चारचाकी वाहनांतले प्रवास (आठवणींतले) - ३

ख्रिसमसला गोव्याला जाण्यासाठी ख्रिस्टोबरोबर आमचा अजून एक सहकारी विभाकरही येणार होता. विभाकर पांडेय हे एक रंजक प्रकरण होते. ख्रिस्टो नि मी साधारण समवयस्क (ख्रिस्टो माझ्याहून दोनेक वर्षांनी लहान). विभाकर माझ्याहून सुमारे पंधरा वर्षांनी मोठा.

माझ्यासारखीच अनेक क्षेत्रे बदलत - त्यात 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये दिलीप पाडगांवकरांच्या चमूमध्ये उपसंपादक हेही एक होते - तो अखेर ख्रिस्टो नि माझ्याबरोबर काम करीत होता.

मूळचा बिहारचा, पण शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठ नि पुणे विद्यापीठ, नंतर नोकरी आणि फ्री-लान्सिंग दिल्लीत, आणि आता परत पुणे. याचे वडील संस्कृतचे राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले प्राध्यापक होते.

विभाकरशी मैत्री जुळण्याची जी अनेक कारणे होती त्यात 'ग्लासमेट' आणि 'अग्निहोत्री' ही केवळ अनेकांतली दोन कारणे होती. त्याचे वाचन निवडक पण प्रगल्भ होते. त्याचा मूळ विषय तत्वज्ञान (पीएचडी). त्यामुळे कुठल्याही गोष्टीची वैचारिक मांडणी तत्वशुद्ध रीतीने करण्याचे त्याचे कसब उल्लेखनीय होते. त्याला चालण्याची व्यसन म्हणावे इतपत आवड होती.

इतकी की, पुण्यात आमचे कामाचे ठिकाण होते डेक्कन जिमखान्यावर आणि विभाकर रहायचा कोंढव्याला साळुंखे विहारमध्ये. सकाळी डबा घेऊन वेळेवर हजर व्हायचे म्हणजे चालणे होत नाही म्हणून तो येताना रिक्षाने येई आणि जाताना चालत जाई.

खाण्याच्या बाबतीतही तो चोखंदळ होता. फक्त एका बाबतीत तो चोखंदळपणा कल्पनातीत अतिरेकी होई - त्याला पुणेरी ब्राह्मणी जेवण अत्यंत प्रिय होते, विशेषतः लग्नातले! अळूची पातळ भाजी, मसालेभात आणि काकडीची दह्यातली कोशिंबीर एवढ्यासाठी तो चुलत-चुलत-चुलत ओळखीच्या लग्नामध्येही बिनदिक्कत घुसे.

गोवा हाही त्याचा एक जिव्हाळ्याचा विषय. त्याच्या पंचविशी-तिशीत तो 'बॅकपॅकर'च्या भूमिकेत महिनाभर गोवा जगला होता. आता पन्नाशीला आला तरी त्याचा उत्साह तेवढाच होता. आणि गाडीतून जायचे म्हणजे रिझर्वेशन वगैरेचीही झंझट नाही म्हणून तो खूष होता.

एव्हाना मी एक सेकंड हॅंड मारुती ८०० खरीदली होती. पण ती पुण्यातल्या पुण्यात वापरायला ठीक होती.

हे मत केवळ त्याआधी झेन वापरल्याने प्रगटले होते. कारण नंतर ती मारुती ८०० घेऊन मी गोवा नव्हे पण रत्नागिरी (एकदा), कोल्हापूर (तीनदा) नि मुंबई (तीनदा) अशा खेपा अगदी आरामात केल्या होत्या.

पण तेव्हां झेनची झिंग होती.

गॅरेजवाल्याला विचारले, त्याने एक आठवड्यासाठी तीच झेन देण्याचे कबूल केले. सामानसुमान बांधून निघालो.

