मोजून-मापून खून (२)

( अॅगाथा ख्रिस्ती यांच्या " टेप मेझर्ड मर्डर" या कथेचे मराठी रूपांतर )

त्या छोट्याशा गावात ही सनसनाटी बातमी पसरण्यास काहीच वेळ लागला नाही. जो तो आपल्यापरीने तर्क करीत होता. कोणी केला असेल खून? त्या खूनामागचा हेतू काय असेल?

साऱ्या गावात एकच खळबळ माजली होती. गावकऱ्यांचे नेहमीचे संथ आणि काहीसे रटाळ आयुष्य ढवळून निघाले होते. त्या लहानशा गावासाठी खून हे फारच मोठे प्रकरण होते. बऱ्याच वर्षांपूर्वी कधीतरी तेथे एकाचा खून झाल्याच्या कथा गावच्या मावश्या आणि आज्या सांगत असत. पण आजवर कुणीही अशी घटना घडलेली त्या गावात अनुभवलेली नव्हती. तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यातही काही जण दबल्या आवाजात मि. स्पेनलॉ च्या निर्विकार प्रतिक्रियेबद्दल बोलत होते.

त्यांच्या मते स्वतःच्या पत्नीचा खून झाल्याचे कळल्यावर पतिला थोडा तरी धक्का बसायला पाहिजे होता. तो गोंधळून जायला हवा होता. त्याचे दुःख थोडेतरी त्याच्या चेहऱ्यावर दिसायला हवे होते. पण असे काहीच घडत नव्हते. मि. स्पेनलॉ थंड, निर्विकारपणे होणाऱ्या घटना बघत होता, सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. आणि नेमके हेच तेथील लोकांना खटकत होते. आणि त्यांच्या दृष्टीने तो मुख्य संशयित बनला होता.

नक्कीच.. त्यानेच आपल्या पत्नींचा थंडपणे खून केला असणार. आणि तसे करण्यासाठी त्याला कारण देखिल आहे. मिसेस स्पेनलॉच्या मृत्युपत्रानुसार तिची सारी संपत्ती मि. स्पेनलॉला मिळणार होती. आणि मिळणारी रक्कम चांगलीच आकर्षक होती. तशीही मिसेस स्पेनलॉ काही खूप सालस, सद्गुणी अशी स्त्री नव्हतीच की. खरं सांगायचं तर जरा त्रासदायकच होती. अति धार्मिक असलेली मिसेस स्पेनलॉ कायम चर्चच्या कामात गुंतलेली असे. सतत कुठल्यातरी नव्या –"-इझम" ने ती भारलेली असे. त्याबद्दल ती अनेकांशी चर्चा करीत असे. आणि तिची मते काहीशी आत्यंतिक अशीच होती. एकूणच तिच्याबरोबर आयुष्य व्यतीत करणे हे फारसे सुखाचे नक्कीच नव्हते. पण असे असले तरी मि. स्पेनलॉ बद्दल कुणाला ठामपणे काहीच म्हणता येत नव्हते. कारण त्यांच्या घरी भांडण झाल्याचे कधीच कुणाच्या आजवर कानी आले नव्हते. आणि हीच काय ती मि. स्पेनलॉची जमेची बाजू होती.

कॉन्स्टेबल पाल्क ने त्या लहानशा बंगलीच्या दारावर हलक्या हाताने टकटक केली. आणि जणुकाही त्याची वाटच बघत असल्या सारखे झटकन दार उघडले गेले. दारात एक हसतमुख वृद्ध स्त्री उभी होती. स्पेनलॉच्या घराजवळच तिचे घर होते. नाव होते मिस जेन मार्पल. सेंट मेरीमीड मध्ये राहणाऱ्या जुन्या जाणत्या रहिवाशांमधील एक. तिने त्याचे स्वागत करीत व्हरांड्यामध्ये ठेवलेल्या एका खुर्चीकडे निर्देश करीत म्हणले, "मिसेस स्पेनलॉबद्दल विचारायला आला आहात ना आपण? "

आता कॉनस्टेबल पाल्क विचारात पडला. कारण खूनाची घटना उघडकीस येऊन जेमतेम अर्धा तासच होत होता. तो घटनास्थळाची तपासणी पूर्ण करून लगेचच मिस मार्पल च्याघरी आला होता. तिला आश्चर्याचा धक्का बसेल असे त्याला वाटत होते. पण त्याने सांगण्याच्या आधीच तिला त्या संबंधी माहिती होती. त्याला एकदम आपले वरिष्ठ, हेडकॉन्स्टेबल स्लॅक यांचे बोलणे आठवले. ते म्हणाले होते, तू सर्वात आधी मिस मार्पलला भेट. ती एक अतिशय बुद्धिमान स्त्री आहे. ती स्वतः जरी फारशी बाहेर जात नसली, तरी घरी राहून देखिल अनेक गोष्टी तिच्या कानावर येत असतात. आणि त्या सर्व माहितीची योग्य ती संगती लावून निष्कर्ष काढण्यात ती फारच हुशार आहे.

"तुम्हाला माहिती आहे? " पाल्क ला आपल्या आवाजातील आश्चर्य लपविता आले नाही.

हो ना, तो मासळीबाजारातला पोरगा.. रोज माझ्याकडे मासे द्यायला येतो ना.. त्यानेच सांगितले.

"अस्सं.. " पाल्क उद्गारला.

मेरीमीड एक लहानसं गाव होतं. त्यात कुठलीही घटना लपून राहणं शक्यच नव्हतं. आणि त्यातही घटनास्थळी असलेली मिसेस हार्टनेल...

