काळे पाणी -- १

एके काळी काळे पाणी म्हटल्यावर अंगावर भीतीने शहारे उमटायचे पण आता मात्र जो उठतो तो आपण होऊनच काळ्या पाण्यावर जातो. त्यास भरीस घालत असतात, केसरी सारख्या प्रवासी कंपन्या! अर्थातच त्यात जास्त भरणा असतो तो मराठी माणसाचा तेही स्वाभाविकच आहे. कारण मराठी माणसाला ज्यांचा अभिमान वाटतो अश्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तेथील सेल्युलर जेलमध्ये आयुष्यातील ऐन उमेदीचा काळ तेथील अंधार कोठडीत व्यतीत केला नुसताच व्यतीत केला नाही तर तेथील मरणसुद्धा बरे असे म्हणण्यासारख्या हाल अपेष्टांना धैर्याने तोंड दिले. बारीसारख्या निर्दय जेलरला नमवले, त्याने "मि. सावरकर आपल्याला ५० वर्षानंतर दयाळू इंग्रज सरकार निश्चित सोडेल" असे कुत्सित उद्गार काढल्यावर, "तोवर ते सरकार टिकले तर" असे बाणेदार उत्तर त्यावर दिले इतकेच नव्हे तर "तसे झालेच तर मृत्यू दयाळू आहे तो त्यापूर्वीच माझी सुटका करेल"असे धैर्योद्गारही काढले. ज्या कोठडीत नुसते राहण्याच्या कल्पनेने अंगाला कापरे भरे त्या कोठडीत राहून लिहिण्याचे कोणतेही साधन नसताना "कमला" सारखे महाकाव्य लिहिले. त्या महान स्वातंत्र्यवीराच्या कारागृहातील वास्तव्याने पवित्र झालेल्या त्या स्थळाला वंदन करून यावे हाच उद्देश प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असतो.

जानेवारीत केरळ पाहून परतल्यावर आपले जन्माचे फिरणे झाले असे वाटू लागले. कारण माझी फिरण्याची हौस तेवढीच. पण त्यानंतर मी गावाकडे एक चक्करही मारली. त्यापूर्वीच आमच्या नेहमीव्या प्रवासी जोडीने म्हणजे माझी बहीण व मेहुणे यांनी अंदमान निकोबारच्या केसरी बरोबरच्या सहलीचा प्रस्ताव मांडला होता व त्याचे पैसेही भरून टाकले. असे कोणीतरी दुसरे ढकलत असले तर उड्या मारायला आमची म्हणजे माझी फारशी हरकत नसते.. म्हणजे गावी जाण्यापूर्वीच आमची अंदमान सहलीची पूर्वतयारी म्हणजे केसरीकडे पैसे पाठवणे झाली होतीच. म्हणजे आम्ही गेल्यातच (अंदमानला) जमा होतो. अर्थात पैसे भरले म्हणजे गेलोच हा माझा भ्रम होता हे आमच्या सहलीच्या प्रारंभीच्या अनुभावावरून ध्याबात आले.

१२ ते १८ नोव्हेंबर असा आमच्या या सहलीचा कालावधी होता. त्यामुळे आमची औंध सहल आटोपल्यावर आम्हाला बराच कालावधी पुन्हा ताजेतवाने होण्यास मिळणार होता. शिवाय केसरीतर्फे जाणार म्हणजे आपली तयारी फार करावी लागणार नाही. त्यानी सांगितलेले कपडे वगैरे त्यानीच दिलेल्या बॅगमध्ये भरले की झाली तयारी. तेवढी तयारी आम्ही १० व ११ या दोन दिवसात करून बॅगा भरून ठेवल्या. आम्ही दोघे पुण्याहून के. के.. ट्रॅव्हल्सच्या टॅक्सीने सरळ मुंबईच्या विमानतळावर जाणार होतो. बहीण व मेव्हणे अगोदरच औरंगाबादहून नुंबईस गेले होते ते विमानतळावरच आम्हास भेटणार होते.

