शेतकरी धर्म

      शेतकरीधर्म

रानामधी गव्हाला मी
पाजीत होतो पाणी
कुजबुज काही अवचित
आली माझ्या कानी
हिरवट गव्हाची ती चुड
होती चाखत मातीचं आचळ
त्याच्या दुखभऱ्या ओंबीचा
होता चालला आईशी चावळ
दिस भरता माझे आये
येईल रानात कुणबी
कापील तो तुझी-माझी नाळ
घात करील गं तो मतलबी
तुझ्याचं उरावर माये
मला भरडील तो गडी
चुरडून-मुरडून माझी
काढिल सोलून कातडी
नंग्या कायेचा माझ्या
मांडील तो लिलाव
कुणा-कुणाच्या हातात
सोपविल माझा जीव
होईल गडप कित्येक पोटात
होउनी पिठ माझी काया
रिती कुस तुझी पाहताना
माझा जन्म जाईल वाया
बोले पान्हाउन काळी माय
अशीकशी गं तू  बावळी?
तिथे पोटात कित्येकांच्या
तुझ्या जन्माची होईल देवळी
उतरेल सत्त्व तुझे पणाला
भिणून तू लाखोंच्या रक्तात
दुड-दुडत माझ्या कुशीत
येशिल तू पुन्हा या जगात
आली तरारून ओंबी
उमगले तिला जगण्याचे मर्म
आला उचंबळुनी उरात माझ्या
माझा शेतकरीधर्म
मी ही राबता-राबता ईथं
मिळून या मातीत जाईल
लक्ष-लक्ष डोळ्यांनी पुन्हा
या जगताला पाहिल......!!!

                                                     -उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
                                                        मु. जळगाव, ता. निफाड, जि. नाशिक.