बायको हरवली आणि (हुश्श ) सापडली

      बायको ही काय हरवण्याची चीज आहे ?पण  हरवल्यावर  हुडकण्याची  मात्र आहे.आणि आता ज्या वयात चष्मा कोठे ठेवला हे सापडत नाही. बाहेर पडताना शर्टाची बटणे बरोबर लावली की नाही आणि पॅंटची तर लावली की नाही हेही लक्षात न रहाण्याची शक्यता असते अश्या वेळी "एवढे कसे हो वेंधळे तुम्ही " असे म्हणून आठवण द्यायला दुसरे कोण  सापडणार ? पण ती हरवली आणि तेही रस्त्यात नाही तर अगदी अमेरिकेस जाताना विमानतळावर !आता बोला मग माझे कसे होणार ?
     अगोदरच अमेरिकेस जाताना बऱ्याच गोष्टींची मला काळजी वाटत असते. घर सोडून कुलुपबंद करून बाहेर पडल्यावर त्या घराचे कसे होणार.आपण परत येईपर्यंत त्याची परिस्थिती नीट राहील की नाही.एकदा उंदरांनी आमच्याच घरावर हल्ला करून घरातील बऱ्याच वस्तूंची वाट लावल्यामुळे आणि दुसऱ्या वेळी  आमच्या एका मित्राचे घर अमेरिकेत असताना चोरांनी फोडल्यामुळे परत आल्यावर घराची काय हालत पहायला मिळते याविषयीची काळजी मनात  असतेच पण त्याच वेळी अमेरिकेत पोचल्यावर जॉर्ज फर्नांडिस किंवा शाहरुक खान अश्या मोठ्या माणसांनाही प्रवेश नाकारणारे अमेरिकन इमिग्रेशन खाते आपल्याला प्रवेश नाकारते की काय किंवा सहा महिन्याचा राहिला पण निदान  जितक्या  महिन्यानंतरचे परतीचे तिकिट काढलेले  तेवढ्या मुदतीचा तरी   स्टॅंप मारून देतील की नाही अश्या काळज्यांनी मन कुरतडत असते . एकदा इमिगेशनवरील बाईने अगदी तिकीट पाहूनच स्टॅंपिंग करून दिले होते. म्हणजे या अमेरिकनांच काम काहीऔरच ! अगोदर व्हिसा देता देत नाहीत आणि तो दिल्यावरही परत नियमाप्रमाणे निदान सहा महिने का होईना पण तेही सुखासुखी राहू देत नाहीत. एवढं काय यांच्या देशाला सोनं चिकटलय काही कळत नाही. तरी आम्ही ,म्हणजे कोण हे सांगायला नकोच,मिळालेला व्हिसा वापरून घ्यायलाच हवा या तत्त्वाला अनुसरून परत परत अमेरिकेला जायला निघतोच.
   तसे आम्ही घराचा अगदी पुरता बंदोबस्त करून याही वेळी निघालो होतो.आमची कामवाली मावशीही या बंदोबस्तात आता चांगलीच तरबेज झाली आहे.कारण उंदरांनी धुमाकूळ घातला त्यावेळी तिलाही बराच त्रास झाला होता. घर बंद करून शेजाऱ्यांवा निरोप घेऊन त्यांना घरावर लक्ष ठेवायला सांगून व घराची एक चावी त्यांच्याकडे देऊन आम्ही  ट्रॅव्हलच्या गाडीत दुपारी दोन वाजताच म्हणजे आमच्या उड्डाणाच्या वेळेच्या तब्बल १२ तास अगोदर बसलो..खरे तर आमचे उड्डाण दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता असल्यामुळे    आम्ही दुपारी चारच्या गाडीने गेलो असतो तरी चालले असते.पण घरात माश्या मारत आणि काळजी करत बसण्यापेक्षा विमानतळावर जाऊन बसलेले बरे असा विचार मी नेहमीप्रमाणे केला होता.शिवाय घरात आम्ही दोघेच असल्याने व हे आमचे पहिलेच परदेशगमन नसल्याने निरोप घ्यायला अगर द्यायला येणाऱ्यांचीही वाट नव्हती त्यामुळे लवकर निघणे श्रेयस्कर होते.