. आमच्या उड्डाण्णाची वेळ १२ तारखेस पहाटे ५-५० ची असल्यामुळे रात्री ११ वा. निघाले तरी चालेल अशा अपेक्षेने के. के. ट्रॅव्हल्सशी बोलणी केली. त्यांची टॅक्सी २-२॥ वाजेपर्यंत पोचेल ही अपेक्षा आणि देशांतर्गत विमानप्रवासासाठी एवढ्या लवकर विमानतळावर पोचण्यास काही हरकत नाही असे अगदी जास्तीत जास्त दक्षता घेणाऱ्या आम्हा दोघांनाही वाटले तरी आमच्या चिरंजीवानी एक तास अगोदर निघाल्यास बरे होईल असा सल्ला दिला. हाच गृहस्थ पूर्वी औरंगाबादहून पुण्याला जाताना "बस सुटेल अरे नीघ लवकर" असे आम्ही ओरडत असताना आपली बॅग शोधायला सुरवात करायचा त्यामुळे मी त्याचे न ऐकता आपलाच निर्णय कायम ठेवला.

आमया या निर्णयास नाट लावली "केसरी" च्या जागरूक सेवकवर्गापैकी एकीने! तिने आधल्या दिवशी आम्हाला फोन करून विमानतळावर बरोबर ३ वा. हजर राहण्याची सूचना दिली. मी तिला आम्ही पुण्याहून रात्री ११ ची टॅक्सी ठरवली आहे असे सांगितल्यावर तिला पढवल्याप्रमाणे तिने "हे बघा ती टॅक्सी वेळेत पोचली नाही तर आमची जबाबदारी नाही. आमचा प्रतिनिधी अगदी ठीक ३ वा. तेथे हजर असेल आणि त्यावेळी तुम्ही तेथे असायला हवे. ३-३० ला गेट बंद झाले आणि तुम्हाला विमानतळात प्रवेश मिळाला नाही तर आम्ही जबाबदार नाही" असे बजावले, त्यावर मी "यापूर्वी मी सहा वेळा अमेरिकेस गेलो आणि वेळेपूर्वी गेट बंद होत नाहीत उलट ते सारखी शेवटची घोषणा शेवटची घोषणा म्हणून राहिलेल्या प्रवाश्यांनी ताबडतोब गेटवर यावे असा आग्रह करतात. ३-३० ला ते उघडेल तरी का हीसुद्धा माझी शंका आहे. " असे सांगून तिच्या दरडावण्यात दम नाही असे तिला पटवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तिने दूरध्वनी बंद केला होता अर्थातच आमचे भयशंकित मन कच खाऊन एक तास अगोदर गेले तर काय बिघडते असा विचार करू लागले व के. के. ला एक तास अगोदरची टॅक्सी पाठवण्यास सांगावे असे आम्हाला बजावू लागले, शिवाय सदा तत्पर सौ. नेही तिला अगोदरपासूनच तसेच वाटत होते असे म्हटल्यावर एक दिवस तिने उशीरा कसे तोंड उघडले याआ मोठा विस्मय वाटला. आता तिचा हा दटावणीवजा इशारा कानी पडल्यावर नेहमीप्रमाणे माझा नाइलाज झाला व ११ ऐवजी एक तास अगोदरच घराबाहेर पडण्याचा आम्ही केलेला विचार आम्ही के. के. च्या कानावर घातला व त्यांनी तो तत्परतेने मान्य केला.

१० वा. ची टॅक्सी एक तास अगोदरच म्हणजे ९ वा. निघते व लोकांना जमा करायला सुरवात करते व त्यातील प्रथम बसणारे आम्हीच आहोत असा के. के. च्या टॅक्सीच्या ड्रायव्हरचा संदेश मिळाला व रात्रीचे जेवण कसे बसे उरकून आम्ही आमच्या बॅगा सकाळीच भरून ठेवलेल्या असल्यामुळे "एका लग्नाची तिसरी गोष्ट" पाहत बसलो. अंदमानला कदाचित आम्हाला ती बघायला मिळणार नाही असा सौ. चा अंदाज होता, तेव्हा परत आल्यावर कुणाचे लग्न असा प्रश्न पडायला नको त्यामुळे ही खबरदारी! के. के च्या चालकानेही आमची ही अडचण ओळखून बरोबर साडेनऊ वाजता आम्हाला फोन केला व आम्ही तयारच असल्यामुळे आम्ही लगेचच टॅक्सीत बसलो.

