आपल्या पंतप्रधानांचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दिलेले भाषण भारताच्या दीर्घकालीन हितांना पोषक आहे काय?

आपल्या पंतप्रधानांचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत दिलेले भाषण भारताच्या दीर्घकालीन हितांना पोषक आहे काय?

कित्येक
ठिकाणी एकाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने तोंड उघडण्यापेक्षा ते बंद
ठेवणेच त्या देशाच्या दीर्घकालीन हिताचे असते. काल संयुक्त राष्ट्रांच्या
आमसभेत बोलताना आपले पंतप्रधान आपले तोंड बंद
ठेवण्याबद्दलचे "पथ्थ्य" पूर्णपणे विसरले असेच मला वाटले.

बांगलादेशबरोबरच्या
संबंधांतील सुधारणा, आपल्या वाढत्या सामर्थ्यानुसार त्या सामर्थ्याला
शोभेशी जबाबदारी उचलण्याची भारताची तयारी, संयुक्त राष्ट्रांच्या घटनेमधील
जरूर असलेल्या  रचनात्मक बदलांची निकड वगैरे योग्य मुद्दे त्यांनी उपास्थित
केले पण त्यांनी एकूण उपस्थित केलेले इतर मुद्दे पहाता एकंदर
गोळाबेरीज भारताच्या हितास पोषक होती असे निदान मला तरी वाटले नाहीं.

उदाहरणार्थ,
लिबियाशी आपल्याला काय देणे-घेणे आहे? खरे तर तो देश आतापर्यंत
पाकिस्तानच्याच जास्त जवळ होता. पाकिस्तानच्या अणूबाँब बनविण्याच्या
प्रकल्पात लिबियाने पाकिस्तानला थोरल्या भुत्तोंच्या वेळेपासून भरघोस
आर्थिक मदत केली होती व म्हणूनच कीं काय नंतर पाकिस्तानने त्यांना अणूबाँब
बनविण्याचे
तंत्रज्ञानच नव्हे तर सारी यंत्रसामुग्रीही विकली होती! पाकिस्तानने (कीं
डॉ. अब्दुल कादीर खान यांनी) लिबियाला कालबाह्य (Obsolete) यंत्रसामुग्री
विकली, ती यंत्रसामुग्री लिबियन लोकांना चालविता आली नाहीं याबाबत
"न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकात उल्लेख आहेत ते पहाता त्यांचा कल
कुणीकडे होता हे स्पष्ट होते!

कित्येक वर्षांपासून पाश्चात्य
राष्ट्रांविरुद्ध-विशेषकरून
अमेरिकेविरुद्ध-मध्यपूर्वेतील राष्ट्रांकडून सातत्याने वापरण्यात येत
असलेले दहशतवादाचे तंत्र लिबिया पहिल्यापासून वापरत आलेला आहे.
"पॅन-अ‍ॅम-१०३" हे विमान लिबियानेच बाँबस्फोट करून स्कॉटलंडवर पाडले
होते[*१]! अशा "सद्दाम हुसेन"च्या पठडीतल्या एका जुलमी हुकुमशहाची सद्दी
संपविली म्हणून भारताने पाश्चात्य राष्ट्रांचे आभार मानायचे कीं
त्यांच्यावर टीका करायची?
ट्युनीशिया, इजिप्त या राष्ट्रांच्या पाठोपाठ येमेन, लिबिया, सीरिया,
बहरीन अशा अनेक मध्यपूर्वेतील राष्ट्रांमध्ये प्रजा बंड करून उठत आहे.
लिबियात "नाटो" राष्ट्रांनी भाग घेतला नसता तर गद्दाफींनी प्रजेचे बंड
ठेचून काढले असते. अनेक दहशतवादाच्या कारवाया केल्याबद्दल पाश्चात्य
राष्ट्रांचा गद्दाफींवर राग होताच. कदाचित् म्हणूनच संधी मिळताच "नाटो"
राष्ट्रें
गद्दाफींच्याविरुद्ध बंडखोरांच्या बाजूने उभी राहिली आणि त्यांनी
गद्दाफीचे हवाई दल जमीनीवरच निकामी करून टाकले यात नवल ते कांहींच नव्हते.
पण त्याबद्दल भारताला कुठल्याही बाजूने बोलायचे कांहींच कारण नव्हते.
गद्दाफी हे कांहीं प्रजेने निवडून दिलेले लोकप्रिय अध्यक्ष नव्हते तर
पूर्वी एकेकाळी सैन्यात कर्नलच्या हुद्द्यावर असलेल्या या लष्करी
अधिकार्‍याने
कुदेताच्यामार्गे[*२] सत्ता बळकाविली होती आणि प्रजेवर
अन्याय-जुलूम-जबरदस्ती करून ती सांभाळली होती. त्यांचा भारताला पुळका
येण्याचे कांहींच कारण नव्हते आणि नाहीं.