        एक पाय नेहमीच अमेरिकेस जाणाऱ्या विमानात असणाऱ्या, बायकोच्या बहिणीचा फोन गाडीत आला व आम्ही इतक्या लवकर निघालो हे पाहून तिने आमची बरीच फिरकी घेतली.आमच्याबरोबर आणखी एक प्रवासी होता पण त्याचे उड्डाण रात्री नऊचे होते त्यामुळे त्याला मात्र खरेच घाई होती.तो आमच्या अगोदरच टॅक्सीत बसला होता आणि अर्थातच चालकाशेजारीच बसलेला होता.
        गाडी मध्ये धाब्यावर थांबली त्याबरोबर बायकोने मोबाइलची मागणी माझ्याकडे केली.इतक्या लवकर हिला कोणावी आठवण झाली हे मला समजेना.शेवटी तिला विचारल्यावर भ्रमाचा भोपळा फुटला, म्हणजे निघताना आपण नीट दार बंद केले की नाही याविषयी ती साशंक होती असे कळले.म्हणजे माझ्या आईची एक आवडती म्हण होती "मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा " ही अलंकारिक अर्थाने नव्हे तर शब्दश: खरी करण्याचे सौ.ने मनावर घेतलेले दिसले कारण उंदरांनी मागे मोरी आणि संडासमधून प्रवेश केल्यामुळे त्या सर्व छिद्रात बोळे घालून व ती दारे अगदी व्यवस्थित बंद करून तिने पुढचे दारच उघडे ठेवलेले दिसले.आम्ही इतक्या लवकर निघालो होतो की  पुन्हा घरी परत जाऊन त्याविषयी खात्री करणे सहज शक्य होते पण आमच्या सहप्रवाश्याने त्याला हरकत घेतली असती.त्यामुळे ज्या शेजाऱ्यांकडे किल्ली ठेवली त्याना फोन करून ती खात्री करून घेण्याचा विचार ती करत होती पण फोनच लागला नाही.
      हे कारण कळताच आता मात्र कमाल झाली ,अशा अर्थाने मी कपाळावर हात मारून घेतला पण हा माझा अभिनय फारच महागात पडला कारण दार नीट बंद न करण्याचे कारण मीच होतो असे माझ्या ध्यानात आणून देण्यात आले.म्हणजे गाडी घरासमोर आल्यावर मी सामानाबरोबर खाली जाऊन तिची वाट पहात उभा राहिलो असता खालून तिला लवकर येण्याची जी घाई लावली त्यामुळे दार नीट बंद झाले की नाही याकडे तिला नीट लक्ष देता आले नव्हते. शिवाय मी जर वर जाऊन पुन्हा स्वत: दार बंद झाल्याची खात्री करून घेतली असती तर असे झाले नसते.थोडक्यात झाल्या प्रकाराला मीच जबाबदार होतो. म्हणजे  पुढे काय होणार याची काळजी करायला लागण्यापूर्वीच मागे काय झाले असेल याचीच काळजी करण्याची पाळी आली.
      आम्ही नऊ वाजता जाणाऱ्या प्रवाश्याच्या सोयीनेच विमानतळावर पोचलो.  पोचल्यावर चालकाने व सहप्रवाश्याने आम्हाला सामान उतरवून ढकलगाडी शोधून त्यावर सामान चढवून आत जाण्यास तयारच केले.आमच्या सहप्रवाश्याने "तुम्हालासुद्धा आत सोडतील असे सांगितल्यावरून आम्ही तसा प्रयत्न केला पण विमानपत्तनाचे सुरक्षा कर्मचारी अधिक जागरूक असल्यामुळे आमच्या सारख्या आगंतुकांना आत सोडून आतील गर्दी वाढवण्याची त्यांची इच्छा नव्हती असे दिसून आले.त्याचबरोबर बाहेर आमच्यासारख्या प्रवाशांसाठी विश्रामस्थान आहे व ते सुशीतल आहे असे त्यांनी सागितले व ते ज्या प्रवेशद्वारापाशी आम्ही उभे होतो त्याच्यापासून बरेच दूर असलेल्या कोपऱ्यात आहे असे दिसून आले.जरा अधिक चौकसपणे पाहिले असते तर तसा आणखी एक विश्रामकक्ष त्या प्रवेशद्वाराच्या डावीकडे अगदी लागूनच होता हे समजले असते पण ही गोष्ट आमच्या चौकस बायकोच्या नजरेतून कशी सुटली समजत नाही.ती बरोबर आहे म्हटल्यावर माझ्या लक्षात येणे शक्यच नव्हते. 
