५२. अभिव्यक्ती!

तुमच्या जीवनात आनंदाची विविध दालनं उघडू शकणारा हा लेख तुमच्या हाती देताना मला अतिशय आनंद होतोय, लक्षपूर्वक वाचा.

संवेदनाक्षम माणसाची एक मोठी दिशाभूल झालीये, त्याला सांगितलं गेलंय की एकतर तुला आनंद शोधायचाय किंवा मिळवायचाय आणि या मानसिकतेतून तो सदैव काही तरी शोधतोय किंवा मिळवण्याच्या मागे आहे. वस्तुस्थिती मात्र अशीये की तो स्वत: आनंद आहे आणि त्याला फक्त ‘अभिव्यक्त’ व्हायचंय.

जीवनातली घुसमट आनंद गवसला नाहीये म्हणून नाहीये तर अभिव्यक्त न होता आल्यामुळे आहे! यू डोंट हॅव टू अक्वायर बट जस्ट टू ऍकच्युअलाइज द पोटेंशियल यू ऑलरेडी हॅव.

_____________________________________

आपल्याकडे अभिव्यक्तीच्या आठ संभावना आहेत, प्रत्येकाकडे त्या कमी जास्त प्रमाणात आहेत पण एकदा एका संभावनेतून अभिव्यक्तीचा आनंद गवसला, ती सहजता आली, की बाकीच्या संवेदनाही तदनुरूप सक्रिय होतात, म्हणजे तुम्ही सध्या चरितार्थासाठी काहीही करत असाल तरी तुमच्या अंगी असलेल्या पण तुम्ही वेध न घेतलेल्या सांगीतिक संभावनेतून तुम्हाला आनंद गवसला की मग तुमची शारीरिक, आंतर व्यक्ती, भाषिक आणि  अवकाश संवेदना देखील सक्रिय होतात.

हे जरा समजून घेण्यासारखं आहे, ‘सांगीतिक संवेदना’ शांततेची जाणीव बरोबर घेऊन येते कारण शांततेच्या कॅनव्हासवर स्वराचं प्रकटीकरण आहे आणि ‘अवकाश संवेदना’ (फिल ऑफ स्पेस) स्वराच्या अभिव्यक्तीशी संलग्न आहे म्हणजे कोणत्याही ठिकाणी गोडवा निर्माण करण्यासाठी व्हॉल्यूम किती ठेवायचा याचा तुम्ही वेध घेऊ लागलात की तुम्हाला ‘स्पेसचा’ बोध व्हायला लागतो. स्पष्ट उच्चारणासाठी ‘भाषिक संवेदनेची’ प्रगल्भता लागते आणि संगीत दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचं म्हटलं की  ‘आंतर व्यक्ती’ (इंटर पर्सनल) संवेदना जागी होऊ लागते अशा प्रकारे आपल्या इतर अभिव्यक्तीच्या संभावना देखील एकामागोमाग एक सक्रिय होत जातात.

___________________________________

अभिव्यक्तीच्या एकूण आठ संभावना अश्या आहेत : १) भाषिक (लिंग्विस्टिक स्किल्स), २) सांगीतिक (म्युझिकल सेन्स), ३) आंतर व्यक्ती (इंटर पर्सनल), ४) अंतर्व्यक्ती संबंधी (ईंट्रा पर्सनल), ५) शारीरिक संवेदना (फिल ऑफ टोटल बॉडी) ६) अवकाश संवेदना (फिल ऑफ स्पेस), ७) निसर्ग विषयक संवेदना (फिल ऑफ नेचर अराउंड अस),   आणि ८) तार्किक आणि गणितीय बुद्धिमत्ता (लॉजिस्टिक अँड मॅथेमॅटिकल स्किल्स)  (सौजन्य आणि धन्यवाद : अशुंमन खुर्जेकर, महाराष्ट्र टाईम्स, १९ ऑक्टोबर २०११)