आमच्या गाडीत आणखी दोन प्रवासी यायचे होते. कर्मधर्मसंयोगाने त्या दोघांनाही एकाच देशात म्हणजे इथिओपियाला जायचे होते. त्यामुळे माझ्या इथिओपियाविषयक ज्ञानात भर पडली. शिवाय आता अमेरिकेप्रमाणेच इतर बऱ्याच देशात आपले अभियंते जाऊ लागले आहेत त्यामुळे आपल्यावरचे संकट थोडेफार टळले या कल्पनेने बराक ओबामाला बरे वाटू लागले असेल असे वाटून मलाही बरे वाटले नाहीतर एकट्या ओबामालाच किती दिवस त्रास द्यायचा? (तरी त्यावेळी देवयानी प्रकरण उपटलेले नव्हते. )त्यापैकी एकाचे उड्डाण पहाटे ३ चे तर दुसऱ्याचे पहाटे ५ चे होते. आम्ही इतक्या लवकर निघाल्याबद्दल त्यानी माफक आश्चर्य व्यक्त केले पण घरात बसून आमच्या जाण्याची वाट पाहणाऱ्यांना जागरण घडवण्यापेक्षा विमानतळावर जाऊन वाट पाहणे शहाणपणाचे हा आमचा विचार त्यांना पटला..

आम्ही बरोबर १-३० वा. विमानतळावर पोचलो. नेहमीप्रमाणे टर्मिनल 1 A की 1B याविषयी माझ्या मनात संदेह होताच. त्याला कारणही तसेच होते. केसरीच्या प्रतिनिधीचा संदेश आला होता त्यावेळी त्याने टर्मिनल 1A असे सांगितल्याचे मला अंधुक आठवत होते पण त्याविषयी खात्री नसल्याने मी मध्ये गाडी थांबली होती तेव्हां केसरीचे माहितीपत्रक काढून पाहिले होते व त्यावर टर्मिनल 1 B असे लिहिले होते लिहिलेल्या शब्दावर अधिक विश्वास ठेवण्याची सवय असल्यामुळे आम्ही टर्मिनल 1 B लाच उतरण्याचे ठरवले मात्र तेथे सगळा शुकशुकाट दिसत होता. चालकाने आम्हाला सोडून गाडी पुढे दामटली कारण इथिओपियावाल्यांना आंतरराष्ट्रीय म्हणजे सहार विमानतळावर जायचे होते.

आम्ही उतरून सामानासह विमानतळाच्या थोडेसे आत प्रवेश करतानाच तेथे असणाऱ्या विमानतळावरील कर्मचाऱ्याला विचारल्यावर आमच्या "GO AIR" या विमानसेवेचे टर्मिनल 1A च असून त्या बाजूस जाण्याचे मार्गदर्शन त्याने आम्हाला केले. थोडेसे चालावे लागणार पण नाहीतरी आपण चार तास विमानतळावर काढणारच आहोत तेव्हां आजचा चालण्याचा व्यायाम तरी झाला (कारण त्यावेळी दुसरा दिवस सुरू झाला होता. ) असे मी मनाचे समाधान करून घेतले व आम्ही दोघे त्या दिशेने बॅगा ओढत चालू लागलो. चाकांच्या बॅगा निघाल्याबद्दल मी मनात त्या शोधकर्त्याचे आभार मानत होतो. मध्ये मध्ये आम्हाला काही टॅक्सीवाले भेटून "काय कुठे जायचे साहेब? "म्हणून आपली सेवा घेण्याचा आग्रह करत होते. पण तसे टर्मिनल 1A फार दूर नव्हते. ३ नंबरच्या प्रवेशद्वारातून चेन्नईस जाणाऱ्या विमानासाठी प्रवेश मिळणार होता तेथील आसनांवर आम्ही जाऊन स्थानापन्न झालो अर्थातच आमच्याशिवाय त्या ठिकाणी कोणीच नव्हते. इतकेच काय अगदी गेट क्रमांक ३ च्या आतदेखील शुकशुकाटच होता. केसरीचा प्रतिनिधी प्रवीण आता झोपेत असेल या कल्पनेने त्याला फोन करावा की न करावा अश्या द्विधा मनस्थितीत असतानाही फोन करण्याचे धाडस केले निदान आपल्याकडे असलेला दूरध्वनी क्रमांक त्याचाच आहे की नाही याची खात्री होईल असा विचारही त्यामागे होता.

