चारचाकी वाहनांतले प्रवास (आठवणींतले) - २

पेपर टॅक्सी च्या कोल्हापूर खेपा नि मेटॅडोरमधली गोवा खेप झाल्यावर आठनऊ वर्षे चारचाकी गाडी चालवत लांबचा प्रवास असा झाला नाही.

नाही म्हणायला लघुचित्रपटांचे क्षेत्र सोडण्याआधी शेवटच्या एका कामासाठी (कंटेम्पररी मास्टर्स ऑफ इंडियन आर्किटेक्चर) पुणे-अहमदाबाद-पुणे असा प्रवास केला. पण ती सुमो चालवण्यासाठी माझ्यासोबत अजून दोनजण होते. त्यामुळे मी त्यात बराचसा राखीव खेळाडूच होतो. भर उन्हाळ्यात आम्ही पुणे-नाशिक-वणी-सापुतारा-सुरत मार्गे गेलो होतो. उन्हाळ्याची तल्खली तेवढी आठवते. सुमो एअर कंडिशन्ड नव्हती. आणि आम्ही सातजण अधिक सामान यासाठी जेमतेम पुरत होती.

मन सुमारे नऊ वर्षांनी एका दिवाळीत मी चारचाकी विकत घेण्याचा बेत आखला. सेकंड हॅंड गाडी घेण्याइतकी आर्थिक परिस्थिती ठीक झाली होती.

अवांतर - सेकंड हॅंडला पूर्वी मराठीत आडगिऱ्हाईकी म्हणत. ते अवमानास्पद वाटू लागल्याने सेकंड हॅंड शब्द प्रचलित झाला. सध्या सेकंड हॅंडलाही बाजूला सारून शब्द आलाय तो म्हणजे प्री-ओन्ड. गंमत म्हणजे नवीकोरी गाडी विकत घेणारा माणूसही कायद्याच्या भाषेत 'प्री-ओन्ड' गाडीच विकत घेत असतो!

त्यानुसार मी एक मारुती व्हॅन पसंत केली. चढा-उतरायला सोयीची. आणि मागे एकच सीट असल्याने सामान ठेवायला नि बसायला ऐसपैस.

पण तिची एकंदर अवस्था फार दयनीय होती हे लगेचच लक्षात आले. लगेचच म्हणजे गाडी घेतल्याघेतल्या मी ती ट्रायल रन साठी तळेगांवला घेऊन गेलो. परतताना पवनेच्या पुलाच्या आसपास मफलरपासून सायलेन्सर सुटला.

फडर्र आवाज करीत ती गाडी परत विक्रेत्याकडे नेऊन घातली आणि दुसरी बघायला सांगितली. दुसरी लगेच उपलब्ध नव्हती.

माझी चिडचीड झाली, कारण चारचाकीतून मला एक गोवा खेप करायची होती. आयुष्यातला एक गुंता चिघळला होता. तो जमले तर सोडवण्यासाठी आणि त्या गुंत्याशी संबंधित असे काही सामान गोव्याला पोहोचवण्यासाठी. सामान म्हणजे दोन मोठे बॉक्सेस होते. एकात पुस्तके नि दुसऱ्यात वैयक्तिक वस्तू.

मग त्या विक्रेत्याने मला आठवड्याभरासाठी एक गाडी मिळवून द्यायचे आश्वासन दिले. आणि पाळलेही.

ती पांढऱ्या रंगाची मारुती झेन होती. जुनी झेन. अतीबसकी. नंतर आलेल्या, वॅगन आर सारख्या उंच, झेन एस्टिलोशी नावाखेरीज काहीही संबंध नसलेली.

अजून एक म्हणजे तिला पाच गिअर होते. पाचवा गिअर ओव्हरड्राईव्ह. प्रात्यक्षिक भाषेत म्हणजे वेग साठसत्तरच्या पुढे गेल्यावर घालण्याचा गिअर.

एकटेच जायचे तर मी साथ शोधायला सुरुवात केली. इक्बाल बेग हा कलाकार मित्र उत्साहाने तयार झाला.

