मी तिला सावरलं. ती कशीबशी म्हणाली, 'हेलन, तो..तो..ठिपकेदार पट्टा....' आणि डॉक्टर रॉयलॉटच्या खोलीकडे बोट दाखवून काहीतरी बोलणार तितक्यात तिची शुद्ध गेली. मी पटकन डॉक्टर रॉयलॉटना बोलावलं, त्यांनी पण उपचार केले, पण ती शुद्धीवर आलीच नाही.' हेलनला हुंदका फुटला.


होम्सने विचारले, 'बाईसाहेब, खोलीच्या खिडक्या बंद होत्या का? आणि तुमची बहिण मरतेवेळी बाहेरच्या कपड्यात होती का?'


हेलन म्हणाली, 'खिडक्या अगदी व्यवस्थित बंद होत्या. आणि ती रात्रीच्याच कपड्यात होती. तिच्या एका हातात जळलेली काडी आणि दुसऱ्या हातात मेणबत्ती होती. मृत्यूनंतरच्या तपासणीत पण त्यांनी सर्व शक्यतांचा शोध घेतला, पण काहीही पुरावा मिळाला नाही आणि खोलीच्या खिडक्या पण नीट बंद होत्या. तिच्या मृत्यूचे कारण हे एक रहस्यच राहिले.'


'त्यानंतर वर्षभराने मी एका व्यक्तीच्या प्रेमात पडले. यावेळी डॉक्टर रॉयलॉटनी काहीही विरोध न दर्शवता आमच्या लग्नाला संमती दिली. माझ्या खोलीत काही दुरुस्तीकाम चालू असल्याने मला माझ्या बहिणीच्या खोलीत झोपावं लागलं.  काल रात्री अचानक मी ती शीळ ऐकली जी माझ्या बहिनीने मृत्यूच्या काही दिवस आधी आणि मृत्यूच्या वेळी ऐकली होती. मी खूप घाबरले. माझी झोप उडाली. कशीबशी मी काही तास थांबले आणि तडक तुमच्याकडे आले. माझ्याकडे कोणताही संशय घ्यायला काहीही पुरावे नाहीत, पण मला हे सर्व बरोबर वाटत नाही आणि त्या घरात राहणं धोक्याचं वाटतं आहे.'


होम्सचा चेहरा गंभीर झाला होता. 'बाईसाहेब, तुम्ही आता जी मिळेल ती गाडी पकडून तुमच्या घरी जा. आम्ही दोघे इथली काही कामं उरकून शक्य तितक्या लगेच तिथे येतो आणि सर्व परिस्थिती पाहतो. तुम्ही परत जाऊन नेहमीसारखी वागणूक आणि दिनक्रम चालू ठेवा आणि कोणाला संशय येऊ देऊ नका.'


आणि आम्ही दुपारच्या गाडीने निघून स्टॉक मोरॉनला पोहचलो. सुदैवाने हेलन रस्त्यातच भेटली. डॉक्टर रॉयलॉट शहरात गेले होते आणि काही तासांचा वेळ होता. होम्स आणि मी वाड्यात गेलो. होम्सने बहिणीची ती खोली पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
खोली साधी आणि मोजकेच सामान असलेली होती. होम्सची तीक्ष्ण नजर खोलीभर फिरत होती.  
'ही घंटेची दोरी आहे ना?' होम्सने पलंगावर लोंबणाऱ्या दोरीचे टोक उचलून विचारले.
'हो. ही काही दिवसांपूर्वीच डॉक्टर रॉयलॉटनी लावली. खरं म्हणजे आम्ही दोघी बसल्या जागी घंटी वाजवून नोकरांना बोलावत नाही. स्वतःची कामं स्वतःच करतो.'
होम्सने घंटा वाजवण्यासाठी दोरीला झटका दिला, पण काहीच आवाज आला नाही.
'ही दोरी घंटेला जोडलेलीच नाही. मुळात ही दोरी कुठेच खोलीबाहेर जात नाहीये. याचं वरचं टोक बघा, आढ्याला एका हूकाला बांधलेलं आहे.' होम्स वर मान उंचावून पाहत म्हणाला. 


'खरंच, विचीत्र खोली आहे. न वाजणारी घंटा, आणि खोलीच्या बाहेर न उघडता दुसऱ्या खोलीत उघडणारा हा हवेचा झरोका..' होम्स एका लहानश्या झरोक्याकडे पाहत विचारमग्न चेहऱ्याने म्हणाला. तो खूप गंभीर दिसत होता. तो म्हणाला, 'बाईसाहेब, जर जीव वाचवायचा असेल तर मी म्हणतो तसं करा. आज रात्र या खोलीत झोपू नका, म्हणजे झोपल्याचे ढोंग करा, पण सर्व निजानीज झाल्यावर लगेच खिडकीतून आम्हा दोघांना इशारा करा. आम्ही दोघं रात्र या खोलीत काढू. तुम्ही गुपचूप आपल्या खोलीत झोपा दुरुस्तीकाम चालू असलं तरी.' मी आणि होम्स बाहेर पडलो.


होम्स खूप गंभीर होता. तो म्हणाला, 'मित्रा, खरं म्हणजे आजच्या कामगिरीत तुझ्या जिवाला धोका आहे. तू माझ्याबरोबर येणं नाकारु शकतोस. आणि तू तसं करावं असं मला वाटतं.'
मी म्हणालो, 'मी तुझ्याबरोबरच येणार कितीही धोका असला तरी. पण तू असं म्हणतोस म्हणजे नक्की तुला कसलीतरी निश्चित शंका आली आहे.'


होम्स म्हणाला, 'तू तो पलंग नीट पाहिलास का? तो खालून खिळ्यांनी पक्का जमिनीला जखडलेला आहे. पलंग जमिनीला पक्का, त्यावर एक घंटेचा दोर तशी विशेष गरज नसताना टांगला जातो.. आणि त्या पलंगावर झोपणारी व्यक्ती लगेच काही दिवसात मरते. एक खूप मोठं कारस्थान इथे शिजतं आहे आणि आज रात्री आपण त्या कारस्थानाचे प्रत्यक्ष साक्षीदार बनणार आहोत.' 


होम्स आणि वॅटसन या जिवावरच्या कामगिरीतून सहीसलामत सुटतात का, हेलनच्या बहिणीचा मृत्यू कोणत्या प्रकारे झाला,आपल्या प्रिय बहिणीला गमावल्यावर आता हेलनचा जीव तरी वाचतो का, डॉक्टर रॉयलॉटचा खरंच या कारस्थानात हात आहे का... जाणण्यासाठी वाचा 'ठिपकेदार पट्ट्याचे रहस्य' .
(-मूळ कथेचा स्वैर अनुवाद)