सिगार केसची चोरी

ब्रेट हार्ट ह्यांच्या 'कन्डेन्स्ड नॉवेल्स: सेकन्ड सिरिज' (१९०२) ह्या पुस्तकातील 'द स्टोलन सिगार केस' ह्या शरलॉक होम्सकथांच्या विडंबनाचा स्वैर अनुवाद. एलरी क्वीन संपादित 'द मिसऍडवेंचर्स ऑफ शरलॉक होम्स' (१९४४) ह्या विविध लेखकांनी लिहिलेल्या होम्सकथांच्या विडंबनांच्या संग्रहात मार्क ट्वेन, अगाथा क्रीस्टी, ओ. हेन्री, स्टीफेन लीकॉक इत्यादींच्या विडंबनकथांबरोबर हार्टची ही कथाही होती.कथेच्या प्रस्तावनेत संपादक हिला, "वन ऑफ द मोस्ट डिवास्टेटींग पॅरोडिज एव्हर पर्पिट्रेटेड ऑन द ग्रेट मॅन" म्हणतात. कथा कोणत्याही विशिष्ट होम्सकथेचे विडंबन नसून त्या जॉन्रचे विडंबन आहे.

मी हेमलॉक जोन्सच्या ब्रूक स्ट्रीटच्या घरी गेलो तेव्हा तो फायरप्लेसपुढे कसल्यातरी विचारात गढून बसला होता. आम्ही जुने मित्र असल्यामुळे मी न संकोचता नेहमीप्रमाणे त्याच्या पायाशी बसून त्याची पाउले चुरू लागलो. एक तर असे बसल्याने मला त्याचा चेहरा नीट दिसत होता, आणि दुसरे म्हणजे त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेबद्दल आदरही व्यक्त होत होता. तो विचारात इतका मग्न होता की मला वाटले त्याचे माझ्याकडे लक्ष नाही. पण हा माझा गैरसमज होता.

"पाऊस पडतोय," वर न पाहताच तो म्हणाला.

"तू बाहेर गेला होतास?"

"नाही, पण तुझी छत्री ओली आहे, आणि तुझ्या ओव्हरकोटावर पाण्याचे थेंब दिसताहेत."

क्षणभराने, विषय संपवल्याप्रमाणे तो सहज म्हणाला, "आणि मला खिडकीतून पावसाची रिपरिप ऐकू येत्येय. ऐक."

मी कान देऊन ऐकू लागलो. खरेच, खिडकीच्या काचेवर थेंबांचे टपटपणे ऐकू येत होते. ह्या माणसापासून काहीही लपून राहू शकत नव्हते!

"काय चाललय हल्ली?", मी विषय बदलला. "स्कॉटलन्ड यार्डने जिथे हात टेकलेत अशा कोणत्या केसमध्ये तुझा अफाट मेंदू गुंतलाय?"

त्याने आपला पाय थोडासा मागे ओढला, आणि जराशाने पूर्ववत केला. मग थकलेल्या स्वरात म्हणाला, " किरकोळ गोष्टी आहेत. विशेष सांगण्यासारखं काही नाही. क्रेमलिनमधून काही माणकं गायब झाली आहेत. त्याविषयी माझा सल्ला घ्यायला राजकुमार कुपोली आला होता. पूटीबादच्या राजाची एक रत्नजडित तलवार चोरीस गेली. सार्‍या अंगरक्षकांना कंठस्नान घालूनही ती सापडली नाही. मग आला मदतीसाठी माझ्याकडे. प्रेट्झेल-ब्रॉन्टस्विगच्या राणी सरकारांना आपला नवरा चवदा फेब्रुअरीच्या रात्री कुठे होता हे जाणून घ्यायचे आहे. आणि काल रात्री - ", तो दबल्या आवाजात बोलला, " - ह्याच इमारतीत राहणार्‍या एकाने मला जिन्यात गाठून विचारलं की त्याने घंटी वाजवल्यावर नोकर का येत नाहीत."

मी हसू लागलो, पण त्याच्या कपाळावरील आठी पाहून थांबलो.

माझ्या हसण्याने नाराज होऊन तो म्हणाला,"लक्षात ठेव, अशाच क्षुल्लक वाटणार्‍या प्रश्नांतून मी पॉल फेरॉलने आपल्या बायकोचा खून का केला ह्याचा, आणि जोन्सचं काय झालं ह्याचा छडा लावला होता!"

