सौंदर्यस्पर्धेत पुरुष ?

       आजपर्यंत सौंदर्यस्पर्धेत स्त्रियाच भाग घेत व त्यांच्यासाठीच सौंदर्यस्पर्धा असतात ( त्या पाहायला मात्र पुरुष चालतात किंवा लागतातही. ) पण यावेळी मिस युनिव्हर्स कॅनडाच्या स्पर्धेतील अजिंक्यपदाच्या दावेदार जेना टालकोवाने मात्र या स्पर्धेत वादळ निर्माण केले आहे. प्रथम तिला स्पर्धेत भाग घ्यायलाच परवानगी देण्यात आली नव्हती कारण ती जन्माने स्त्री नाही. म्हणजे पुरुष म्हणून जन्माला येऊन नंतर शस्त्रक्रियेने शरीरात बदल घडवून तिचे स्त्रीत रूपांतर करण्यात आले आहे. अर्थात हा उपद्व्याप सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी एकाद्या पुरुषाने केला असेल असे वाटत नाही. पण त्याला स्त्री म्हणून जीवन जगणे पसंत असल्यामुळे त्याने तसे केले व आता स्त्री म्हणूनच वावरू लागल्यावर तिने सौंदर्यस्पर्धेतही एक स्त्री म्हणून भाग घेतला यात तिचे ( की त्याचे )काय चुकले?  पण शेवटी आता तिला त्या स्पर्धेत भाग घेऊ देण्यात आला आहे व तिचा अंतिम ( की महा अंतिम? ) फेरीत प्रवेश झाला आहे.  पण तरीही या विषयावरील चर्चेला ऊत आला आहे.

          काहींच्या मते तो स्त्री म्हणून जन्माला आला नसल्यामुळे त्याला स्त्रियांसाठीच्या सौंदर्यस्पर्धेत भाग घेऊ देणे योग्य नाही . त्यांचा मुद्दा  असा आहे की व्यक्तीचे 
लिंग हे तिच्या जन्माच्या वेळी जो जनुकांचा मेळ 
झालेला असतो त्यावर ठरत असते  अर्थातच  एकदा तो मेळ  निश्चित  झाल्यावर ती व्यक्ती स्त्री किंवा पुरुष आहे असे ठरते त्यामुळे नंतर शस्त्रक्रियेने केलेला लिंगबदल ही वरवरची रंगसफेदी ठरते त्यामुळे पुरुष म्हणून जन्माला आलेली व्यक्ती वरून स्त्री सारखी दिसू वा वागू लागली तरी  मूलतः तो पुरुषच आहे म्हणून या स्पर्धेत भाग घेण्यास अपात्र ठरतो. त्यांच्या मते केवळ एकाद्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेमुळे स्त्रीचे पुरुषात किंवा पुरुषाचे स्त्रीत असे रूपांतर करणेच योग्य नव्हे. 

        याउलट  काहींच्या मते आता जेना ही  स्त्री म्हणूनच वावरते त्यामुळे तिला तो हक्कच आहे. त्यांच्या मते पूर्वी समलिंगी संबंधांना समाजाची मान्यता नव्हती पण समाजाने आता ते मान्य केले आहेत. खरे तर हा मुद्दा येथे गैरलागू आहे. कारण खजुराहो येथील मिथुन शिल्पातही समलिंगी संबंध दाखवले आहेत असे खजुराहो येथे जाऊन आलेल्या व्यक्ती सांगतात . अल्बर्ट एलिस या प्रख्यात मानसशास्त्रज्ञाच्या मते अशा संबंधांमध्ये अनैसर्गिक काही नाही. ( संदर्भ "मी अल्बर्ट एलिस" ले. डॉ. अंजली जोशी  शब्द पब्लिकेशन )त्यामुळे त्याचा संदर्भ देऊन जेनाचे स्पर्धेत भाग घेणे स्वीकारार्ह म्हणता येणार नाही. स्पर्धेच्या संयोजकांनीही जरी जेनाला स्पर्धेत भाग घेऊ दिला तरी अशा प्रकारे   लिंगबदलामुळे रूपांतरित झालेल्या कोणत्याही  व्यक्तीला भाग घेता येईल असा नियमातच बदल करण्यात आला आहे का  याविषयी  मात्र  मुग्धता बाळगली आहे.