६०. एकहार्ट

सत्य किती सोपंय, किती सहज आहे हे पाहायचं असेल तर आज जगात एकमेव व्यक्ती आहे, एकहार्ट! कोणताही चमत्कार नाही, सिद्धाच्या लक्षणांचं कोणतंही अवडंबर नाही, तुम्ही दखल घेतली नाही तर लक्षातही येणार नाही इतका साधा एकहार्ट.

त्याचं पॉवर ऑफ नाऊ प्रकाशित होऊन अनेक वर्ष झाली, तो भारतात येऊन गेला, इथली आध्यात्मिक बजबजपुरी त्यानं पाहिली, त्याबद्दल अवाक्षरही काढलं नाही, अनेक वर्ष त्याच्याकडे कुणाचं लक्षही गेलं नाही. एकदा ओप्रा विनफ्रेनं त्याला टॉक शोला बोलावलं आणि तो प्रकाशात आला पण आजही तो इतक्या सादगीनं जगतो की तुम्ही रिसेप्टीव असाल तरच त्याला समजू शकाल आणि तुमच्या लक्षात आलं नाही तर तुमच्या जीवनातली एक सुवर्णसंधी हुकेल म्हणून हा लेख.  

____________________________________

पॉवर ऑफ नाऊ च्या प्रस्तावनेत त्यानं लिहिलंय, तिसाव्या वर्षापर्यंत तो कमालीची अस्वस्थता आणि आत्महत्येप्रत नेणाऱ्या विमनस्कतेतून जगत होता. एक दिवस ही स्थिती इतकी पराकोटीला गेली की त्याला वाटलं ‘आता मला स्वत: बरोबर जगणं अशक्य आहे’. मग हा विचार त्याच्या मनात सतत रुंजी घालू लागला आणि अचानक त्याला त्या विचाराचं आश्चर्य वाटलं, ‘मी एक आहे की दोन? ’ कोण कुणाबरोबर जगू शकत नाहीये?

या एका विचारावर तो इतका केंद्रित झाला की त्याचे सगळे विचार थांबले, सगळं एकदम शांत झालं. ती शांतता मग क्षणोक्षणी इतकी सघन होत गेली की तिच्यात (वॉइड) तो असाहाय्यपणे खेचला जाऊ लागला, मग त्याला जाणवलं की ती सर्वव्यापी वैश्विक शांतता बाहेर नाही, त्याच्या आत आहे. बाहेरची आणि आतली शांतता अचानक एक झाली, त्याचं सारं भय संपलं, तो सिद्ध झाला.

पुढे त्यानं लिहिलंय, आज सर्वोच्च काय असेल तर माझा अविभाज्य भाग झालेली ती शांतता. लोक मला विचारतात, ‘तुला जे मिळालंय ते आम्हाला कसं मिळेल? तर मी त्यांना सांगतो, ‘तुमच्याकडे ते आहेच, तुमचं तिकडे लक्ष जात नाहीये कारण मनाची अविरत बडबड सतत तुमचं लक्ष वेधून घेतंय’ ( पॉवर ऑफ नाऊ (१९९७): पाने १ ते ३)

________________________________________

एकहार्ट म्हणतो मी बहुदा उद्विग्नतेच्या परमावस्थेला पोहोचलो होतो आणि तिचा परिणाम म्हणजे एका क्षणी माझी जाणीव मन आणि शरीरापासून वेगळी झाली.

अध्यात्मात याला सडन एन्लायटन्मेंट म्हटलंय, तिच्या प्रक्रियेचं विश्लेषण होत नाही. पाणी इतकं बेहद्द उकळलं की एका क्षणी, अचानक त्याची वाफ झाली, ते निराकार झालं, हे अपवादात्मक मानलं गेलंय.

निराकारत्वाचा बोध क्रमशः देखील होऊ शकतो, तुमच्या एकेक धारणा, मनाची तुमच्या वरची पकड, एकेका आकलनासरशी ढिली होत जाते, दोन विचारांच्या मध्ये तुम्हाला समोरचं स्पष्ट दिसायला लागतं आणि आजूबाजूचं नीट ऐकू यायला लागतं. एखाद्या स्वास्थ्याच्या क्षणी तुम्हाला समोरचा निराकार दिसतो आणि अचानक उलगडा होतो, आपण निराकार आहोत.

मी  तुम्हाला अशा क्रमशः सिद्धत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करतोय.

