आणि मी यू.के. ला जाऊन आले...४

    त्याप्रमाणे बरोबर आणलेली गुळाची पोळी आणि ऑफीसच्या जवळच्या दुकानातून घेतलेले सँडविच खाल्ले. थोडासा टी. वी. बघितला. मग घरी फोन केला. आरोहीशी बोलायचे होते पण ती झोपली होती. एरवी आईशिवाय कुणाजवळही न झोपणारे माझे लेकरू आजी व बाबाजवळ झोपी गेले होते. मला रडूच येऊ लागले. पण असे करून चालणार नव्हते. आता कुठे एक दिवस झाला होता. अजून १२-१३ दिवस जायचे होते. आरोहीची काळजी घेणारे खूप लोक तिथे आहेत हा विचार करून मी माझ्या मनाला समजावले व पलंगावर अंग टाकले. झोप कधी लागली कळलेच नाही.

    अशा तऱ्हेने माझा दिनक्रम सुरू झाला. मी तेथे दोनच आठवडे असल्याने मला एकच मधला शनिवार-रविवार फिरण्यासाठी मिळणार होता. त्यामुळे आम्ही (मी व माझे सहकारी अजेय आणि अभिजीत) ते दोन दिवस व आठवड्यात अधे मध्ये ३-४ दिवस असे विविध ठिकाणी भेट द्यायचे ठरवले. त्याप्रमाणे बुधवारी संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर आम्ही ToysRUs नावाच्या तेथील प्रसिद्ध खेळण्यांच्या दुकानात गेलो. प्रचंड मोठा असा तो एक मॉल होता. इतका मोठा मी कधीही पाहिला नव्हता. आम्ही गाडी बाहेर उभी केली आणि आत आलो. आम्हाला तिघांनाही काही ना काही घ्यायचे असल्याने आम्ही वेगवेगळ्या विभागात फिरू लागलो. तेवढ्यात माझ्या लक्षात आले की माझा मोबाईल कारमध्येच राहिला आहे. अजेय म्हणाला की घेऊन ये म्हणजे चुकामूक व्हायला नको. मग मी कारमधून तो घेऊन आले. आता आम्ही वेगवेगळ्या विभागात फिरलो तरी चिंता नव्हती. मग सगळीकडे फिरून मी आरोहीसाठी, माझ्या भाच्यासाठी व पुतणीसाठी खेळणी घेतली. 
    परत येताना रस्त्यात एक सरदारजींचे रेस्टॉरंट होते त्यांना ऑर्डर दिली व हॉटेलवर डिलिवरी द्यायला सांगितले. तेथील पंजाबी पदार्थांना भारतातल्यासारखी चव नव्हती पण रोज सँडविच खाण्यापेक्षा बरे असे वाटले. 
    मग गुरुवार, शुक्रवार प्रशिक्षण होऊन पहिला आठवडा संपला. शनिवारी आम्ही कॅसल डॉनिंग्टन येथून जवळच असलेल्या नॉटिंगहॅम पॅलेस येथे गेलो. पॅलेस खूप मोठा व सुंदर आहे. तेथे सर्व माहिती दृक-श्राव्य माध्यमातून बघण्याची व ऐकण्याची सोय होती. तेथून जवळच एक शिवाली नावाचे भारतीय रेस्टॉरंट आहे हे आम्ही आधीच आंतरजालावरून शोधून ठेवले होते. तेथे गेलो व बऱ्याच दिवसांनंतर भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला. तेथून अजेयने मला हॉटेलवर सोडले व तो त्याच्या घरी गेला.
    दुसऱ्या दिवशी रविवार होता व आम्ही Primark नावाच्या शॉपिंग मॉलमध्ये जायचे ठरविले होते. त्याप्रमाणे तिथे पोचलो. बघते तर काय मॉलबाहेर भाजी मंडई भरली होती! यू. के. मध्ये आल्यापासून एका ठिकाणी इतकी माणसे मी पहिल्यांदाच पाहिली. ही मंडई थोड्या फार फरकाने पुण्याच्या मंडईसारखीच होती. विक्रेते ओरडून आपल्या मालाची व किंमतीची जाहिरात करत होते.
     Primark मध्ये मी केदारसाठी शर्ट, आरोहीसाठी ड्रेस व माझ्यासाठी एक टॉप घेतला. तेथून परत येताना वाटेवरच असलेल्या Golden Dragon नावाच्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये शिरलो. आत एकदम कमी उजेड होता व प्रत्येक टेबलवर लहान लहान दिवे सोडलेले होते. मला जरा भीतीच वाटली.
(क्रमश:)