काळे पाणी ---- २

      गो एअरने आमचा प्रवास सुरू झाला तेव्हां १२ नोव्हेंबर उजाडलाच होता व केसरीबरोबर आमचा पहिला दिवसही सुरू झाला.त्या विमानात जवळ जवळ सगळेच प्रवासी वेगवेगळ्या प्रवासी कंपन्यांतर्फे किंवा स्वतंत्रपणेही अंदमानलाच चालले होते हे विशेष.चेन्नईला आमच्या विमानाचा एक थांबा होता .तो बहुतेक चेन्नईत उतरणाऱ्यांसाठी होता.
    विमानात खाद्यपदार्थ विकण्यासाठी ठेवले होते.विमानात चढण्यापूर्वी १५ व्या प्रवेशद्वारापाशी बसलो असताना  घरातून रात्री साडेनऊला निघाल्यापासून झोप न मिळाल्यामुळे   चहा घेण्याची बुद्धी झाली होती व त्यावेळी चहाचा एक कप ११० रु.त घेतल्यावर आता विमानातले दर तपासून पहाण्याची जरी इच्छा असली तरी तेवढे पैसे घालवण्याची नव्हती शिवाय "केसरी" ने अगदी आम्हाला अंदमानला पोचेपर्यंत खाऊनही पुरून उरतील इतके खाद्यपदार्थ बरोबर दिलेले होते.(त्यातले काही खरोखरच आम्ही पुण्यास परत आल्यावरच संपवले.)त्यामुळे विमानातील खाद्यसेवेचा लाभ घेण्याचे कारण पडले नाही.विमानात आणखीही काही वस्तू विकतात असे दिसले त्याविषयी माहितीपत्रक आमच्या समोरील बैठकीच्या पाठीमागील पिशवीत ठेवले होते ते अर्थातच सौ.ने पाहिले असले तरी तिची खरेदीची हौस आता भागली होती व अंदमानलाही तिला तो आनंदाचा क्षण लाभणारच होता त्यामुळे तिने केवळ माहिती मिळण्यापुरताच त्याचा लाभ घेतला.त्यामुळे विमान सुंदरींना फक्त सुरवातीस सुरक्षा व्यवस्थेची माहिती मागे चालू असलेल्या ध्वनिफितीच्या तालावर हातवारे करून देणे हेच काय ते काम होते.ते मात्र त्यांना एकदा इंग्लिश एकदा हिंदीत व असे एकदा मुंबईच्या विमानतळावर व नंतर चेन्नईच्या विमानतळावर असे चार वेळा करावे लागले.या कामासाठी रामदास पाध्ये यांच्या बाहुल्या वापरायला हरकत नाही असे वाटून गेले.अर्थात या सक्तीच्या व्यायामामुळे हवाई सुंदरींचा बांधा सडपातळ रहायला मदत होत असेल असेही वाटून गेले. शिवाय मग हवाई सुंदरींनी तरी करायचे तरी काय ?
      मुंबई चेन्नई प्रवास दीड तासाचा व  चेन्नई पोर्टब्लेअर जवळ जवळ तेवढाच असल्याने आम्ही साडॅदहाला पोर्टब्लेअरच्या विमानतळावर होतो.सकाळचे जवळ जवळ ११ वाजले होते व तपमान ३० अंश सें.किंवा अधिकच
असावे.हवा ढगाळ होती.येथे केव्हांही पाऊस पडू शकतो आणखी तोही अगदी रपारप,पण
तसा पडून गेल्यावर मात्र रस्त्यावरील पाणी सोडले तर पाऊस पडला असेल असे
वाटतही नाही.तो विमानतळ फारच लहान आहे . तेथे बंगाली लिपीचा वापर करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव त्या विमानतळास दिलेले दिसले. आमचे सामान बाहेर आणण्यासाठी लावलेले पट्टे सुद्धा अगदी छोटे होते.आणि तसे दोन पट्टे होते.त्यावरून आमचे सामान यायला सुरवातच व्हायला बराच वेळ लागला व दोन पैकी कोणत्याही बेल्टवर सामान येऊ शकत असल्याने दोन्हीकडे लक्ष ठेवावे लागत होते.
       मी आपला ढकलगाडी ताब्यात घेऊन सामान त्यावर लादण्याची वाट पहात बसलो कारण आपल्या बॅगा ओळखण्याचे काम मी करू शकेन यावर सौ.चा विश्वास नव्हता.माझा तर मुळीच नव्हता पण दोन पट्ट्यांमुळे एकी कडे मलाच लक्ष देणे भाग होते.सुदैवाने दोन्ही बॅगा एकाच पट्ट्यावर येताना तिने हेरले व आमच्या भगिनी व मेहुणे यांचेही सामान  त्यांच्या टप्प्यात आले व आता सामानासह आम्ही विमानतळाबाहेर पडलो. आमचे केसरीचे प्रतिनिधी नाबरही तेथे  उपस्थित होतेच त्यांनी सामान ताब्यात
घेऊन बाहेर येण्यास सांगितले.आता आम्ही पूर्णपणे "केसरी"च्या ताब्यात
होतो.आम्हाला एका ए.सी.बसमध्ये बसायला सांगून नाबर यांनी आमचे सामान दुसऱ्या गाडीतून आमच्या पहिल्या मुक्कामाच्या होटेलमध्ये म्हणजे होटेल सी प्रिन्सेस मध्ये नेले.आम्हाला मिळालेली बस वातानुकूलित होती.व प्रथम आम्ही आत चढल्यावर मिळेल त्या आसनावर बसलो
        सर्वात वृद्ध गृहस्थ श्री. प्रधान व त्यांचे नावही किशोरच होते त्यामुळे किशोर व शोभा प्रधान या जोडप्यापैकी ते एक होते की काय असे यादीवरून मला वाटले पण ते वेगळेच होते व बेळगांवहून आले होते.त्यांनी केसरीबरोबरच बऱ्याच सहली केल्यामुळे ताबदतोब हक्क गाजवायला सुरवात करून आपल्याला पुढचीच बैठक पाहिजे असे जाहीर केले त्यावर नाबर यांनी त्यांची समजूत काढत त्याना पुढील बैठक मिळेल असे सांगितले व आमची बस होटेल सी.प्रिन्सेसच्या दिशेने निघाली.