इक्बाल हा अत्यंत चांगल्या दर्जाचा कमर्शिअल आर्टिस्ट होता. कॅलिग्राफी (सुलेखन) हा त्याचा विशेष आवडीचा प्रकार. इक्बाल पुस्तक-मासिकांची कव्हर्स डिझाईन करून चरितार्थ चालवीत असे. अविवाहित होता.

पत्रकारनगरजवळ त्याचे निवासस्थान कम स्टुडिओ होता. हेवा वाटावा अशी ती जागा होती. एका प्रसिद्ध संस्थेच्या आवाराला लागून, पण स्वतंत्र. काळ्या दगडातले बांधकाम. दहा बाय वीसची एकच मोठी खोली. खोलीत टेलिफोन. खोलीतच एका भागात पोर्टेबल गॅस आणि स्वयंपाकाचे जुजबी सामान. संडास-बाथरूम बाहेरच्या बाजूला.

मीही त्या काळात परतून 'सडाफटिंग' स्टेटस गाठले होते. त्यामुळे बऱ्याचदा मी त्याच्याबरोबर रात्रीच्या मैफलीत शरीक होई.

इक्बालचा एक विशेष म्हणजे तो अत्यंत मितभाषी होता. तेही अत्यंत संथ आणि हळू बोलायचा. त्यामुळे त्याचे बोलणे आपोआप लक्ष देऊन ऐकले जायचे. त्याच्या हालचालीही अगदी निवांतपणे होत.

एकदा त्याचे अम्बिलिकल हर्नियाचे ऑपरेशन झाले. तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी हे ऑपरेशन जनरल ऍनेस्थेशिया देऊन करीत (आता स्पायनल ऍनेस्थेशिया देतात; माझे तीन वर्षांपूर्वी झाले). त्या भुलीतून तो हळूहळू बाहेर येत होता. त्यावेळचे त्याचे वाक्य "भूल ही रबरासारखी असते. एकदा इकडून ओढते, एकदा तिकडून ओढते" पूर्ण करण्यासाठी त्याने सुमारे चाळीस सेकंद घेतले होते. घड्याळ लावून म्हणून पहा म्हणजे त्याचा सुपर-डुपर-स्लो स्पीड लक्षात येईल!

पण तो अगदी आयडियल ग्लासमेट होता. गडबड नाही, दंगा नाही, आरडाओरडा नाही, भावुक अश्रुपात नाही. त्याला दारू आवडे. मग ती रम-व्हिस्की असो वा देशी दारू. अत्यंत धीम्या गतीने त्याचे मद्यपान चाले. इंग्रजीत 'नर्सिंग युअर ड्रिंक' असा एक वाक्प्रचार वापरला जातो. इक्बाल त्याचे जितेजागते उदाहरण होता.

कधी वेळ कमी असल्याने मी सटासट ढोसायला सुरुवात केली तर तो त्याच्या बोक्यासारख्या गुबगुबीत गालांमुळे मिचमिचे दिसणारे डोळे आणखी मिचमिचे करून नाखुषीने पहात बसे. एक क्वार्टर संपवायला त्याला कमीतकमी दोन तास लागत. त्याच्या मनाप्रमाणे प्यायला तर तीन तास. त्यामुळे पटापट पिणे ही त्याच्या दृष्टीने 'शराबकी तौहीन' होती. "मग पितोस कशाला? डॉक्टरकडे जाऊन एक इंजेक्शनच घे ना लावून दारूचं" असा त्याचा ठरलेला डायलॉग असे.

तेव्हा इक्बालकडे माधव शिंपी नावाचा त्याचा एक मित्र आलेला होता. त्यानेही यायला होकार दिला.

गाडीत तशीही तीनच माणसांना जागा होती. मागच्या निम्म्या सीटवर एक बॉक्स नि डिकीत दुसरा.

सकाळी सहाला निघू असे ठरले होते. मी तेव्हा बावधनला राहत होतो.

सकाळी सहाला हे दोघे उगवले नाहीत म्हणून मी इक्बालकडे फोन केला. त्याने उचलला आणि 'हॅलो' ऐवजी "हो निघतोच आहे" असा वीसेक सेकंद चालणारा आशिर्वाद दिला. मी चडफडत बसून राहिलो.

