मोजून -मापून खून (४)

( ऍगाथा ख्रिस्ती यांच्या " टेप मेझर्ड मर्डर" या कथेचे मराठी रूपांतर )
इन्स्पेक्टर मेल्चॅट आपल्या ऑफिस मध्ये मेजावरील एक एक फाइल वाचण्यात मग्न होता.  पाल्क आणि स्लॅक त्याच्या समोर बसले होते. सरळ ,सोपी कसलीही गुंतागुंत नसलेली केसचे गूढ अजूनही उकलत नव्हते.  अनेक दिशांनी शोध घेऊन त्यांच्या हाती फक्त माहितीचे काही तुकडे लागले होते. पण त्यातून निष्पन्न काहीच होत नव्हते.   मिळालेल्या माहितीची काहीच संगती लागत नव्हती. त्यांनी मि. आणी मिसेस स्पेनलॉ च्या भूतकाळासंबंधी बऱ्याच चौकश्या केल्या, त्यात मिळालेली माहिती ही गूढ उकलण्यासाठी फारशी उपयोगी नसावी. त्यांना ही माहिती मिळाली होती की, मिसेस स्पेनलॉ यांनी आपल्या तरुण वयात एक घरगुती मदतनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. सर रॉबर्टऍबरक्रॉम्बी यांच्या घरी ती काम करीत असे, आणि योगायोगाने तिथेच मिस पॉलीट ही 'लेडीज मेड' म्हणून काम करीत होती. एक दिवस सर ऍबरक्रॉम्बीच्या   घरी चोरी झाली होती. त्यांच्याकडे असलेल्या अमूल्य रत्नांचा संच चोरीला गेला होता, आणि तो कधीच सापडला नाही. रत्नेही मिळाली नाहीत आणि गुन्हेगारही. पण या सर्वाचा मिसेस स्पेनलॉशी काही संबंध असेल असाही काहीच पुरावा नव्हता. 
"स्लॅक तू एकदा मिस मार्पल ला भेटत का नाहीस? " मेल्चॅटने त्याला परत एकदा विचारले.
"पण सर तिचा या सर्वांशी काय संबंध? आपला तपास चालू आहेच ना. " स्लॅक म्हणाला 
"हो चालू आहे ना , पण कुठल्याही निर्णयाप्रती आपण अजून पोहोचू शकलो नाहीये. तेव्हा तू तिला भेट. माझा विश्वास आहे, आतापर्यंत तिच्याकडे नक्कीच काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती जमा झालेली असणार. "
मेल्चॅटने असे म्हणाल्यावर स्लॅकला त्याचे म्हणणे डावलता आले नाही. आणि आता तो मिस मार्पलच्या समोर बसलेला होता.
"पण तुम्हाला इतकं ठामपणे का वाटतं आहे की स्पेनलॉ खरेच बोलतो आहे? " स्लॅक ने तिला विचारले.
"कारण मी स्पेनलॉला ओळखते." मिस मार्पल शांतपणे म्हणाली, "अतिशय साधा, सरळमार्गी मनुष्य आहे तो. त्याच्या पत्नीकडे जास्त पैसा होता हे मान्य, पण त्याला पैशाची हाव नव्हती, आणि काहीही म्हणजे अगदी खून करून तो भविष्यात मिळणारा पैसा आताच मिळवावा अशी कोणतीही निकड त्याला नव्हती. तो त्याच्या बागेमध्ये मनापासून रमला होता, आणि म्हणूनच .. " 
पुढे काही न बोलताच ती बोलायची थांबली. काही क्षण तसेच शांततेत गेले. 
"मग पैसा नाही तर इतर काही कारण... म्हणजे मिसेस स्पेनलॉचे काही....? " स्लॅक अडखळत म्हणाला. 
"म्हणजे तुम्ही त्या चर्च मधील तरुण टेड गेर्राड बद्दल म्हणत आहात का? म्हणजे तुमची शंका अगदीच अनाठायी नाही. कारण टेडला २.२७ च्या पॉडिग्टन ट्रेन मध्ये चढताना काहींनी त्याला पाहिले खरे. पण ट्रेन च्या एका बाजूने आत प्रवेश करून विरुद्ध प्लॅटफॉर्मवर उतरून, स्पेनलॉच्या घरी त्याने पोहोचणे, आणि तेही कुणाच्या नकळत, जरा अवघड आहे." मिस मार्पल विचारपूर्वक म्हणाली.
"मग मि. स्पेनलॉला तिचा संशय येऊन.. " स्लॅकला आपले वाक्य पूर्ण करू न देताच मिस मार्पल म्हणाली,
"अगदीच अशक्य, मि. स्पेनलॉला संशय येणे अगदीच अशक्य आहे. तो असा माणूस आहे, की त्याच्या पत्नीचे खरेच कुठे अफेअर असले, तर तिने त्याच्यासाठी चिठ्ठी ठेवून, ती निघून जाईपर्यंत त्याला संशय देखिल येणार नाही. आणि मिसेस स्पेनलॉ आणि टेड चे खरंच तसे काही नव्हते. हे खरं आहे की टेड हा एक आकर्षक तरुण आहे. आणि तो चर्च मध्ये आल्यापासून चर्चमध्ये जाणाऱ्या तरुण मुलींच्याच नव्हे तर मध्यमवयीन स्त्रियांच्या संख्येतदेखील लक्षणीय वाढ झाली आहे. पण मिसेस स्पेनलॉ ने स्वतःच मला सांगितले होते, की त्यांचा एक चर्चा गट आहे, त्याला ते 'ऑक्स्फर्ड गट'  म्हणत, त्या गटाचे ते दोघे सभासद होते. आणि कामानिमित्त त्यांचे एकमेकांना भेटणे होत असे. आणि मिसेस स्पेनलॉ खूपच धार्मिक होती, एक निष्ठावान कार्यकर्ती होती. त्यामुळे तिचे असे काही अफेअर वगैरे असावे असे मला वाटत नाही. " 
"पण मग काय घडले असावे त्या दिवशी?