   विश्रामस्थळापर्यंत जाऊन आत प्रवेश करताना तेथील द्वाररक्षकाने आत प्रवेश करण्यासाठी ५० रु.चा प्रवेशपरवाना लागेल असे सांगितले सुदैवाने परवाना खिडकी जवळ होती, अर्थातच आम्हाला दोन परवाने घेऊनच आत प्रवेश मिळाला. या बाबतीत अमेरिकन विमानतळाची सोय मला आवडते तेथे बरेच आतपर्यंत प्रवाश्यांना कितीही अगोदर जाऊन बसता येते. आतील खानपान सेवेचा लाभ घेता येतो आणि सोडायला येणाऱ्या व्यक्तींनाही अगदी सुरक्षा आचणीच्या द्वारापर्यंत जाता येते.आत गेल्यावर व आम्ही स्थानापन्न झाल्यावर पहिले काम अर्थातच आमच्या पुण्यातील शेजाऱ्यांना भ्रमणध्वनी करून आमच्या घराच्या सुरक्षाव्यवस्थेची चौकशी करणे हे होते व त्यांनी आमच्या सदनिकेपाशी जाऊन दार उघडून आणि पुन्हा बंद करून ,आता ते खरोखरच बंद झाले आहे , याची खात्री करून आम्हाला तसे कळवले व आम्ही निश्चिंत झालो.त्यानंतर भ्रमणध्वनी सौ.ने आपल्याजवळच ठेवला.
       आम्ही बरोबर काही खाद्यपदार्थ आणलेले असल्यामुळे त्या वेळी त्यांचा समाचार घेणे आम्हाला शक्य झाले.त्यानंतर आजूबाजूच्या लोकांचा समाचार सौ.ने घेतला व मी बरोबर आणलेले पुस्तक चाळत बसलो. आमचे उड्डाण पहाटे दोन वाजताचे असल्यामुळे रात्री दहा वाजता आत सोडत असतील या अंदाजाने आम्ही परत एकदा सामानासह प्रवेशद्वाराकडे निघालो आणि आता मात्र आत शिरण्यास मुभा मिळाली व त्याच वेळी त्या प्रवेशद्वारापाशीच एक सुशीतल विश्रामकक्ष होता असे दिसून आले. व आम्ही अगोदर उगीचच दुसऱ्या टोकास जाऊन बसलो अशी हळहळ वाटली पण मग नाहीतरी आपल्याला वेळच घालवायचा होता अशी मनाची समजूत घालून घेतली.
        चरकात घातलेले उसाचे कांडे जसे आपोआपच दुसऱ्या बाजूने बाहेर पडते तसे आपल्या विमानसेवेच्या एका बाजूने प्रवेश केला व रांगेत उभे राहिले की फारसा विचार न करता आपोआप आपण योग्य ठिकाणी पोचतो.सामान आम्ही नेहमीप्रमाणे तीनतीनदा वजन करून आणल्यामुळे कुठल्याही अडथळ्याशिवाय आत गेले,बोर्डिंग पासेस हातात पडले आता सुरक्षाचाळणीतून आत शिरण्याचेच बाकी होते आणि तेथेच सगळा घोळ झाला.तेथे स्त्री पुरुषांची वेगळी रांग होती. बरेच वेळा रांग एकच असते.त्यावेळी आम्ही शेवटपर्यंत  बरोबरच असतो  त्यामुळे एकमेकांची चुकामूक होण्याची शक्यता नसते. पण आता मात्र मुकाट्याने  आपआपले कागदपत्र व सामान घेऊन आम्ही वेगवेगळ्या रांगेत उभे राहिलो.
