आणि मी यू.के. ला जाऊन आले....५

    पण आम्हाला पार्सलच घ्यायचे होते म्हणून मी निश्चिंत झाले. आम्ही हाक्का नूडल्स आणि राईसचे पार्सल घेऊन हॉटेलवर येऊन खाल्ले. 

    कधी मी माझ्या सहकाऱ्यांच्या घरीही जात असे. (ते जास्त दिवस राहणार असल्याने कंपनीने त्यांना रहायला एक घर दिले होते. ) कारण तेथे स्वयंपाकघर असल्याने आम्हाला हवे ते बनवून खाता येत असे. थालीपीठ, मूग डाळीची खिचडी, पोहे असे पदार्थ आम्ही बनवून खात असू. त्यातील अभिजीतला व मला चहा आवडत असल्याने तो मला चहा करून देत असे.
    पहिल्या आठवड्यात मी एके दिवशी अजेयबरोबर जाऊन यू. के. मधील लेबारा कंपनीचे सिम कार्ड घेऊन आले होते. त्यांचे ५ पाउंडचे रिचार्ज होते आणि १ पेनी प्रती मिनिट असा दर होता. त्यामुळे आता मला घरच्यांशी खूप बोलता येणार होते. मी रोज सकाळ संध्याकाळ माझ्या घरी आणि आईकडे फोन करत असे. आरोही मला दर वेळी 'आई, चॉक्केट आण. खेळणी आणि कप्पे(कपडे) आण' असे बोबड्या शब्दात सांगत असे. तिला बिचारीला कल्पनाच नव्हती की आपली आई इतक्या लांब गेली आहे. तिला वाटायचे की नेहेमीसारखी ऑफीसलाच गेली आहे. तिचे ते बोलणे ऐकले की मला कधी एकदा हे दिवस जातायत आणि मी परत जातीय असे होऊन जाई. मी अक्षरशः एक एक दिवस मोजत असे.
    माझ्या मॅनेजरने माझे बुकिंग डॉनिंग्टन मॅनॉर नावाच्या हॉटेलमध्ये केले होते. पण २२ तारखेपासून ते हॉटेल एका लग्नासाठी पूर्णपणे आरक्षित करण्यात आले होते. म्हणून २२ ते २५ फेब्रुवारी माझी सोय एका दुसऱ्या हॉटेलमध्ये करण्यात आली होती. खरेतर आता मी मॅनॉरमध्ये चांगली स्थिरावले होते. पण नाइलाज होता.
    मी २२ तारखेला सकाळी ऑफीसला जाताना तेथून चेक-आउट केले. बॅगा गाडीतच ठेवून ऑफीसला गेले. ऑफीस सुटल्यावर अजेय-अभिजीतने मला नवीन हॉटेलवर सोडले. ह्या हॉटेलचे नाव होते चर्चव्ह्यू. हे एक नवरा-बायकोने चालविलेले घरगुती पद्धतीचे हॉटेल होते. मॅनॉर हे एक व्यावसायिक व मोठे हॉटेल होते. माझी हॉटेलमधील सर्व व्यवस्था बघून ते दोघे त्यांच्या घरी गेले. सुदैवाने माझी दोन्ही हॉटेल्स व त्यांचे घर जवळ जवळ होते.
    नवीन हॉटेलवर गेल्यावर पहिल्या दिवशी झोपच आली नाही. कारण पुन्हा सर्व गोष्टी नवीन होत्या. ही खोली आधीच्या खोलीपेक्षा थोडी लहान होती. पण इथे मला तीनच दिवस काढायचे होते म्हणून ठीक होते. ह्या हॉटेलच्या मालकीणबाई जेवणासाठी काही हवे असेल तर बनवून देत असत. मी रात्रीच्या जेवणासाठी त्यांच्याकडून ऑम्लेट, सँडविच असे पदार्थ घेत असे. असेच २-३ दिवस गेले आणि माझा परत जाण्याचा दिवस उजाडला. 
    त्या आधी एके दिवशी मी तेथील अझ्दा नावाच्या मॉलमध्ये जाऊन माझे आई-बाबा, सासू-सासरे, भाऊ-वहिनी आणि दीर-जाऊ ह्यांच्यासाठी परफ्यूम्स आणि सर्वांसाठी चॉकलेटस घेतली होती. 
    माझे परतीचे विमान शुक्रवार ता. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.२५ चे होते. त्या दिवशी लवकर उठून मी सर्व सामानाची बांधाबांध केली. पासपोर्ट, तिकीट व इतर प्रवासात आवश्यक गोष्टी लॅपटॉप बॅगमध्ये ठेवून इतर दोन्ही बॅगा पॅक केल्या. आणि सकाळीच हॉटेलमधून चेक-आऊट केले. आज मी खूप आनंदात होते. आज मी परत जायला निघणार होते.
    मग सामान गाडीत टाकून ऑफीसला गेलो. मी दुपारी २ वाजता कॅब सांगितली होती. कारण माझा तेथील मॅनेजर जॉन म्हणाला होता की शुक्रवारी संध्याकाळी रस्त्यांना गर्दी असते. त्यामुळे विमानतळावर पोचायला वेळ लागू शकतो. आज माझे कामात अजिबात लक्ष लागत नव्हते. कधी एकदा २ वाजतायत असे झाले होते. एकीकडे मनात उगीचच भीती होती की सांगितल्याप्रमाणे कॅब वेळेवर येईल ना इ. शेवटी एकदाचे २ वाजले आणि एका गाडीचा आवाज आला. 'केतकी, तुझी गाडी आलेली दिसते' असे ऍलेक्स म्हणाला आणि मी खिडकीशी धावले. खरेच गाडी बरोबर २ वाजता आली होती. त्याआधी मी तेथील टीमला निरोपाचे इमेल केलेलेच होते. मग लॅपटॉप बंद केला आणि सर्वांचा निरोप घेउन निघाले. कितीही परतायची ओढ लागली असली तरी निघताना थोडा पाय अडखळलाच.
    ड्राइवरने माझे सामान डिकीत ठेवले. माझ्याबरोबर अभिजीत लंडनपर्यंत येणार होता. त्याला तेथून त्याच्या मित्राकडे जायचे होते. मला बरेच वाटले. लंडनपर्यंत त्याची सोबत होती. एकदा सर्व सामान तपासून आम्ही निघालो. ड्राइवर चांगले होते. आमच्या तिघांच्या गप्पा सुरू होत्या. गाडी हायवेला लागून काही अंतर गेली असेल नसेल,एकदम मोठा आवाज झाला...
(क्रमशः)