 काय असे कारण होते की तिचा खून झाला असावा? "  स्लॅकने तिला विचारले.
काही वेळ मिस मार्पल शांत बसून राहिली. ती कसलातरी विचार करीत होती. ती एकदम  म्हणाली,
"एक गोष्ट मात्र मला फार विचित्रं वाटते आहे. मिसेस स्पेनलॉचा खून झाला दुपारी साधारण ३.३० वाजता. त्यावेळी तिच्या अंगावर पोषाख कोणता होता? "
"किमोनो" स्लॅक तत्परतेने म्हणाला.
"तेच तर.. " आपला हात खुर्चीच्या कडेवर आपटत ती म्हणाली. "कुठलीही सभ्य स्त्री, दिवसातील या वेळेला किमोनो परिधान करणार नाही. मिसेस स्पेनलॉसारखी तर नाहीच नाही. पण तिने किमोनो घातलेला होता, कारण तिला तिच्या नव्या पोषाखाची ट्रायल घ्यायची होती. याचाच अर्थ मिस पॉलीट तिथे जाण्या आधी मिसेस स्पेनलॉ जिवंत होती. ती मिस पॉलीटची वाट बघत होती. " मिस मार्पल चे डोळे चमकत होते. तिला नक्कीच काहीतरी गवसले होते. 
"तुम्हाला तिथे काही वस्तू ... म्हणजे ज्या स्पेनलॉच्या नाहीत, अशा काही वस्तू मिळाल्या असतील ना? मिस मार्पलने विचारले. 
"आम्ही कसोशीने झडती घेतली आहे, अगदी काळजीपूर्वक. आजकाल गुन्हेगार देखिल फार हुशार झाले आहेत मिस. आजकाल ते खुनाच्या जागी, सिगारेटची राख, पोषाखाची बटणे अशा वस्तू सोडत नाहीत. " स्लॅक हसत हसत म्हणाला. 
स्लॅक जाण्यासाठी म्हणून उभा राहिला. गोंधळ कमी न होता, उलट वाढला होता. आता मि. स्पेनलॉ व्यतिरिक्त अन्य काही व्यक्तींचा देखिल, त्या केसशी संबंध प्रस्थापित होऊ लागला होता. स्लॅक ने आपली युनिफॉर्मची कॅप हातात घेत  मिस मार्पल ला अभिवादन केले आणि तो जाण्यासाठी वळला. तितक्यात त्याला थांबवीत मिस मार्पल म्हणाली, 
"आणि तो तुमचा कॉन्स्टेबल? .... त्याच्या युनिफॉर्म मध्ये एक पिन अडकली होती.. पण त्याला ते कळलेच नव्हते."
"हो मला आठवते आहे ते. नंतर त्याने मला तो प्रकार सांगितला होता. पण त्याचे काय?" स्लॅक त्रासिकपणे म्हणाला. त्याच्यामते असल्या नगण्या गोष्टींवर विचार करण्यात वेळ घालवणे अजिबात शहाणपणाचे नव्हते. पण मार्पल त्या पिन मध्ये अडकली होती. 
"ती पिन कशी होती आठवते आहे? तुम्ही पाहिली असेल ना? "
खूप आठवून देखील त्या पिन मध्ये काही वेगळेपण होते असे काही त्याला वाटेना . तो प्रश्नार्थक मुद्रेने तिथे थांबून राहिला. 
" ती पिन ही सर्वसामान्य महिलांच्या वापरातली नव्हती. अशा पिनांचा अख्खा बॉक्सच विकत घ्यावा लागतो, एक किंवा दोन पिना विकत मिळत नाहीत. अशा पिना शिंपी लोक वापरतात. पोषाखाला पक्क्या शिवणी घालायच्या आधी अशा प्रकारच्या पिना लावून ते पोषाखाची ट्रायल घेत असतात. " 
"असेल? पण त्याचा इथे काय संबंध? " स्लॅकच्या मनात आले, पण तो उघडपणे काहीच बोलला नाही. 
मिस मार्पलने  स्लॅक कडे अपेक्षेने पाहिले. ती त्याला काही सुचवू पाहत होती, पण त्याला ते समजत नव्हत.  स्लॅक आता विचारात पडला होता. त्याच्या हे लक्षात आले होते की मिस मार्पल कुठल्यातरी विवक्षित मुद्द्याकडे निर्देश करून बोलत होती. पण तिच्या बोलण्यातला, तो नेमका मुद्दा काही  त्याच्या  लक्षात येत नव्हता. पण एव्हढे नक्की समजले होते, की मिस मार्पल कोड्याच्या उत्तराच्या जवळ पोहोचली होती. 
(क्रमशः )