मोजून-मापून खून (५)

( अॅगाथा ख्रिस्ती यांच्या " टेप मेझर्ड मर्डर" या कथेचे मराठी रूपांतर )
आपल्या ऑफिसमध्ये बसून काम करण्यात व्यग्र असलेल्या मेल्चॅट कडे जेव्हा त्याचा ऑर्डर्ली मिस जेन मार्पलच्या नावाचे कार्ड घेऊन आला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. पण त्याने आपल्या समोरील फाइल बाजूला सारत तिला त्वरेने आत पाठविण्याची सूचना दिली. मिस मार्पल त्याच्या ऑफिस मध्ये प्रवेश करीत होती, तेव्हा आपल्या जागेवरून उठत त्याने तिचे स्वागत केले.  
मेल्चॅट वाट पाहत होता की मिस मार्पल बोलण्यास आरंभ करेल. पण ती अजूनही गप्पच होती. शेवटी न राहवून मेल्चॅटनेच संभाषणाची सुरुवात केली.  
"तुम्हाला हेड कॉन्स्टेबल स्लॅक भेटण्यास आला होता ना? मी त्याला तशा सूचना दिल्या होत्या. "
"होय, होय.. आणि धन्यवाद माझी आवर्जून आठवण ठेवल्याबद्दल" मिस मार्पल उत्तरली. मग तिने विचारले 
"स्पेनलॉ च्या केस संबंधी काय प्रगती आहे? मी अश्यांसाठी विचारते की मला काही महत्त्वाच्या गोष्टी नुकत्याच लक्षात आल्या आहेत, आणि असे वाटते आहे की त्यांचा उपयोग खुनी व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित होऊ शकतो. " 
मिस मार्पल असे म्हणताच मेल्चॅट सावरून बसला. या वृद्ध स्त्री बद्दल त्याला आदर होता. या पूर्वीही एका गुंतागुंतीच्या केस मध्ये त्याला तिची, तिच्या सल्ल्याची चांगलीच मदत झाली होती.  
मिस मार्पल म्हणाली.. "मला कळले की सर ऍबरक्रॉंबी   कडे मिसेस स्पेनलॉ नोकरीस होत्या, आणि त्याच वेळी त्यांच्या घरी चोरी झाली होती. "
"खरं आहे.. " मेल्चॅट म्हणाला, "पण त्याचा इथे काय संबंध? ही चोरीची घटना घडल्यानंतर काही काळाने मिसेस स्पेनलॉने सर रॉबर्ट च्या मुख्य माळ्याबरोबर विवाह केला होता, आणि नंतर त्यांनी दोघांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता. पण लवकरच स्पेनलॉच्या प्रथम पतीचे काही आजाराने निधन झाले. त्या मुळे तिचा त्या चोरीच्या घटनेशी काही संबंध असेल असे वाटत नाही. आणि असला तरी इतक्या वर्षांनंतर त्याचे फारसे काही महत्त्व देखील राहिले नाही. "
"बरोबर आहे.. पण या वेळी मला माझ्या दोन दूरच्या भावांची आठवण येते आहे. ऍंटोनी आणि गॉर्डन. दोघांनाही समान संपत्ती मिळालेली. पण ऍंटोनी चे सारे निर्णय अचूक ठरत गेले. त्याने जिथे म्हणून पैशाची गुंतवणूक केली ती भलतीच फायदेशीर ठरली. आणि काही काळातच त्याची संपत्ती अनेक पटीने वाढली. नशीब त्याला अनुकूल होते. परंतु या उलट गॉर्डनचे सारे निर्णय फसले आणि त्याची असलेली संपत्ती देखिल तो गमावून बसला. यात खरं म्हणजे कुणाचीच चूक नव्हती, ऍंटोनी ची तर अजिबातच नव्हती. नशिबाचा खेळच म्हणा ना तो. पण गॉर्डन ने मात्र ऍंटोनीशी वैर धरले शेवट पर्यंत. तो कायम त्याचा द्वेष करीत राहिला. "