    बोर्डिंग पासवर आमचे बैठक कमांक व प्रवेशद्वार क्रमांक लिहिलेले होते. नेहमीप्रमाणे पुरुषांची रांग मोठी दिसत होती त्यामुळे सौ.ची तपासणी अगोदर होऊन ती बाहेर उभी राहील  ही माझी कल्पना. नेहमीप्रमाणे बूट, बेल्ट, घड्याळ इ.जोखमीच्या(?) वस्तु बास्केटमधून तपासणीपट्ट्यावर ठेवल्यावर कसलाही आवाज न करता सुरक्षाचाळणीतून आत जाऊन पडल्या  व  मीही तपासणी चौकटीतून आत जाऊन तपासणी अधिकाऱ्याच्या तपासणीस तोंड देऊन बाहेर पडलो व परत सर्व वस्तु अंगावर जेथल्या तेथे स्थापन करून  मागील दारातून बाहेर पडलो.तेथे एक खाली जाणारा जिना आहे तेथे सौ.चा पत्ता नव्ह्ता त्यामुळे ती जिना उतरून खाली उभी राहिली असेल असे वाटून जिना उतरून खाली गेलो तर तेथेही ती नव्हती. 
       खरेतर नेहमीप्रमाणे ती माझी वाट पाहत बसलेली असेल असा माझा अंदाज होता पण यावेळी बरेच विमानप्रवास केल्यामुळे  अधिकच हुशार होऊन व द्वार क्रमांक माहीत असल्यामुळे ती सरळ तिकडेच गेली असेल असे वाटून मी त्या दिशेने भरभर चालायला सुरवात केली.वाटले की या गतीने चालल्यावर आपण तिला गाठू.पण यावेळी तिने भलतीच चपळाई दाखवली असे दिसले कारण वाटेतही मी तिला गाठू शकलो नाही.आणि आमच्या बोर्डिंग पासात नमूद केलेल्या द्वारक्रमांकासमोरील विश्रामकक्षात ती दिसेल अशा आशेने पहातो तो काय तेथेही तिचा पत्ता नाही.आता मात्र शंकेची पाल मनात चुकचुकली की ही वाटेत चुकली की काय.खरे तर विमानतळावर चुकण्याचे  कारण नाही. बर मोबाइलवर संपर्क साधावा तर आमच्या शेजाऱ्यांशी बातचीत करून आमच्या फ्लॅटच्या सुरक्षिततेची खात्री करून घेतल्यावर   अतिशहाणपणा करून तो मी बंद करून ठेवण्यास सांगितला होता.आता तिला तो चालू करण्याची बुद्धी व्हावी अशी देवापाशी मी प्रार्थना केली व परत येताना एका ठिकाणी मदतकेंद्र होते तेथे जाऊन माझी बायको हरवली आहे तिच्याशी संपर्क करायचा आहे असे सांगितले.
    मदत केंद्रावरील सुरक्षासेवकाने जत्रेत हरवलेल्या  मुलासारख्या (त्या मुलाच्या दृष्टीने त्याची आई हरवलेली असते )माझ्या केविलवाण्या मुद्रेकडे  पाहिल्यावर मी सांगितले नसते तरी याची बायको हरवली असणार हे समजून घेतले असते, त्यामुळे मला मोबाइल क्रमांक विचारून तो लावला व माझ्या हातात रिसीव्हर दिला पण
"आप जिस मोबाइलसे संपर्क करना चाहते है वह अभी बंद है " असा संदेश मला मिळाला.आणि तो अपेक्षितच होता कारण मी बंद केलेला मोबाइल चालू करणे तिच्या लक्षात येईल अशी शक्यता फारच कमी होती.
   मग पुन्हा एकदा मी आमच्या विमानसेवेचे द्वार क्रमांक ३४ कडे मोर्चा वळवला.आशा होती की तेथे मला दिसेल.पण पुन्हा तेथे तिचा मागमूसही नाही. म्हणजे "स्वप्नवासवदत्ता " नाटकातील राजासारखे,"दशदिशांस पुसतो पुसतो
वेड्या नभा,ती कुठे राजसा माझी प्रिय वल्लभा "असे म्हणत फिरण्याची वेळ आली.परत येताना पुन्हा त्या सुरक्षा जवानाला काय झाले ते सांगितले व अजूनही ती सुरक्षाचाचणीच्याच विभागात असेल तर तिच्या नावाचा पुकारा करून माझ्याशी संपर्क तिने साधावा असे घोषित करावे अशी विनंती त्याला केल्यावर त्याने तसे करण्याचे मान्य केले.त्यालाही कदाचित माझ्यावरील गंभीर प्रसंगाची कल्पना आली असावी.
