षड्विकार अन् षट्भावांनी पुरता पिडलो आहे!

गझल
वृत्त: समजाती-अष्टावर्तनी –लवंगलता-मात्रावृत्त
मात्रा: ८+८+८+४=२८मात्रा
***************************************************
प्रेरणा: कविवर्य मनोज गोडबोले
***************************************************
(एका पश्चात्तापदग्ध, व्यसनासक्त, हतबल आत्म्याचा हृदयद्रावक करूण आक्रोश)
************************************************************

षड्विकार अन् षट्भावांनी पुरता पिडलो आहे!
नजरेमधुनी माझ्याही मी अता उतरलो आहे!!

आरशातल्या मलाच मजला आता बघवत नाही......
कटाक्षांमुळे प्रत्येकाच्या पुरा सडकलो आहे!

सद्गुण गेले दूर.....विवश मी उपभोगांनी झालो!
एक आसुरी आनंदाचा धनी जाहलो आहे!!

कुठे पंढरीची वारी अन् गुत्त्यामधल्या फेऱ्या......
गटारगंगेलाच तीर्थ मी म्हणू लागलो आहे!

कुठे अग्निहोत्राची आहे पवित्रता अन् कोठे......
धूम्रपान अव्याहत माझे, ज्यातच बुडलो आहे!

हात राबणे दूर....सारखा तांबुल मळतो आहे!
देहामध्ये आजारांना जमवत बसलो आहे!!

आयुष्याच्या पारावरती बरळत बसलो आहे!
मूढ असोनी मला वाटते...पंडित बनलो आहे!!

व्यसनांनी अन् पापांनी उध्वस्त जाहलो आहे!
रौरवनरकामधे जायला सज्ज जाहलो आहे!!

-------प्रा. सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१