संदर्भांची उणीव - लोकसत्तातील मराठी भाषाविषयक लेख

१ मार्च, २०१५ च्या लोकसत्तातील लोकरंग पुरवणीमध्ये प्रकाशित झालेला डॉ. द.दि. पुंडेंचा 'मराठी.. राष्ट्रीय संवेदन भाषा' हा लेख नुकताच वाचनात आला. लेखाचा दुवा - दुवा क्र. १=1

लेख वाचल्यावर सर्वाधिक जाणवलेली गोष्ट म्हणजे संदर्भांची उणीव. लेखामध्ये अनेक विधाने आहेत. मात्र, एक मराठी हस्तलिखितांच्या संग्रहांच्या कॅटलॉगाबद्दलचा संदर्भ सोडला तर लेखामशील बहुतांश विधानांसाठी संदर्भ दिलेला नाही. लेखातील विधाने लेखकाने वा इतर अभ्यासक/भाषातज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासांतून सिद्ध झालेले निष्कर्ष आहेत की सदर लेखाच्या लेखकाची स्वतःची मते आहेत हे संदर्भांशिवाय कसे समजावे?

उदाहरणार्थ, लेखातील ही विधाने पाहा -

१. ..शिवाय भाषातज्ज्ञांचा विश्वास बसू नये असे एक भाग्य भारतातील फक्त मराठी या भाषेस लाभलेले आहे. ते भाग्य म्हणजे एका फार मोठय़ा कालखंडभर मराठी ही संपूर्ण भारताची संपर्क-भाषा होती.

-- लेखातील हे विधान हे लेखकाचे स्वतःचे मत की संशोधनान्ती सिद्ध झालेला निष्कर्ष?

२. ...चारधाम यात्रा अगदी प्राचीन काळापासून प्रचलित आहे. जगद्गुरू श्रीशंकराचार्यानी या चारी ठिकाणी धर्मपीठे स्थापन केली. तेथील देवदेवतांची पूजाअर्चा व्यवस्थित केली जावी म्हणून एक प्रशासन थाटून दिले. आपण जर नीट चौकशी केली तर आपल्याला असे आढळून येईल की, श्रीशंकराचार्यानी या चारच्या चारही पीठांवर मुख्य पुजारी म्हणून महाराष्ट्रातील कोल्हापूरकडच्या देशस्थ ब्राह्मणांची योजना केली होती. कारण बद्रिनाथ-बद्रिकेदार, द्वारका, पुरी आणि रामेश्वर या हिंदुस्थानच्या दक्षिणोत्तर आणि पूर्व-पश्चिम टोकांना असणाऱ्या या प्राचीनतम पवित्र स्थानी संपूर्ण हिंदुस्थानमधील विविध प्रांतांतील विविध भाषा बोलणारे भाविक लोक येणार! त्यांना कोणती भाषा समजू शकेल? तर राष्ट्रभर संपर्क-भाषा म्हणून प्रचलित असलेले मराठी भाषेचे 'प्राकृत' हे नाव धारण करून असलेले तिचे पूर्वरूपच.

-- आपण ही नीट चौकशी नेमकी कुठे/कोणाकडे करायची?

३.संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांच्या व्याकरणाचे व्यासंगी विद्वान कै. डॉ. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी, ऋग्वेदामध्ये मराठी क्रियापदे आढळतात, हे सप्रमाण सिद्ध करणारा एक शोधलेखच लिहिला होता. याचा अर्थ ऋग्वेद-संहिता जितकी प्राचीन; तितकीच मराठी भाषाही प्राचीन असाच होतो. याचा आणखीही एक अर्थ असा होतो, की मराठी ही केवळ 'दिण्णले- गहिले' (म्हणजे 'दिले-घेतले') म्हणणाऱ्या रांगडय़ा लोकांची भाषा नाही, तर ती तत्त्वज्ञानात्मक ऊहापोह करणाऱ्या चिंतनशील समूहाचीही भाषा आहे.

-- डॉ. अर्जुनवाडकरांच्या नेमक्या कोणत्या शोधनिबंधामध्ये ऋग्वेदातील मराठी क्रियापदांसंबंधीची सिद्धता आहे? त्याचा अर्थ मराठी (प्राकृत) भाषा ऋग्वेद-संहितेएवढी प्राचीन असणे आणि ती चिंतनशील समूहाची भाषा असणे हा अर्थ काढणारी विधाने ही डॉ. अर्जुनवाडकरांची की सदर लेखाच्या लेखकाची, हे कसे समजावे?

वैचारिक लेख लिहिताना त्यातील विधानांच्या पुष्ट्यर्थ दाखले देण्याची गरज असते. वृत्तपत्र, मासिके वगैरेंनी वैचारिक लेख स्वीकारताना त्यात संदर्भांचे उल्लेख असणे, संदर्भयादी असणे अनिवार्य करायला हवे असे सुचवावेसे वाटते.