यज्ञोपवितं परमपवित्रं ।

   ( केवळ विनोद म्हणूनच या लेखाकडे पाहावे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा यात हेतू नाही )
       वयाच्या आठव्या वर्षी माझी मुंज करण्यात आली व माझ्या गळ्यात यज्ञोपवीत म्हणजे जानवे अडकवण्यात आले. त्यावेळीही केवळ मुंज झाल्याचा पुरावा म्हणूनच जानवे घालणे आवश्यक आहे असा माझा समज झाला, गुरुजींनी कदाचित मला समजावून सांगितलेही  असेल पण मला आजूबाजूच्या गोंधळात ऐकू आले नसावे किंवा कदाचित ते काम  माझ्या वडिलांनी करावे असे त्यांचे मत असण्याचीही शक्यता होती. नंतर वडिलांनाही त्यासाठी वेळ मिळाला नाही. किंवा याला सांगून काय उपयोग असेही त्याना वारले असावे शिवाय  ते जाणून घेण्याची उत्सुकता  मीही  दाखवली नाही त्यामुळे ते राहूनच गेले असावे. माझ्या जानवे धारण करण्याविषयी तेही फारसे दक्ष होते अशातला भाग नाही. मुंजीनंतर काही दिवस गुरुजी संध्येची संथा देण्यास येत होते व तेवढाच काळ काय ती मी संध्या केली व म्हटली असेल. त्यानंतर त्यानी कधी मला संध्या केलीस का असे विचारले नाही किंवा माझ्या शर्टाच्या आत जानवे आहे की नाही याची खात्रीही  करून घेतली नाही. श्रावण महिन्यात मीच जानव्याविषयी दक्ष असे कारण बरेच दिवस  आमच्या परिचितांच्या घरी मला शनिवारचा मुंजा म्हणून निमंत्रण असे व त्यावेळी मिळणाऱ्या मिष्टान्न भोजनामध्ये मुख्यत्वे मला रस असल्यामुळे त्यासाठी आपण मुंजा मुलगा असण्याचा पुरावा म्हणून जानवे सुरक्षित ठेवण्याची  काळजी मी घेत असे.
       बरेच वेळा गावातील तलावात पोहताना जानवे निसटून गेल्याचे समजत नसे. जानवे परत धारण करताना माझी पंचायत होत असे कारण जानवेजोड विकत मिळे व त्यातील एकच जानवे काढून घालण्यासाठी प्रयत्न केल्यावर बऱ्याच वेळा त्याचा गुंता होई व तो सोडवणे हे ब्रह्मगाठ सोडवण्यापेक्षाही मला अवघड वाटे. खरे तर ते जानवे हातात धरून गायत्री मंत्र म्हणून नंतर ते घालणे आवश्यक असे पण इतके विधीपूर्वक घालण्यामध्ये इअतर अनेक महत्त्वाचे उद्योग करण्यात गुंतल्यामुळे  मला जमत नसे व त्याकडे कोणाचे लक्षही नसे. त्याच काळात "सुदाम्याचे पोहे"मधील कोल्हटकरांच्या जानवे, कद व श्रावणी या विषयावरील विनोदी लेखात सर्वच प्रकाराची घेतलेली हजेरी वाचून आधीच फार सश्रद्ध नसणाऱ्या माझ्या मनातील जानव्याविषयीची आपुलकी जवळ जवळ नाहीशीच झाली.
       मुंज झाल्याचा पुरावा याव्यतिरिक्त जानव्याचा उपयोग म्हणता येईल अशी एक गोष्ट मला आढळली ती म्हणजे पाठीवर जेथपर्यंत हात पोचत नसेल अश्या जागी खाज सुटली  तर जानवे योग्य तऱ्हेने पाठीवर फिरवल्यास तो कार्यभाग साधता येतो. पुढे वसतीगृहात स्वतंत्र रहायला लागल्यावर आपल्या खोलीची किल्ली हरवू नये म्हणून जानव्याला व्यवस्थित अडकवणे हा एक चांगला   म्हणता येईल असा उपयोग करण्यास शिकलो. याशिवाय जानव्याचा वापर कसा चतुराईने करता येतो याविषयी माझ्या लहानपणी कीर्तनकारांच्या निरूपणात सांगितल्या जाणाऱ्या एका गोष्टीत ऐकल्याचे मला आठवते.