राजकारणापायी भारताला कुठल्या
तरी एका बाजूला समर्थन द्यायची गरज निर्माण झाली असतीच तर भारताने
बंडखोरांच्या बाजूने उभे रहाणे जास्त सयुक्तिक झाले असते, गद्दाफींच्या
नव्हे. मग उगीचच "नको तिथं श्यानपना"
करून शत्रू कशाला निर्माण करायचे? केवळ आपण त्यांच्या बाजूचे आहोत असे या
मध्यपूर्वेतील राष्ट्रांना दाखविण्याखेरीज आपल्याला त्यात काय मिळाले? आणि
आपण कुणाच्या बाजूने उभे आहोत याची या सर्व राष्ट्रांना कांहींतरी पर्वा
आहे का? सौदी अरेबिया, संयुक्त अमिराती (अलीकडेपर्यंत दाऊदला आश्रय देणारे
यजमानराष्ट्र), इराण[*२], इराक, सीरिया, अशी बहुतेक सर्व राष्ट्रें
आपल्यापेक्षा
पाकिस्तानलाच जास्त जवळचा मानत होती. मग आपल्याला या राष्ट्रांबद्दल
सहानुभूतीपूर्वक धोरण ठेवायची काय गरज आहे?

People in all countries
have the right to choose their own destiny and decide their own future
असे या आमसभेत जगापुढे मांडणार्‍या सिंग यांना या लिबिया-सीरिया
वगैरेसारख्या देशांतील जनतेने आजपर्यंत आपले भवितव्य कधीच ठरविले नव्हते
याची तरी जाणीव होती ना? त्यांच्यावर तर हुकुमशाहीच लादली गेली होती (आणि
आहे)! मग अशा
तर्‍हेने स्वत:च्याच देशातील जनतेवर जुलूम करणार्‍या (आणि भारताशी फारशी
जवळीक कधीच न ठेवलेल्या) या राष्ट्रांकडून आपल्याला काय देणं-घेणं आहे? अशा
देशांच्या बाबतीत आपले तोंड बंद ठेवणे हाच मार्ग जास्त सयुक्तिक नाहीं
कां?

सीरियाचीही तीच कथा. सध्याचे हुकुमशहा बशार अल-अस्सद (आणि त्या
आधीचे हुकुमशहा बशार यांचे वडील हाफेज अल-अस्सद) हे आपल्या प्रजेवर जुलूम
करणारे
सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या अन्यायाविरुद्ध जनता जर उठाव करून त्यांची
हकालपट्टी करीत असेल तर आपण जनतेच्या बाजूला उभे रहायचे कीं अन्यायी
हुकुमशहाच्या? ट्युनीशिया मध्ये सुरू झालेला "अरबी वसंतऋतू" सगळीकडे
फैलावतो आहे त्याचा भारताला फायदा असेल तर अशा वसंतऋतूचे भारताने स्वागत
केले पाहिजे पण असा वसंतऋतू आपल्या हिताचा नसेल तर त्या विषयावर गप्प तरी
राहिले पाहिजे. मग
आपल्या पंतप्रधानांनी विनाकारण तोंड कां उघडले?

इस्रायल आणि
पॅलेस्टाईनबद्दलही तेच. इथे पॅलेस्टाईनला समर्थन देण्यापर्यंत टाकलेली
पावले ठीकच वाटतात. पण आपले पंतप्रधान जेवढे ठामपणे याबद्दल बोलले तेवढे
ठामपणे बोलण्याची गरज नव्हती. अमेरिकेने पॅलेस्टाईनला सध्या तरी एका
स्वतंत्र राष्ट्राचे स्थान देण्यास मान्यता दिली नसताना आपण असे ठामपणे काय
म्हणून बोलायचे?
"इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांनी परस्परसंमत असा समझोता करून हा प्रश्न
सोडवावा, त्याला आमचा पाठिंबा राहील" असे गुळमुळीत निवेदन करणे भारताच्या
जास्त हिताचे नव्हते कां?

आज ना उद्या चीनबरोबर आपला संघर्ष अटळ आहे.
आपल्यात युद्ध जुंपणारच आहे. त्यावेळी आपल्या बाजूने कोण उभे राहील? सौदी
अरेबिया? मध्य-पूर्वेतील इतर तेलोत्पादक राष्ट्रे? मुळीच नाहीं. कुणी उभे
राहिलेच (तेही
नक्की नाहीं) तर ते राष्ट्र असेल फक्त अमेरिका! युरोपमधील राष्ट्रें
त्यांच्या स्वत:च्या दिवाळखोरीमुळे चीनला मस्का लावायच्या तयारीत आहेत.
इटलीने आपले ट्रेझरी बॉन्ड चीनला विकायची तयारी दर्शविली आहे. अशा
परिस्थितीत अमेरिकेच्या विरुद्ध मत व्यक्त करूनच सिंग थांबले नाहींत तर
"पॅलेस्टाईनची राजधानी जेरुसलेम असावी" इथपर्यंत बोलून इस्रायलला (आणि
अमेरिकेला) दुखवायची काय
गरज होती?

इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत पाकिस्तानचा अण्वस्त्र
बनविणाचा कहूता प्रकल्प बाँबहल्ला करून उडविण्याच्या योजनेत प्रत्यक्ष भाग
घेऊन आपल्याला मदत करण्याची तयारी इस्रायलनेच दर्शविली होते हे आपण कसे
विसरू शकतो?