मी गप्प झालो. क्षणभर थांबून तो अचानक आपल्या नेहमीच्या भावरहीत, चिकित्सक शैलीत बोलू लागला. "मी ह्या गोष्टींना किरकोळ म्हटलं ते आता माझ्यासमोर जी केस आहे तिच्या तुलनेत. एक गुन्हा घडलेला आहे - आणि आश्चर्याची बाब म्हणजे बळी ठरलो आहे मी! माझ्याकडे चोरी झाली आहे. हे करण्याची कोणाची हिंमत झाली असा तुला प्रश्न पडला असेल ना? मलाही पडला. पण असं घडलय खरं."

"तुझ्या घरी चोरी! साक्षात गुन्हेगारांच्या कर्दनकाळाच्या घरी!", मी थक्क होऊन म्हणालो.

"होय! ऐक. हे मी दुसर्‍या कोणाकडेही हे कबूल केलं नसतं. पण तू माझी कारकीर्द पाहिली आहेस, तुला माझी गुन्हे उकलण्याची पद्धत ठाऊक आहे; सामान्य लोकांपासून दडवलेल्या माझ्या योजना मी तुला थोड्या तरी सांगितल्या आहेत, माझी गुपितं सांगितली आहेत. तू माझ्या तर्कांचं कौतुक केलं आहेस, माझ्या हाकेला कायम ओ दिली आहेस, माझा गुलाम झाला आहेस, माझ्या पायांवर लोळण घातली आहेस, तुझ्या वैद्यकीय व्यवसायाकडे दुर्लक्ष केलं आहेस, माझ्या केसेसमध्ये गुंग असल्यामुळे तुझ्या झपाट्यानं घटत चाललेल्या रुग्णांना क्विनीन‍ऐवजी स्ट्रिकनीन आणि एप्सम सॉल्ट्स‍ऐवजी आर्सेनिक दिलेलं आहेस. तू माझ्यासाठी सर्वस्वावर पाणी सोडलं आहेस. म्हणून मी तुला हे सांगतोय."

मी उठून भावनातिरेकाने त्याला मिठी मारली पण तो आपल्याच विचारात गर्क होता. यांत्रिकपणे आपल्या घड्याळाची साखळी चाचपत म्हणाला, "बस. सिगार ओढणार?"

"मी सिगार ओढणं सोडलय.", मी म्हणालो.

"का?"

मी गोरामोरा झालो. खरे म्हणजे माझा धंदा इतका बसला होता की मला सिगार्स परवडत नव्हत्या, फक्त पाइप ओढणेच परवडत होते. "मला पाइप आवडतो", मी हसून म्हटले. "ते जाऊ दे, चोरीविषयी सांग. काय काय गेलं?"

तो उठला व दोन्ही हात कोटाच्या खिशांत खुपसून फायरप्लेसपुढे उभा राहिला. माझ्याकडे पाहून बोलला, "तुला आठवतं, तुर्कस्तानच्या वझिराची लाडकी नाचणारीण गायब झाली होती? हिलॅरिटी थेटरात नाचणार्‍या पोरींच्या पाचव्या रांगेत असायची. तिला शोधून काढल्याबद्दल तुर्की राजदूताने मला एक हिरेजडित सिगार केस भेट दिली होती."

"त्यातला सगळ्यात मोठा हिरा नकली होता ना?", मी म्हणालो.

त्याच्या चेहर्‍यावर स्मितरेषा उमटली. "तुला माहीत आहे, तर?"

"तूच तर सांगितलं होतस. तू ते ओळखलंस हा मी तुझ्या असामान्य हुशारीचा व निरीक्षणशक्तीचा पुरावा समजत आलो आहे. ती सिगार केस हरवलीस की काय तू?"

घटकाभर थांबून तो म्हणाला, "हरवली नाही, ती चोरीला गेली आहे. पण मी तिला नक्की शोधून काढेन. आणि तेही एकट्याने! तुमच्या पेशात एखादा डॉक्टर जेव्हा आजारी पडतो तेव्हा तो स्वत: स्वत:ला औषधं देत नाही. दुसर्‍या डॉक्टरकडे जातो. इथे तसं नाही. मी स्वत: ह्या प्रकरणाचा छडा लावेन."

"या कामासाठी तुझ्याहून योग्य कोण आहे? सिगार केस आता मिळाल्यातच जमा आहे.", मी उत्साहाने म्हणालो.