     या गोष्टीत एक अतिशय देवभक्त फौजदार असतो. कदाचित प्लॅंचेटप्रमाणे देवपूजा हाही उपाय गुन्हेगार शोधून काढण्यात उपयोगी पडत असेल. तसे प्लॅंचेटच्या वापराविषयी डॉ. विजय भटकर यांनीही अगदी अमेरिकेतही या गोष्टीचा वापर गुन्हेअन्वेषणासाठी करतात असा हवाला दिल्यावर भारतीय पोलिसदलाचे मनोधर्य निश्चितच उंचावले असणार. असो तर या देवभक्त फौजदाराचा असा नियम होता की पूजा करताना बोलायचे नाही. तो पूजा करत असताना एका गुन्हेगाराला घेऊन काही पोलीस त्यांच्याकडे आले व याला काय शिक्षा करायची ते विचारू लागले. खरे तर त्यांनी असे विचारणे हा फौजदाराचा किंवा त्याही पेक्षा त्या गुन्हेगाराचा गौरव होता. कालाय तस्मै नमः । आता फौजदारसाहेब तर पूजा करत आहेत व त्यांना बोलायचे नाही शिवाय ते अतिशय कर्तव्यतत्पर त्यामुळे आपल्यासमोर आलेल्या बाबीचा निकाल तर ताबडतोब लावायलाच हवा ही वृत्ती अंगी बाणलेली. बऱ्याच खाणाखुणा करूनही पोलिसांच्या डोक्यात प्रकाश पडेना तेव्हां संतापलेल्या फौजदारसाहेबांनी ताम्हणात स्नान घालून शूचिर्भूत झालेल्या लंगड्या बाळकृष्णाची मूर्ती एका हाताने उचलली , दुसऱ्या हाताने गळ्यातील जानव्याचे वेढे त्या मूर्तीच्या पायाला दिले व एका हातात ते जानवे पकडून दुसऱ्या हाताने आचमनासाठी ठेवलेली पळी उचलून त्या मूर्तीच्या पाठीवर पळीचे फटके दिले तेव्हां कोठे शिपायांच्या लक्षात आले की त्या गुन्हेगाराला उलटा टांगून फटके द्या. असो जानव्याचा हाही एक उपयोग म्हणता येईल. " सुदाम्याचे पोहे " मध्ये कोल्हटकरांनी उल्लेखलेला जानव्याचा उपयोग असाच विनोदी आहे.
     सध्या चालू असलेल्या  महिन्यात श्रावणी करताना व इतरही धार्मिक समरंभासाठी वापरावयास लागणाऱ्या सोवळे व जानवे या वस्तूंविषयी लिहिताना कोल्हटकरांनी एक विनोदी षटकार मारला आहे.
   सुदाम्याला ( सुदामा हा या पुस्तकाचा नायक) कद म्हणजे सोवळे हे रेशमी वस्त्र असते व रेशमी धाग्यातून विद्युतप्रवाह वाहतो या वैज्ञानिक सत्याची माहिती झाल्यावर ते वस्त्र धारण करताना बाहेर वीज कडाडली ( कारण श्रावणात पावसाळा असल्याने ही शक्यता असतेच) तर कदाचित आपल्या रेशमी वस्त्रात शिरून आपल्याला भस्मसात करेल अशी भीती वाटते पण  उंच इमारतीवर जसे विद्युन्निरोधक बसवून इमारतीच्या तळाशी एक तांब्याची तार जमिनीत पुरतात याच तत्त्वाचा  अतिशय चलाख उपयोग करून सुदामा या भीतीतून मुक्त होतो. त्यासाठी  आपल्या जानव्यास अडकवलेल्या किल्लीच्या टोकास तांब्याची तार लावून ती जमिनीला टेकेल अशा पद्धतीने पूजेस अगर श्रावणी वगैरे धार्मिक समारंभास बसण्याची दक्षता तो घेतो म्हणजे यदाकदाचित रेशमी वस्त्राच्या आकर्षणाने वीज अंगावर कोसळलीच तर या तांब्याच्या तारेतून ती जमिनीत निघून जाईल.     
