९ / ९ / ६९ चे दोन महापूर

कादवा व गोदावरी या दोन नद्यांच्यामध्ये कादवेच्या कुशीत टेकडीवर वसलेलं माझं जुनं जळगांव फार तर ७०-८० घरांचं असेल, मला ते फारसं आठवतही नाही. कारण माझा जन्मच मुळी आम्ही रानात वस्तीवर राहायला गेल्यावर झाला. गावाशी माझा फारसा संबंध आलाच नाही. जो काही संबंध आला तो शाळेत जाण्यापुरताच, तोही दोनच वर्ष. इतरवेळी फक्त सणासुदीला, कारु-नारुंकडे कामापुरते जाण्याच्या निमित्ताने आला तोही थोडकाच.

      आमचं मळ्यात गुऱ्हाळ होतं. त्यामुळे सीझनमध्ये राहण्यासाठी मळ्यात शेड बांधलेलं होतं. जस जसा शेतीचा पसारा वाढला तसं गावात राहून शेती करणं अवघड झाल्यानं मळ्यातच मोठं घर बांधलं. आमचं कुटुंब त्यावेळी २०-२२ माणसांचं होतं. गुऱ्हाळा बरोबरच पिठाची गिरणीही होती, त्याला लागूनच गूळ व इतर सामान साठवण्यासाठी मोठं पत्र्याचं गोडाउन बांधलेलं होतं. माझ्या जन्मा आधीच गुऱ्हाळ बंद पडलं व त्याजागी अंदाजे पंधरा बाय पन्नास फुटांची दोन दालनांची मोठी माडी व खाली चार खोल्या बांधल्या त्यामुळे राहण्यासाठी बखळ जागा होती.
      एवढी प्रस्तावना करण्याचं कारण म्हणजे जेव्हा-जेव्हा पावसाळा येतो तेव्हा-तेव्हा मला सर्वप्रथम आठवतो तो ९ / ९ / ६९ चा महापूर. त्यावेळी मी आठ वर्षांचा होतो. मला बऱ्यापैकी आठवतात ते दिवस. १५ ते २० दिवस सारखी पावसाची रिपरिप चालली होती. मधूनच जोरदार पाऊस पडायचा. सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं. आमच्या घराभोवती गुडघे जातील इतका गाळ व पाणी झालेलं होतं. घराबाहेर पडणंही मुष्किल झालं होतं. गारठाही कमालीचा होता. दिवसभर माणसं, बाया आम्ही मुलं भुशाची धुनी पेटवून कोंडाळं करून बसलेलो असायचो. चिखलामुळे गावात जाणंही बंद झालं होतं. त्यातच पोळा आला पण आमच्या ५-६ बैलजोड्या गावात नेणं जमलं नाही, म्हणून आमच्या घराभोवतीच पाच प्रदक्षिणा घालून पोळा साजरा केला गेला. इतका कठीण पाऊस त्यावेळी पडत होता.
      अशा परिस्थितीत महापूर आला नसतातर नवलच. घरातल्या मोठ्या माणसांच्या बोलण्यातून मला पुराविषयी समजलं. आम्ही गावात जाणं शक्यच नव्हतं पण आमच्या माडीच्या खिडकीतून पुराचं पाणी स्पष्टपणे दिसायचं. खूप मोठा पूर होता तो. गोदावरी आणि कादवा दोन्ही नद्या एकत्र झाल्या होत्या. आमच्या गावाला तर पाण्याने वेढा घालून काथरगावकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत मजल मारली होती. तिकडून काथरगावकडून गोदावरी कादवेच्या भेटीला आली होती. संपूर्ण काथरगाव ते जळगाव रस्ता पाण्याखाली गेला होता हे आम्हाला खिडकीतून दिसत होतं. निफाडशीही गावाचा संपर्क तुटला होता.
