होम्स कथाः असा गवसला नीलमणी..

नाताळाची रात्र कालच झाली होती. म्हटलं होम्सकडे चक्कर टाकावी आणि त्याला प्रत्यक्षच नाताळाच्या शुभेच्छा द्याव्या.


होम्स कोचावर पसरला होता. नेहमीप्रमाणेच त्याच्या शेजारी त्याचा पाईप आणि वाचून अस्ताव्यस्त पसरलेली अलिकडच्या वर्तमानपत्रांची रद्दी होती. समोर खुर्चीच्या पाठीवर अडकवलेल्या एका जुनाट टोपीने माझं लक्ष वेधून घेतलं. खुर्चीवर पडलेलं भिंग आणि वस्तू उचलायचा चिमटा पाहून मी अंदाज केला कि महाशयांचा त्या टोपीचा सखोल अभ्यास आत्ताच झालेला दिसतोय.


'तू कामात दिसतोयस. मी नंतर येऊ का?' -मी.
'नाही रे. मी एका प्रसंगाबद्दल चर्चा करायला तुझ्याकडेच येणार होतो. खरंच, विचीत्र गोष्ट आहे.' -होम्स त्या टोपीकडे विचारमग्न चेहऱ्याने पहात म्हणाला.
'म्हणजे या टोपीचा संबंध एखाद्या गुन्ह्याशी आहे आणि तू त्याचा शोध लावणार आहेस.'
'तीच तर गंमत आहे. गुन्हाच घडलेला नाहीये. तुला तो पोलीस पीटरसन माहितीये का?' -होम्स गूढ हसत.
'म्हणजे ही जुनाट टोपी त्या पीटरसनची आहे?'
'नाही, ही त्याला काल रात्री सापडली. आणि तीपण एका नाताळाच्या भरगच्च कोंबड्याबरोबर. हे तर नक्की कि तो बिचारा कोंबडा आता पीटरसनच्या शेगडीवर असेल. झालं असं कि काल पीटरसन कामावरुन येत होता. काही मवाली सोडले तर रस्ता तसा मोकळाच होता. एक माणूस खांद्यावर हा कोंबडा घेऊन चालला होता. अचानक त्याच्या समोरच आसपासच्या मवाल्यांत काही मारामारी झाली. एकाचा धक्का लागून त्याची टोपी खाली पडली. अगदी नकळत त्या माणसाकडून स्वसंरक्षणार्थ  हातातली काठी उंचावली गेली. ती काठी मागच्या दुकानाच्या काचेला लागून काच फुटली. पीटरसन त्या मवाल्यांपासून त्या माणसाला वाचवायला पुढे आला.पण आपण काच फोडली म्हणून हा पोलीस शिक्षा करायला येतो आहे असं समजून तो माणूस टोपी आणि तो कोंबडा तिथेच सोडून पळून गेला. पीटरसनने त्याची वाट पाहिली, पण तो परत आलाच नाही त्याच्या वस्तू घ्यायला. म्हणून पीटरसनने सकाळी या वस्तू माझ्याकडे आणून दिल्या. हवेत थंडी असली तरी तो कोंबडा आणखी काळ टिकणार नाही अशी चिन्हं दिसायला लागली, म्हणून पीटरसन नाईलाजाने तो  कोंबडा घेऊन गेला. आता आपल्यासमोर काम आहे ते म्हणजे ही टोपी तिच्या मालकाला सुपूर्त करणं.'-होम्स.


'पण त्याने वर्तमानपत्रात जाहिरात वगैरे दिली आहे का? नाहीतर आपल्याला तो कसा सापडणार?'-मी.
'फारसं कठीण नाही ते. आता असं बघ, कोंबड्याच्या पायाला चिठ्ठी होती 'सौ.हेन्ऱी बेकर हीस सप्रेम भेट' आणि टोपीवर हे.बे. आद्याक्षरे आहेतच. टोपी पाहून मी असं म्हणीन कि या टोपीचा मालक अत्यंत तल्लख बुद्धीचा आहे. मागची तीन वर्षं तरी तो आर्थिकदृष्ट्या संपन्न होता,पण हल्ली त्याची परिस्थिती खालावलेली आहे.त्याच्याकडे दूरदृष्टी आहे, पण पूर्वीइतकी नाही. सध्या त्याच्यावर एका वाईट सवयीचा प्रभाव आहे. आणि त्याच्या पत्नीचे पण त्याच्यावर पूर्वीइतके प्रेम राहिलेले नाही.'-होम्स.
मी उडालो. 'होम्स!!!'
'अरे हो, आणि हा मनुष्य मध्यमवयीन आहे. त्याने आता सध्याच केस कापून घेतले आहेत आणि तो लिंबाचे तेल केसाना लावतो. त्याच्या घरी अजून गॅसबत्ती आलेली नाही.मेणबत्त्याच आहेत.'-होम्सने मला अजून हादरे दिले.


'पण होम्स, नुसती ही टोपी बघून तुला इतकं कसं कळलं?'
'थोडी निरीक्षणशक्ती आणि थोडं तर्कशास्त्र. ऐक मी तुला आता समजावून सांगतो.' होम्सने पुढे बोलायला तोंड उघडले तेवढ्यात..


पीटरसन उघड्या दरवाज्यातून धावत आला. त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. 'साहेब, साहेब, तो...तो...कोंबडा..'
'काय झालं?तो कोंबडा जिवंत होऊन खिडकीतून उडी मारून पळून गेला का?'-होम्स मिश्किल हसत.
'नाही...बघा माझ्या बायकोला कोंबड्याच्या पोटात काय सापडलं ते.. ' -पीटरसनने मूठ उघडून आमच्यासमोर धरली.


होम्सने एका टोपीवरुन टोपीच्या मालकाबद्दल इतक्या गोष्टी कशा सांगितल्या? कोंबड्यात काय मिळालं?अखेर टोपीच्या मालकाला ती परत मिळाली का? कोंबड्याच्या पाठीमागे कोण लागलंय आणि का? हा उलगडा होण्यासाठी वाचा ' असा गवसला नीलमणी. '