आणि मी यू. के. ला जाऊन आले...२

   विमानाने उड्डाण केल्यावर काही वेळाने जेवण व पेय दिले गेले. ते झाले पण मला अजिबात झोप येईना. मी खूप टेंशनमध्ये होते. कंपनीने कितीही चांगली सोय केलेली असली तरी मला एकदा त्या यू. के. मधील माझ्या हॉटेलवर पोचल्याशिवाय स्वस्थता मिळणार नव्हती. नाना शंका कुशंका माझ्या मनात सारख्या येत होत्या. आणि त्यांना दूर लोटून मी पुन्हा पुन्हा झोपण्याचा असफल प्रयत्न करत होते. माझ्या शेजारच्या आजीबाई मात्र जेवण करून मस्त ढाराढूर झोपल्या होत्या. त्या ह्या सर्व गोष्टींना चांगल्याच सरावलेल्या दिसत होत्या. आणि दुसऱ्या बाजूचे अमेरिकन गृहस्थ लॅपटॉपवर कामात इतके गर्क होते की त्यांना आजूबाजूच्या कशाचीच फिकीर नव्हती. समोरच्या टी. व्ही. वरील कार्यक्रमांत मी थोडा वेळ मन रमविण्याचा प्रयत्न केला. मग कधीतरी अगदी थोड्या वेळासाठी डोळा लागला.

   अखेर ते विमानातील १० तास संपले व आमचे विमान लंडन येथील हिथ्रो विमानतळावर उतरले. आम्हाला विमानातच लँडिंग कार्डस देण्यात आली होती व मी ते विमानातच भरून ठेवले होते. हिथ्रो हा एक अत्यंत अवाढव्य विमानतळ होता. इमिग्रेशन काउंटरला जाण्यासाठी आम्ही साधारण २० मिनिटे चाललो असू. तेही साधे सुधे नाही. सारखे सरकते जिने. खाली आणि वर! शेवटी एकदाचा इमिग्रेशन काउंटर आला. तेथील ऑफिसरने 'का आली आहेस?' 'किती दिवस राहणार? ' इ. प्रश्न विचारून शिक्का मारला. मग बॅगेज क्लेमच्या दिशेने धावायचे होते. आता फक्त सरकता जिनाच नव्हता तर त्यानंतर एक छोटी ट्रेन, जिला ट्रांझिट म्हणतात, ती होती. ती आम्हाला बॅगेज क्लेमच्या दिशेने घेऊन गेली. 'आपण बरोबर चाललोय ना' ह्याची मी एका गृहस्थांना विचारून खात्री करून घेतली.

   ट्रांझिटमधून उतरल्यावर स्क्रीनवर पाहिले तर माझ्या विमानाच्या बॅगा बेल्ट नं. ३ला येणार होत्या. मग ट्रॉली घेऊन बेल्ट नं. ३ ला गेले. आणि माझ्या बॅगची वाट पाहू लागले. ३ ते ४ मिनिटांतच मला एक हिरवी रिबन लावलेली बॅग येताना दिसली. खरेतर मी माझ्या बॅगेवर एक माझ्या नावाचा मोठा कागद, माझे विजिटिंग कार्ड व हिरवी रिबन एवढे लावले होते. पण त्यातील मोठा कागद गायब होता. पण रिबन व कार्डमुळे खात्री झाली आणि मी माझी बॅग पटकन उचलून खाली घेतली.

   सर्व सामान ट्रॉलीवर ठेवून कस्टम्स चॅनेलमधून जाऊन मी बाहेरच्या दिशेने चालू लागले. बाहेर येते न येते तोच माझ्या नावाचा फलक हातात घेऊन उभे असलेले ड्राइव्हर माझ्या नजरेस पडले व माझा जीव भांड्यात पडला. त्यांच्याकडे पाहूनच माझा विश्वास बसला की हे आपल्याला सुखरूप हॉटेलवर नेऊन पोचवतील.

   मग त्यांनी माझी ट्रॉली घेतली व आम्ही पार्किंगच्या दिशेने निघालो. ड्राइव्हरने सामान गाडीच्या डिकीमध्ये ठेवले व मी मागच्या सीटवर बसले. मी त्यांना विचारून खात्री करून घेतली की त्यांना पत्ता नीट माहीत आहे ना? त्यांनी होकारार्थी मान हलवली. त्या ड्राइव्हरचे नाव मॅक होते. ते मला म्हणाले 'तुला कुठेही रस्त्यात थांबावेसे वाटले किंवा गाडीतील तापमान कमी जास्त करावेसे वाटले तर मला सांग. ' मी मनात म्हटले 'मला कुठेही थांबायचे नाही व काही करायचे नाही. मला फक्त लवकरात लवकर हॉटेलवर पोचायचे आहे. 'मग गाडी सुरू झाली. तेव्हा स्थानिक वेळेप्रमाणे संध्याकाळचे ७ वाजले होते.

(क्रमशः)