"वेळ आली की ह्या शब्दांची मी तुला आठवण करून देईन.", तो गमतीने म्हणाला. "माझा तुझ्यावर विश्वास आहे. तुझ्या काही सुचवण्या असल्या तर सांग.", असे म्हणत त्याने खिशातून एक छोटी वही व पेन्सिल काढली.

माझा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. हेमलॉक जोन्ससारखा महापुरूष माझ्यासारख्या सामान्य माणसाचा सल्ला घेतोय! मी अत्यादराने त्याच्या हाताचे चुंबन घेतले, आणि हर्षभरित सुरात बोलू लागलो :
"सर्वप्रथम मी वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन बक्षिस देऊ करेन; पब्समध्ये, दुकानांमध्ये पत्रकं वाटेन. मग मी दागिने गहाण ठेवणार्‍या सावकारांच्या दुकानांत चक्कर टाकेन; पोलिसात जाईन. नोकरचाकरांची जबानी घेईन. घराची झडती घेईन, स्वत:चे खिसे तपासेन." "म्हणजे तुझे, अर्थात", मी हसून म्हणालो.

त्याने गांभीर्याने ह्या सार्‍याची नोंद केली.

"हे सर्व तू आधीच केलं असशील, नाही का?", मी पुढे बोललो.

"कदाचित", त्याने गूढ उत्तर दिले. वही खिशात घालत तो उठला. "मी थोड्या वेळासाठी बाहेर जातोय. मी परत येईपर्यंत इथेच थांब. आपलंच घर समज. हवं तर वेळ घालवायला पुस्तकं वाच, फळ्यांवरील वस्तू बघ. त्या कोपर्‌यात तंबाखू व पाइप्स आहेत.", हाताने इशारा करीत जोन्स म्हणाला व बाहेर पडला. त्याच्या विक्षिप्त वागण्याची सवय असल्यामुळे मला त्याच्या अशा अचानक निघून जाण्याचे काही वाटले नाही. त्याच्या सदा सजग मेंदुला तपासाची एखादी नवी दिशा सुचली असावी.

मी भिंतींवरील फळ्यांवरून नजर फिरवली. त्यांवर काचेच्या काही लहान बरण्या होत्या ज्यांत लंडनच्या लहान-मोठ्या रस्त्यांतील माती होती. बरण्यांच्या लेबलांवर '<रस्त्याचे नाव>  पदपथ व रस्त्यावरील माती' असे लिहिले होते, व त्याच्या खाली 'पावलांचे ठसे ओळखण्यासाठी' अशी उपसूचना होती. इतर बरण्यांवर 'बस व ट्रॅमच्या खुर्च्यांवरील दोरे', 'सार्वजनिक ठिकाणांच्या पायपुसण्यांतील नारळाचे व इतर दोरे ', 'पॅलेस थेटर रो अ १ ते ५०मध्ये सापडलेली सिगारेटची थोटके व जळक्या काड्या ' अशी लेबलं होती. चहुकडे ह्या पुरुषोत्तमाच्या पद्धतशीरपणाचे व कुशाग्र बुद्धिमत्तेचे पुरावे दिसत होते.

मी असा निरीक्षणात गुंतलो असताना दार उघडण्याची करकर ऐकू आली. मळकट ओव्हरकोट घातलेला व गळा व चेहर्‌याच्या खालच्या भागाभोवती त्याहून मळकट मफ्लर गुंडाळलेला एक आडदांड, गुंडासारखा दिसणारा माणूस आत आला. त्याच्या ह्या घुसण्याने मी चिडलो, पण मी काही बोलण्याआधीच तो खोली चुकली, क्षमा करा असे काहीतरी पुटपुटत बाहेर गेला. मी पटकन त्याच्या मागे गेलो पण तो जीना उतरून दिसेनासा झाला. घडलेल्या चोरीचे विचार मनात होतेच. त्यामुळे ही घटना मला साधीसुधी वाटली नाही. अचानक काहीतरी सुचल्याने खोली तशीच टाकून निघून जाण्याची माझ्या मित्राला सवय होती. त्याची प्रबळ बुद्धी व अलौकिक प्रज्ञा एखाद्या विषयावर केंद्रित असताना तो आपले खण व खोली कुलुपबंद करायला विसरण्याची शक्यता होती. मी एक दोन खण उघडण्याचा प्रयत्न करून पाहिला. माझा अंदाज खरा ठरला. पण त्यातील एक खण पूर्ण उघडत नव्हता. खणांचे दांडे कोणीतरी अस्वच्छ हातांनी उघडल्यागत चिकट होते. हेमलॉक स्वच्छतेविषयी अत्यंत चोखंदळ होता. त्यामुळे ही गोष्ट मी त्याच्या कानावर घालायची ठरवली. परंतु दुर्दैवाने विसरलो; आणि आठवली तेव्हा - पण ते गोष्टीत पुढे येईल.
 