      त्यावेळी आमच्यासह बोटावर मोजण्या इतकी कुटुंबं सोडली तर सर्वजण गावात राहत होते. पुराचं पाणी उंचावर असलेल्या मारुतीच्या मंदिराला जेव्हा लागायला आलं तेव्हाच लोकांनी जाणलं की आता मोठा पूर येणार, गावात पाणी शिरणार कारण पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत होती. तेव्हाच लोकांनी गाव सोडायला सुरवात केली. सर्व सामान-सुमान बांधून लोकं घर सोडून निघाली. गाव पाण्याखाली जायच्या आतच गाव रिकामं झालं होतं. त्यामुळे जीवित हानी काही झाली नाही.
      लोकांनी घरं तर सोडली पण त्यांच्या राहण्याचा व निवाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. कुठे जाणार १००-१२५ बाया, माणसं,लहान मुलं ? तेव्हा माझे आजोबा श्री. नामदेव पुं. पा. कराड, काका श्री. प्रल्हाद पा. कराड, व माझे वडील श्री. वामन पा. कराड हे पुढे झाले व त्या सर्वांना आमच्या वस्तीवर आणलं गेलं. काही पत्र्याच्या गोडाउनमध्ये, काही माडीवरच्या दोन्ही दालनांत तर काही खालच्या खोल्यांमध्ये अशी सर्वांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. झोपण्याची व जेवणाची सोयही तिथेच करण्यात आली. चांगले ५-६ दिवस लोकं पाणी ओसरेपर्यंत आमच्याकडे मुक्कामाला होते. आमचं सर्व कुटुंबही त्यांच्यात सामावून गेलं होतं. दररोज जवळपास पाऊण-एक पोतं धान्य दळलं जायचं बया-बापड्या दगडांच्या चुली करून चपात्या-भाकऱ्या करायच्या, कधी पिठल्याचा बेत व्हायचा तर कधी घुटं(उडदाच्या डाळीची आमटी ) व्हायचं. सर्वजण एका पंक्तीत बसून जेवायचे. जात-पात, गरीब-श्रीमंत हे तर त्या महापुराने केव्हाच धुऊन नेलं होतं. सर्वजण एकोप्याने व एकदिलाने राहत होते, कुणाचं उणं-दुणं नाही की भांडण-तंटा नाही. 
    पुरुष मंडळी दिवसा रानात चक्कर मारून यायची, कोणी गावाकडे जायचे पाणी ओसरलं की नाही हे पाहायला. ते परत आल्यावर त्यांच्या बोलण्यातून आम्हाला गावच्या परिस्थितीविषयी व पुराविषयी समजायचे. त्या महापुरात गावातलं मारुतीचं एकमजली व चार-पाच खणांचं मंदिर पूर्णपणे कोसळलं होतं, मारुतीची दगडी मूर्ती तेवढी शिल्लक होती. जवळपास सर्वच घरं काही पूर्णपणे तर काही अर्धवट पडली होती. संपूर्ण गावच उद्ध्वस्त झालं होतं. 
      अशा बातम्या ऐकायला मिळत असतानाच रात्रीच्यावेळी काही गमतीचे प्रसंगही घडायचे. माडीवर बरेचसे लोक झोपायला असायचे, त्यांच्यातच आम्ही झोपत असू. अगदी दाटीवाटीने लोक झोपलेले असत. पुरामुळे तेव्हा वीजही गायब होती. त्यामुळे दिवे-कंदील लावले जायचे परंतु ते रात्रभर काही टिकत नसत. त्यामुळे कोणी रात्रीच उठलं तर धडपडायचं, कुणाच्या अंगावर पाय पडायचा त्यामुळे त्याही परिस्थितीत बाचाबाची, इरसाल शिवीगाळ व्हायची. काही आमच्या बरोबरची मुलं होती, पुरुष व बायकांची वेगवेगळी सोय असल्यामुळे मुलं पुरुषांबरोबर झोपायची. त्यातलं कोणी आईची आठवण होऊन तिकडे जायला निघायचा तो दरवाज्याकडे जायच्या ऐवजी खिडकीकडे जाऊन बाहेर जायचा प्रयत्न करायचा, बाहेर पडायला जमलं नाही की मोठ्याने हाका मारायचा, बं $$$ बं $$$ बं $$$( त्यावेळी आईला ' बं ' म्हटलं जायचं) त्याची चांगलीच खिल्ली उडवली जायची. कुणीतर मुद्दाम कुणाच्या कानात-नाकात दोरा घाल, कुणाची शेंडीच बांध अशा गमती-जमती घडायच्या.