"बरोबर आहे" पाल्कच्या मनात आले. आत्तापर्यंत गावातील प्रत्येकजण या घटनेची चर्चा करत असणार. आणि का करू नये? घटना होतीच तशीच सनसनाटी.

पाल्कने लहानशी टिपणं करण्यासाठी वापरली जाणारी वही आपल्या युनिफॉर्मच्या खिशातून बाहेर काढली. उजव्या हातात पेन्सिल घेत त्याने विचारले.

"मॅडम, मि. स्पेनलॉने आम्हाला माहिती देताना सांगितले, की तुम्ही आज दुपारी 2.30 वा. फोन करून त्यांना दुपारी 3.30 वा. तुमच्या घरी येण्यास सांगितले म्हणून. तर हे खरे आहे का? "

"अर्थातच नाही. " मिस मार्पलने लगेच उत्तर दिले.

"एकतर मी मि. स्पेनलॉला फोन केला नाही, आणि 3.30 वा. मी ज्या एका समाजसेवी संस्थेसाठी काम करते, तिथे मीटिंगसाठी गेले होते. त्या मुळे त्या वेळेला मी त्याला बोलावणे शक्यच नाही. पण एक खरे आहे. मि. स्पेनलॉ दुपारी 3.30 वा माझ्या घरी आले होते. माझ्या घरकाम करणाऱ्या मुलीने मला ते सांगितले आहे. "

पाल्क ने झटक्यात आपली वही बंद केली.

"यावरून सिद्ध होते आहे की स्पेनलॉ खोटे बोलतो आहे. स्वतः खूनाच्या वेळी बाहेर होतो हे सिद्ध करण्यासाठीच त्याने हे नाटक केले असावे. "

"मि. स्पेनलॉ? आणि असे नाटक? " मिस मार्पल काहीशी स्वतःशी, काहीशी उघडपणे म्हणाली.

"पण मी स्पेनलॉ ला चांगली ओळखते. त्याला असले नाटक करणे कधीच जमणारच नाही. "

"पैशासाठी कुणीही काहीही करेल आजकाल. " पाल्क म्हणाला.

"मी असे ऐकले आहे की त्या दोघांपैकी मिसेस स्पेनलॉकडे खूप सारा पैसा होता? "

मिस मार्पलने काहीच उत्तर दिले नाही. मग कॉनस्टेबल पाल्क पुढे म्हणाला,

"तुम्ही आम्हाला मि. स्पेनलॉ बद्दल काही सांगू शकाल का? तुम्ही त्यांच्या सर्वात जवळच्या शेजारी आहात. त्यांच्यात काही भांडण, वाद? "

"नाही कधीच नाही" मिस मार्पल ठाम पणे म्हणाली.

"मि. स्पेनलॉ हा एक सभ्य गृहस्थ आहे. थोडा जुन्या विचारांचा, जुन्या चालीरीती कसोशीने पाळणारा. त्याला पैशाची कधीच हाव नव्हती. त्याला फुलझाडांमध्ये फार रस आहे. त्यासाठीच तर त्याने संपूर्ण आयुष्य शहरात काढल्यानंतर इंग्लंडमधील लहानशा खेडेगावातील ही बंगली राहण्यासाठी निवडली. "

बोलता बोलता मिस मार्पल च्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले.

"तुम्हाला सांगते कॉन्स्टेबल त्याला जरी फुलझाडांची आवड असली तरी त्यातले कळत काहीच नाही. प्रत्येकावेळी वही पेन घेऊन माझ्याकडे एखाद्या विद्यार्थ्यासारखा येतो, कुठली रोपे लावायची, त्यांची निगा कशी ठेवायची इ. विचारायला. "

पाल्क ने नाराजीनेच म्हणले, " माणसे जशी दिसतात, तशीच ती प्रत्यक्षात नसतात. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण चार भिंतीआड त्याच्यात काही कुरबुरी असणारच. त्या नसतीलच असं तुम्ही इतक्या विश्वासाने कशा म्हणू शकता? "

"तुम्ही ग्लॅडीजला विसरता आहात कॉन्स्टेबल" मिस मार्पल म्हणाली. या घरकाम करणाऱ्या बायकांपासून कुणीच काही लपवू शकत नाही. आणि एकदा तिला कळले की सबंध मेरीमीडला कळायला कितीसा वेळ लागणार? आणि ते सुद्धा अगदी तिखट, मीठ, मसाला असे सारे काही घालून.. "

पाल्कने ने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण मग त्याने गप्प बसणेच पसंत केले. कारण मिस मार्पल चा हा मुद्दा बिनतोड होता.

आपला युनिफॉर्म सारखा करीत पाल्कने आपली हॅट डोक्यावर ठेवली.

"धन्यवाद मॅडम, तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल"

जेन मार्पल तीक्ष्ण दृष्टीने त्याच्याकडे पाहत होती. ती म्हणाली.

"कॉन्सटेबल एक जुनी म्हण मला आठवली. तुमच्या पोषाखात अडकलेली एक लहानशी पीन काढा, आणि मगच तुमचे नशीब चमकेल"

बोलता बोलता तिने त्याच्या शर्टाच्या बाहीकडे निर्देश केला. खरच उजव्या बाजूच्या बाहीच्या कापडात एक पीन अडकलेली होती.

"ओह.. आत्ता स्पेनलॉच्या घराची तपासणी करून आलो, तिथेच कुठेतरी ही अडकली असणार. "

"तेच म्हणते मी. आणि मी सांगितलेली ती जुनी म्हण विसरू नका बरं का... " मिस मार्पल हसत हसत म्हणाली.

(क्रमशः)