पण वीसेक मिनिटांत दोघे पोहोचले इक्बालच्या एम-८० वरून. मी नुसताच सिगरेटी फुकत घरातल्या घरात हिंडत होतो. ते दोन बॉक्स खूप जड होते, खाली न्यायला अजून मदत लागणार होती.

दहा मिनिटे त्यात खर्च झाल्यावर माझ्या बॅगा घ्यायला वर आलो तर मागोमाग इक्बाल नि माधवही शिरले. इक्बालने "जरा पाणी बघू बरं तुझ्या फ्रीजमध्ये असलं तर" असा एक मिनिटाचा दीर्घसंवाद म्हटला.

मी पाण्याची बाटली काढून दिली.

"आणि ग्लाससुद्धा लागतील बरं का" अर्ध्या मिनिटाचा संवाद.

मला कळेना. ग्लास दिला.

"अरे ग्लास लागतील म्हटलं, लागेल नाही म्हणालो. अजून लागतील" एक मिनिटाचा दीर्घसंवाद.

मी अजून ग्लास काढले.

इक्बालने त्याच्या झोळीतून रमची क्वार्टर काढली.

एकूण गोवा दौरा रेकॉर्डब्रेक होणार हे माहीत होते. पण गाडीला स्टार्टर बसण्याआधीच रेकॉर्ड्स तुटायला लागतील याची कल्पना नव्हती.

"निघायला जरा उशीर झाल्याने तू चिडणार. मग तुझ्या गाडी चालवण्यावर परिणाम होणार. मग कदाचित अपघात होणार. कदाचित आपण त्यात मरणार. मग काल रात्रीची उरलेली ही क्वार्टर वाया जाणार. त्यापेक्षा काय व्हायचे ते पिऊन होऊ दे."

इक्बालचा एवढा संवाद म्हणून होईस्तोवर माझा पेग संपलाही होता. इक्बाल नाखुषीने उठला. "तू म्हणजे ना, नेहमी घाईत असतोस. पिताना कसली एवढी घाई?" त्याचा संवाद होईस्तोवर गाडीत बसून आम्ही निघालो होतो.

ताज्या लोण्यातून धारदार सुरी चालवावी तशी झेन पळत होती. आवाज जवळपास शून्य.

कुठल्या घाटाने जायचे याचा मी विचार केला नव्हता. ताम्हिणी तेव्हा बराचसा झाला होता, पण मधले मधले टप्पे अगदीच त्रासदायक होते. बाकी कुठलाही घेतला तरी कात्रजचा घाट ओलांडायलाच लागणार होता. मग नंतरच बघू म्हणून गाडी हाणली.

कात्रजचा घाट उतरेपर्यंत सूर्य नीट उगवला होता. त्या काळी मोठ्या हमरस्त्यांलगत 'वाईन ऍंड बिअर शॉप' सुरू करण्याचे फॅड पसरले होते. एका ज्येष्ठ नेत्याने "वाईन म्हणजे दारू नव्हे" असे प्रबोधन केले होते नि सरकारने ते मान्य केले होते.

शिवापूरच्या पुढे कुठेतरी एक वाईन ऍंड बिअर शॉपचे किलकिले शटर माधवला दिसले. झाले. गाडी थांबवून दोन बिअर घेण्यात आल्या. चाखत माखत त्या पिताना मला आठवले की मी कधीच आंबेनळीच्या घाटाने गेलो नव्हतो. स्कूटरनेही नाही. मग चाक तिकडे वळवले.

आंबेनळीचा घाट केवळ आणि केवळ बिअरच्या जोरावर काढला. इतका कंटाळवाणा घाट दुसरा नाही. आणि वरंधा, आंबा वा कोयनानगरच्या घाटासारखे दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्यही दिसत नाही. शिवाय खाली उतरल्यावर हुश्श करेपर्यंत दहाएक किलोमीटरवर परत कशेडीचा घाट.

सुदैवाने गाडीत कॅसेट रेकॉर्डर होता. मी भीमसेन आणि वसंतराव यांचा फुल स्टॉक घेतला होता. इक्बाल नि माधवने बिअरचा स्टॉक फुल ठेवण्याकडे लक्ष दिले.

