नाण्याची चौथी बाजू

बरीच वर्षे मी नाण्याच्या दोन बाजू बघण्यात घालवल्या. इतरांच्या दबावाखाली तसे मान्य करत आलो. पण सतत मिळणा‍र्‍या अनुभवांच्या विश्लेषणातून मला नाण्याच्या इतर बाजू समजू लागल्या. तीन माकडांना पुढे करून ह्या जनतेला माकड बनवण्याचे माहात्म्य शिकवण्यात आले. वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, वाईट बघू नका ह्या मागचा स्वार्थ कळायला फारसे अवघड झाले नाही. अहो एखादी गोष्ट वाईट नसून चांगलीच आहे असे सांगण्याचे प्रयत्न सगळ्या माध्यमातून जर राबवले जात आहेत तर मी वाईट ऐकू नये हे मला पटवून देण्याचा अट्टाहास का आहे, कोण करतंय, कशा करता? हेच प्रश्न बोलण्याच्या बघण्याच्या बाबतीत मला त्रास देत आहेत.

असो वाचक हो, नाण्याच्या छापा व काटा ह्या दोन बाजू बाळ कडूतून मी पचवल्या. पण नाण्याचा आकार व त्यावर चौफेर होणार्‍या दबावाची तिसरी बाजू उमजायला आणि मग पचवायला जरा वेळ लागला. मग चौथ्या महत्त्वाच्या बाजूचा उलगडा झाला व सगळ्या गोष्टी, घटना, प्रसंगातून ही चौथी बाजू समजून घेण्याचा छंद नव्हे महत्त्व भेडसावू लागले. हि चौथी बाजू म्हणजे नाण्याचा उपभोगता कोण, हे नाणे वापरणारे हात कुणाचे, ह्या नाण्याचा वापर कोणत्या उद्देशाने होतो आहे, वगैरे? एका गहन विषयाचा अभ्यास आवश्यक ठरला आहे. हा मुद्दा तुमच्या समोर ठेवावा असे मना पासून वाटले म्हणून हा खटाटोप, कदाचित उचापात्या ठरू शकतात. लष्कराच्या भाकर्‍या....... वगैरे.......

असो, एक प्रसंग बातमी पत्रात पहिल्या पानावर झळकला व माझे विचार नाण्याच्या चौथ्या बाजूत फिरू लागले. "एकाच रात्रीत सुरक्षा साधनांनी मढवलेल्या इमारतीत सात घरफोडीचे प्रकार!! " अशा कैक बातम्या आपण रोज चघळतो आहोत. पण मी त्याच इमारतीचा रहिवासी असल्याने हि बातमी विश्वासहार्य आहे असे सांगण्याचा अधिकार मला असावा अशी माझी प्रांजळ अपेक्षा आहे, मराठी त्यात ब्राम्हण एवढेच म्हणू शकतो हि सत्य परिस्थिती आहे.

ह्या घरफोडीच्या प्रसंगातील घटना नाण्याच्या तिसर्‍या व चौथ्या बाजूंशी संबंधित आहेत त्या कोणत्या हे तुमचे तुम्ही ठरवा. कारण कोणती घटना कोणत्या बाजूशी जास्त संबंधित आहे हे ठरवण्यात, वाद घालण्यात निपुण वाचक खोर्‍याने आहेत त्याचा अनुभव मला परका नाही. आधी सहा घरफोडी झाल्याचे समजले, सातवी घरफोडी झाल्याचे चार दिवसा नंतर उघडकीला आले आहे.

एकूण पाच विभाग आहेत अ, ब, क, ड आणि ई प्रत्येक विभागाच्या तीन अशा १५ इमारती इथे आहेत. ह्या घटकेला अ ब क ड इमारतीत एकूण फ्लॅट ५४४ संख्या आहे तर ई विभागात एकूण १३२ फ्लॅट संख्या आहे. क विभागातील एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे कामगारांची ये जा २४/७ चालू असते. त्यात काही कामगार ह्या इमारतीत रात्रीच्या वास्तव्याला असतात. ई विभाग नुकताच राहण्यास योग्य ठरला असून रहिवासी येणे जाणे सुरू झाले आहे. पण ह्या विभागाची व बांधकाम सुरू असणार्‍या इमारतीची सुरक्षा व्यवस्था व संस्था इतर ११ इमारती पेक्षा वेगळी आहे.

अ, ब, क, ड विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेत गेल्या काही महिन्यात १६ सीसीटिव्ही कॅमेरा व त्यांची नियंत्रण व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. ह्या व्यवस्थेतील गोंधळ कोणत्याही शेतमजुराला समजू शकेल इतका साधा आहे.

प्रत्येक इमारतीच्या प्रवेश दारातच चित्र 0२ इंग्रजी भाषेतून "तुम्ही सुरक्षा कॅमेरा कक्षात आहात" अशा अर्थाचा फलक लावलेला आहे, तो कोणा करता, उद्देश काय, का मोफत मिळाले म्हणून लावले आहे? हो हे ही खरे आहे, संचालकांनी का म्हणून असल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी? उत्तरांची अपेक्षा करू नका!