जोन्स बराच वेळ गायब होता. वाट पाहत मी फायरप्लेसजवळच्या खुर्चीत बसलो. त्या उबेने व पावसाच्या आवाजाने पेंगू लागलो व शेवटी झोपी गेलो. स्वप्नही पाहिले असावे, कारण झोपेत कोणीतरी माझे खिसे चाचपल्याची मला अंधूक जाणीव झाली. हा नक्कीच त्या चोरीच्या बातमीचा परिणाम असावा. जाग आली तेव्हा समोर हेमलॉक जोन्स बसलेला दिसला. आगीकडे स्थिर नजरेने पाहत होता.

"तुला इतकी छान झोप लागली होती की उठवणं जिवावर आलं.", ओठांवर मंद हास्य खेळवत तो म्हणाला.

"काय खबर आहे? काही प्रगती झाली का?", मी डोळे चोळत विचारले.

"अपेक्षेपेक्षा जास्त. आणि याचं बरंचसं श्रेय तुला जातं," वही दाखवत तो म्हणाला.

सुखावून, तो आणखी काही सांगण्याची मी वाट पाहू लागलो. पण तो पुढे काहीही बोलला नाही. अशा प्रसंगी तो फारशी माहिती देत नाही हे मी विसरलो होतो. त्याच्या गैरहजेरीत येऊन गेलेल्या विचित्र माणसाविषयी मी त्याला सांगितले, पण त्याने ते हसण्यावारी नेले.

थोड्या वेळाने मी निघालो. जोन्स माझ्याकडे बघत थट्टेने म्हणाला, " तू विवाहित असतास तर कोटाची बाही साफ केल्याशिवाय घरी जाऊ नकोस असा सल्ला दिला असता. मनगटाच्या वर आतल्या बाजूस तपकिरी रंगाचे सीलचे केस अडकले आहेत. सीलस्किनचा कोट घातलेल्या एखादीच्या कमरेला घट्ट विळखा घातल्यावर नेमके जिथे अडकतील तिथेच!"

"या वेळी मात्र तू चुकलास. हे केस माझेच आहीत. मी न्हाव्याकडे केस कापून घ्यायला गेलो होतो. हात एप्रनच्या बाहेर आला असावा."

त्याच्या कपाळावर छोटीशी आठी पडली, पण मी जायला निघालो तेव्हा त्याने मला मिठी मारली. जोन्सकडून भावनांचे असे प्रदर्शन दुर्लभ होते. त्याने मला ओव्हरकोट घालायला मदत केली, आणि त्याचे खिसे नीट केले. माझ्या ओव्हरकोटाची बाही खांद्यापासून मनगटापर्यंत झटकली. "लवकर ये परत!", माझी पाठ थोपटत म्हणाला.

"कधीही. तू म्हणशील तेव्हा. दिवसातून दोनदा जेवायला दहा मिनिटं व रात्री झोपायला चार तास फक्त दे मला. बाकी माझा सारा वेळ तुझा - तुला ठाऊकच आहे."

"हो, ठाऊक आहे.", त्याचे ते गूढ स्मित करीत तो म्हणाला.

पण पुढच्या वेळेस मी तिथे गेलो तेव्हा तो घरी नव्हता. एक दिवशी दुपारी तो मला माझ्या घराजवळ दिसला. त्याने वेषांतर केलेले होते. लांब निळा कोट, चट्टेरी सूती पॅन्ट, वर केलेली मोठी कॉलर, चेहर्‌याला काळा रंग, पांढरी टोपी, आणि हातात डफ. मी त्याला निग्रो गायकाच्या ह्या वेषात आधीही पाहिले असल्यामुळे ओळखू शकलो, पण बाकी कोणी ओळखू शकले नसते. आमच्यात मागेच ठरले होते की अशा वेळी एकमेकांना ओळख द्यायची नाही, आपापल्या मार्गाने चालत राहायचे. स्पष्टीकरणांची देवाण-घेवाण नंतर करायची. त्यानुसार ह्याही वेळी मी चालत राहिलो. त्यानंतर, एकदा मी ईस्ट एन्डला एका रुग्णाला पाहायला गेलो होतो. ती एका पबमालकाची बायको होती. जोन्स मला तिथे एका गरीब कारागिराच्या वेषात दिसला. तो सावकाराच्या दुकानाबाहेर उभा राहून काचेतून आत बघत होता. तो माझ्या सूचना पाळत होता याचा मला आनंद झाला. मी त्याला डोळा मारला; त्यानेही अनवधानाने तसेच केले.