पाचव्या गिअरला गाडी तेल लावलेल्या काचेवरून गोटी घरंगळावी तशी घरंगळत होती. इंजिनचा नगण्य आवाज नि व्हायब्रेशन्स. बिअरने उल्हसित केलेल्या चित्तवृत्ती. वेगाचा अंदाजच येत नव्हता.

नातूनगरच्या आसपास सिगरेट पेटवून काडी बाहेर टाकायला इक्बालने हात बाहेर काढला नि हवेच्या झोताने तो फट्कन मागे जाऊन बी पिलरला आपटला. तेव्हा कळाले की गाडी जवळजवळ शंभरच्या वेगाने चालली आहे.

जात राहिलो.

संधिप्रकाशाने आम्हांला गाठले तेव्हा आम्ही मालवणला पोहोचलो होतो. बिअरचा एकूण आकडा डझनावर गेला होता.

एका साध्याशा हॉटेलात एक रूम घेऊन आधी आंघोळी केल्या.

"आता दारू प्यायला हरकत नाही" माधवला कंठ फुटला. एरवी तो इक्बालपेक्षाही मितभाषी.

मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर एका झोपडीवजा हॉटेलात आम्ही बरेचसे मासे आणि थोडीशी रम एवढ्यावर भागवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करण्यासाठी मालवण बाजारात गेलो. नुकतीच दुकाने उघडत होती. काळ्या वाटाण्याची उसळ नि बनपाव. आम्ही पहिलेच गिऱ्हाईक. उसळीचा खमंग वास सुटला होता. पण मालक कम वेटर आम्हांला खायला काही देईना. 'अजून वेळ आहे का? जरा हिंडून येऊ का?' असे विचारल्यावर त्याने 'तसां काय नाय हां' हे ज्या ठसक्यात म्हटले तो ठसका इक्बालला खूप आवडला.

नंतर इक्बाल केव्हां, कधी नि कुठे 'तसां काय नाय हां' म्हणेल याचा भरंवसा उरला नाही.

'सिंधुदुर्ग' बघण्याचा बूट निघाला. आमच्यापैकी कुणीच बघितला नव्हता. एक आऊटबोर्ड मोटर बसवलेले छोटेसे होडके मिळाले त्यातून सिंधुदुर्ग सफर केली हे चांगले झाले. दोन कारणांनी. एक म्हणजे तेव्हा दुबेळका माड जिवंत होता. नंतर वीज पडून तो भस्मसात झाला. दुसरे म्हणजे आम्ही सोडून कुणीच किल्ल्यावर नव्हते. आता तिथल्या 'टूरिस्ट' लोकांच्या गर्दीचे फोटो बघितले की धसका बसतो.

मालवणातून बाहेर पडताना धामापूरमार्गे रस्ता होता. धामापूरचे तळे हे अजून एक नितांतसुंदर ठिकाण अनुभवायला मिळाले.

अकराच्या सुमारास आम्ही बांदा ओलांडून पात्रादेवीला गोव्यात शिरलो. सरहद्दीला लागूनच रस्त्याच्या उजव्या हाताला एक बार आहे. तिथे थांबून फेणी प्यायची नि पुढे व्हायचे हे मी जेव्हाजेव्हा स्कूटरने गोव्याला गेलो तेव्हातेव्हा केले होते. आताही अपवाद केला नाही.

राहायचे कुठे हे काही ठरवले नव्हते. आधी एकदा मी बाणवली बीचवर एका नवीन हॉटेलात शार्लटबरोबर राहिलो होतो. तिथे रहावे असा साधारण बेत होता. पण तिथे पोहोचल्यावर खुणा ओळखीच्या दिसेनात. मग एक रिसॉर्टची पाटी बघितली. 'बीच फेसिंग कॉटेजेस' असा बोर्ड मिरवणारी. आमच्या बजेटात बसले. तिथे मुक्काम टाकला. दिवसभर बीच नि बिअर, रात्री फेणी नि फिश.

काळ तरंगत गेला. मग इक्बाल नि माधव बसने पुण्याला परत गेले.

मी बॉक्समधले सामान परत आणि वाटाघाटी करायला निघालो. मिरामार बीचजवळच्या करंजळें गावात जायचे होते.

