काळे पाणी ---- ४

          स्वातंत्र्यवीर सावरकरांना मुद्दाम कडेची कोठडी देऊन त्यास दोन्हीकडे कोखंडी जाळीचे दरवाजे होते.

  स्वातंत्र्यवीरांची कोठडी

सेल्युलर जेल कक्षाचा व्हरांडा

         संग्रहालयास धावती भेट दिल्यावर प्रत्यक्ष सेल्युलर जेलमधील सर्व इतिहासाचा प्रत्यक्ष साक्षी असलेले  पिंपळाचे झाड, फाशी देण्याची जागा,प्रत्यक्ष राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केलेला तुरुंगाचा उर्वरित भाग व स्वा.वी.सावरकर यांची कोठी हे सर्व धावतपळतच पहावे लागले.कारण ध्वनी प्रकाश कार्यक्रमापूर्वी सर्वांना बाहेर काढून तिकिटे पाहून नंतरच आत सोडतात.
     ध्वनी प्रकाश कार्यक्रमात प्रथम प्रकाश इतिहासाचा साक्षी असणाऱ्या अश्वत्थ वृक्षावरच केंद्रित करतात व स.मनोहरसिंह,ओम पुरी,मसीरुद्दिन शहा व जलाल आघा यांच्या आवाजात या वास्तूचा इतिहास कथन केला जातो.सुरवातीस सरफरोशीकी तमन्ना अब हमारे दिलमे है या गीताच्या पंक्ती ,काही ऐतिहासिक व पौराणिक माहिती सांगण्यात आली .प्रकाशयोजनेत ऐतिहासिक पंपळाचे झाड,हिरवळ,तीन मजल्याचा स्वातंत्र्यवीर सावरकार यांना ठेवण्यात आलेला कक्ष,अमानुष शिक्षेच्या प्रकारांचे पुतळे ,फाशी कोठी अश्या भागांवर प्रकाश टाकून बंदीवासाचे व बंदिवानांनी दिलेल्या लढ्याचे वर्णन प्रभावी भाषेत करण्यात आले.  बंदीवानांना रहाणे कष्टप्रद व्हावे म्हणून शक्यतेवढे प्रयत्न केले जात होते.बारी नावाचा तुरुंगप्रमुख बढाईने म्हणत असे,"हे पहा या तुरुंगात दोन देव आहेत .एक वरचा आणि एक येथील आणि तो देव म्हणजे मी स्वत: मला खूष ठेवाल तरच तुमची धडगत आहे. खाण्यापिण्याचे हाल अगदी पुसता सोय नाही असे असत."सकाळी कांजी नावाचे पेय देण्यात येत असे त्याठी नारळाच्या अर्ध्या करवंटीपासून केलेले ओगराळे वापरण्यात येत असे आणि त्यात मीठ नसल्यामुळे चवीचा लवलेशही नसे.चिमूटभर मीठ दिवसभरासाठी प्रत्येक कैद्यास देण्यात येई व ते दिवसभर पुरवावे लागे त्यामुळे जेवणात्तील भाजीसाठी ते वापरावे लागे आणि चवहीन कांजी ज्याला ते "गांजी" म्हणत तशीच प्यावी लागे.अन्न ठेवण्यासाठी लोखंडी कटोरा तर पाण्यासाठी मातीचे भांडे.त्यामुळे अन्न उरले तर ते खराब होत असे तर पाणी गळून जात असे.व या गोष्टी ठराविक वेळीच आणि ठराविक प्रमाणातच मिळत.मलमूत्र विसर्जनासाठी ठराविक वेळीच कैद्यांना सोडण्यात येई त्यामुळे त्यांना मलमूत्र रोखून धरावे लागे.रात्रभर त्यासाठी त्यांना एक मातीचे भांडे देण्यात येई व त्याचा दुर्गंध सहन करावा लागे.या हाल अपेष्टांचा उल्लेख सावरकरांनीच केलेला आहे.
    अगदी अपुरे आणि सत्वहीन अन्न देऊन या बंदीवानांकडून काथ्या कुटणे,घाणा चालवणे अशी श्रमाची कामे करून घेतली जात व त्यात कामाचे दैनंदिन प्रमाण ठरवलेले असे.उदा घाणा फिरवून दिवसात काही लिटर लाढावेच लागे व ते न निघाल्यास वेगळी शिक्षा होत असे.