मोजून -मापून खून

( ऍगाथा ख्रिस्ती यांच्या " टेप मेझर्ड मर्डर" या कथेचे मराठी रूपांतर )

कितव्यांदा कोण जाणे.. मिस पॉलीट ने हातातली छत्रीची मूठ समोरच्या दारावर हलकेच दोन तीन वेळा आपटली. त्या दुपारच्या शांततेत तेव्हढा आवाजही खूप मोठा वाटत होता. पण आतून कसलीही चाहूल लागत नव्हती. हैराण होत तिने घराभोवती असलेल्या छोटेखानी बागेच्या नीटस अशा लाकडी फाटकाकडे नजर टाकली. सारं काही निर्मनुष्य होते. अवती भवती बाग असूनही उन्हाच्या असह्य झळांनी ती चांगलीच त्रासली होती. तिने बंगलीच्या तीन चार पायऱ्या उतरून बाजूच्या खिडकीमधून आत डोकावण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे असं करणं मिस पॉलीट च्या सभ्यतेच्या व्याख्येत बसणारं अजिबात नव्हतं. पण आज तिचा नाईलाज होता.

मिस पॉलीट ही सेंट मेरीमीड या गावातली एक रहिवासी.. स्त्रियांचे कपडे शिवण्याचे काम करून ती आपला चरितार्थ चालवत असे. आपल्या कामात ती चांगलीच निष्णात होती. कारण त्या लहानशा गावातील बहुतांश उच्चभ्रू स्त्रिया आपले पोषाख तिच्याकडूनच शिवून घेत असत. त्या पैकीच एक म्हणजे मिसेस स्पेनलॉ. तिने मिस पॉलीटला एक नवीन हिरव्या रंगाचा रेशमी पोषाख शिवायला सांगितले होते. तिला तो दोन दिवसानंतर होणाऱ्या कसल्याशा समारंभासाठी हवा होता. पॉलीटने तो शिवून पूर्ण केला होता, आणि आज 3.30 वा. तिची मिसेस स्पेनलॉ बरोबर वेळ निश्चित केली होती. आज स्पेनलॉ तो पोषाख परिधान करून बघणार होत्या, आणि तो त्यांना योग्य वाटला तर पॉलीट त्याच्या शिवणी पक्क्या करून तसेच लेसेस वगैरे लावून दुसऱ्या दिवशी त्यांना देणार होती. पण हे सगळं होण्यासाठी स्पेनालॉने दार उघडणे जरूरी होते. पॉलीटने आपल्या लहानशा रिस्टवॉच मध्ये पाहिले. आता जवळ जवळ 3.45 झाले होते.

बहुदा मिसेस स्पेनलॉ आपल्याला दिलेली वेळ विसरल्या असाव्यात. मिस पॉलीटच्या मनात आले. पण मिसेस स्पेनलॉ बाबत असे घडणे अशक्य होते. ती अतिशय शिस्तीची बाई होती. आणि तो पोषाख मिळण्याची तिला निकड होती. मग काय झाले असावे? मिस पॉलीट संभ्रमात पडली. हातामध्ये असलेल्या खाकी रंगाच्या कागदात गुंडाळलेल्या रेशमी पोषाखाकडे बघत ती विचार करत होती. परत जावे तर तिचे काम उगीचच लांबणार होते, आणि कदाचित मिसेस स्पेनलॉ चाही खोळंबा झाला असता.

इतक्यात तिला बागेतील पायवाटेवर कुणाचीतरी चाहूल लागली. ती वळून बघत असतानाच "गुड आफ्टर्नून मिस पॉलीट" असे शब्द ऐकू आले. फाटकामधून मिसेस हार्टनेल येत होती. साधारण 55 वर्षे वयाची प्रौढ आणि स्थूल महिला, अतिशय बडबडी.. प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची अतोनात हौस असलेली महिला.. गावातील काही स्त्रिया आपापसात बोलताना तिची "भोचक.. " अशी संभावना करीत. ती आली की लवकरात लवकर तिच्या समोरून निघून जाण्याचा प्रयत्न करीत. पण आज पॉलीटला ती एखाद्या देवदूता सारखीच भासली.

"गुड आफ्टरनून मिसेस हार्टनेल.. तुम्ही मिसेस स्पेनलॉ ला भेटायला आला आहात का? पण त्या बहुदा घरात नसाव्यात. कारण मी गेले जवळजवळ 15 मिनिटे दार वाजवते आहे, पण कुणी उघडत नाही. "

" अस्सं..? पुढे होत मिसेस हार्टनेल म्हणाली. " थांब मी बघते" असे म्हणत तिने दारावर जोरजोरात आपल्या हाताची मूठ आपटली. तरीही आतून कसलाच प्रतिसाद नाही.

"... आणि ग्लॅडीज पण का येत नाहीये? ती कुठे गेली". हार्टनेल मोठ्याने म्हणाली. ग्लॅडीज म्हणजे स्पेनलॉ च्या घरात घरकाम करणारी मुलगी. खरं म्हणजे नेहमी तिच दार उघडण्यासाठी पुढे येत असे. पण आज तिची देखिल चाहूल लागत नव्हती.

"मला वाटते आज गुरुवार, म्हणजे तिच्या आठवड्याच्या सुट्टीचा वार असणार, आणि मिसेस स्पेनलॉ देखील बाहेर गेलेल्या असणार.. " पॉलीट चे वाक्य पूर्ण होऊ न देताच मिसेस हार्टनेल एकदम म्हणाली, " शक्य नाही.. मी तिला नुकतीच भेटले होते, अगदी काही वेळापूर्वीच, आणि ती कुठेही बाहेर जाणार नव्हती. थांब मी त्या मागील बाजूच्या खिडकीतून बघते".

असे म्हणत म्हणत मिसेस हार्टनेल मुख्य दाराला वळसा घालून मागच्या खिडकी च्या जवळ गेली. तिथून आत डोकावून बघताच तिने " अरे देवा!! " अशी जोरात किंकाळी फोडली. पॉलीट धावतच तिच्याकडे गेली. आणि हार्टनेल दाखवत असलेल्या दिशेने खिडकीतून तिने डोकावून पाहिले.. मिसेस स्पेनलॉ जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेली होती. तिच्या एकंदरीत स्थितीवरून तिचा मृत्यू झालेला असावा असेच वाटत होते.

मिस पॉलीट घाई घाईने बागेच्या फाटकाच्या दिशेने निघाली. पोलिसांना माहिती देणे जरूरीचे होते.

... आणि त्याच वेळी मि. स्पेनलॉ फाटकामधून आत येत होते.

(क्रमशः)