काळजातून कुणाच्या
काळजातून कुणाच्या आता कुठे झरा पाझरतो
भुका जागे कुणी अन् कुणी दुपारी घोर-घोरतो
हाय वादळानेही नेला आभाळी पदर तो असा
रात्रीही आता उन्हास रणरणत्या मी पांघरतो
युगपुरुषांनी नेला अटकेपार मऱ्हाठी बाणा
तोच सह्याद्री जाजम हाय उपऱ्यांना अंथरतो
पिकल्या कुडीतले मन हिर्वेकंचं असे बावरे
जातांना बागेत मी टकलाला उगाच सावरतो
सुगी दर सुगी बघतो मी राख स्वप्नांची होतांना
आशेच्या किरणांनी शेत फिरी मनाचे नांगरतो
मोजून बघतो मी कोटीवर एका किती पूज्ये ती ?
वाचतांना गफला होउनी शुन्य, मेंदू गांगरतो
वैशाखच का ? मला श्रावणानेही पोळले ईतके
पावसात वळवाच्या भिजाया आता मी घाबरतो
-उद्धव कराड, ( मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.