दोन दिवसांनी त्याने चिट्ठी पाठवून त्याच रात्री मला त्याच्या घरी बोलावून घेतले. हाय! ती भेट माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय घटना, आणि माझी व हेमलॉक जोन्सची शेवटची भेट ठरली! तो प्रसंग आठवला की आजही माझ्या छातीत धडधडते. तरीही मी तिचा वृत्तान्त जमेल तेव्हढ्या शांतपणे लिहिण्याचा प्रयत्न करतो.

जोन्स फायरप्लेससमोर उभा होता. त्याच्या चेहर्‌यावरील विलक्षण भाव मी त्याआधी इतक्या वर्षांच्या परिचयात एक-दोनदाच पाहिला होता - निर्दय, अमानुष, तर्ककठोर. तिथे कोमल मानवी भावनांचा लवलेशही नव्हता. तो माणूस नव्हे, एक गणिती चिन्ह भासत होता. त्याने स्वत:ला एव्हढे एकाग्र केले होते की त्याचे कपडे सैल झाले होते, आणि मन एकाग्र केल्याने त्याचे शिर लहान होऊन त्याची हॅट कपाळावरून मागे सरकून त्याच्या मोठ्या कानांवर लटकली होती.

मी आत शिरल्यावर त्याने दारे-खिडक्या लावून घेतल्या, अगदी धुराड्यापुढे खुर्चीही ठेवली. त्याची ही खबरदारी मी दंग होऊन पाहत असतानाच त्याने अचानक खिशातून रिव्हॉल्वर काढला व माझ्या कानशिलावर ठेवून म्हणाला, "बर्‌या बोलानं ती सिगार केस माझ्या हवाली कर!"

मी गोंधळून पटकन खरे बोललो. "ती माझ्याकडे नाहीये."

कडवट हसून त्याने रिव्हॉल्वर खाली फेकला. "मला वाटलंच होतं तू असं म्हणणार! ठीक आहे. तू असा बधणार नाहीस. तुझ्या गुन्ह्याचे सबळ पुरावेच देतो!", असे म्हणत त्याने खिशातून कागदाचा गुंडा आणि एक वही काढली.

"तू थट्टा करतोयस ना माझी?", मी कसाबसा बोललो.

"चूप!", तो गरजला. "खाली बस!"

मी मुकाट्याने बसलो.

"तू स्वत: स्वत:ला गुन्हेगार सिद्ध केलं आहेस," तो निर्दयपणे म्हणाला. "माझी तपास करण्याची पद्धत तुला चांगली ठाऊक आहे. तू तिची वर्षानुवर्षे स्तुती करत आलेला आहेस, ती आत्मसात केलेली आहेस. आणि आता त्याच पद्धतीनुसार तुझा गुन्हा सिद्ध झाला आहे. ती सिगार केस तू पहिल्यांदा पाहिलीस तो दिवस आठव. तू म्हणाला होतास: 'अप्रतिम! ही माझी असती तर...' गुन्हेगारी जगतात टाकलेलं हे तुझं पहिलं पाऊल होतं — आणि मला मिळालेला पहिला संकेत. 'ही माझी असती तर' पासून 'मी ही मिळवल्याशिवाय राहणार नाही', ते 'ही कशी मिळवावी?' हा तुझा प्रवास उघड होता. चूप म्हटलं ना! मध्ये मध्ये बोलू नकोस. पण गुन्हा करण्यास काहीतरी ठोस कारण असावं लागतं. तुला ती सिगार केस आवडली होती एव्हढंच पुरेसं नव्हतं. तुला सिगार्स ओढण्याची सवय आहे आणि म्हणून तू चोरी केलीस."

"अरे, पण मी तुला सांगितलं होतं की मी सिगार्स ओढणं सोडून दिलय", मी चिडून जवळ जवळ ओरडलोच.

