नीलनभी विहरत्या ढगांनो या या या

नायक :
नीलनभी विहरत्या ढगांनो या या या
शेत उन्हाने करपे अमुचे त्याला द्या छाया

नायिका :
लपलेल्या चंचल पक्ष्यांनो जा जा जा
धान्य अजुनही कच्चे आहे, पिकता या खाया
।ध्रु।

नायक :
वाफ्यांमधुनी झुळझुळ वाहे शीतळ शीतळ पाणी
पायांना लागेल तुझ्या ते बघ शेताच्या राणी

नायिका :
गढूळेल ते लागुन माझ्या मळलेल्या पाया
मी शेताची दासी अन् तू बळिराजा राया ।१।

नायिका :
हिरव्या हिरव्या शेता राखी देवाजीची करुणा
म्हणेल तो तर लोंबी लोंबी धरेल लाखो दाणा

नायक :
कष्टकऱ्यांचे गाऱ्हाणे तो ऐके विठुराया
उघडी ठेवा अपुली झोळी, तो आहे द्याया ।२।

पर्याय :

१. ... अन् तू शेताचा राया
किंवा
.... अन् तू शेताचा राजा (... आ इतकेच यमक निवडले तर)

टीपा :

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चालः   मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक निदान ...   आ असे जमवा बरका! (...   आया असे जमवलेत तर फारच धमाल येईल)  यमकाची जागा ठळक केलेली आहेच.