यावेळी ताम्हिणी घाटातून जायचे ठरवले होते. हाफ डे करून दुपारी निघालो. पौडपर्यंतचा चिंचोळा एकेरी रस्ता ठाऊक होता, कारण त्याआधी दहाबारा वर्षांपूर्वी एक डॉक्टर मित्र तिथे हॉस्पिटल सुरू करून स्थायिक झाला होता. पुढला रस्ताही एकेरी नि चिंचोळाच होता. त्यावरुन एस्टीची वाहतूक सुरू झाली होती. एका वळणावर माणगांव-पुणे एस्टीने असे काही अंगावर येऊन दाखवले की थरकाप झाला. अख्खी गाडी साईडस्ट्रिपमध्ये उतरवून जीव वाचवला. झेनचा पिटुकला आकार (त्या डिझाईनला ऑटो इंडस्ट्रीत 'जेलीबीन' असे लाडाचे नाव होते) कामी आला.

पण पुणे जिल्हा संपून रायगड जिल्ह्याची हद्द लागली मात्र... रस्त्याने एकदम कात टाकली. विमानतळाचा रनवे भासावा असा दुहेरी रस्ता, वळणांवर पुरेशा मोठ्या साईडपट्ट्या...

तेव्हां घाटपायथ्याची विळे इंडस्ट्रिअल इस्टेट सुरू झालेली नव्हती, फक्त प्लॉटिंग नि बांधकाम चालू होते.

बिअरपानामध्ये ख्रिस्टो जरी लिंबूटिंबू असला तरी विभाकर बरोबरीचा खेळाडू होता.

या प्रवासवर्णनांमध्ये (आणि एकंदरीतच लिखाणामध्ये) मद्यपान ऊर्फ दारू ढोसणे याची वर्णने जर कुणाला खटकत असतील तर त्यांच्यासाठी खुलासा. एकतर हे सर्व लिखाण शक्य तितके 'जसे घडले तसे' मोडमध्ये आहे. त्यातले काय झाकावे नि काय नाही हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य निवेदनकर्त्याला आहे असे मी मानतो.

आणि त्या काळात (आणि तदनंतर) मी आणि/वा इतर पात्रे 'डाय हार्ड विथ अ व्हेंजेअन्स' चित्रपटातल्या जॉन मॅक्लेन (ब्रूस विलिस) च्या भाषेत "वन स्टेप शाय ऑफ बिकमिंग अ फुल ब्लोन अल्कोहोलिक" या अवस्थेला पोहोचलो होतो असे कुणाला वाटले तर तेही खरे आहे. इक्बाल ती 'स्टेप' ओलांडून तीन वर्षांपूर्वी आयुष्यातून मुक्त झाला. कॉलेजातला सहाध्यायी प्रशांत गेल्या वर्षी मुक्त झाला. कॉलेजातला एक कसबेकर शिष्य पंधरा वर्षांपूर्वी. गिनती करायला बसलो तर दोन्ही हातांची बोटे पुरणार नाहीत. सत्तरी ओलांडलेला विभाकर गेली दहाएक वर्षे 'रिहॅब'च्या आतबाहेर करतो आहे.

असो.

माणगांवला मुंबई-गोवा महामार्गाला लागलो. तिथपासून ते थेट तळकोंकणापर्यंत एक अडचण सतत आडवी येत राहिली - सिक्स सीटर ऊर्फ डुक्कर रिक्षा. एस्टीवर अवलंबून असलेल्या कोंकणवासियांनी या नवीन प्रवासव्यवस्थेला जोरदार लोकाश्रय दिल्याचे दिसत होते. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीही होत होती.

अडचण अशासाठी की मुंबई-गोवा महामार्ग तेव्हां एकरस्ती होता - मध्ये डिव्हायडर नसलेला. आणि रस्त्याची रुंदी सगळी मिळून अडीच लेन एवढीच होती. आणि कोंकणातले रस्ते म्हणजे शेदोनशे मीटरपेक्षा सरळ पट्टा मिळण्याची मारामार. त्यामुळे पुढे जर सिक्स सीटर आली तर ओव्हरटेक करणे हे दरवेळेस किरकोळीत होईलच असे नव्हते.

पण लोणेरे ओलांडल्यावर एक वेगळाच अडथळा आला - एक कुत्रे. तोवर गाडी पाचव्या गिअरला पोहोचली होती. त्यातून अचानक खाली येऊन चौथा नि तिसऱ्या गिअरला यावे लागले. मी एक कचकचीत शिवी दिली जी ऐकून ख्रिस्टो नि विभाकरला हसू आवरेना. प्रतिक्षिप्त क्रियेने उच्चारली गेलेली ती शिवी होती 'सन ऑफ अ बिच'.

