केस ऑफ़ आयडेंटिटी

होम्सची ही केस 'तो मी नव्हेच' प्रकारची आहे. गोष्टीच्या सुरुवातीला होम्स आणि वॅटसन सामान्य जनजीवनातही किती असामान्यत्व लपलेले आहे अश्या गप्पा मारत असतात. त्यात नेहमीप्रमाणे एक-दोन जुन्या अशिलाचे उल्लेख, चालू घडामोडींचे उल्लेख येतात. अश्या थोड्या माहितीच्या तर थोड्या माहित नसलेल्या संदर्भांमुळे हे दोघे मित्र खरेच गप्पा मारत आहेत असे वाटते. कुठूनही सर कॉनन डॉयल 'वातावरणनिर्मिती' करत आहेत असे वाटत नाही. होम्सकथांतील या सहजपणामुळे वाचकाला त्या खऱ्या आहेत असे वाटायला लागते.


गप्पा सुरू असताना, खिडकीतून बाहेर डोकावणाऱ्या होम्सला पलीकडच्या पदपथावर एक स्त्री दिसते. तिच्या मनाची दोलायमान अवस्था त्याच्या लक्षात येते आणि ही आपली पुढची अशील हेही. होम्सकथांतील सारीच वर्णने चित्रदर्शी असतात. एखाद्या नव्या पात्राबद्दल सांगताना लेखक अगदी नेमक्या शब्दात ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी करतो. या कथेत ही अशील मेरी व तिचे सावत्र वडील विंडीबँक अशी दोनच पात्रे आहेत. दोघेही थेट लंडनच्या रस्त्यावरून गोष्टीत आणून ठेवल्यासारखे वाटतात.


होम्सच्या प्रत्येक कथेत त्याच्या निरीक्षणतंत्राची उदाहरणे असतात. कधी वॅटसनशी गप्पा मारताना, तर कधी अशिलाला चकित करताना! तशी ती या कथेतही आहेत. मेरीचा पेशा, तिची मनस्थिती होम्सच्या लगेच लक्षात येते. पुढे तिची गोष्ट ऐकता ऐकता तिच्या प्रश्नाचे उत्तरही त्याला मिळते. मेरी एका नृत्याच्या कार्यक्रमात होज्मर एंजलला भेटते. त्याच्या मनमिळाऊ स्वभावाने तिला तो आवडतो. त्यालाही ती आवडते असे तो सांगतो. पण मेरीच्या सावत्र वडिलांना तिचे हे वागणे, नृत्याला वगैरे जाणे मुळीच पसंत नसते. होज्मरही, तिचे वडील कामानिमित्त फ्रान्सला गेलेले असतानाच तिच्या घरी येतो, एरवी ते दोघे केवळ पत्रातून एकमेकांना भेटतात. मेरीच्या आईला होज्मर आवडतो. तो मेरीला लग्नासाठी विचारतो, बायबलावर हात ठेवून केवळ ती केवळ त्याचीच होईल असे वचनही घेतो. पुढच्याच शुक्रवारी लग्न करायचे म्हणतो. मेरीला वडील फ्रान्सहून येईपर्यंत थांबावेसे वाटते; काही लपून छपून करायला नको असे वाटते. पण तिची आई होज्मरला पाठिंबा देते. त्याप्रमाणे अगदी साधेपणाने लग्न करायचे ठरते. लग्नाच्या दिवशी सकाळी होज्मर त्यांना घ्यायला घोडागाडी घेऊन येतो. मेरी व तिची आई घोडागाडीतून तर तो मोटारीतून चर्चाकडे निघतात. पोचतात तेव्हा होज्मर गायब! मोटारीचा चालकही चक्रावतो. आपल्या हरवलेला वर शोधून देण्याची विनंती करायला मेरी होम्सकडे येते.


मेरीची गोष्ट ऐकून, दोनतीन तपशील विचारून होम्स तिला होज्मरला विसरून जायचा सल्ला देतो. मेरीला ते पटत नाही. पुढे होम्स आपल्या बेकर स्ट्रीटवरच्या घरातून न हलता हरवलेल्या वराचा कसा शोध घेतो, होज्मर मुळात कुठे हरवतो, का, होम्स त्याचे काय करतो हे टिपीकल होम्सकथेला शोभणारे आहे. त्यात गोष्टीला पूरक होम्सचे टंकयंत्राविषयीचे संशोधन, आणि तसा काही संदर्भ नसणारे रसायनशास्त्राचे प्रयोग असे सगळे सहजपणे येते. होम्सच्या निरीक्षण तंत्राच्या बरोबरीने कथानकातील हा सहजपणाही होम्सकथांच्या यशाचा वाटेकरी आहे असे मला वाटते.