मोजून -मापून खून (३)

( ऍगाथा ख्रिस्ती यांच्या " टेप मेझर्ड मर्डर" या कथेचे मराठी रूपांतर )
इन्स्पेक्टर मेल्चॅट विचारी नजरेने आपल्या समोर बसलेल्या कॉन्स्टेबल पाल्क आणि हेड कॉन्स्टेबल स्लॅक कडे बघत होता. सेंट मेरीमीड ला घडलेल्या घटनेचा रिपोर्ट द्यायला ते आले होते. त्यांनी सांगितलेल्या सर्व घटनेचा तो बारकाईने विचार करीत होता.
"मग तुला वाटते आहे मि. स्पेनलॉनेच खून केला आहे तर ?" त्याने पाल्क ला विचारले.
"हो सर सकृतदर्शनी तर तसेच वाटते आहे.  मिसेस स्पेनलॉचे कुणाशीच भांडण वगैरे नव्हते, म्हणजे त्या साठी त्यांचा खून व्हावा इतके तरी नक्कीच नाही.  आणि त्यांच्या मृत्यूमुळे फायदा होईल अशी एकमेव व्यक्ती म्हणजे मि. स्पेनलॉ हेच आहे."
"हम्म्म्म",   मेल्चॅट उद्गारला "-- पण खून उघडकीला आला तेव्हा तो घरी नव्हता, बाहेरून येत होता असे तू म्हणालास? आणि त्याला  साक्षीदार सुद्धा आहेत. "
"हो सर, पण तो एक बनाव होता. कारण मिस मार्पल ने त्याला फोन केलाच नव्हता."  पाल्क म्हणाला.
"पण दुसर्‍या कुणी मिस मार्पल च्या नावाने फोन करून त्याला घरापासून दूर जाण्यास भाग पाडले असण्याची शक्यता तू नजरेआड करतो आहेस माझ्या मित्रा." टेबलवर पेन ने आघात करत इन्स्पेक्टर मेल्चॅट म्हणाला. 
"हे बघ निष्कर्षावर येण्याची घाई करू नकोस. आणि तू कोण म्हणालास? मिस मार्पल? म्हणजे मिस जेन मार्पल ना? ती काय म्हणत होती ?"
"तिच्या मते मि. स्पेनलॉ हा गुन्हा करूच शकत नाही. तो एक सरळमार्गी माणूस आहे. त्याला हे सारे जमणार नाही."  पाल्कने  काहीशा नाखुशीने सांगितले. कारण त्याच्या मते मि. स्पेनलॉ हा एकमेव संशयित होता. आणि सरळ साध्या केस ला त्याचा वरिष्ठ अधिकारी  उगीचच गुंतागुंतीची करू पाहत होता. 
"ठीक आहे तर मग, मला वाटते स्लॅक तू मिस मार्पलला भेटावंस, अर्थात अनौपचारिक भेट असणार आहे ती.  आणि तिचा सल्ला नीट ध्यानात घे. ती अतिशय शहाणी आणि समंजस अशी स्त्री आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, गावात घडणार्‍या अनेक घटना ती ऐकत आणि पाहत असते." इन्स्पेक्टर मेल्चॅटने  सांगितले.
******
"पण लोकांना असे का वाटत असेल?"  काहीशा वैतागाने स्पेनलॉ म्हणाला. "मी माझ्या बायकोचा खून का करीन? आमच्यात कधी साधा वाद सुद्धा झाला नाही. आता या लहानशा खेडेगावात घर घेण्याचा माझा निर्णय माझ्या पत्नीला फारसा रुचला नव्हता हे खरं आहे.  पण कुठल्या जोडप्यामध्ये 100% मतैक्य असते? तुम्हीच सांगा.  आम्ही सुखी होतो एकमेकांबरोबर." 
मिस मार्पल सहानुभूतीने त्याचे बोलणे ऐकत होती. 
"पैसा.. तुला मिळणारा पैसा मि. स्पेनलॉ. त्यांमुळे लोकांना वाटते आहे की खून तूच केलास."
मि. स्पेनलॉने अगतिकतेनं आपले हात झटकले. तो  हताश होऊन तेथे बसला होता. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने खूप काही सहन केले होते. त्रास, मनस्ताप, दुःख हे जणू त्याचे सखे सोबती बनले होते. पूर्वी रस्त्यात भेटल्यावर आदरपूर्वक आपुलकीने अभिवादन करणारे लोक,तो येताच तोंड फिरवून निघून जात होते. सर्वांच्याच डोळ्यातला संशय आणि तिरस्कार त्याला जाणवत होता. आणि त्यामुळे तो फारच खचला होता. आपली बाजू कुणासमोर तरी मांडावी, म्हणून तो आज मिस मार्पल कडे आला होता. 
मिस जेन मार्पल हे त्या लहानशा खेड्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. तिच्या मतांना, शब्दांना गावात मान होता. अतिशय गोड  चेहऱ्याची आणि तितक्याच तिखट जिभेची म्हणून तिची ख्याती होती. ती कदाचित आपल्या समस्येवर काही उपाय सांगेल असे. मि.स्पेनलॉला वाटत होते. 
