असे जग तयाचे - असे काळ त्याचा

असे जग तयाचे - असे काळ त्याचा
प्रेमात झाला - असे जो कुणाचा ।ध्रु।

प्रीतीत जो सर्व हरवून बसला
जगाच्या ठिकाणी तया स्वर्ग दिसला
लुटे तोच आनंद ह्या जीवनाचा ।१।
प्रेमात झाला - असे जो कुणाचा

प्रत्येक वेडा असे वंद्य मजला
प्रियेची जणू जो प्रतिमाच बनला
करा मान त्याच्या वेडेपणाचा ।२।
प्रेमात झाला - असे जो कुणाचा

मिळावे धुळीला मनीषा अशी ज्या
व्यथा प्रीतिची औषधासारखी ज्या
छळे शोक त्याला न या जीवनाचा ।३।
प्रेमात झाला - असे जो कुणाचा

पर्याय :
१.
जो प्रीतियात्रेत गेलाय लुटला
जगाचा तयास्तव असे स्वर्ग बनला

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (वृत्त : भुजंगप्रयात - लगागा लगागा लगागा लगागा) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )
मूळ गाण्यात आणि भाषांतरात (वेगवेगळ्या) अनेक ठिकाणी लघ्वक्षर गाळून लगागा लगागा ऐवजी गागा लगागा किंवा लगागाऽ गागा किंवा गागाऽ गागा असे फरक आहेत. चालीत म्हणायला फरक पडत नाही.

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...   नाचा किंवा णाचा  असे जमवा बरका!  यमकाची जागा ठळक केलेली आहे.