प्रवीणच्या झोपेतून त्याला उठवण्याचे पातक मी केले तरी तो केसरीचा नम्र सेवक असल्याने फारसा त्रागा न करता त्याने फोनचा स्वीकार करून आपण ३ नंबरच्या प्रवेशद्वारापाशी बरोबर ३-३० ला येत आहोत हे त्याने जाहीर केले. व आमचे टर्मिनल व गेट यात तरी आम्ही चूक केली नव्हती हेही सिद्ध झाले. थोड्याच वेळात आमच्या समोरच रिक्षातून दोन मध्यमवयीन स्त्रिया उतरल्या. त्यांच्याजवळील एका बॅगवर केसरीचा शिक्का सौ. ने बरोबर हेरला व मग आम्ही त्यांना "या, या, अंदमानला केसरीबरोबर ना? " म्हणून आमच्या गोटात ओढले. लगेच नावगाव विचारणा झाली. त्यांचे नाव ऐकल्यावर लगेच त्या नावाच्या औरंगाबादमधील परिचितांची आठवण सौ. ला झाली व तिने तसे म्हटल्यावर ते त्यांच्यापैकीच एक निघाले त्यांचीही परिस्थिती थेट आमच्यासारखीच झाली होती. त्या औरंगाबादहून प्रथम पुण्यास आल्या व तेथून के. के. च्याच गाडीने मुंबईस यायचे ठरवून प्रथम त्यांनी ११ च्याच टॅक्सीने यायचे ठरवले होते पण नंतर के. के. च्या कचेरीतील बाईनेच त्यांना गेट बंद होऊन विमानात प्रवेश न मिळण्याची धमकी दिल्यामुळे त्यांनीही ११ ची टॅक्सी रद्द करून १० ची मुक्रर केली होती आणि त्यांनाही टॅक्सीचालकाने टर्मिनल A पासून बऱ्याच दूर उतरवले होते नाहीतर खरे तर त्यांची टॅक्सी थेट टर्मिनल A च्या ३ नंबरच्या गेटपाशी येऊ शकली असती. आम्ही जरा जवळ उतरल्यामुळे चालत आलो होतो व दूर उतरविल्यामुळे त्यांना तेथून रिक्षाने तेथपर्यंत यावे लागले होते एवढाच काय तो फरक.

इतके परिस्थितीसाधर्म्य व शिवाय औरंगाबादचे एकमेकांचे परिचित सारखे निघाल्यामुळे आमचा समसमा संयोग सहल संपेपर्यंत चांगलाच टिकणार असे वाटत होते पण त्या दोघीतील एक स्त्री बरीच दमल्यासारखी दिसत होती आणि सुरवातीस थोडॅफार बोलल्यावर तिला धाप लागल्यासारखे झाले. त्यामुळे आमच्या स्वयंसिद्ध डॉक्टर सौ. ला स्फुरण चढून तिने आपल्याजवळील औषधे बाहेर काढण्याची तयारी दाखवली पण त्यांच्याकडेही औषधाचा साठा होता पण आवश्यक असेल तरच औषध घेऊ असे त्यानी ठरवल्याचे तिच्या कानावर घातल्यावर त्यांना पाणी देऊन थोडेफार बरे वाटावे यासाठी तिने प्रयत्न केला. मी अश्या परिस्थितीत घराबाहेर पडलो असतो की नाही व केसरीकडे भरलेली रक्कम व आपला जीव यातील कोणाचे पारडे अधिक जड झाले असते याविषयी विचार करू लागलो. त्यांचाही तोच विचार चालू असावा. कारण त्यांच्या त्याना डॉक्टरांनी जायला हरकत नाही असे सांगितले म्हणूनच त्या आल्या होत्या असे त्यांच्या बोलण्यावरून दिसले.