बॉक्स परत केले पण वाटाघाटी निष्फळ ठरल्या. इतक्या, की थेट परत पुणे गाठावे असा एक विचार तीव्रपणे छळू लागला.

पण वास्कोला राहणाऱ्या ख्रिस्टो कार्व्हालो नावाच्या मित्राकडे जायचे कबूल केले होते. ख्रिस्टो माझ्यासोबत पुण्याला येणार होता. मुकाट त्याच्याकडे गेलो.

वास्को गावात मांगोर हिल भागात त्याचे घर होते. भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर दाबोळी विमानतळ एका उंचशा पठारावर आहे. त्याच्या उत्तरेला असणाऱ्या साधारण तितक्याच उंचीच्या पठारावर मांगोर हिल. मध्ये एक छोटीशी दरी. त्यामुळे दक्षिणेला विमानतळ नीट दिसे. गच्चीतून तरी.

ख्रिस्टोचे घर मजेशीर होते. मूळचे ते चार भाऊ. त्यातला ख्रिस्टो पुण्यात. उरलेल्यांतला एक आखाती देशांत. एक मंगलोरला. एक अपघातात निवर्तलेला.

ख्रिस्टोच्या आईवडिलांनी एका मजल्यावर दोन असे चार दोन बीएचके फ्लॅट्स बांधले होते. चार भावांना चार. त्यातल्या निवर्तलेल्या भावाच्या फ्लॅटमध्ये आईवडील राहत. ख्रिस्टो माझ्याबरोबर पुण्याला काम करी. तो येई तेव्हा त्याचा फ्लॅट वापरात येई. आखाती देशातला भाऊ येई तेव्हा त्याचा फ्लॅट वापरात येई. मंगलोरवाला भाऊ आला की त्याचा फ्लॅट वापरात येई.

आईवडील राहत त्या फ्लॅटचे किचन-डायनिंग हे कॉमन किचन-डायनिंग.

तेव्हा मंगलोरचा भाऊ कुटुंबासकट आला होता. आम्ही सगळे मिळून सहासात मोठी माणसे तेव्हा तिथे होतो. सकाळच्या खाण्यालाच दीडदोन डझन अंडी लागत. आणि दुपारसाठी मटन, पोर्क वा बीफ दोन किलो. त्यात पोर्क वा बीफ असले तर ख्रिस्टोची आई सकाळीच ते शिजायला लावी. निवांत पंधरावीस शिट्ट्या (पोर्क) वा वीसपंचवीस शिट्ट्या (बीफ) वाजत. मग शाकुती/काफ्रिआल/सॉर्पातेल/विंदालू जे असेल ते.

मूळ आमचा अंधुक बेत होता की एक मंगलोर खेप करावी. पण सुमारे नऊ तास एका दिशेच्या प्रवासाला लागणार म्हटल्यावर तो रद्द केला. त्या ऐवजी कारवारपर्यंत जाऊन येऊ असे ठरले.

कारवार म्हणजे वास्कोपासून सुमारे दोन तास. गोव्याचे दक्षिण टोक म्हणजे काणकोण. तिथून तर अर्धाच तास.

ख्रिस्टोची एक बालमैत्रीण, प्रिया, दंतवैद्य झालेली होती. तिलाही घेऊन जाऊ असे ठरले.

पुणे गोवा प्रवासातली बिअरची गंमत मला आवडली होती. ती परत करावी या विचारला ख्रिस्टोने पाठिंबा दिला. अर्थात त्याचा पाठिंबा मुख्यत्वेकरून नैतिक होता. एका बाटलीतले दीडदोन घोट तो घेई, बाकी मला.

प्रियाचे कौतुक वाटले. एक अनोळखी ड्रायव्हर, एक अर्ध-ओळखीचा बालमित्र, दोघेही बिअर ढोसताहेत. आणि ती निवांत बसून होती.

कारवारचा रस्ता सुंदर होता. उजवीकडे अधून मधून दिसणारा समुद्र, डावीकडे हिरवीगार डोंगररांग आणि काळा तुकतुकीत रस्ता. आणि बिन आवाजी रस्ता कापणारे झेनचे इंजिन. अक्षरशः कापसावर मुंगी मुतली तरी आवाज येईल इतकी शांतता.