"मूर्खा, ही चूक तू दुसर्‌यांदा करतोयस. हो, तू मला सांगितलंस ! तुझ्यावर आळ घेतला जाऊ नये म्हणून विचारलं नसतानाही तू मुद्दाम तसं सांगितलंस. पण हा तुझा केविलवाणा प्रयत्नही गुन्हा सिद्ध करण्यास पुरेसा नव्हता. तुझ्यासारख्या माणसाला असा गुन्हा करायला भाग पाडणारं प्रबळ कारण मला शोधायचं होतं, आणि मी ते शोधून काढलं. ते होतं वासना, माणसाची सर्वात शक्तिमान प्रवृत्ती. अर्थात, तू त्याला प्रेम म्हणशील. त्या रात्री तू इथे आला होतास तेव्हा तुझ्या कोटाच्या बाह्यांवर त्याचे पुरावे होते."

"अरे, पण," मी आता किंचाळायचेच बाकी ठेवले होते.

"एक शब्द बोलू नकोस," त्यानेही आवाज चढवला. "मला माहीत आहे तू काय म्हणणार आहेस ते. तू म्हणशील तू सीलस्किन कोट घातलेल्या बाईला मिठी मारण्याचा आणि चोरीचा काय संबंध. ऐक तर मग. सीलस्किन कोट तुझ्या त्या लफड्याची हीन पातळी सिद्ध करतो! कथा-कादंबर्‌या वाचल्यास तर तुला कळेल की असा कोट पैशांनी विकत घेतलेल्या प्रेमाचं प्रतीक असतो. अशा 'प्रेमा'करता तू तुझा नावलौकिक, तुझी अब्रू, सारं धुळीला मिळवलंस. सिगार केस चोरलीस, आणि ती विकून आलेल्या पैशातून त्या बयेला तो कोट घेऊन दिलास. तुझा व्यवसाय चालत नव्हता, तुझ्याकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत, तिचे 'प्रेम' मिळवण्याचा तुझ्याकडे हा एकमेव मार्ग होता. तुझ्याकडे बघून मी तिला सोडून देण्याचं ठरवलं आहे. असो. चोरी करण्यामागचं तुझं कारण कळल्यावर तू चोरी कशी केलीस याचा मी शोध घेऊ लागलो. सामान्य माणसांनी चोरीस गेलेल्या वस्तूचा शोध आधी घेतला असता. पण माझी पद्धत वेगळी आहे."

त्याचे हे विवेचन इतके जबरदस्त होते की मी निर्दोष असूनही पुढे ऐकण्यास आतुर होतो.

"ज्या रात्री मी तुला सिगार केस दाखवून तुझ्यासमोर ती खणात ठेवली त्याच रात्री तू ती चोरलीस. तू त्या खुर्चीत बसला होतास व मी फळीवरून काहीतरी काढायला उठलो होतो. तेवढ्या वेळात तू खुर्चीतून न उठता सिगार केस लंपास केलीस. चूप! मध्ये बोलू नकोस. तुला आठवतय, त्या रात्री मी तुला ओव्हरकोट घालायला मदत केली होती? तुझी बाही नीट केली होती? ते करताना मी टेपने तुझ्या खांद्यापासून मनगटापर्यंतची लांबी मोजली. नंतर तुझ्या शिंप्याकडे जाऊन ते माप बरोबर असल्याची खातरजमा करून घेतली. तुझ्या खुर्चीपासून त्या खणापर्यंत बरोबर तेव्हढेच अंतर होते !"

मी सुन्न झालो. काय बोलावे तेच कळेना.

