चितगांव संग्रामाचा ८२ वा स्मृतिदिन

आज दिनांक १८ एप्रिल. ८२ वर्षांपूर्वी याच दिवशी मास्टरदा उर्फ हुतात्मा सूर्यसेन यांनी भारतीय प्रजासत्ताक सेनेच्या अवघ्या ६४ सैनिकांसह रात्री ९.५० ला एल्गार केला आणि अगदी काही दिवसांसाठी असेल पण चितगांव स्वतंत्र केले आणि चितगांव वर तिरंगा फडकवला. या सेनेत सर्वात लहान योद्धा होता तो अवघ्या १४ वर्षांचा सुबोध रॉय!

स्वातंत्र्यवेडाने पछाडलेले मूठभर शिपाई विरुद्ध इंग्रजांचे प्रचंड संख्येने आलेले प्रशिक्षित व शस्त्रसज्ज सैन्य या अतिविषम संग्रामात अनेक वीरांच्या आहुती पडल्या आणि मास्टरदांना माघार घ्यावी लागली. मात्र सेना विखुरली ती पुन्हा एकदा एकवटण्यासाठीच. जंग जंग पछाडून व प्रजेवर अत्याचार करूनही मास्टरदा इंग्रजांना सापडले नाहीत, त्यांचा संग्राम सुरूच होता. पुढे १९३३ मध्ये ते इंग्रजांच्या हातात फितुरीमुळे सापडले. मास्टरदा व तारकेश्वर दस्तिदार यांना १२ जानेवारी १९३४ रोजी अमानुष अत्याचाराने ठार मारून त्यांचे अचेतन देह फासावर लटकवले गेले आणि फाशीची नोंद केली गेली.

सरकारला हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू व हुतात्मा सुखदेव यांच्या प्रमाणेच मास्टरदांच्याही मृतदेहाची प्रचंड धास्ती वाटत असावी. त्यांचा मृतदेह लोखंडी पिंजर्‍यात कोंबून समुद्रात बुडविण्यात आला.

फाशीच्या आदल्या दिवशी मास्टरदांनी आपल्या सहकार्‍यांना देण्यासाठी पत्र लिहून ठेवले - "माझ्या साथीदारांनो, उद्या माझी फाशी आहे, माझ्या आयुष्यातला तो मंगलक्षण आता अगदी जवळ येऊन ठेपला आहे. माझे मन आता अनंताकडे झेपावत आहे. मृत्यूला मिठीत घेऊन मी लवकरच माझ्या प्रिय साथीदारानं भेटायला जाणार आहे. या क्षणी मी तुम्हाला काय बरे देऊ शकतो? मी तुमच्यासाठी माझे सोनेरी स्वप्न मागे ठेवून जात आहे. साथींनो, तुम्ही पुढे जात राहा, यश तुमचेच आहे, गुलामीचे पर्व संपत येत आहे आणि स्वातंत्र्याचे सोनेरी किरण मला दिसू लागले आहेत. अंतिम विजय आपलाच आहे"

ज्याने स्वतंत्र हिंदुस्थानात तिरंगा फडकवण्यासाठी पूर्वेत ’हिंदुस्थान प्रजासत्ताक सेना’ स्थापन केली, ज्याने अवघ्या ६४ सैनिकांना घेऊन चितगांववर झडप घातली त्या मास्टरदांना व त्यांच्या तमाम साथीदारानं आज चितगांव संग्रामाच्या ८२ व्या स्मृतिदिनी सादर प्रणाम.

मास्टरदा


सुबोध रॉय

सुबोध रॉय

जितेन, मधुसुदन आणि पुलीन

नरेश, त्रिपुरा आणि बिंदु

हरिगोपाल आणि मतिलाल