       सुरक्षा रक्षकाने सुरक्षा चाचणी चालू असलेल्या भागात उद्घोषणा करण्यासाठी तिकडे तसे कळवले म्हणजे आमची बायको हरवली ही आता  ब्रेकिंग न्यूज झाली पण ती तिच्या कानावर पडण्याची शक्यता आहे की नाही याविषयी मी साशंक होतो म्हणून स्वत: शोध घेणे मात्र जारीच ठेवायचा निश्चय केला व सगळ्यात जास्त ती  कोठे असण्याची शक्यता आहे याचा विचार करू लागलो.
       वस्तू शोधण्याच्या बाबतीत आमच्या बायकोनेच घालून दिलेला जो नियम मी कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करूनही माझ्याकडून पाळला जात नाही  तो म्हणजे जिथे ती वस्तू असण्याची जास्तीतजास्त  शक्यता असते ती जागाच अगदी कसोशीने शोधायची,पण याबाबतीत कसे काय कुणास ठाउक मी कमी पडतोच आणि नंतर ती शांतपणे त्याच ठिकाणातून ती वस्तू काढून"ही काय इथेच आहे" असे म्हणून माझ्या मते मला खिजवते, पण तिच्या मते ती फक्त दाखवते. तिच्या मुद्रेवरील भाव खरे तर मलाच कळतात पण असो,  आता तिलाच शोधायला तिच्या या कसबाचा उपयोग होणार नसला तरी तिच्या या पद्धतीचाच वापर करावा लागेल असे मला वाटून अगदी निश्चितपणे ती थांबण्याची जागा म्हणजे सुरक्षाचाचणीतून बाहेर पडल्यावर म्हणजे जो जिना उतरून मी घाईने निघालो होतो त्याच जिन्याखालील जागाच नीट तपासणे आवश्यक आहे असा निष्कर्ष काढला आणि मी तेथे जाऊन  पाहतो तो काय समोर साक्षात तीच उभी. पण नुसती नव्हे तर  साक्षात महिषासुरमर्दिनीच्या अवतारात उभी !
        आता Best way of defense is offense या तत्त्वानुसार मी तिला शोधण्यासाठी जी धावपळ केली त्याचा अहवाल देऊन "कमालच आहे तुझी  सगळा विमानतळ पालथा  घातला तुला  शोधण्यासाठी, आणि मोबाइल चालू करायला काय झाले होते? " अश्या चोराच्या उलट्या बोंबा मारण्याचा प्रयत्न केला. पण हा  माझा बचाव करण्याचा प्रयत्न करून मी चांगलाच तोंडघशी पडलो. आतापर्यंत तिने दुर्गेचा अबतारच धारण केला होता पण आता तेवढ्यावर थोडेच भागणार होते?  आमच्या द्वारक्रमांकापर्यंत जाईपर्यंत आणि नंतरही बराच काळ  लग्नानंतर मी आजपर्यंत किती आणि कोणत्या चुका केल्या याचा पूर्ण इतिहास मला तिच्या तोंडून ऐकावा लागला. जणु अमेरिकेपर्यंत  मी तिला चालतच  यायला लावले आहे अश्या थाटात यापूर्वीही एकदा स्कूटरवर माझ्या मागे ती बसली असताना एका ठिकाणी काही कारणाने थांबावे लागले असता, नंतर गाडी सुरू करताना ती मागे बसलीच नव्हती याची दखल न घेता मी गाडी तशीच दामटून घरी गेलो आणि तिला कसे चालत घरी यायला लावले याही प्रसंगाची उजळणी झाली.तिच्याकडून मात्र आयुष्यात एकच चूक झाल्याचे तिने कबूल केले ती म्हणजे माझ्याबरोबर लग्न करणे, हेही समजले.तरीही माझ्या चुका पदरात घेणारी व्यक्ती सापडल्याच्या आनंदात ते सर्व मी शांतपणे ऐकून घेतले कारण आता आणखी चुका करायला मी मोकळा झालो होतो.