      सहा-सात दिवसांनी पाणी ओसरलं. गाव मोकळं झालं तसं लोकांनी गावात जाऊन पाहणी केली, कुणाचं घर शाबूत आहे, कुणाचं उद्ध्वस्त झालं. ज्यांच्या घरांची थोडीच पडझड झाली होती त्यांनी तात्पुरती डागडुजी करून घेतली, ज्यांची घरं पूर्णं उद्ध्वस्त झाली होती त्यांनी त्यांच्या मळ्यामध्ये तात्पुरता निवारा उभा केला. हि सगळी सारवा-सारव झाल्यावर मग एकेकजण जमेल तसं त्यांच्या घरांकडे परतू लागले. दोन-तीन दिवसांतच गेली पाच-सहा दिवस मुक्कामाला असलेली माणसं आमच्या कुटुंबातलीच झाली होती, ती परत गेल्यानं २०-२२ जणांचं आमचं कुटुंब असलं तरी घर तसंच मनही सूनंसुनं वाटत होतं.
      त्या पुरानं उद्ध्वस्त झालेलं आमचं गाव सरकारनं दिलेल्या जागेवर नव्यानं वसलं पण त्यातले जवळपास ३० टक्के कुटुंबं कायमची मळ्यात वस्ती करून राहायला गेली. त्यामुळे नव्यानं वसलेल्या गावात ' गावपण ' जाणवेनासं झालं. तुटक-तुटक घरं, सुटी-सुटी खळवाडी आणि त्याच बरोबर माणसंही एकमेकांपासून दूर गेली ती कायमचीच.
      आजही अशा नैसर्गिक वा मानव निर्मीत आपत्ती आल्या की माणसं त्याच्या निवारणार्थ एकत्र येतात, सगळ्या भेदाभेदांच्या भिंती गळून पडतात. एकजूटीने सारे झटून कार्य करतात व सगळी निरवानिरव झाल्यावर परत सुनीसुनी होतात. खरंतर माणसांनी मनाने एकत्र आलं पाहिजे पण तसं होत नाही हे दुर्दैव, म्हणूनच तो एकोपा टिकत नाही. त्यामुळे माणसातलं ' माणूसपण ' सदैव जागृत राहावं, त्यांनी कायमसाठी मनानं एकत्र व्हावं यासाठीच तर अशा आपत्तीचं प्रयोजन तर नसेल ना ? असा प्रश्न मनात राहून राहून येतो. असो.
      तो महापूर काय जे नुकसान करायचं होतं ते करून ओसरून गेला पण ज्याच्यामुळे केवळ घरंच नाही तर माणसं व माणसांची मनं उभारली गेली, काही काळापुरता का होईना माणूस ' माणूस ' होऊन माणसाशी जोडला गेला, माझ्या बालमनाने प्रत्यक्ष अनुभवलेला तो ' माणुसकीचा महापूर ' मात्र मनातून अजूनही ओसरत नाहीये. दरवर्षी पावसाळा येतो, ९ / ९ ही तारीख येते त्यावेळी या माणुसकीच्या महापुराची आठवण झाल्यावाचून राहत नाही, आणि तिच आठवण मग माझ्यातल्या ' माणसाला ' नवतीचं नव्हाळं पाजून जाते व त्या महापुराचा जिताजागता साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं ह्या सार्थ अभिमानानं उर भरून येतो व मनातून आणखी एक महापूर त्या क्षणापुरता का होईना वाहत राहतो......!!!
                                              ********
                                                                                  -उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५) 
                                                                                    मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.