सत्यशोधन

प्रत्येक माणूस आयुष्यात सत्यशोधनाचं कामच करीत असतो. आपापल्या वकुबानुसार (म्हणजे क्षमतेनुसार). आपल्याला वाटतं तो जगतोय. पण त्याची साध्या साध्या कृतींमधून तीच धडपड दिसते. निसर्गाने सत्याला सगळ्या आयुष्यातच इतकं बेमालूमपणे गुंडाळून ठेवलेय की आवरणं कितीही नाहीशी करण्याचा प्रयत्न केला तरी अगदी आतमधेही सूक्ष्मातीसूक्ष्म आवरणच सापडतं. किंवा एखादा जर अतीच जिज्ञासू असला तर आत काहीच नाही असं दिसत . एखाद्या फुलाची पाकळी न पाकळी काढली तर काय राहतं ? काहीच नाही. फार तर हाताला लागलेला सुगंध तोही काही क्षणांनी नष्टच होतो.म्हणजे समोर अनाकलनीय भिंत उभी राहते. मग सगळं आयुष्य धडपडीने का जगायचं हा प्रश्न उभा राहतो. गंमत वाटते म्हणून ? , सुखदुःख वाटतात म्हणून ? आकर्षणापोटी ? की आणखिन काही ? अशा प्रश्नाने सामान्य जिज्ञासू शोध सोडून देतो. मग तो आयुष्याला परमेश्वरी खेळ, माया निर्गुणता , निराकारिता असा शिक्कामोर्तब करुन पळ काढतो. ही झाली सामान्य मर्यादित बुद्धिमत्ता असलेल्या माणसाची गोष्ट. परंतू दुसरेही विचार असतीलच की , जे वेगळा दृष्टिकोन दाखवतील.परंतू सचेतन अचेतन सृष्टीशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न केला तर गूढ समजता क्षणीच माणूस नाश पावतो. कारण कळत नाही. अगदी सायनाइड विषाची चव लिहीणं अजून कोणालाही जमलं नाही , तसंच सत्य सांगायला माणूस जिवंतच राहत नसावा.संत या सगळ्याला अपवाद आहेत. म्हणूनच आपला जन्म जर सामान्य संसारी म्हणून झाला असेल , तर जिज्ञासेची तहान आपल्या अंतापर्यंत ताणण्याची गरज नाही असं मला वाटतं. संत किंवा आदर्श व ते होण्याचा तर प्रयत्नच करु नये. कारण अंतिम सत्य सापडलंय हे सांगणार कसं आणि कुणाला ?   सर्वात सोपं म्हणजे आहे ते आयुष्य स्वीकारुन व यश मिळवून  सुखी  होण्याचा प्रयत्न करणं हेच श्रेयस्कर.