"बाकीचे किरकोळ तपशीलही माझ्या म्हणण्याला पुष्टीच देताहेत! नंतरही मी तुला त्या खणात हात घालताना पाहिलं. इतका आश्चर्यचकित होऊ नकोस! मफ्लर घालून खोलीत शिरलेला तो माणूस मीच होतो. तुला मुद्दाम इथे एकटा सोडून गेलो होतो; पण जाण्याआधी खणाच्या दांड्याला थोडा साबण लावून ठेवला होता. रात्री तू घरी जायला निघालास तेव्हा आपण हस्तांदोलन केलं. त्या वेळी तो साबण तुझ्या हाताला लागलेला होता. तू खुर्चीत झोपलेला होतास तेव्हा मी तुझे खिसे चाचपून पाहिले. तू निघालास तेव्हा मी तुला मिठी मारली कारण तू सिगार केस किंवा आणखी काही गोष्टी अंगावर लपवून ठेवल्या होत्यास का ते मला पाहायचे होते. पण काहीच हाती लागलं नाही. माझी खात्री पटली की तू सिगार केसची आधीच विल्हेवाट लावली आहेस. मला वाटलं होतं की तुला अजूनही पश्चाताप होईल, तू आपला गुन्हा कबूल करशील. म्हणून मी तुझ्या मागावर आहे हे मी तुला दोनदा तुझ्यासमोर येऊन दाखवून दिलं, पहिल्यांदा निग्रो गायकाच्या वेषात, आणि दुसर्‌यांदा सावकाराच्या दुकानाच्या काचेतून पाहणार्‌या कारागिराच्या वेषात. त्या वेळी तू त्या सावकाराकडे सिगार केस गहाण टाकत होतास."

"अरे, त्या सावकाराला विचारायचस तरी मी तिकडे काय करत होतो ते. मग तुला कळलं असतं तुझा आरोप किती बिनबुडाचा आहे ते.", मी कळवळून म्हटलं.

"मूर्खा, सावकारांच्या दुकानांत तपास करण्याची सूचना तुझी होती. तुला काय वाटलं, मी तुझ्या - एका चोराच्या - सूचना पाळेन? किंबहुना, त्यांतून मी काय करू नये ते मला कळलं."

"म्हणजे तू खणात शोधलं नसशीलच", मी कडवटपणे बोललो.

"नाही," तो शांतपणे म्हणाला.

आता मात्र मी वैतागलो. खणाजवळ जाऊन तो खसकन ओढला. त्या रात्रीसारखाच तो अजूनही पूर्ण उघडत नव्हता. आणखी प्रयत्न केल्यावर माझ्या लक्षात आले की खणाच्या वरच्या बाजूला काहीतरी अडकले आहे, व त्यामुळे तो उघडत नाही. मी हात घालून ती अडकलेली वस्तू बाहेर काढली. ती हरवलेली सिगार केस होती! मी आनंदाने जोन्सकडे वळलो.

पण त्याच्या चेहर्‌याकडे बघून मला धक्काच बसला. त्याच्या धारदार नजरेत आता एक तुच्छतेची छटा होती. "माझी चूक झाली," तो हळूहळू बोलू लागला. "तू किती भ्याड आणि कमकुवत मनाचा आहेस हे मी विसरलो होतो. तू गुन्हेगार असूनही मला तुझं कौतुक होतं; पण आता माझ्या लक्षात आलं की तू त्या रात्री खणाची उघडबंद का करत होतास. कुठल्या तरी मार्गाने, कदाचित आणखी एक चोरी करून, तू सिगार केस सावकाराकडून सोडवून आणलीस व आता तिला खणातून शोधून काढण्याचं नाटक केलंस. तुला वाटलं तू हेमलॉक जोन्सला फसवू शकशील; कधीही न चकणार्‌याला चकवशील. पण ते शक्य नाही. जा! मी तुला सोडून देतो. शेजारच्या खोलीत दबा धरून बसलेल्या तीन पोलिसांनाही मी बोलावणार नाही. जा, निघून जा. यापुढे आयुष्यात तुझं तोंड मला कधीही दाखवू नकोस."

मी चक्रावून उभा होतो. त्याने माझा कान धरून मला बाहेर काढले व दार लावून घेतले. क्षणभराने त्याने दार किंचित उघडून फटीतून माझी हॅट, ओव्हरकोट, आणि ओव्हरशूज बाहेर फेकले. त्यानंतर ते दार माझ्यासाठी कायमचे बंद झाले!

त्या दिवसानंतर मी त्याला कधीही पाहिले नाही. हे मात्र कबूल करायलाच हवे की त्यानंतर माझी भरभराट झाली - प्रॅक्टिस पुन्हा जोरात चालू लागली. माझे काही रुग्णही बरे झाले. मी श्रीमंत झालो. एक घोडागाडी घेतली, वेस्ट एन्डला घर घेतले. पण त्या महान माणसाची तीक्ष्ण बुद्धिमत्ता, दूरदृष्टी आणि अभिनिवेश विचारात घेता मला अनेकदा प्रश्न पडतो की माझ्याही नकळत मी खरोखरच त्याची सिगार केस चोरली तर नव्हती!