फिर्याद

बाजार काजव्यांचा आबाद होत आहे
किरणांस सूर्य हल्ली मोताद होत आहे


दो-चार वंचनांची का खंत बाळगावी
आयुष्य हे असेही बरबाद होत आहे


बेकार कोरले मी ते नाव या कपाळी
आता ललाटरेषा जल्लाद होत आहे


फर्मावले तियेने, याला चिणून मारा
एकेक वीट चढते, प्रासाद होत आहे


दारावरून गेला माझा जरी जनाज़ा
उच्छाद मांडल्याची फिर्याद होत आहे


अर्ध्यावरून उठणे, शोभे, मिलिंद, का हे
अद्याप मैफलीचा इर्शाद होत आहे