आणि मी यू. के. ला जाऊन आले...१

   मला माझ्या कंपनीने प्रशिक्षणासाठी यू. के. ला पाठविण्याचे ठरविले. 'तू जाशील का? ' असे माझ्या टीम लीडने मला विचारले तेव्हा मी लगेच हो म्हणाले. कारण माझी खूप दिवसांपासूनची परदेशी जाण्याची इच्छा होती. आणि प्रशिक्षण फक्त २ आठवड्यांचेच होते.
   हो म्हणाले खरी पण मनातून थोडे दडपण होतेच. माझी पावणेदोन वर्षांची मुलगी आरोही माझ्याशिवाय राहील का? मला एकटीने हा प्रवास करताना काही अडचण तर नाही ना येणार? असे अनेक प्रश्न मनात होते. पण घरी आई बाबा,सासू सासरे व नवरा ह्यांनी खूप पाठिंबा दिला.'आम्ही आरोहीला सांभाळू. तू काही काळजी करू नको व ही संधी सोडू नको' असे त्यांनी सांगितले व माझे जाण्याचे नक्की झाले.
   विसा वगैरे सोपस्कार होऊन १३ फेब्रुवारी २०११ रोजी सकाळी ६.३० वाजता आम्ही पुण्याहून निघालो. विमान दुपारी १.४० चे होते. मला विमानतळापर्यंत पोचवायला कंपनीची गाडी होती. मला सोडायला माझा नवरा केदार व माझे बाबा येणार होते. आम्ही निघत असतानाच आरोही झोपेतून उठून बसली. सासूबाईंनी तिला मांडीवर घेतले. मी तिला सांगितले 'मी ऑफिसला जाऊन येते' व मन घट्ट करून निघाले.
  १०.३० वाजता विमानतळावर पोचलो. केदारने व बाबांनी दर्शक पास घेतला. ते आता मला थोडा वेळ तरी काचेच्या दारातून बघू शकणार होते. मी सामान ट्रॉलीवर ठेवून आत जायला निघाले. आता केदार व बाबांना निरोप देण्याची वेळ आली होती. बाबांनी जवळ घेऊन 'बेस्ट लक' म्हटले व मी डोळ्यात दाटून आलेल्या अश्रूंना परतवत मनाचा हिय्या करून आत शिरले. प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाने माझे तिकीट व पासपोर्ट तपासला आणि मला आत सोडले. केदारने मला आत गेल्यावर काय काय करायचे ते सांगून ठेवले होते. त्याप्रमाणे ब्रिटिश एअरवेज च्या चेक इन काउंटरवर गेले. त्यांना तिकीट व पासपोर्ट दाखवला. चेक इन करायची बॅग त्यांना दिली. त्यांनी बोर्डिंग पास दिला. तेवढ्यात केदारचा फोन आला व त्याने सांगितले की ते काचेच्या दारातून मला बघत आहेत. मग थोडा वेळ त्यांच्याशी जाऊन बोलले. मग त्यांचा निरोप घेऊन इमिग्रेशनच्या दिशेने निघाले. मध्ये एके ठिकाणी बसून इमिग्रेशन फॉर्म भरला. मग इमिग्रेशनच्या रांगेत जाऊन उभी राहिले. त्यांना पुन्हा पासपोर्ट, तिकीट व इन्विटेशन लेटर दाखविले. त्या बाईंनी 'कशासाठी चालला आहात? कुठे काम करता? ' इ. जुजबी प्रश्न विचारून इमिग्रेशनचा शिक्का पासपोर्टवर मारला. त्यानंतर सिक्युरिटी चेकिंग होते. माझी व माझ्या सामानाची तपासणी झाली व सामानाच्या टॅग्जवर शिक्के मारले गेले.
  मग सरकत्या जिन्याने सर्व सामान घेऊन खाली गेले. माझा गेट क्र. १० होता. तिथे जाऊन बसले. ११च वाजले होते. विमान निघायला बराच अवकाश होता. केदारला फोन केला. मग तेही परत जाण्यास निघाले. आई व सासूबाईंनाही फोन केला.  एक मेथीचा पराठा मी तिथेच खाऊन घेतला.
   १.२०च्या सुमारास प्रवाशांना आत सोडण्यास सुरुवात झाली. पुन्हा सामानाचे थोडे चेकिंग झाले व मी माझ्या जागी विमानात जाऊन बसले.केवढे अवाढव्य विमान होते ते! हा माझा पहिलाच आंतरराष्ट्रीय विमानप्रवास असल्याने मला सर्वच गोष्टी नवीन होत्या.
  माझे आसन मधल्या रांगेत होते. माझ्या एका बाजूला एक गुजराथी आजी व दुसऱ्या बाजूला एक अमेरिकन गृहस्थ होते. एअर होस्टेसने सर्व सूचना दिल्या आणि थोड्याच वेळात विमानाने उड्डाण केले. आता पुढील २ आठवडे मला एकटीला काढायचे आहेत ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली आणि मी डोळे मिटून घेतले.