बोलता बोलता मिस मार्पल काही क्षण शांत राहिली, आणि सावकाश म्हणाली, "मी असे ऐकले की मिस पॉलीट आणि मिसेस स्पेनलॉ दोघी एकाच वेळी ऍबरक्रॉंबी च्या घरी नोकरी करत होत्या? "
"हा.. त्यात काही अर्थ नाही. तुम्हाला म्हणायचे आहे की त्या दोघींचा संबंध त्या चोरीशी होता? पण त्या घटनेसंबंधी अनेक प्रवाद आहेत. काही जण म्हणतात ऍबरक्रॉंबीचा मुलगा, जो कर्जबाजारी होता, आणि त्यामुळे त्याच्या वडिलांचा त्याच्यावर रोष होता, त्यानेच ही चोरी केली असावी. कारण चोरीच्या घटनेनंतर, आश्चर्यकारकरीत्या त्याने आपली सारी कर्जे फेडली होती, आणि नंतर ऍबरक्रॉंबीने देखिल चोरीचा तपास पुढे चालवू नये अशी पोलिसांकडे विनंती केली होती. तसेच ती रत्नेही कधीच सापडली नाहीत.   त्या मुळे तुम्ही जे सांगू पाहत आहात त्याला तपासाच्या दृष्टीने फारसे महत्त्व नाही. "
मिस मार्पल काही क्षण शांत राहिली, आणि म्हणाली, "ठीक आहे, दूसऱ्या काही गोष्टी आहेत ज्या मला महत्त्वाच्या वाटतात. एक म्हणजे मिसेस स्पेनलॉ चे सतत चर्च च्या कामात गुंतून राहणे, आणि तिच्याकडे असलेला पैसा. इन्स्पेक्टर, मी आजवर अनेक माणसे पाहिली, आणि घटना घडताना पाहिलेल्या, अनुभवलेल्या आहेत. मनुष्यस्वभाव असा आहे की जो आपला भूतकाळ सतत आपल्या बरोबर घेऊन वावरत असतो. भूतकाळातील घटनेशी काय संबंध?   असे म्हणून चालत नाही. मिसेस स्पेनलॉचा अॅबरक्रॉंबीच्या घरी झालेल्या चोरीशी काही संबंध नव्हता हे मान्य करू, पण मग स्वतःचे फुलांचे दुकान उघडण्याइतके पैसे तिच्याकडे होते त्याचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल?   नेमक्या त्या घटनेनंतर तिने आणि तिच्या पतीने नोकरी सोडली आणि मिस पॉलीटने देखिल हा   निव्वळ योगायोगच का? तर तसे नाही. मिसेस स्पेनलॉचा खून झाला तो तिच्या इतिहासात घडून गेलेल्या काही प्रसंगामुळेच. मी तुम्हाला मगाशी माझ्या दोन दूरच्या भावांचे उदाहरण दिले ते याचसाठी. चोरीत सहभाग होता की नाही हा 
गौण मुद्दा, पण त्या घटनेचा दोघींनाही फायदा झालेला होता. दोघींनाही काही रक्कम मिळाली होती. मिसेस स्पेनलॉने ती वापरून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. प्रथम पतीच्या मृत्यूनंतर तिने स्पेनलॉ बरोबर विवाह केला. तिच्या प्रत्येक निर्णयानंतर तिची उत्तरोत्तर प्रगती होत होती.   या उलट   मिस पॉलीट... अनेक ठिकाणी जाऊन देखिल, तिला कुठेच यश आले नाही, आणि शेवटी ती एकटीच, या लहानशा खेडेगावात शिलाई करून जगणारी एक स्त्री बनून राहिली. मिसेस स्पेनलॉ इथे आल्यावर तिला तिचा   मत्सर वाटू लागला. "
"ठीक आहे,   ती मत्सरग्रस्त झाली असेल, कारण स्त्रियांचा स्वभावच तसा असतो. " मेल्चॅट मध्येच तिला थांबावीत म्हणाला. परंतु मिसेस स्पेनलॉ   मेरीमीड मध्ये आल्या आल्या तिचा खून झाला नाही. तर काही काळानंतर झाला. असे का? "
आपण एक बिनतोड मुद्दा मांडला याचा मेल्चॅटला विलक्षण आनंद झाला होता. आणि तो उत्सुकतेने मिस मार्पलच्या उत्तराची वाट बघत होता.  