कारवार स्टॅंडजवळ एक कामत रेस्टॉरंट दिसले. प्रिया शाकाहारी असल्याने तिथे मोर्चा वळवला. आणि धन्य झालो. अस्सल कारवारी शाकाहारी जेवण ज्यांनी अनुभवलेले नाही त्यांनी ते त्यांच्या बकेट लिस्ट मध्ये पहिल्या पाचांत नेऊन ठेवावे ही विनंती.

परत येताना काणकोणनंतर कोटीगांव वाईल्डलाईफ सॅंक्चुअरी उजव्या हाताला असल्याचा बोर्ड दिसला. वीसेक किमी अंतर होते. हातात वेळ होता. जाऊन बघू म्हणून गेलो.

ठिकाण ठीकठाक होते. पण वाईल्डलाईफ असे काही दिसले नाही. मुळात वन्य प्राणी असे काहीच दिसले नाहीत. चारपाच म्हशी दिसल्या, ते रानरेडे असल्यास माहीत नाही.

संध्याकाळी दिवस मावळता वास्कोला पोहोचलो. प्रियाचे वडील मार्मागोवा पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी करीत. त्यांच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये तिला सोडले नि घरी आलो.

त्या रात्री लक्ष्मीपूजन होते. सगळीकडून दिव्यांचा लखलखाट दिसत होता. मग ख्रिस्टोला आठवले, त्याच्या आखाती देशातल्या भावाने दोन डिस्ट्रेस फ्लेअर्स आणून ठेवले होते, गंमत म्हणून. आम्ही आमच्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करावे म्हणून ते उडवून पहायचे ठरवले.

रात्री दहाच्या सुमारास आम्ही सगळे गच्चीत जमलो. तोवर दिवाळीच्या दिव्यांचा नि फटाक्यांचा लखलखाट थांबला होता. मनुष्यवस्तीचे दिवे मिणमिणत होते. फ्लेअर साधारण उभट नळकांडीच्या आकाराचे होते. त्याच्या एका टोकातून एक जाडसर दोरी बाहेर आली होती. फ्लेअर उभे धरून ती दोरी खाली खेचून सोडायची असे काहीसे तंत्र होते. त्याप्रमाणे खेचून सोडले.

काय अनुभव होता!

शंभरेक मीटरवरती जाऊन ते फ्लेअर प्रकाशले. आणि पुढले तीसेक सेकंद मांगोर हिलच्या आसपासचा सुमारे एक किमी त्रिज्येच भूभाग लख्ख प्रकाशमान झाला. त्याकाळी गोवा विमानतळावर दिवसातून चारदोन फ्लाईट्सच येत. त्यामुळे 'सिक्युरिटी' कडक वगैरे नव्हती. नाहीतर विमानतळाच्या एवढ्या जवळ फ्लेअर उडवल्याबद्दल गहजब झाला असता.

परत पुण्याला निघायची वेळ झाली होती. करंजळेंमधल्या घडामोडींमुळे झालेला चित्तक्षोभ बराच उणावला होता. मग पाचर उपटणाऱ्या माकडाचा वंशज असल्याने परतीच्या वाटेवर करंजळेंमध्ये डोकावून जावे असा विचार सुचला.

तो प्रत्यक्षात आणला. त्या भेटीत दुपारचा एक वाजून गेला. अजून चित्तक्षोभाखेरीज हाती काही लागले नाही.

निघालो.

थेट पुणे गाठता येणार नाही, वा गाठण्याचा अट्टहास करू नये एवढे स्पष्ट होते. पण थांबायचे तर कुठे हे काही ठरवले नव्हते.

सरळ जात राहू आणि जिथे थांबावेसे वाटेल तिथे थांबू अशा विचाराने निघालो. पात्रादेवीचा फेणी स्टॉप चुकवला नाही.

रात्री आठच्या सुमारास चिपळूण गाठले होते. तिथे थांबण्याऐवजी खेडला जाऊ म्हणून निघालो. अर्ध्या-पाऊण तासात पोहोचलो.

सरकारी विश्रामगृहात राहण्याचा माझा अनुभव दांडगा होता. जर कुणी साहेबलोक आले नसतील तर तिथले रखवालदार योग्य ती रक्कम घेऊन तिथे राहू देतात. हट्ट केला तर पावतीही देतात.

