आणि मी यू.के. ला जाऊन आले....७

     आता बरेचसे सोपस्कार पूर्ण झाल्याने माझे टेंशन बरेच कमी झाले होते. आता फक्त सामान घेऊन विमानात बसले की झाले. मग काही वेळाने आम्हाला बोर्डिंग पास बघून आत सोडण्यात आले. ह्या वेळी माझे आसन मधल्या रांगेत पण कडेला होते. सामान ठेवून मी माझ्या आसनावर बसले. फोन बंद करण्याआधी एकदा घरी फोन केला. आता मला खूप शांत वाटत होते. विमानाने उड्डाण केले. 

    समोरच्या स्क्रीनवर We are family नावाचा चित्रपट लागला होता. तो बघत बसले. जरा वेळाने जेवण आले ते घेतले. चित्रपट संपल्यावर शांत चित्ताने झोपी गेले. आता लवकरच माझी आरोही मला दिसणार होती. 
    जाग आली तेव्हा विमानात सूचना दिली गेली की आपण तासाभरात मुंबईला पोचू. मला खूप आनंद झाला. मग आम्हाला landing cards दिली गेली. ती आम्ही भरली. शेवटी एकदाची सूचना दिली गेली की तुमचे सीट बेल्टस लावा. आपले विमान मुंबई विमानतळावर उतरत आहे. मी सीट बेल्ट लावून विमान उतरण्याची वाट बघत बसले. २ आठवडे काढले होते पण आता ही शेवटची काही मिनिटे कधी संपतात असे मला होऊन गेले होते. 
    शेवटी एकदा विमान उतरले. सामान घेऊन मी बाहेर पडले. आपल्याच देशात परतत असल्याने इमिग्रेशनची फारशी प्रक्रिया नव्हती. लँडिंग कार्ड घेऊन फक्ता पासपोर्टवर एक शिक्का मारला गेला. आता बॅगेज क्लेमकडे गेले. १५-२० मिनिटे झाली तरी माझी बॅग काही त्या स्वयंचलित पट्यावरून येईना. ह्यावेळी मी माझ्या मायदेशी होते. त्यामुळे टेंशन काही नव्हते. पण तरी बॅग मिळायलाच हवी होती. मी सर्वांसाठी आणलेल्या भेटवस्तू आणि माझे इतर सामान त्यात होते. तेवढ्यात काही माणसे बॅग न आल्याने तक्रार नोंदवायला निघाली. माझे लक्ष सतत पट्ट्याकडे होते. शेवटी बऱ्याच वेळाने माझी बॅग येताना मला दिसली आणि मी ती पटकन उतरवून घेतली. मग सामान ट्रॉलीवर ठेवून कस्टम्सच्या दिशेने निघाले. त्या ऑफीसरने माझे सामान न तपासताच मला जाण्याची खूण केली. कदाचित माझ्याकडे पाहूनच त्याला वाटले असावे की ही बाई काही बेकायदेशीर वागणार नाही. 
    आता सर्व सोपस्कार पूर्ण झाले होते त्यामुळे मी ट्रॉली घेऊन वेगाने एग्झिटच्या दिशेने निघाले. एग्झिट गेटकडे जाणाऱ्या कॉरिडॉरला काचेची भिंत होती व तेथून बाहेर रिसीव्ह करायला आलेली माणसे दिसत होती. माझे आई बाबा व केदार हे आरोहीला घेऊन मला घ्यायला येणार होते. त्यामुळे माझी नजर त्यांचा शोध घेत भिरभिर फिरत होती. तेवढ्यात बाबाचा हात धरून इकडे तिकडे फिरणारे माझे लेकरू माझ्या दृष्टीस पडले आणि माझ्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. अजून वेगाने चालून मी गेट मधून बाहेर पडले आणि हातातील ट्रॉली सोडून दिली. धावत जाऊन माझ्या पिल्लाला उचलून कडेवर घेतले. तिकडे माझी आई हे दृश्य बघून रडू लागली. तिच्या चेहेऱ्यावर मुलगी परदेशातून आल्याचा आनंद आणि नातीला तिची आई भेटल्याने आजीला होणार आनंद असे सर्व भाव दिसत होते. 
    आरोही मला बघून गोड हसली आणि का कोण जाणे त्यानंतर ५-१० मिनिटे ती माझ्या चेहेऱ्याला, गालाला स्पर्श करून बघत होती. कदाचित त्या जीवाला तेव्हा जाणीव झाली की आपली आई आपल्याला बरेच दिवसांनंतर भेटत आहे.
    मला घ्यायला कंपनीची गाडी आली होती आणि त्याच गाडीतून आई, बाबा, केदार व आरोही आले होते. मग ड्राइव्हरने सामान डिकीत टाकले आणि आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. माझे पिल्लू संपूर्ण प्रवासात मला चिकटून बसले होते. आणि मी मनोमन सुखावत होते. 
    माझे आई बाबा, सासू सासरे व केदार ह्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि त्यांनी आरोहीची पूर्ण जबाबदारी घेतल्यामुळेच केवळ मी माझे हे स्वप्न पूर्ण करू शकले. तसेच माझ्या यू. के. मधील वास्तव्यात माझे सहकारी अजेय आणि अभिजीत ह्यांची मला अत्यंत मदत झाली.
    ह्या अनुभवकथनाच्या निमित्ताने ह्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानते व ही लेखमाला येथेच संपविते.
    
(समाप्त)