(हा लेख अंशुमनच्या लेखाचं एक्स्टेन्शन नाही, त्या लेखावरून अभिव्यक्तीच्या संभावनेचा अत्यंत वेगळ्या अँगलनं घेतलेला समग्र वेध आहे)

माणसाची पूर्वापार अशी समजूत झालीये की तार्किक आणि गणितीय बुद्धिमत्ता हाच बुद्धिमत्तेचा एकमेव निकष आहे! त्यामुळे तर्कपूर्ण विचारसरणी, पराकोटीची विश्लेषण क्षमता आणि त्या दोन क्षमतांच प्रश्न सोडवण्यासाठी केलेलं समायोजन यावरून एखादी व्यक्ती बुद्धिमान आहे किंवा नाही हे ठरवलं जातं. थोडक्यात विज्ञान आणि गणित यातली गती हा बुद्धीचा एकमेव मानदंड मानला गेलाय आणि भाषिक क्षमता संवादाचा अनिवार्य भाग असल्यानं त्यावरून बुद्धी जोखली गेलीये त्यामुळे इतर संवेदनाक्षमता दुय्यम समजल्या गेल्या आहेत.

पैसा ही मानवी जीवनाची एकमेव दिशा असल्यानं अभिव्यक्ती ऐवजी उपयोगिता प्रथम मानली गेलीये पण तुम्हाला अभिव्यक्तीची मजा घ्यायची असेल तर तुमची उपजत क्षमता आणि तदनुषंगिक अभिव्यक्ती यांचा तुम्हाला मेळ घालता यायला हवा.

ही उपजत क्षमता शोधणं आणि त्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेशी मेळ घालणं हे खरं कौशल्य आहे.

____________________________________

हा मेळ घालण्यापूर्वी काही गैरसमज दूर करायला हवेत.

प्रथम ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अभिव्यक्तीला शारीरिक आणि मानसिक मर्यादा आहेत, म्हणजे कितीही प्रगाढ अनुभव असला तरी साहित्य आणि भाषेचा पुरेसा अभ्यास केल्याशिवाय लेखनातून हवी तशी अभिव्यक्ती होणार नाही.

कितीही चांगला आवाज आणि सांगीतिक समज असली तरी गाणं शिकल्याशिवाय  सुरेल आणि सहज गाता येणार नाही, थोडक्यात योग्य दिशेनं पुरेसा सराव केल्याशिवाय अभिव्यक्तीची सहजता आणि आनंद दुर्लभ आहे. त्याचप्रमाणे कितीही चांगली शारीरिक संवेदना असली तरी शारीरिक वयाला जमेल असंच क्रिडानैपुण्य प्राप्त होईल, म्हणजे कितीही थोर प्लेअर असेल तरी त्याचे रिफ्लेक्सेस वयानुरूप कमी होत जातील.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिव्यक्ती हा चमत्कार नाही, एखाद्याकडे जन्मजात कौशल्य असेल तर तो इतरांपेक्षा सरस ठरेल पण तुमचा रस, प्रयत्नांची योग्य दिशा आणि त्या अभिव्यक्तीसाठी लागणाऱ्या बौद्धिक क्षमतांची जाण यांचा योग्य मेळ घालून तुम्हाला कोणत्याही अभिव्यक्तीचा आनंद घेता येईल आणि हाच खरं तर या लेखाचा हेतू आहे.
______________________________

कोणत्याही अभिव्यक्तीत एकच महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि तो म्हणजे मन आणि शरीर यांचं समायोजन! बॉडी अँड माइंड कोऑरडिनेशन. मन आणि शरीर यांचं एकसंधत्व कोणत्याही सुखद अभिव्यक्तीसाठी अनिवार्य आहे.

