अशि पाहु नकोस मजकडे

अशि पाहु नकोस मजकडे - छातीशी घेइन मी
तुजपासुन गं पळवून तुला - हृदयी लपविन मी ।ध्रु।

मनरमणी ग मनास तुझ्या हे माझे मन म्हणते,
"सारे जग प्रीतीचे वैरी, भीती मज वाटे! "
धर हाऽत आता माझा ...
तुजलाऽ अधारि मी ।१।
तुजपासुन गं पळवून तुला - हृदयी लपविन मी

हाय! निखारा फुलवुन जाई जणु तव मंदाग्नी
कासावीस किती करसी तू हृदयाला दुरुनी
हृदयाऽतली ह्या ऊर्मी ...
एकेऽक पुरविन मी।२।
तुजपासुन गं पळवून तुला - हृदयी लपविन मी

 वेचू आज फुले, चल प्रीतीच्या पदरात भरू
वाटेमधले काटे सारे आपण दूर करू
प्राणाऽहुनी प्रिय मज तू
तुज प्राऽण बनविन मी ।३।
तुजपासुन गं पळवून तुला - हृदयी लपविन मी

टीपा :

 १. अधारणे = आधार देणे (या लाडक्या मुलांनो - तुम्ही मला 'अधार' ह्या प्रसिद्ध गाण्याचा 'अधार' घेतलेला आहे. )
तसे अगदीच नको वाटले तर आधारिन असे पटकन म्हणावे.

वृत्त:

ध्रुवपदाचे वृत्त :
गा गागागागा गागा - गा गागगागा गा
गा गागागा गा गागागा - गागागागा गा
कडव्याच्या दोन ओळी :
गागागागा गागागागा गागागागा गा
कडव्याचा शेवटः
गागाऽल गागा गागा - गागाऽल गागागा

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!    (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...  इन मी असे जमवा बरका!  यमकाची जागा ठळक केलेली आहे.