कॅमेऱ्याचे स्थान हा सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून त्याला जोडणार्‍या तारा, त्याचा वीज पुरवठा हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. 03, 04, 11 चित्रात दिसणारा कॅमेरा मी राहतो त्या इमारतीचा आहे. त्याला जोडणार्‍या तारा कशा आहेत ते इथे दिसते आहे. कॅमेरा बसवणार्‍या व्यक्तीला कोणते ज्ञान आहे हे सहज समजू शकते व संचालकांना हे ज्ञान असावे ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. चित्रात हे स्पष्ट आहे की ह्या कॅमेऱ्याने कायदेशीर हक्काने वावरणार्‍या व्यक्तींचे चित्रीकरण होते आहे. त्यांचे येणे जाणे मुख्य प्रवेश द्वारानेच व्हावे म्हणून जाळ्यांचा दुरुपयोग फार चांगल्या प्रकारे झाला आहे. ज्या बेकायदेशीर व्यक्तींच्या हालचालींची माहिती आवश्यक आहे त्या मार्गांचा शोध व नियंत्रण महत्त्वाचे आहे, पण हे महत्त्व संचालकांना का नाही?

चित्र 07, 08, 09 सांड पाण्याचे डक्ट अ नियंत्रित व कॅमेऱ्यात न दिसणारे आहेत. प्रत्येक विभागातील कोणत्याही इमारतीत ह्यातून जा ये सहज शक्य आहे. ह्या मार्गांना कोठेही जाळी व कुलूप बसवण्याची कल्पकता संचालकांनी दाखवलेली नाही हे लक्षात घ्या!!!

चित्र 10,12,13 ही अग्नीशामक यंत्रणेची व्यवस्था अ नियंत्रित व कॅमेऱ्यात न दिसणारी आहे. ह्या मार्गांना सुद्धा कोठेही जाळी व कुलूप बसवण्याची कल्पकता संचालकांनी दाखवलेली नाही हे पण लक्षात घ्या!!!

चित्र 14 चा प्रकार फार गंभीर व चुकीचा आहे. बाणाने दिसणारे भाग जोडलेले असणे आवश्यक आहे, मग का नाही? वर्तुळात दाखवलेल्या जागेत खास तोटी असणे आवश्यक आहे मग का नाही? अहो डी२ ह्या इमारतीत तर चित्रात दिसणारा काळा रबरी पाइप कुठेही बसवलेला नाही, मग ह्या इमारतीची अग्नी शामक दलाने मंजुरी कशी दिली असेल हे तुम्हीच समजून घ्यावे!!!

चित्र 05, 06 प्रत्येक फ्लॅटला वीज पुरवठा, टेलिफोन, इंटरनेट व्यवस्थेला कडी कुलूप नाही, ते अ नियंत्रित तसेच कॅमेऱ्यात न दिसणारे आहेत. वाचक हो म्हणून मी मढवलेली सुरक्षा व्यवस्था असा द्वय अर्थी शब्द प्रयोग केला आहे. त्यातल्या त्यात एक समाधानाची गोष्ट आहे की "एवढ्या मोठ्या इमारतींच्या जाळ्यात फक्त सात घरफोडीचे प्रकार ही फार चिंता करणारी घटना नाही" असे कोणी अजून तरी पचकलेले नाही.

नुकतेच एका सुरक्षा कर्मचार्‍याने सांगितले की वर्तमान सुरक्षा दल इथले काम ह्या महिना अखेरीस सोडणार आहे, मी नाण्याच्या चौथ्या बाजूतून ही बातमी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. नवीन सुरक्षा दल इथे यावा ही योजना ह्या घरफोडीत होती का? तुमचे काय मत आहे????? मी अशा घटनांना कॅरमच्या खेळातील रिबौंड शॉट म्हणतो. छे छे अहो हे इथेच थांबणार नाही, पुणेकरांच्या घरफोडीला सामोरे जाण्याच्या धाडसाची कौतुक सभा, नाश्ता त्यावर काही मतप्रदर्शन अजून होणे बाकी आहे.

दुसरा प्रकार - घरात नोकर पुरवणारी दोन तीन मंडळी आहेत, कोणता फ्लॅट किती दिवस बंद असणार ह्याची कल्पना, बातमी ह्या सूत्रधारांना मिळते, बातमी आहे म्हणजे ती विकाऊ होते, किंमत ठरते व योजना आखणे सोपे होते. मला मस्कत ओमानचा एक प्रसंगा आठवला. चोर घरफोडी करून दागिने पळवतो, ते विकताना खोटे असल्याचे लक्षात आल्यावर काही दिवसाने परत त्या घरात जातो व बाईला खोटे दागिने ठेवल्या बद्दल चाकूने वार करून निघून जातो. जय हो सुरक्षा व्यवस्था!!! ह्याचा अर्थ बातमी विकली गेली, विकत घेतली पण पैसे कमावता आले नाही म्हणून चाकूने हल्ला झाला, पण तिथे पोलिसांना त्या हल्लेखोराला पकडण्यात यश आले होते ह्याचे समाधान त्या महिलेला मिळाले. महिनाभर त्या महिलेने घाबरून तिला कोंडून घेतले होते.

वर्तमान घरफोडीतून हा घाबरण्याचा दहशतीचा प्रकार बर्‍याच महिलांनी बोलून दाखवला आहे. अहो कृपया घडणार्‍या प्रत्येक घटनेचे प्रसंगाचे चिंतन नाण्याच्या तिसर्‍या चौथ्या बाजू लक्षात घेऊन व्हावे, ही मन:पूर्वक सदिच्छा!!!!!