या प्रवासाच्या वर्षभर आधी मी स्कूटरने गोवा खेप केली होती. त्यावेळी वरंध घाटातून उतरलो होतो. नि मुक्कामाला राजापूरला थांबलो होतो. यावेळीही राजापूरला थांबावे असा बेत होता. स्कूटरखेपेवेळी सरकारी विश्रामगृह उपलब्ध नव्हते. यावेळेस होते.

इथल्या खोल्याही ऐसपैस होत्या. आणि आम्हांला मिळालेली खोली पंचकोनी वा षट्कोनी होती एवढे आठवते. चौकोनी नक्की नव्हती. त्यामुळे सतत काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी लौकर निघायचा बेत होता. पण विभाकर 'मॉर्निंग पर्सन' नव्हता. त्याला हल्या हल्या करून बाहेर काढण्यात सात वाजले. तसे गोव्याला पोहोचायला तीनचार तास पुरे होते.

वाटेत कणकवलीजवळ विभाकरला तळकोंकणाची खासियत खाऊ घातली - काळ्या वाटाण्याचा रस्सा नि पुऱ्या. बनपाव ही तडजोड. या पुऱ्या आकाराने अगदी लहान असतात, जेमतेम एका घासाच्या. आणि जाड कणकेच्या असल्याने कडक नि तांबड्यालाल. रस्सा बाकी झणझणीत होता.

पात्रादेवी स्टॉप घेऊन ख्रिस्टोच्या घरी वास्कोला दुपारच्या जेवणाला पोहोचलो. रात्री कार्व्हालो कुटुंब चर्चमध्ये ख्रिसमस सर्व्हिसला जाणार होते. ते परतल्यावर मध्यरात्रीनंतर ख्रिस्टो, विभाकर नि मी बाहेर पडायचे ठरवले.

मंडळी परतेपर्यंत रात्रीचा दीड वाजून गेला होता. ती बोलूनचालून 'मिडनाईट सर्व्हिस'च होती. मग आम्ही कोलवा बीचला जायला निघालो.

मी त्याच्या दशकभर आधी मेटॅडोरने आलो होतो तेव्हां कोलवा बीचवर दोन रात्री राहिलो होतो. दशकभरानंतर बघताना कोलवा बीचचे बाजारीकरण नजरेत भरत होते. ख्रिसमस नाईट रंगात आली होती. सुमारे दोनशे चारचाक्यांनी वाहनतळ भरला होता. स्पीकर्समधून संतानाची 'कोरासॉन एस्पिनाडो', 'ब्लॅक मॅजिक वुमन', 'इव्हिल वेज' ही जुनी आणि नुकतीच आलेली 'मारिया मारिया', 'मिग्रा', 'प्रिमावेरा' ही नवी गाणी गुंजत होती. त्याकाळी मला बरीचशी पाठ होती.

त्या गलबलाटापेक्षा दुसरीकडे कुठे जाऊ म्हणून निघालो. पहाटेच्या तीन वाजता कुठून नि कुठे गेलो हे आठवत नाही. या स्मरणशक्तीऱ्हासात मॅक्डॉवेल रमचाही सहभाग होता. अंधुक आठवते त्याप्रमाणे कोलव्याच्या उत्तरेला आरोसी-वेल्सांव या भागात कुठेतरी किनाऱ्यालगत एका मोठ्या मांडवात पार्टी चालू होते. पेड पार्टी अर्थात. पन्नासेकजणांचा घोळका होता. दहापंधराजण नाचत होते.

गोव्यातला तो ख्रिसमस बहुधा संपूर्ण संताना प्रायोजित होता. कारण इथेही तीच गाणी वाजत होती.

विभाकरला नाचायची लहर आली. मी नि ख्रिस्टोने नकार दिला. त्यातला ख्रिस्टोचा नकार ठाम होता. विभाकरने मला खेचलेच.

महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय (त्यातही ब्राह्मणी) संस्कृतीत 'नाचणे' या कृतीला स्थान नाही. फार झाले तर दहीहंडीच्या आधीचा 'गोविंदा'. पण तोही मुख्यत्वेकरून बहुजनसमाजाच्या तरुणांनीच भरलेला. सरळ आहे. 'प्रागतिक' विचारवंतांनी ब्राह्मणांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या पावणेतीन टक्के अशी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ती आहे नऊ-दहा टक्के. पण अगदी दहा टक्के म्हटले तरी बहुजनसमाजाचे प्राबल्य असणे साहजिक आहे.