"खरं आहे तुमचं.. " मिस मार्पल उत्तरली. "पण तिचा खून झाला तो फक्त मत्सरातून नाही, तर तिच्या पूर्वायुष्यात घडून गेलेल्या घटनेमुळे, असं मी मगाशी म्हणाल्याचे आठवत असेल तुम्हाला. असं बघा, मिसेस स्पेनलॉ ही काही गुन्हेगार प्रवृत्तीची स्त्री नव्हती. तर एक पापभीरू, सर्वसाधारण अशी   स्त्री होती. नकळत ती बहुदा नकळत  त्या गुन्ह्यात ओढली गेली असावी. आणि त्या वेळी ती खूपच तरुण असणार, खरं म्हणजे   एक अननुभवी, अशी तरुण मुलगीच होती ती त्यावेळी. पण त्या घटनेचा परिणाम तिच्यावर कायम होता. ती खूप अस्वस्थ होती, आणि म्हणूनच तिने स्वतःला चर्चच्या कामात झोकून दिले होते. तिथे तिची टेड गेर्राड या तरुणाशी ओळख झाली. मेरीमीड मधील अनेक तरुण मुली आणि मध्यमवयीन स्त्रियांना देखिल टेड भलताच आकर्षक वाटत असे, आणि त्याच्यासाठी त्यांच्या चर्च च्या फेऱ्या वाढल्या होत्या.   स्पेनलॉ आणि टेड यांच्या वरचेवर गाठीभेटी होत असत. त्यावरून गावातील स्त्रिया चर्चा करीत असत. ती चर्चा पॉलीटच्या कानावर गेली. "
"ओह... अस आहे होय? " मेल्चॅट उद्गारला.  
"नाही नाही.. तुम्हाला वाटते तसं काही नाही. "मिस मार्पल घाईघाईने म्हणाली. "पॉलीटला टेडबद्दल काही आकर्षण नव्हते. तसेच स्पेनलॉला देखील नव्हते. मला स्वतः मिसेस स्पेनलॉनेच सांगितले, की त्यांच्या त्या ऑक्सफर्ड ग्रुपच्या कामानिमित्त ते भेटत असत. आणि त्यावेळी तिने आपली अस्वस्थता त्याला बहुदा सांगितली असावी, त्यामागचे कारण न सांगता. टेडने तिला चर्च मध्ये धर्मगुरुसमोर कबुलीजबाब (कंफेशन) दे असा सल्ला दिला.   अनेक लोक असा कबुलीजबाब दिल्या नंतर तणावमुक्त आयुष्य   जगतात असे त्याने सांगितले. आणि हे पॉलीटला कळले होते. मिसेस स्पेनलॉने अजून कबुलीजबाब देण्याचा निर्णय जरी घेतला नव्हता, तरी तशी शक्यता होतीच. आणि तसे झाले असते, तर मिस पॉलीटला भीती वाटत होती की तिला अनेक वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याबद्दल जेलमध्ये जावे लागेल. तिला ते घडू द्यायचे नव्हते. आणि म्हणून तिने निर्णय घेतला. " 
"निर्णय घेतला? कसला? खून करण्याचा? " मेल्चॅट आश्चर्यचकीत होत म्हणाला. त्याला मिस मार्पलच्या सांगण्यात तथ्यं वाटू लागले होते. "पण खून झाला तेव्हा ती तर मिसेस स्पेनलॉच्या घराबाहेर उभी होती. मिसेस हार्टनेल आणि मिस पॉलीटने एकदमच मिसेस स्पेनलॉच्या घरात प्रवेश केला होता. " मेल्चॅट साशंक स्वरात म्हणाला.
