नशीब माझे खरोखरी खोडसाळ आहे!
स्वभावही तेवढाच माझा खट्याळ आहे!!
विषास अन् अमृतास कैसे करू निराळे?
हरेक पेला तसा चवीला मधाळ आहे!
चढेल चर्चेस रंग आता, बघाच तुम्ही....
करायला वाद दु:ख माझे रसाळ आहे!
किती खुबीने, दिलीस त्यांना जहाल मात्रा;
हरेक माणूस आज झाला मवाळ आहे!
कसा रमू मी? तुझी न काहीच गंधवार्ता;
तुझ्याविना श्वास श्वास झाला रटाळ आहे!
पुन्हा पुन्हा साचती ढिगांनी किती चिपाडे!
मनात माझ्या जणू स्मृतींचे गुऱ्हाळ आहे!!
अशा कशा लेखण्या, कळेना, अटून गेल्या?
खरेच गेलाय काय त्यांचा विटाळ आहे?
मलाच मी देत देत खांदा जिवंत आहे....
मलाच ठाऊक की, किती मी ढिसाळ आहे!
खरेच दुष्काळ आज गझले, तुझाच आहे!
दिसायला आज फक्त दिसतो सुकाळ आहे!!
प्रकाश धुंडाळण्यात गेली प्रकाशवर्षे.....
अजूनही पाहिली कुठे मी सकाळ आहे?
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१