मी त्याआधी गोविंदा नाचलो होतो. पण तेव्हां पोटात दारू नव्हती नि कानांवर संताना नव्हता. आठवणी धूसर आहेत, पण तेव्हां झालेली एक जाणीव अजूनही स्पष्ट आहे - मला नाचण्याचे अंग नाही.

सूर्य उगवल्यावर घरी परतलो नि तिपारपर्यंत झोपून राहिलो. उठलो तर डोके दगडाचे होते की लाकडाचे समजत नव्हते. ख्रिस्टो उठून त्याच्या मित्रांकडे गेला होता. तसेही आदल्या रात्री त्याचे पिणे हे 'आचमन' श्रेणीतलेच होते.

अवांतर - खानदेशात (तेव्हा तरी) धर्मांतरित ख्रिश्चनांच्या वेगळ्या कॉलन्या असत. त्यांचा देव म्हणजे लाकडी क्रूस. ती मुले शाळेत आम्हांला "तुमचा देव दगडाचा, आमचा देव लाकडाचा; तुमचा देव पाण्यात बुडतो, आमचा देव बुडत नाही" असे चिडवीत. मग काही काळाने आम्ही "तुमचा देव जळून राख होतो, आमचा देव जळत नाही" असे उत्तर द्यायला लागलो नि ते घोषणायुद्ध विझले.

शेवटी मी नि विभाकर बाहेर पडलो. मार्मागोवा पोर्ट ट्रस्टच्या कुठल्यातरी कार्यालयाच्या (गेस्ट हाऊस की हायस्कूल की अजून काही आठवत नाही) जवळ पायऱ्या उतरून खाली गेल्यावर एक अतिछोटा बीच होता. दोनेकशे मीटर लांबीचा. आम्ही उतरून तिथे गेलो. बीचवर एक मोठासा रबरी बॉल बेवारस पडलेला होता. तो घेऊन आम्ही अर्धा-पाऊण तास कॅच-कॅच खेळून घाम काढला. डोके ठणकायला लागले. पण आहे ही जाणीव तरी झाली.

दुसऱ्या दिवशी निघायचे होते. तोवर करंजळें प्रकरण हाताबाहेर गेले होते. त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्न नव्हता.

म्हणून मुद्दाम वाट वाकडी करून करंजळेंपर्यंत गेलो. फक्त आत न शिरता मिरामार बीचवर बसून एकेक बिअर पिण्यावर भागवले.

यावेळी परत मुक्कामासाठी खेडचे गेस्ट हाऊस गाठले. पण ते भरलेले होते. ख्रिसमसच्या सुट्यांनिमीत्त सरकारी अधिकारी बहुधा कामाला बाहेर पडले असावेत. मग एका बऱ्याशा लॉजमध्ये रात्रीपुरते विसावलो.

परतताना ताम्हिणीमधूनच वर चढायचे असे ठरवले होते. विभाकरला चारचाकी चालवण्याचे अंग नव्हते नि नाही. त्यामुळे तो 'नॅव्हिगेटर' आणि 'ड्रिंक/स्मोक सप्लायर' ही भूमिका पार पाडीत होता.

येताना ताम्हिणी उतरल्यावर 'निजामपूर' हे गांव लागले होते. रायगडाच्या टकमकटोकापासून जवळ एक छत्री-निजामपूर नावाचे गांव असल्याची ऐतिहासिक माहिती होती. कथा/मिथक असे की एकदा शिवाजीमहाराज टकमक टोकाजवळ गेले असताना सोसाट्याचा वारा छत्रात भरून त्यांच्या मागे छत्र धरून उभा असलेला सेवक हवेत उडाला. प्रसंगावधान राखून त्याने छत्र घट्ट धरून ठेवले. आणि त्या छत्राचा पॅराशूटसारखा उपयोग करून तो निजामपूरला खाली उतरला. म्हणून त्या गांवाचे नांव छत्री-निजामपूर.