मुळात कायद्याने कुणाही नागरिकाला तिथे राहण्याचा हक्क आहे. फक्त हा पाचव्या पायरीचा हक्क आहे. पहिली पायरी कामानिमित्त आलेले राज्य सरकारचे कर्मचारी. दुसरी पायरी कामानिमित्त आलेले केंद्र सरकारचे कर्मचारी. तिसरी पायरी सुटीवर असलेले राज्य सरकारचे कर्मचारी. चौथी पायरी सुटीवर असलेले केंद्र सरकारचे कर्मचारी. पाचवी पायरी इतर सर्व.

पण वरिष्ठ/अतिवरिष्ठ सरकारी अधिकारी आणि/वा मंत्री यांचे अधिकृत दौरे नसतील तर बहुतांशी गेस्ट हाऊसेस रिकामी असतात. सध्याची परिस्थिती माहीत नाही. माझा शेवटचा विश्रामगृह मुक्काम नऊ वर्षांपूर्वी आजऱ्याला केला होता.

खेडचे विश्रामगृह अगदीच गावात आहे. त्यामानाने बहुतेक इतर विश्रामगृहे जरा मोकळ्या निसर्गरम्य जागी असतात. कशेडी घाटातले विश्रामग़ृह तर घाटमाथ्यावर आहे. दोन्ही बाजूंच्या दऱ्यांतून येणारे धुक्याचे लोट अनुभवता येतात असे.

पण खेडच्या विश्रामगृहाचे बाथरूम मात्र अचंबित करणारे आहे. सुमारे पंधरा बाय वीस फुटांचे बाथरूम! एका कोपऱ्यात कमोड. त्यावर बसले की 'सार्वजनिक ठिकाणी घाण केल्याबद्दल' कुणी पकडायला येईल की काय भीती वाटत राहते!

पात्रादेवी सोडता बिअरवरच गाडी चालू होती. ती बिअरवरच थांबवून झोपलो.

आता परतताना वरंधा घाट घ्यावा असा विचार ठरत आला होता. पण अचानक वाटले की पेणमधल्या मित्रांची खबरबात घ्यावी, खोपोलीला 'रमाकांत'चा वडा अजून तेवढाच चटकदार आहे का तपासावे आणि एक्प्रेसवेला नेऊन झेन थोडी पळवावी. तेव्हा एक्स्प्रेसवेचा काही भाग खुला झाला होता असे ऐकिवात होते.

पेणेत गंमत झाली. चावडीनाक्याच्या अलिकडच्या गल्लीने दातार आळीच्या तळ्याकडे निघालो. झेनच्या इंजिनाचा आवाज गाडीत अजिबात जाणवत नसे. हळूहळू जात असेल तर बाहेरही अजिबात येत नसे हे तेव्हा कळाले. तळ्याच्या कोपऱ्यावर एक कातकरी डोक्यावर मोळी घेऊन चालला होता. मी मागून जात होतो. बाकी रस्त्यावर कुणीही नव्हते. मला वाटले बाहेर गाडीचा थोडाफार तरी आवाज येत असेल आणि त्या चाहुलीने तो कातकरी बाजूला होईल. पण नाही. त्याच्यापासून तीनेक फुटांवर पोहोचलो तरी त्याला पत्ता नाही. शेवटी हॉर्न वाजवला. आणि दचकून तो मोळीवाला टाणकन उडाला. जवळपास 'आयडलिंग'च्या स्थितीत असलेल्या इंजिनचा आवाज त्याच्या जाणिवेत उतरलाच नव्हता. त्याला शांततेत एकदम भाँ झाले!

पेण नि खोपोली नीट पार पडले. 'रमाकांत'चा वडा (आणि सोबतची चटणी) अजूनही लज्जत राखून होती. पण एक्प्रेसवेचा केवळ एक टप्पा झाला होता. लोणावळा ते पुणे. झेनने आरामात १२०चा वेग गाठला आणि तीनचार मिनिटे टिकवला. मग तो टप्पा संपलाच.

परत ख्रिसमसला गोव्याला जायचे असे ठरवत ख्रिस्टो नि मी पुण्यात परतलो.