________________________________________

आज एकहार्टची फक्त चार पुस्तकं आहेत, पॉवर ऑफ नाऊ, प्रॅक्टीसिंग द पॉवर ऑफ नाऊ, स्टीलनेस स्पीक्स आणि अ न्यू अर्थ.

आजपर्यंत आध्यात्मिक जगतात प्रसिद्ध झालेल्या सर्व साहित्यात त्याची ही सर्वोच्च कामगिरी आहे. स्टीलनेस स्पीक्स तर त्यानं इतकं सूत्रबद्ध लिहिलंय की उपनिषदांची आठवण होते आणि त्याचं ‘अ न्यू अर्थ’ लोक समजू शकले तर त्याला जागतिक शांततेसाठी असलेलं नोबेल मिळेल.

___________________________________ 

पॉवर ऑफ नाऊ मधला मला आवडलेला क्लायमॅक्स, जो त्याच्या एनलायटन्मेंटची उकल करतो, तो असायं:

‘एनलायटन्ड रिलेशनशिप्स’ या प्रकरणात शेवटी त्यानं लिहिलंय:
 
‘तुम्हाला स्वत:शी नातं कशाला हवंय? तुम्ही फक्त ‘असू’ शकत नाही का? ज्या वेळी तुम्ही स्वत:शी नातं जोडता तेव्हा तुम्ही दोन होता, एक तुम्ही स्वत: आणि दोन, ज्याच्याशी नातं जोडलंय तो. हे मनाचं विभाजन सर्व कलह आणि द्वंद्वाचं कारण आहे.

साक्षात्कार म्हणजे स्वत:शी एकरूपता. तुम्ही स्वत:ला जोखत नाही, तुम्हाला स्वत:बद्दल करुणा, अभिमान, प्रेम, तिरस्कार काहीही वाटत नाही. जाणीवेतून होणारं हे स्वविभाजन संपतं, जाणीव एकसंध होते, पूर्णत्वाला येते, शापातनं मुक्त होते. ज्याला वाचवायचंय, सजवायचंय,  आणि सतत काही तरी हवंय असा कुणी राहत नाही. तुम्ही सिद्ध होता तेव्हा एकच नातं संपतं, ते म्हणजे तुमचं स्वत:शी असलेलं नातं. एकदा तुमचं ते नातं संपलं की तुमची इतर सर्व नाती प्रेमाची होतात. (पान १४५)

______________________________________ 

स्टीलनेस स्पिक्समध्ये अहंकाराबद्दल (दि इगोइक सेल्फ) एकहार्टनं लिहिलंय:

जेव्हा विचार तुमचं सर्व लक्ष वेधून घेतात तेव्हा तुम्ही मनाच्या बोलण्याशी एकरूप होता, ते बोलणं मग तुम्हाला तुमचं बोलणं वाटायला लागतं. या मनानं निर्माण केलेल्या ‘मी’ला सतत अपूर्णता आणि भय वाटत राहतं आणि त्या भयातून आणि अपूर्णतेतून  तुम्ही कार्यरत होता. असं जगणं मग इतरांसाठी आणि तुमच्यासाठी क्लेशदायी होतं. ( स्टीलनेस स्पिक्स, २००३, पान २९)
___________________________________

अ न्यू अर्थ मध्ये शेवटच्या प्रकरणात एकहार्टनं अभिव्यक्तीबद्दल (अवेकन्ड डूइंग) अफलातून लिहिलंय, मनाच्या सृजनात्मक उपयोगा विषयी तो म्हणतो:

सत्य गवसल्यावर तुम्ही जे काही करता त्याची सुरुवात आणि शेवट, तुमच्या मानसिक आणि भावनिक स्तरावर आधीच झालेला असतो त्यामुळे कृत्यातून तुम्हाला काही मिळवायचं नसतं. तुमचं कृत्य तुम्ही जे आहात त्याची अभिव्यक्ती असते. असं कृत्य कोणतीही अपूर्णता पूर्ण करण्यासाठी नसल्यानं त्या कृत्यातच आनंद असतो. प्रत्येक कृत्यातून तुम्ही अव्यक्ताला व्यक्त होण्याचा अवसर देता आणि त्यामुळे ज्यांच्यापर्यंत ते पोहोचतं त्याला ते आनंदित करतं.

संजय

मेल : दुवा क्र. १