६२. परिक्रमा

 

या लेखाचा रोख परिक्रमा केलेले किंवा करावी अशी इच्छा असणारे यांच्यावर नाही तर एक आध्यात्मिक साधना म्हणून परिक्रमेचा घेतलेला वेध आहे; मन:पूर्वक वाचला तर सर्वांना उपयोगी होईल.

______________________________ 

पहिली गोष्ट, अध्यात्म हा अनुभवांचा मागोवा नाही, तो ‘अनुभवणाऱ्याचा’ शोध आहे. ‘अनुभवणारा’ आपल्या सर्वांचा एकच आहे त्यामुळे तो सनातन, निराकार आणि सर्वत्र आहे हा उलगडा होणं म्हणजे सत्य समजणं आहे. थोडक्यात आपल्या प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असले तरी ज्या निराकार जाणीवेला अनुभव येतोय ती एक आहे या बोधासाठी केलेली साधना म्हणजे अध्यात्म.

अध्यात्माकडे ‘विविध अनुभवांची इच्छा’ या दृष्टीनं बघितलं तर सर्व साधना विफल होते कारण अनुभवात भेद आहेत, वैविध्य आहे आणि ती न फिटणारी हौस आहे. समजा एखादा चंद्रावर जाऊन आला तर त्याला आलेला अनुभव आपल्यापेक्षा निश्चित वेगळा असेल आणि तो आपल्याला या जन्मी येणं शक्य नाही पण ज्यानं ते अनुभवलं तो त्याचा आणि आपला ‘मी’ एकच आहे हा उलगडा होणं म्हणजे अध्यात्म. 

या अनुभवणाऱ्यावर अनुभवाचं विलेपन होत नाही, तो हरेक स्थितीत निर्लिप्त राहतो म्हणून अनुभव गौण आहे आणि त्यामुळे कोणताही अनुभव आध्यात्मिक नाही.

निसर्गदत्त महाराजांचं एक सुरेख वाक्य आहे: ‘कोणताही अनुभव नसलेला मी एक महानुभवी आहे! ’

हे वाक्य तुम्ही अंत:स्थ करा, या बोधासरशी, कोणत्याही अनुभवाच्या पूर्ततेसाठी अनिवार्य असणारी मनाची सक्रियता किंवा अनुभव नाही म्हणून येणारी अस्वस्थता दूर होईल. तुम्ही स्वस्थ व्हाल, स्वत:प्रत याल.

अनुभवांची दुनिया मायावी आहे आणि ती जाणीवेचा रोख अनुभवणाऱ्याकडून अनुभवाकडे वळवते त्यामुळे अशी साधना तुम्हाला स्वत:प्रत आणू शकत नाही.

पर्यटन हा माणसानं वेळ घालवण्यासाठी शोधलेला टाईमपास आहे आणि तो सुखद आहे पण ती आध्यात्मिक साधना नाही.

________________________________

दुसरी गोष्ट, सत्य किंवा आपण अचल आहोत, त्यामुळे पहिलं पाऊल उचलण्यापूर्वीच आपण स्वत:शी संलग्न आहोत.

शंकर, पार्वती, कार्तिक आणि गणपती यांची एक दंतकथा सर्वश्रुत आहे. पृथ्वीला कोण आधी फेरी मारतो यासाठी कार्तिक आणि गणपतीमध्ये स्पर्धा लागते. कार्तिक पृथ्वीप्रदक्षिणा करून येईपर्यंत गणपती आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून नमस्कार करतो आणि जिंकतो अशी ती कथा आहे. स्वत:प्रत येण्यासाठी कुणालाही (स्वत:ला देखील) प्रदक्षिणा घालण्याची गरज नाही कारण आपण स्थिती आहोत, व्यक्ती नाही आणि स्थिती अचल आहे त्यामुळे प्रदक्षिणेचा प्रश्नच येत नाही.

या अचलतेचा नुसता बोध कोणत्याही परिक्रमेपेक्षा जास्त स्वाथ्यदायी आहे.

_______________________________

तिसरी गोष्ट, आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हा उलगडा अध्यात्मात अत्यंत प्रार्थमिक आहे किंवा ती सुरुवात आहे आणि मग आपण मनापेक्षा वेगळे आहोत ही दुसरी स्टेप आहे.

शारीरिक कष्ट आणि सायास करून काहीही साध्य होत नाही त्याचप्रमाणे क्लिष्ट मानसिक साधनांनी गोंधळ वाढत जातो.

विपश्यनेच्या दोन सेशन्समध्ये सजग राहण्यासाठी ‘शांतपणे चालणं’ हा पर्याय बुद्ध सुचवतो आणि त्याच्या बुद्धीचं कौतुक वाटतं. आपण शरीरापासून वेगळे आहोत हा बोध सलग ठेवण्याचा प्रयत्न करत तुम्ही फक्त 'शांतपणे चालून' पाहा. आपण शरीरापासून वेगळे आहोत या वस्तुस्थितीच्या बोधाचं सातत्य टिकवणं हेच किती जिकीरीचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. पण एकदा का ही सोपी गोष्ट तुम्हाला जमली की तुमचा श्वासोत्व्छास सखोल होईल, रुधिराभिसरण उत्तम राहिल आणि आपण विदेह आहोत हा  बोध सघन होत जाईल.

जर आपण अनावश्यक दैहिक परिश्रमातच वेळ घालवला तर मनाच्या मायाजालातून बाहेर कधी पडणार? कारण तिथे तर आकलनाची आत्यंतिक गरज आहे, एकेक धारणा दूर करून आलेल्या स्वास्थ्यातून दुसऱ्या धारणेला शह द्यायचाय. उपलब्ध वेळ आणि शारीरिक ऊर्जा मनाचे विभ्रम दूर करायला वापरायची आहे.

_________________________________   

शेवटची गोष्ट, अध्यात्म हा चमत्कार नाही ती अत्यंत उघड आणि नजरेसमोर असलेली कायम स्थिती आहे, किंवा निराकारात प्रकटलेलं संपूर्ण अस्तित्व हाच एक चमत्कार आहे. सूर्याचं अनंत कालापासून प्रकाशणं, कोट्यवधी किलोमीटर दूर असलेल्या पृथ्वीच्या जीवसृष्टीला त्यानं आधार मिळणं, लक्षावधी ग्रहताऱ्यांचा कुणीही चालक नसताना अवकाशात चाललेला संचार आणि इतक्या अनाकलनीय भानगडीत आपला हा आता चालू असलेला श्वास (की ज्याच्यावर सगळं अवलंबून आहे) हे सर्व रहस्यमय आहे. छोटे छोटे योगायोग आणि त्यातून झालेली सुटका असे अनुभव रोमांचक असले तरी ते जाणीवेचा रोख स्वत:कडे वळवू शकत नाहीत.

सतत काही तरी वेगळं घडावं यापेक्षा जे काही घडतंय ते माझ्यात घडतंय आणि मी प्रसंगात सापडलेली व्यक्ती नसून प्रसंगाच्या भोवतालची स्थिती आहे हा उलगडा होणं हे आध्यात्मिक ईप्सित आहे.

संजय  

मेल : दुवा क्र. १