मी डोक्यात घेतले की जाताना रायगडाहून जावे. पाचाडहून थेट छत्री-निजामपूरला रस्ता असेलच. म्हणजे महाडपासूनच आत होता येईल, पुढे लोणेरे-माणगांव करण्याची गरज नाही. त्याप्रमाणे पाचाडला पोहोचलो. दोन गोष्टी समजल्या.

एक म्हणजे गर्दी जबरदस्त होती. तेव्हां रोपवे सुरू झालेला होता. ख्रिसमस/वर्षअखेर ही सुटी. या योगामुळे तिथे झुंबड उडालेली होती.

दुसरी म्हणजे पाचाड ते छत्री-निजामपूर रस्ता (तेव्हा तरी) फार तर बैलगाडीचा होता. बऱ्याचदा ती पायवाटच होते असे पाचाडच्या लोकांचे म्हणणे पडले. मुकाट मागे फिरलो.

परतताना 'पॉवर/एअर ब्रेक' म्हणजे काय याचेही एक प्रशिक्षण होऊन गेले. झाले असे, की एका मोठ्याशा उतारावर मी गाडी बंद करून न्यूट्रलवर जाण्याचा इंधनबचतीचा प्रयोग केला. दुचाकीवर ही नेहमीची गोष्ट होती. माझ्या मारुती ८०० चालवतानाही मी हे करून पाहिले होते. तिला पॉवर ब्रेक नव्हते.

झेनला 'पॉवर ब्रेक' होते. सोप्या भाषेत, गाडीचे इंजिन चालू नसेल तर ब्रेक दाबलाच जात नाही / लागत नाही. हे माहीत नसल्याने एका वळणावर गणपतीबाप्पा मोरया होण्याचे वेळ आली होती. सुदैवाने समोरून कुणी येत नव्हते म्हणून धोकादायकरीत्या ते वळण मारून इंजिन चालू केले. मग ब्रेक अत्यंत मुलायमपणे वागू लागला.

अवांतर - पॉवर स्टिअरिंगचेही तसेच नि तेच होते. झेनला फक्त पॉवर ब्रेकच होते. पॉवर स्टिअरिंगही असते तर ऑर्थोपेडिक सर्जनची चंगळ झाली असती. सध्याच्या बहुतेक सगळ्या चारचाक्यांना पॉवर स्टिअरिंग नि ब्रेक 'बाय डिफॉल्ट'च असतात. त्यामुळे न्यूट्रल करून इंजिन बंद करून उतारावर घरंगळत जाण्याची गंमत अनुभवण्यापासून सगळे मुकलेले आहेत.

ताम्हिणीचा घाट चढेस्तोवर दुपार होत आली होती. सगळा शीण एकदम दाटून आल्यासारखे झाले नि पौडातच डॉक्टर मित्राकडे थांबून दोन तास डुलकी मारून जावे असा मोह झाला.

पण डॉक्टर मित्र नेमका सहकुटुंब पुण्याला गेला होता. त्याचे 'हॉस्पिटल' अगदीच दोनचार खाटांचे होते. नि डॉक्टरांचा मित्र असल्याचे सांगत येणाऱ्या कुणाला तिथे दोन तास झोपू देणे हे तिथल्या केअरटेकरला कल्पनातीत वाटले असते हे त्याच्या देहबोलीतूनच कळाले.

जांभया आवरत निघालो नि जेवणवेळ उलटता उलटता पुण्यात पोहोचलो.

त्यानंतर मोठे प्रवास म्हणजे गोव्याला दोनदा. त्यात एकदा मी, पत्नी, एक मित्र, त्याची पत्नी आणि त्यांच्या दोन मुली इतके सगळे. गाडी होती मारुती बलेनो (जुनी, सेडन क्लास; नवीन हॅचबॅक नव्हे). आणि दुसऱ्यांदा माझ्या एस-क्रॉसमधून मी नि एक मित्र दोघेच. पण ते दोन्ही प्रवास तसे सरधोपट होते.

बाकी कोल्हापूर/सांगली आठदहा वेळेस, रत्नागिरी साताठ वेळा नि नाशिक तीनचारदा. पण तेही तसे सरधोपटच.

त्यामुळे 'चारचाकी वाहनांतले प्रवास - आठवणीतले' हे प्रकरण इथेच संपते.