"तुम्ही ती पीन विसरत आहात इन्स्पेक्टर. " मिस मार्पल त्याला आठवण करून देत म्हणाली. कॉन्स्टेबल पाल्कच्या युनिफॉर्मच्या बाहीला अडकलेली पीन. जी फक्त शिलाई करणारे कारागीरच वापरतात. ती खुनाच्या जागीच कुठेतरी पडलेली होती, आणि तेथील जागेची तपासणी करताना ती त्याच्या कपड्यात अडकली. याचा अर्थ मिस पॉलीट आधी तिथे गेलेली असणार. मी काय घडले असेल याचा माझा अंदाज सांगते. तुम्ही मिस पॉलीट कडून खात्री करून घ्या.  
तिने मिसेस स्पेनलॉचा काटा काढायचे ठरवले. आणि तिला संधी स्वतः स्पेनलॉनेच दिली. मिस पॉलिट कडून तिला एक रेशमी पोषाख शिवून घ्यायचा होता. मिस पॉलीट ही एका कसबी कारागीर होती. प्रत्येक गोष्ट मोजून-मापून, बिनचूकपणे करायची तिला सवय होती. तिने पोस्टऑफीस मधील फोन वरून मि. स्पेनलॉला फोन केला, आणि  तो दुपारी 3.30 च्या सुमारास   घराबाहेर असेल अशी व्यवस्था केली. फोन करतानासुद्धा तिने अचूक वेळ साधली, ज्या वेळी पोस्टमास्तरीणबाई तिच्या दुकानासाठी आलेल्या वस्तूंचे पार्सल घेण्यासाठी 5-10मिनिटे ऑफिस पासून दूर होती. त्यामुळे मिस पॉलीटने फोनचा केलेला वापर तिला कळलाच नव्हता. ती दुपारी मिसेस स्पेनलॉच्या घरी आली आणि तिने तिला पोषाख घालून बघण्यास सांगितले. म्हणूनच मिसेस स्पेनलॉने किमोनो परिधान केलेला होता, नेहमीचा पोषाख नाही. शिवलेल्या पोषाखात काही दुरुस्ती करावी लागेल असे म्हणून परत काही मापे घेण्यासाठी म्हणून मिस पॉलीटने, मिसेस स्पेनलॉच्या गळ्याभोवती आपली मोजमापे घेण्यास वापरली जाणारी टेप अडकवली. मग पुढचे सगळं सोपे होते. मिस पॉलीट ही मिसेस स्पेनलॉपेक्षा उंच   होती. तिने ती टेप तशीच तिच्या गळ्याभोवती आवळली. मिसेस स्पेनलॉ मृत झाल्याची खात्री करून घेऊन ती घराच्या मागील दरवाज्याने बाहेर आली, आणि वळसा घालून मुख्यं दारापाशी,   आपण जणू काही आत्ताच आलो आहोत असा देखावा करीत थांबली. तिच्या चांगल्या नशिबाने मिसेस हार्टनेल त्याचवेळी तेथे आली. ती नसती आली तरी मि. स्पेनलॉ माझ्या घरून तिथे काही वेळात पोहोचणार होताच. तिने सगळे काही मोजून-मापून केले होते. कुणालाच तिचा संशय येणार नव्हता, कारण मिसेस स्पेनलॉच्या मृत्यूने तिला काहीच   आर्थिक फायदा होणार नव्हता. त्यामुळे संशयाची सुई   सतत मि. स्पेनलॉकडेच निर्देश करीत राहिली होती. आणि मी सांगते इन्स्पेक्टर, या न केलेल्या खुनासाठी मि. स्पेनलॉला मृत्युदंड जरी झाला असता, तरी मिस पॉलीटच्या सदसद्विवेकबुद्धीला किंचितही टोचणी लागली नसती. "
मेल्चॅट, मिस मार्पलचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. तिने सांगितलेल्या प्रत्येक मुद्द्याचा तो गंभीरपणे विचार करत होता. आता त्याला ते सारे मुद्दे न्यायालयात सिद्ध करायचे होते. पण तो ते नक्कीच करणार होत. तो एका कर्तव्यनिष्ठ पोलीस ऑफिसर होता, आणि एका निरपराध   माणसाचा   हकनाक   बळी तो कदापिही जाऊन देणार   नव्हता.  
 
(समाप्त)