सी प्रिन्सेस होटेल
        निसर्गरमणीय वंडूर समुद्रकिनाऱ्यावर म्हणजे एकमजली खोल्यांच्या अनेक रांगा विशिष्ट पद्धतीने रचना केलेल्या असे आहे.प्रथम आम्हाला ज्या खोल्यांचे क्रमांक सांगण्यात आले ते आम्ही चुकून भलतेच ऐकल्यामुळे मार्गदर्शकामागे बऱ्याच पायऱ्या चढत वर गेल्यावर आमच्या खोल्या वरच्या पातळीवरील D 7 व D8 नसून बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेने खालच्या पातळीवरील C7 व C8 आहेत असे कळल्यावर सगळ्या पायऱ्या उतरून त्या दिशेने गेलो.प्रथमच हा व्यायाम घडल्यावर जरी दु:ख झाले तरी आता परत परत हा चढ उतार करावा लागणार नाही याचा आनंदही झाला. प्रवेशद्वारापाशी बुद्धाची मूर्ती होती व तशी सर्वच होटेलमध्ये असते असे कळले.त्याचे कारण कळले नाही.आमच्या खोल्यापर्यंत जायला बरेच अंतर चालावे लागले व वाटेत एक जलतरण तलावही होता.त्यातील पाणी पाहून एकदा त्यात पोहण्याचा बेतही मी केला अर्थात सहलीच्या भरगच्च कार्यक्रमात पोहणे फक्त रात्रीच शक्य होते हे नंतर लक्षात आले व त्यासाठी खास एकदा आठवडाभर या बीच रिसोर्टमध्येच रहायला यावे लागेल म्हणजे थोडक्यात पोहणे जमणार नाहीच असे ध्यानात आले.
    येथील गुर्जन आणि पडुक लाकडाच्या वैपुल्यामुळे हॉटेलच्या रचनेत लाकडाचा मुक्त वापर केलेला दिसतो.अगदी जुन्या पद्धतीचे कड्या कुलुपांचे वापर केलेले दिसले.म्हणजे दाराला एक लोखंडी कडे व चौकटीला तसेच दुसरे कडे व या दोन्हीना जोडणारे भलेमोठे कुलूप व तशीच भली मोठी किल्ली त्यामुळे ती खिशात बाळगणे कठीणच.तसे चोरीचे भय नव्हते.खोलीच्या रचनेत लाकडाचा मुक्त वापर असल्याने.हवा उष्ण असली तरी त्यामुळे खोली फार तापत नाही,तरी वातानुकूलित असून पंखाही होता.गरम व थंड पाण्याचे शॉवरसह स्नानगृह होतेच.त्यामुळे खोलीत प्रवेश केल्यावर प्रथम स्वच्छ स्नान केले.रात्रभर जागरण झाल्यामुळे जरा तरतरी आली.हवा परत ढगाळ झाली व पाऊस येतो की काय असे वाटू लागले.आमच्या वास्तव्यात मधून मधून जोरदार पाऊस कोसळत होता पण सुदैवाने त्यावेळी आम्ही उघड्यावर नसायचो
       आमच्या खोलीपासून परत बरेच अंतर चालून भोजनगृहाकडे आलो.भोजनगृहाची रचनाही वर छप्पर व बाजूने अर्धवट उंचीच्या लाकडी भिंती,त्यामुळे जेवताना बाहेरील दृष्य दिसायचे.बाहेर हिरवागार निसर्ग सदैव डोळ्यांना सुखावत होता त्याचबरोबर आत भोजनाचा वासही तितकाच सुखावह होता.भोजनात अनेक पदार्थ होते त्यात शाकाहारी व सामिष दोन्हींचा समावेश होता.शाकाहारी जनतेसाठी त्या दिवशी पुरणपोळी बरोबरच गुलाबजांबचाही बेत होता.बऱ्याच लोकांना इतर कोठल्याही कार्यक्रमापेक्षा हाच कार्यक्रम अधिक आनंददायक वाटत असावा. होटेलचा कर्मचारी वर्ग अतिशय सुस्वभावी व नम्र.सर्वच होटेलमध्ये हाच अनुभव आला.
     जेवणाचा महत्वाचा कार्यक्रम झाल्यावर दुपारच्या कार्यक्रमाची सूचना देण्यात आली त्यानुसार आज सेल्युलर जेल पहाणे एवढाच कार्यक्रम होता.पोर्ट ब्लेअर भारताच्या अगदी पूर्वेकडे असल्यामुळे उजाडते खूपच लवकर आणि सूर्यास्तही तसाच लवकर म्हणजे संध्याकाळी पाच वाजताच.त्यामुळे ३ वा.निघालो व ४ वा.सेल्युलर जेलपाशी पोचलो तरी तसा वेळ कमीच होता आणि तेवढ्याच वेळात सर्व पाहून लाइट व साउंड शो पहाणे म्हणजे फारच घाई झाली . त्यामुळे    म्यूझियम धावतपळत पाहिले.