अलीकडे तर चीनची "नियत" जास्त-जास्तच उघड होऊ लागली आहे.
चीनने अरुणाचलप्रदेश या आपल्या एका राज्यावरच्या त्याच्या हक्काचा हेका
अद्याप सोडलेला
नाहीं, त्याने आपल्या सरहद्दीवर चीनच्या बाजूने हमरस्ते बांधलेले आहेत पण
आपण बांधायला गेलो तर आपल्याच हद्दीत येऊन आपल्याला तसे करण्याला त्यांचे
सैन्य मनाई करते (आणि आपण माघारही घेतो). आपल्या उत्तरेकडील सीमेवर आपल्या
जवानांना दमदाटी चालूच असते[*३]. अशा परिस्थितीत उद्या जेंव्हां आपले आणि
चीनचे युद्ध पेटेल (ते पेटणारच आहे!) तर आपल्या मदतीला कोण येईल?
पाकिस्तान? तो तर
वहात्या गंगेत हात धुवून घ्यायला चीनच्या बाजूने आपल्याविरुद्ध युद्धात
उतरेल. मध्य-पूर्वेतलाही कोणीही आपली विचारपूस करायलासुद्धा येणार नाहीं.
मग त्यांची भलावण करून आणि ते करताना अमेरिकेला आणि इस्रायलला दुखवून आपण
काय मिळविले? आपल्या हातात अशाने धुपाटण्याशिवाय कांहींही उरणार नाही!

आजच्याच
टाइम्स ऑफ इंडियातील मथळ्यानुसार आपल्या संरक्षणमंत्र्यांनी चीन
तिबेट-भारताच्या सीमेवर आक्रमक पवित्र्यासह आपले लष्करी अस्तित्व वाढवत
असल्याची कबूली दिली आहे. चीनने तिबेटमधे ५ पूर्णपणे कार्यरत असलेले हवाईतळ
व ५८००० किमी लांबीचे हमरस्ते व रेल्वे मार्ग उभारले असून त्यायोगे ३०
डिव्हीजन्स (४५०००० सैनिक) आपल्या सीमेवर जलदपणे आणण्याची क्षमता निर्माण
केलेली आहे. आपल्या संरक्षणमंत्र्यांनी पूर्वीचा निष्काळजीपणा मान्य केला
असून
यापुढे त्याला प्रत्युत्तर म्हणून जाणीवपूर्वक आखलेल्या युद्धनीतिनुसार
योग्य पावले टाकली जात असल्याचेही सांगितले आहे. या परिस्थितीत आपल्या
पंतप्रधानांचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील भाषण मला तरी आत्मघातकच
वाटले.

उद्या महासत्ता (Super Power) बनण्याचे सामर्थ्य असलेल्या
देशाच्या नेत्याला आपले तोंड कधी उघडायचे व कधी बंद ठेवायचे याचे भान असले
पाहिजे. आणि चुकून नको
तिथे तोंड उघडले तर कमीत कमी आपल्या पायाचा अंगठा तरी त्या उघड्य़ा तोंडात
घालायचे त्याने टाळावे!

==================================================

[*१]
या कटाच्या सूत्रधारास जन्मठेपेची शिक्षाही झाली होती पण अलीकडेच त्याला
"त्याचा मृत्यूकाल जवळ आलेला आहे" या सबबीखाली ब्रिटिश (कीं स्कॉटिश?)
सरकारने अत्यंत संशयास्पद परिस्थितीत दया म्हणून वेळेआधीच मुक्त केले. (पण
तो पठ्ठ्या अद्याप जिवंत आहे!)

[*२]
अलीकडे पाकिस्तानातील शियांच्या कत्तलीमुळे इराणमधील परिस्थिती जराशी बदलत
आहे असे वाटते. तसेच सद्दामनंतरचा इराक सध्यातरी स्वत:च्याच जखमा चाटत
आहे.

[*३] या घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे भूतपूर्व मुख्यमंत्री आणि आजचे एक केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला (Lion of Kashmir
शेख अब्दुलांचे सुपुत्र)यांनी "हिवाळा संपून उन्हाळा येऊ दे मग मी जाऊन
चिन्याना असा सज्जड दम मारेन कीं....." अशी
"उत्तर" छापातली सिंहगर्जनासुद्धा केली होती. (उन्हाळा आता संपलाच आहे आणि
मी बापडा अजून या चिन्यांच्या हृदयात धडकी भरविणार्‍या आणि त्यांच्या
"धोतरांची पीतांबरे" करू पहाणार्‍या "अललडुर्र" गर्जनेची वाट पहात आहे!) या
घटनेचा मला वैयक्तिक पातळीवर एक फायदा झाला कारण मला शाळेत शिकतांना माहीत
झालेली पण दरम्यानच्या काळात विसरलेली मोरोपंतांची खालील आर्या आठवली.

कुरुकटकासि
पहाता तो उत्तर बाळ फार गडबडला
स्वपरबलाबल नेणुनी बालिश बहु बायकात बडबडला!

==================================================