    लघू अथवा दीर्घशंकेस जाताना मात्र जानवे कानावर अडकवण्याचा सल्ला किंवा तसा नियमच मला सांगण्यात आल होता. या पद्धतीचा फायदा या दोन कृती करताना होतो असे कोठेतरी वाचायला मिळाले. आणि भारतीय परंपरेत वैज्ञानिक दृष्टिकोणही कसा अंतर्भूत आहे याचे दर्शन घडले. कदाचित जानव्याची लांबी जास्त असल्यास त्याचा अयोग्य जागी स्पर्श घडून ते  अपवित्र होऊ नये अशीही दृष्टी त्यामागे असावी असे मला वाटले.
      कॉलेजशिक्षणासाठी घर सोडल्यावर जानवेही कधीतरी निसटून गेल्यावर पुन्हा धारण करण्याच्या भानगडीत मी पडलो नाही. त्यानंतर मग कारणपरत्वे म्हणजे स्वतःच्या लग्नात व त्यानंतर सत्यनारायणासारख्या धार्मिक प्रसंगात सव्य अपसव्य करता यावे म्हणून मी त्या त्या वेळी जानवे धारण करीत असे.
     अलीकडे अश्याच कारणाने म्हणजे नातवांच्या मुंजीत एका नातवास मांडीवर घ्यावे लागल्यामुळे त्याला जानवे घालताना आपल्या गळ्यातही हवे म्हणून जानवे धारण केले व त्यानंतर काही दिवसांनी मला एका छोट्या शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागले. त्यासाठी छातीचा एक्स रे काढणे आवश्यक होते म्हणून मी नजिकच्या अश्या प्रकारच्या चाचणी केंद्रात गेलो असता तेथील कर्मचाऱ्याने शर्ट काढून उभे राहण्यास सांगितले. क्षकिरण उपकरणापुढे उभा राहिल्यावर एकदम त्याला लक्षात आले की माझ्या गळ्यात जानवे आहे तेही त्याने उतरवावयास सांगितले. खरे तर त्यामुळे काही बिघडले नसते पण  कदाचित त्यात किल्ली अडकवण्याचा जानव्याचा उपयोग त्यालाही माहीत असावा म्हणून त्याने ही खबरदारी घेतली असावी त्याचा कशाला हिरमोड करा म्हणून मी ही ते उतरवून ज्या खुंटाळ्यास शर्ट अडकवला होता त्याचशेजारी  अडकवले.
        क्षकिरण छायाचित्र काढून झाल्यावर नेहमीप्रमाणे शर्ट घातला पण जानवे मात्र तेथेच राहिले. (हेही नेहमीप्रमाणेच). छायाचित्र  लगेचच मिळाले व ते घेऊन मी घरी आल्यावर थोड्याच वेळात केंद्रातील स्वागतिकेचा फोन आला, मी तपासणीकेंद्रात माझी माहिती देताना केवळ औपचारिकता पुरी करणे या हेतूने माझा भ्रमणध्वनी क्रमांक दिला होता त्याचा इतका लगेचच वापर होईल असे वाटले नव्हते. स्वागतिकेने मधुर स्वरात सांगितले, " सर, तुमचे जानवे येथे राहिले आहे " घरी आल्यावर खरे तर लगेचच ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती आणि आता राहिले तर राहूदे असा विचार मी करत होतो. पण आता फोन आल्यावर मात्र माझी जानव्याविषयीची भूमिका तिला सांगून तिला दुखवणे माझ्या जिवावर आले म्हणून संध्याकाळी येऊन घेऊन जातो असे मी उत्तर दिले. खरे तर संध्याकाळी तेवढ्यासाठी परत जाणे माझ्या जिवावर आले होते तरीही पावित्र्यविडंबनाचा माझ्यावर आरोप होण्याचा धोका  टाळण्यासाठी मी परत केंद्रावर गेलो. मी आत शिरताच स्वागतिकेने  माझी अतिशय मौल्यवान वस्तू केंद्रात राहिली असावी अश्या पद्धतीने "तुमचे जानवे त्याच खोलीत खुंटाळ्यालाच आहे" असे सांगितले व मी वर जात असताना, "आज पौर्णिमा आहे त्यामुळे आजोबांना जानवे बदलायचे असेल "असे दुसऱ्या स्वागतिकेशी बोलताना ऐकले व तेवढ्यासाठी परत आलो याचे सार्थक झाले असे वाटले.