कळत नकळत

बऱ्याच दिवसांनी सगळे भेटलो. निमित्त होतं विनोद च्या वाढदिवसाचं. सगळ्यांचं आता एकत्र भेटणं फक्त समारंभांपुरतंच मर्यादित राहिलं होतं. सुरुवातीला एकत्र भेटल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि काही वेळातच गाडी आली ते थेट "लग्न" ह्या विषयावर. मुलगी किंवा मुलगा वयात आला की घरातून "लग्न" ह्या विषयाची टिमकी वाजायला सुरुवात होते. आम्ही पोरं सुद्धा त्याला अपवाद नव्हतोच.
"लग्न" म्हटलं की मला एकच प्रश्न त्रास देतो ! लोक लग्न का करतात ?
अनेकांना मी ह्यायाधी ह्या प्रश्नाचं उत्तर विचारलं होतं. लोकांकडून फार भिन्न भिन्न उत्तरं ऐकायला मिळाली .
हाच प्रश्न मी इथेही विचारला. आमच्यापैकी लग्न झालंय अश्या दिशा आणि पूजा दोघीच जणी. नीलिमा साठी शोधमोहीम चालू आहे, त्यामुळे तीपण आमच्याच गटामध्ये बसत होती.
प्रत्येकानं आपापल्या परीनं उत्तर द्यायचा प्रयत्न केला. शेवटी सगळ्यांनी मला विचारलं. "तू सांग तुला काय वाटतं? का करावं लग्न ?"
"हे बघा, मला जर हे नीट माहीत असतं तर मी प्रश्न केलाच नसता. पण मी हाच प्रश्न अनेकांना विचारला आणि उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण समाधानी वाटावं असं एक उत्तर मला मिळालंय. ते मी सांगतो" मी बोलायला सुरुवात केली.
"माणसानं लग्न करावं ते संतती प्राप्त करण्यासाठी. आपल्या अपत्याला चांगले संस्कार देऊन त्याला घडवणं हे त्यामागे अभिप्रेत आहे. त्याला एक सुजाण नागरिक बनवणं हे एक खूप महत्त्वाचं आणि एक चांगलं सामाजिक काम आहे. आपला समाज आणि धर्म आपल्याला लग्नाआधी संतती प्राप्त करण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे लग्न करूनच संतती प्राप्त करणं भाग आहे आणि तेच योग्य आहे. इतरही सामाजिक कामे असतील, पण हे काम प्रत्येकानं करणं अनिवार्य आहे. प्रेमविवाह जो की प्रेमाखातर केलेला असतो, त्यात दोन्ही मनांचा स्वार्थ दडलेला असतो. त्यात समाजकल्याणाचा विचार नसतो. लग्न करून अपत्याला मोठं करण्याच्या ह्या कामात फक्त आणि फक्त समाजाचाच फायदा आहे. शहाजी राजांनी जिजाबाईंबरोबर विवाह केला नसता तर आज आपल्याला छत्रपती शिवाजी राजांचा पराक्रम बघायला मिळालाच नसता."
सगळे जण शांतपणे ऐकून घेत होते. मुद्दा तसं पाहता खूप चुकीचा नव्हता. त्यामुळे त्याला छेद द्यायचा कोणी प्रयत्न केला नाही. मी सर्वांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होतो. माझी नजर नीलिमाकडे वळली.
ती खूप खिन्न झाली होती. आपण एखादा गुन्हा केला आहे असं तिचा चेहरा सांगत होता.
"नीलिमा म्याडम काय झालं ? सगळं ओके आहे नं ?" मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
"संतती ? मूलबाळ? हम्म .. " तिनी एक मिश्किल हास्य देत माझ्याकडे नजर वळवली.
तिच्या नजरेत बघितल्यावर, त्या क्षणाला मात्र माझी स्थिती बिकट झाली.
कोणीतरी सणसणीत चपराक माझ्या गालावर ओढावी तशी माझी अवस्था झाली. काही दिवसांपूर्वीच घडलेली एक घटना माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली.
"अरे भूषण, नीलिमा आलीये घरी, कुठे आहेस ? ये लवकर घरी" आईनं मला फोन करून कल्पना दिली. मी गडबडीतच ऑफिसातून निघालो. नीलिमा अशी अचानक न कळवता घरी कशी आली हा विचार करत असतानाच मी घरी पोचलो.
ती समोरच खुर्चीत बसली होती. डोळे लाल होऊन सुजले होते. खूप अपसेट वाटली.
"काय झालं गं ? अशी अचानक ? काही न कळवता ?" तिचं असं अचानक येणं मला अपेक्षित नव्हतं, त्यामुळे मी थेट प्रश्न केला.
ह्यावर ती काहीच बोलली नाही. तिनी बॅगेतून एक फाइल काढली आणि माझ्या हातात ठेवली. मी ती लगेच उघडून बघायला सुरुवात केली. ते कसलेतरी रिपोर्ट्स होते.
"काय आहे हे ? कसले रिपोर्ट्स आहेत ? मला काहीच कळत नाहीये " माझ्या भीतीयुक्त कुतूहलाला ज्ञान देण्यासाठी मी तिलाच पाचारण केलं.
"त्या रिपोर्ट नुसार मी कधीही आई होणार नाही वेड्या, डॉक्टर म्हणाले खूप गुंतागुंत निर्माण झालीये" इतकं बोलून तिच्या सहनशक्तीनं मर्यादा ओलांडली आणि ती खाली मान घालून घुसमटत रडू लागली.
परिस्थितीचे गांभीर्य मला समजत होतं. पण अशा वेळेस कसं वागायला पाहिजे ते मला सुचेना.
"अग वेडूबाई, आजकाल मेडिकल सायन्स खूप पुढे गेलं आहे. प्रत्येक व्याधीवर काही ना काहीतरी उपाय असतोच. काही काळजी करू नकोस. सगळं नीट होईल." मी सांत्वन करायचा अयशस्वी प्रयोग करून पहिला.
"भावा, ए भावा, कुठे हरवलास? कसला विचार करतोयस ?" विनोदनी मला हालवून ठिकाणावर आणला.
"अरे काही नाही, असच एक किस्सा आठवला रे.. बरं ते जाऊदे, आपला तेंडल्या आजकाल नीट खेळत नाही राव. लोक पण ना, राजीनामा दे, राजीनामा दे म्हणून मागे लागलेत. खेळत नाही म्हणून लगेच हकालपट्टी का ? अरे त्याला संधी द्या ? प्रयत्न करतोय की तो .. आपल्याला नाही पटत राव हे लोकांचं ".. मी विषय बदलायचा प्रयत्न केला.
त्यानंतरचा वेळ गप्पांमध्ये निघून गेला. सगळ्यांना हसत टाटा केलं. दिवस संपला.
कळत नकळतपणे आमच्यापैकीच एक मन खूप जोरात दुखावलं गेलं होतं. त्याची खंत मनातून सहजासहजी जाणे अवघड आहे.