जेव्हा एखादा बॅटसमन सुरेख फटके मारतो तेव्हा त्याला कळो अथवा न कळो, अशी प्रक्रिया घडलेली असते: बॉलच्या दिशेचा आणि उंचीचा संपूर्ण अंदाज त्याला आलेला असतो, त्या बॉलला फटका मारण्यासाठी काय शारीरिक हालचाल घडायला हवी याचा मनात प्लॅन झालेला असते आणि शरीरानं त्या प्लॅनबरहुकूम काम केलेलं असतं! आपल्याला क्रिकेट खेळता न येण्याचं कारण या तिन्ही पैकी एकही गोष्ट बॉल टाकल्याक्षणी आपल्या मनात किंवा शरीरात घडू शकत नाही, किंवा एखादा धुरंदर फलंदाज जेव्हा आऊट होतो तेव्हा त्याची या तीन पैकी एखादी गोष्ट हुकलेली असते!

तर मुद्दा असायं की अभिव्यक्ती कोणतीही असो, शरीर आणि मनाचं समायोजन हे अभिव्यक्तीच्या सहजतेचं आणि आनंदाचं गमक आहे.

जेव्हा एखादा गायक लीलया गातो तेव्हा त्याला जे गाणं किंवा जो राग तो गातोय त्याचं पूर्ण भान असतं, प्रत्येक क्षणी जे गायचंय ती फ्रेज त्याच्या संपूर्ण काह्यात असते (म्हणजे स्मृतीत तयार असते) आणि त्या फ्रेज बरहुकूम गळ्याचं समायोजन करून नेमक्या वेळात ती फ्रेज तो गाऊ शकतो त्यामुळे त्याला अभिव्यक्तीची आणि श्रोत्यांना श्रवणाची मजा येते.

गाताना यातला एक जरी घटक कमी पडला, म्हणजे गायकाचं गाण्याचं किंवा रागाचं भान हरवलं, स्मृतीत फ्रेज उमटू शकली नाही किंवा गळा स्मृतीबरहुकूम चालला नाही तर गाणं हुकतं, किमान त्या आवर्तनापुरतं तरी  बेरंग होतं मग कसलेला गायक किंवा वादक श्रोत्यांना कळायच्या आत स्वत:ला सावरतो आणि पुढच्या आवर्तनात पुन्हा तो मेळ साधतो!

_____________________________________

अभिव्यक्तीसाठी लागणारी ‘दिशा’ तुमच्या त्या विषयातल्या रसामुळे निर्माण होते आणि तुमची त्या विषयाची ‘लगन’ तुमचं सरावातलं सातत्य कितपत टिकेल हे ठरवते. आपण जवळजवळ प्रत्येक कृत्य हे त्याच्या आर्थिक फलश्रुतीशी जोडल्यानं आपला रस अभिव्यक्तीच्या आनंदा ऐवजी आर्थिक लाभ आणि त्यासाठी पर्यायानंच जनमताचं शिक्कामोर्तब याकडे असतो त्यामुळे आपल्याला अभिव्यक्तीची दिशा गवसत नाही.

आनंदासाठी ‘अभिव्यक्त’ होण्याऐवजी आपण ‘निष्क्रिय पर्याय’ शोधतो. टीव्ही बघणं, एखादं क्रिडाकौशल्य स्वतः: आत्मसात करण्याऐवजी रात्रंदिवस क्रिकेट बघून त्यावर व्यर्थ पण अत्यंत जोरकस चर्चा करणं, स्वत: गाणं शिकण्या ऐवजी कोणता गायक किती महान होता आणि त्याच्या आयुष्याची नंतर काय वाताहत झाली किंवा अमकी गायिका (किंवा गायक) ग्रेट की तमकी यावर सविस्तर खल करणे, स्वत: लेखन किंवा काव्य करण्यापेक्षा बेसुमार वाचन करणे, निरर्थक आणि निरंतर पर्यटन करून रोजच्या जीवनात काहीही बदल न घडवता आपण ‘रूटीन ब्रेक केल्याचा’ भ्रामक दिलासा मिळवणे, असं काहीबाही करून आपण अभिव्यक्तीच्या आनंदापासून वंचित राहतो.

