ही कळी जोवरी उमलुनी ना फुले

नायिका :
ही कळी जोवरी उमलुनी ना फुले
धीर ध, धीर ध, धीर ध तोवरी - धीर ध तोवरी ।ध्रु१।

नायक :

कोठवर अन् कसा धीर धरणार तो
ज्या अधि, ज्या अधि, ज्या अधि तू करी - ज्या अधि तू करी  ।ध्रु२।

नायक :
प्रीतिला ना मुभा का ग प्रीतीतही?
प्रीति नाही मुळी ही. अनास्थाच ही

नायिका :
करत ऱ्हा हीच तक्रार; मज वाटते
किति मधु, किति मधु, किति मधुअंतरी - धीर ध तोवरी ।१।

नायिका :
मजवरी काहि परिणाम ना व्हायचा
प्रीतिचा ध्यास तुज वेड लावायचा!

नायक :
मान्य की वेड सारेच हे; मजवरी
प्रेम ज, प्रेम ज, प्रेम ज तू करी -ज्या अधि तू करी ।२।

नायक :
मज मिळे पाहण्या हे घडे रोजला
सोंग करसी नवे तू गडे रोजला

नायिका :
शेवटीचेच हे सोंग आता सख्या
ठेव भ, ठेव भ, ठेव भमजवरी - धीर ध तोवरी ।३।

टीपा :

१. पर्याय : घेत ऱ्हा हाच आक्षेप; मज वाटते

२. मूळ गाण्यात रूप आणि प्रेम हे स्त्री पुरुषांचे प्रतीक घेतलेले आहे. रूप म्हणजे नायिका आणि प्रेम म्हणजे नायक (असे मला वाटते). त्याप्रमाणे हे पर्यायही म्हणून पाहा.

रतिवरी काही परिणाम ना व्हायचा
प्रेमभाव तुजला वेड लावायचा!

किंवा

सुंदरीला न ह्या काही ते व्हायचे
प्रीतिने मात्र तुज वेड लागायचे!

३. पर्याय : ना पुढे सोंग होणार ऐसे सख्या

चालः   मूळ गाण्याचीच!   वृत्त स्रग्विणी गालगा गालगा गालगा गालगा (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल

शब्द : दोन्ही ध्रुवपदांच्या शेवटच्या ओळीत आणि कडव्यांच्या शेवटच्या ओळीत पहिला शब्द पाठोपाठ तीनदा येतो. शिवाय त्याचे यमकही आहे भाषांतर करताना ह्या गोष्टीवर भर दिलेला आहे. त्यामुळे भाषांतर नेहमीप्रमाणे काटेकोर न करता भावार्थाने आणि कधी कधी स्वैर केलेले आहे. सर्व सुधारणांचे स्वागत आहे.

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.   (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. ठळक केलेल्या जागी र (म्हणजे अर, इर किंव उर असेच. ) असे यमक हवे. अधोरेखित जागी री असे यमक हवे.