केसरीचे आणखीही काही प्रवासी येऊ लागले. चेन्नईचे पण आमया अगोदरचे उड्डाण असलेली मंडळी प्रवेशद्वारावर गर्दी करू लागली त्यामुळे वेळ सहजच भरभर जाऊ लागला. अचानक केसरीचा प्रतिनिधी प्रवीण येऊन आम्हाला पुकारू लागला. सर्वजणांचे एकच विमानप्रवासाचे तिकिट होते व त्याची एक एक प्रत त्याने सर्वांना दिली त्याचबरोबर आपले ओळखपत्र बरोबर ठेवण्याची सूचनाही दिली. यावेळी त्यासाठी निवडणूक ओळखपत्र आम्हाला आणण्यास सांगितले होते. आता आमच्याकडे किंवा प्रत्येकच भारतीय नागरिकाकडे ओळखपत्रांचा अगदी सुळसुळाटच झाला आहे. त्यातील काही भारतीय नागरिक नसलेल्यांपाशीही असतात त्यामुळे इतकी ओळखपत्रे असून त्यातील खरेच कोणते चालणार याविषयी मनात शंका असतेच.

विमानाच्या प्रवासात व पुढेही आम्हाला लागणाऱ्या वस्तूंचे भले थोरले पॅकेज प्रवीणने आणले होते त्यात अंदमानमध्ये अचानक केव्हांही पाऊस पडत असल्यामुळे प्रत्येकास स्वतंत्र रेनकोट व केसरी कॅप याचबरोबर विमानप्रवासात खाण्यासाठी व पुढेही अंदमानमध्ये बसच्या प्रवासात खाण्यास उपयोगी सुका मेवा वगैरे वस्तूंचे प्रत्येकी एक पाकीट त्याने सर्वांना देऊन कोण आले आहेत याची नोंद घेतली. केसरीच्या प्रतिनिधीच्या दरडावणीस भीक न घालता माझी बहीण व मेव्हणे अजून आले नव्हते. पण त्यांच्या वस्तू आमच्या ताब्यात देऊन तो मोकळा झाला. शिवाय त्या दोन स्त्रियांची जबाबदारी त्याने आमच्यावर सोपवली. तोपर्यंत आमच्या ५-५० च्या उड्डाणाच्या प्रवाश्यांना आत सोडण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे आत जाऊन डावीकडे वळा व तेथे बोर्डिंग पासेस मिळतील व तेथून पुढे सिक्युरिटी मधून कसे जायचे ते दिसेलच असे म्हणून त्याने आम्हाला निरोप दिला कारण त्याला आत जाण्याची मुभा नव्हती.

आमचे तिकीट व ओळखपत्र दाखवून आत प्रवेश केला व डावीकडे गो एअर चे सामानाची पडताळणी करून बोर्डिंग पास देण्याचे चार कौंटर्स होते. आम्ही आमच्या ताब्यात दिलेल्या दोन सहप्रवासिनींच्या बरोबर एका पुढे उभे राहिलो. आमच्या सामानात त्याना काही अयोग्य न वाटल्याने त्यावर गो एअरची लेबले लावून ते त्यांनी आत जाऊ दिले व आम्हाला 21 E,F क्रमांकाचे बोर्डिंग पासेस मिळाले. तोवर आमच्या बहिणाबाई व त्यांचे यजमान आत आले व एका टेबलासमोर उभे राहिले.

आमच्यापैकी सर्वांना म्हणजे आम्ही चौघे व दोन सहप्रवासिनी यांना बोर्डिंग पासेस मिळाल्यावर सर्व जण सुरक्षा चाळणीतून जाण्यासाठी उभे राहिलो मागील अनुभवावरून मी बेल्ट, बूट वगैरे काढण्याच्या खटपटीत असताना सुरक्षा चाचणी कर्मचाऱ्यांनी तसे करण्याची जरुरी नाही असे सांगितल्यामुळे माझी मेहनत वाया गेली आणि त्या गोंधळात मोबाइल मात्र खिशातच राहिला, तो अंगझडती घेताना सुरक्षासेवकाच्या लक्षात आला व मग तो मला सुरक्षाचाचणी पट्ट्यावर ठेवून यावे लागले. त्यानंतर मग सगळे आत जाऊन आमच्या द्वार क्र. १५ समोर दाखल झालो व तेथे उपलब्ध असणाऱ्या खुर्च्यांवर बसलो.