तुम्हाला अभिव्यक्त व्ह्यायचं असेल तर प्रथम तुमचा रस आणि मग त्यासाठी आवश्यक त्या (वर नमूद केलेल्या) संभावनांचं समायोजन केलं नाही तर तुमच्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट सतत घडत राहील ती म्हणजे निष्क्रिय टाईमपास! स्वत:चं सक्रिय, ते कितीही साधं आणि अजिबात अपूर्व नसलं तरी तुम्हाला अभिव्यक्तीचं दालन उघडून देणारं असं विधायक काहीही हाती लागणार नाही.

जनमानसाची दाद, आर्थिक लाभ आणि एकदम काही तरी अलौकिक आणि लोकोत्तर घडवण्याची इच्छा हे निकष दूर ठेवून तुमच्या अभिव्यक्तीची दिशा ठरवा. तुम्हाला जे ओढ लावतंय, ज्यात तुम्ही देहभान विसरता असा कोणताही छंद निवडा, त्यात ‘सक्रिय सहभागी’ व्हा, मग तुमचं सरावातलं सातत्य तुम्हाला अभिव्यक्तीतली सहजता आणि नैपुण्य प्राप्त करून देईल.

_____________________________  

लोकोत्तर आणि अलौकिक अभिव्यक्तीबद्दल थोडं लिहितो. जे काही जीनियस वगैरे वाटतं त्याला पराकोटीचा पूर्वानुभव, रियाज किंवा वारसा असतो. आपल्या पत्नीला दिवस गेल्याचं समजल्या क्षणी अल्लारखाँनी तिच्या कानात वेळीअवेळी तबल्याचे कायदे म्हणायला सुरुवात केली, स्वत: शिकवून रात्ररात्र वादनावर चर्चा केल्या आणि रविशंकरजी आणि रईसखाँ सारख्या दिग्गजांबरोबर पंधरा वर्षाचा असल्यापासून साथ करायला मिळाली हे झाकीरच्या लोकोत्तर होण्यामागचं (त्यानं स्वतः: सांगितलेलं) कारण आहे.

हृदयनाथ मंगेशकरांसारख्या संगीताचा वारसा लाभलेल्या आणि त्यात चोहोबाजूनी आणि सर्वतोपरी निमग्न असलेल्या प्रतिभावान संगीतकारानं, कोणतीही नवी अभिव्यक्ती हे अंतर्मनात रुजलेल्या स्मृतींचंच वेगळं समायोजन आहे असं प्रामाणिकपणे कबूल केलंय.

आपल्या अभिव्यक्तीला मर्यादा असतील, ती काही विलक्षण आणि असामान्य असणार नाही पण तुम्ही मला समजावून घेतलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की प्रश्न अलौकिकत्वाचा नाहीये, अभिव्यक्त होण्याचा आहे.

तुमच्यातल्या अभिव्यक्तीच्या उपजत संभावनेचा वेध घेऊन, मन आणि शरीर यांचा मेळ घालून तुम्हाला अभिव्यक्ती साधायचीये. अर्थप्राप्ती, जनमानसाची वाह्व्वा किंवा अभिव्यक्तीतली असामान्यता या दिशाभूल करणाऱ्या परिमाणांकडे दुर्लक्ष केल्याशिवाय अभिव्यक्ती साधणं असंभव आहे.

ओढ लावणारी संभावना आणि शरीर आणि मनाच्या एकसंधतेतून होणारी अभिव्यक्ती हा आनंदाचा एकमेव निकष आहे आणि मी तुम्हाला निर्विवादपणे सांगतो की आनंद अभिव्यक्त होण्यात आहे, मग तो जगातल्या कोणाही दिग्गज वादकाचा, गायकाचा, किंवा प्रतिभावान चित्रकाराचा, लेखकाचा, कवीचा, की निष्णात प्लेअरचा, किंवा कमालीच्या लोकप्रिय अभिनेत्याचा की अभिनेत्रीचा अथवा खुद्द तुमचा असो तो एकच आहे!

संजय
 

पूर्वप्रकाशन : दुवा क्र. १

मेल : दुवा क्र. २