मि. स्पेनलॉचे आजवरचे आयुष्य मोठ्या शहरात गेलेले होते. त्याचा स्वतःचा किंमती आभूषणे खरेदी, विक्रीचा व्यवसाय होता. व्यवसायात त्याला जेमतेमच प्राप्ती होत होती. त्याची पत्नी म्हणजे मिसेस स्पेनलॉचे फुलांच्या विक्रीचा व्यवसाय होता. तो मात्र भलताच फायद्यात चालू होता. तिच्या दुकानातच त्यांची ओळख झाली होती. त्या वेळी ती  एक विधवा स्त्री होती. पतीच्या निधनानंतर  आपला व्यवसाय समर्थ पणे सांभाळत होती. स्पेनलॉ बरोबर विवाह झाल्यानंतर देखील ती आपला व्यवसाय स्वतंत्र पणे सांभाळत होती.  विवाहानंतर काही वर्षांनी त्या दोघांनी आपापले व्यवसाय विकून सेंट मेरीमीड येथे येण्याचा निर्णय घेतला होता. मि. स्पेनलॉची अगदी लहानपणापासूनची  ती इच्छा होती. सारे  आयुष्य शहरांमध्ये व्यतीत केल्यानंतर, आयुष्यातील उर्वरित काळ  त्याला एखाद्या  लहानशा खेड्यात अवतीभवती बागबगीचा असलेले घर विकत  घेऊन राहायचे होते. आणि त्या प्रमाणे त्याने केले देखिल. त्या लहानशा गावात ते दोघेही आताशा चांगलेच रुळले होते, आणि मध्येच हे प्रकरण उद्भवले. 
मि. स्पेनलॉ मोठ्या आशेने मिस मार्पल कडे पाहत होता. निदान ती तरी त्याला खुनी समजत नव्हती... म्हणजे नसावी, असे त्याला वाटत होते. 
मिस मार्पल विचार करत होती. स्पेनलॉ खोटे बोलत असावा असे तिला क्षणभरही वाटले नव्हते. त्याला खरोखरच कुणाचा तरी फोन आला होता, दुपारी 2.30 वा. पण ज्या अर्थी त्या फोनबद्दल,  एक्स्चेंज कडून काही कळू शकले नाही, त्या अर्थी तो बहुदा सार्वजनिक फोन चा वापर करून केलेला कॉल असणार. मेरीमीड मध्ये दोनच सार्वजनिक फोन होते, एक रेल्वेस्टेशन वर आणि दुसरा पोस्ट ऑफिस मध्ये. वेळेचा विचार केला तर, जर स्टेशनवरून फोन केला असेल तर दररोज त्याच वेळेला, म्हणजे 2.27 ला एक ट्रेन तेथे येत असे. म्हणजे ट्रेन चा आवाज, तसेच आजूबाजूला काही माणसे असणार, त्याचा आवाज  फोनवर बोलताना नक्कीच आला असता. तिने स्पेनलॉला त्याबद्दल विचारून खात्री केली होती की त्याला फोनवर ट्रेनच काय, बोलणार्‍या महिलेचा सोडून दुसरा कुणाचाही आवाज आला नव्हता. म्हणजे फोन पोस्टऑफिस मधून केला असणार. पण पोस्टऑफीस चालविणारी महिला, तिथेच एक लहानसे दुकान देखील चालवीत असे. म्हणजे काही स्वस्तातली पुस्तके, गोळ्या, बिस्किटे. खेळणी असे साहित्य तिच्या दुकानात असे. त्यामुळे ती सतत तिथे हजर असे. तिच्या अपरोक्ष कुणी गुपचुप फोन करणे शक्यच नव्हते.  आणि तिच्या म्हणण्या प्रमाणे त्या दिवशी तिच्या समोर कुणीही पोस्टातून फोन केलेला नव्हता.      
मिस मार्पल काही विचार करून आपल्या खुर्चीवरून उठली. मि. स्पेनलॉला म्हणाली, "माझ्याकडे काही सिझनल फुलांचा नवीनं कॅटलॉग आलेला आहे. तू तो बघ तो पर्यंत मी माझे एक काम करून येते."  त्याच्या हातात कॅटलॉग देत जेन आपल्या घराकडे वळली.  ती घरातून बाहेर पडली तेव्हा तिच्या हातात एक खाकी रंगाचे एक पुडके होते. आपला जुना, राखाडी  रंगाचा पोषाख, लेस लावून आणि काही दुरुस्त्या करून अगदी नव्या फॅशनचा करून घेण्याचे तिने ठरवले होते.
मिस मार्पल पोस्टऑफीस जवळ आली तेव्हा घड्याळात  दुपारचे 2.25 झाले होते. पोष्टमास्तरीण तेथेच होती. पोस्टाच्यावर काही खोल्या होत्या तिथेच मिस पॉलीट राहत होती. मिस मर्पलला तिच्याकडेच जायचे होते पण ती एकदम पॉलीटच्या खोलीकडे गेली नाही. तिथेच खाली थांबली. इतक्यात दररोज 'मच बेनहॅम' गावातून येणारी बस तेथे आली. पोष्टमास्तरीण आपली जागा सोडून बस कडे गेली. बस मधून तिच्या दुकानात ठेवण्यासाठी लागणार्‍या काही वस्तूंचे बॉक्सेस तिला घ्यायचे होते. हा तिचा रोजचाच दिनक्रम होता . ती  बॉक्सेस घेण्यात गुंतलेली असताना जवळ जवळ 5-ते 7 मि. पोस्टऑफीस पूर्णपणे मोकळे होते. म्हणजे त्या वेळात जर कुणी तेथील फोन वापरला असेल तर कुणालाच कळणार नाही.  पोस्टमास्तरीण परत येईपर्यंत मार्पल तेथेच थांबली, आणि मगच मिस. पॉलीटच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली. जिन्याच्या पायऱ्या चढताना तिच्या व्यग्र चर्येवर स्मितरेषा उमटली होती. 
(क्रमश: )