आमच्या आजारी सहप्रवासिनीची अवस्था जरा अधिक बिघडल्यासारखी वाटली. त्यांची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळे आम्ही त्यांना बरे वाटण्यासाठी आम्हाला माहीत असलेले जमतील ते उपाय करू लागलो. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे व त्यांचे अंग गार पडत आहे असा शोध सौ. ने लावला. त्या आता बोलण्याच्याही स्थितीत दिसत नव्हत्या. त्यांच्या बरोबरीच्या मैत्रिणीने त्याना बरे वाटते का असे विचारले. त्यांना आमच्या जवळील गोळ्या घेण्याची सुचना सौ. ने केली. अश्या परिस्थितीत केसरीच्या प्रतिनिधीनेच उपाययोजना करायला हवी असे मला वाटत असल्याने मी प्रवीणला फोन करून त्यांच्या परिस्थितीची कल्पना दिली. प्रवीणने "मी आत येऊ शकत नाही" असे सांगितल्यावर आता या आजारी बाईला आपण कसे काय पुढे नेणार असा विचार मला पडला.

तेवढ्यात १५ क्रमांकाचे द्वार उघडण्यात आले व आमच्या उड्डाणातील प्रवाश्यांना आत जाण्याची सूचना येऊ लागली व बरेच प्रवासी प्रवेशद्वारातून आत जाऊ लागले. तेथून गो एअरच्याच बसने विमानात जाऊन बसायचे होते. इकडे या बाईंची तब्येत जागेवरून उठण्याइतकीही ठीक दिसत नव्हती अशात त्या विमानात कश्या चढणार व पुढे अंदमानपर्यंत कश्या जाणार याचा घोर मला पडला. त्यामुळे मी प्रवीणला फोन करून काहीतरी व्यवस्था करा असे सांगितले. त्याने त्याला आत येता येत नसल्याने चाकखुर्ची पाठवतो व त्यामधून त्यांना आत न्या असे फोनवरूनच सांगितले. इकडे आमच्या उड्डाणात बसण्याची शेवटची घोषणा होऊ लागली व सगळ्यात अगोदर विमानतळावर आलेले आम्ही दोघे आणि आमच्यावर जबाबदारी सोपवलेल्या दोघी विमानतळावरच राहणार की काय असे मला वाटू लागले. त्या बाई त्याना "आत जाऊ शकाल का"विचारल्यावर जाईन असेच म्हणत होत्या (ते कश्याच्या बळावर म्हणत होत्या कोणास ठाऊक) आणि जागेवरून उठतही नव्हत्या. शेवटी प्रवेशद्वारावरील विमानकर्मचाऱ्याला परिस्थिती समजावून सांगितल्यावर तेथील डॉक्टरांना बोलावणे पाठवण्यात आले.. तेवढ्यात प्रवीणने पाठवलेला चाकखुर्चीवालाही दाखल झाला व डॉक्टरांनीही त्यांची परिस्थिती पाहून त्यानी जाऊ नये असा सल्ला दिला. व त्या चाकखुर्चीवरून त्यांनी बाहेर जाऊन प्रविणला गाठावे असे ठरले. विमानकर्मचाऱ्यांनी आम्हाला "आता तुम्ही जा त्यांच्याकडे आम्ही बघतो" (नाहीतर केसरीच्या फोनवरून दम देणाऱ्या कर्मचारिणीचा अंदाज खराच ठरला असता )असे सांगितल्यावर आम्ही गेटमधून बाहेर पडून बसमध्ये बसलो व ती बस विमानापर्यंत गेल्यावर विमानास लावलेल्या छोट्या शिडीवरून विमानात चढलो. आम्ही आत शिरताच विमानाची दारे बंद झाली व आमचे विमान ठीक ५-५० च्या ठोक्याला जागेवरून हालले. पण आमच्यावर ज्यांची जबाबदारी प्रवीणने टाकली होती त्यांना मात्र परतच जावे लागले थोडक्यात त्यांच्याबरोबर प्रवास करण्याचा आमचा किंवा आमच्याबरोबर प्रवास करण्याचा त्यांचा योग नव्हता हे निश्चित! व पैसे भरले म्हणजे गेल्यातच जमा हा माझा समजही खोटा ठरला.