चारचाकी वाहनांतले प्रवास (आठवणींतले) - १

चारचाकी वाहने चालवायला शिकलो त्यानंतर साताठ वर्षे चारचाकी चालवण्याचा प्रसंग फारसा आला नाही. प्रसंग म्हणजे तळेगांवला जाण्यासाठी वा पुण्यातल्या पुण्यात जाण्यासाठी कुणाची चारचाकी मिळाली तर.

पदवीधर होऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठात दाखल झालो आणि यात हळूहळू बदल होऊ लागला.

गोखले इन्स्टिट्यूटमध्ये एमए, एम फिल वा पीएचडी करणाऱ्या मित्रांच्या टोळक्यात एक अभिक नावाचा (हे त्याचे 'भालोनाम'; त्याचे 'डाकनाम' होते बाबुन) बंगाली बाबू होता. त्याचे वडील आर्मीत खूप मोठ्या पदावर होते. खूप मोठ्या म्हणजे ब्रिगेडिअरच्या वरच्या पदावर. मेजर जनरल की लेफ्टनंट जनरल ते विसरलो. ते दिल्लीत असत.

तर एकदा या अभिक/बाबुनने पांचगणीला जाण्याचा घाट घातला. तो, मी, अशोक, संदर्शकुमार, रमणकुमार, शिवकुमार आणि कोको. हा कोको म्हणजे नशॉन नामक एक आफ्रिकन (केनियातला) मुलगा होता. तेव्हा तरी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आफ्रिकेतून शिकायला मंडळी येत. बाबुन नि कोको सोडता इतर पात्रे दुसऱ्या एका प्रवासात माझ्या राशीला येऊन गेली होती.

बाबुनच्या ओळखीचे (म्हणजे त्याच्या वडिलांच्या ओळखीचे) एक कर्नलसाहेब कॅंपात पूना क्लबजवळ राहत असत. त्यांची फियाट मिळेल असे बाबुनचे म्हणणे होते. सर्व मंडळींत गाडी चालवणारा असा मीच. 'गरज पडल्यास मी गाडी चालवू शकेन' असा शिवकुमारचा दावा होता ते सोडता. तर गाडी आणायला बाबुनसोबत मी गेलो. जुना ब्रिटिशकालीन बंगला. त्याच्या व्हरांड्यात कर्नलसाहेब 'आफ्टरनून टी'चा सरंजाम मांडून बसले होते. बाबुनच्या वडिलांबरोबरचे त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध या विषयावर त्यांनी एक छोटेसे आख्यान लावले, पण अखेर गाडीची किल्ली मिळाली. काळ्या रंगाची ती फियाट दिसत होती सुबक नि डौलदार. आणि चालवायला अगदी मऊसूत. बाकी गोष्टी (पिक अप, वेग वगैरे) अर्थातच यथातथा होत्या.

पावसाळ्याचे दिवस होते पण पावसाचा बहर ओसरला होता. श्रावण-भाद्रपद यांपैकी कुठलातरी महिना होता. शिवकुमारकडे घडीचे दोन तंबू होते. त्यात मिळून आम्ही सातजण मावू असा त्याचा अंदाज होता. टेबल लॅंडवर तंबू लावावेत असा बेत होता. शिवकुमारकडे एक छोटा गॅसही होता.

ते तंबू आणि आमचे इतर सामान असे घेऊन चार-साडेचारला आम्ही निघालो. पुढे तीन नि मागे चार. विद्यार्थीदशेतले आम्ही सगळे सडसडीत श्रेणीत होतो म्हणून हे जमले.

गाडी कर्नलसाहेबांनी अगदी निगुतीने जपलेली दिसत होती. तोवर मी चालवलेल्या बहुतेक गाड्यांचा क्लच नि ब्रेक हे भसकन दाबले जात नि शेवटल्या पंधरावीस टक्क्यांत खरे काम करीत. या गाडीचा ब्रेक लागायला ब्रेकपॅडल दाबल्यावरच सुरुवात होत असे. तसेच क्लचचे. अशी मऊसूत फियाट पुन्हा चालवायला मिळाली त्यानंतर दहाएक वर्षांनी. पण दहाएक वर्षांनी चालवलेली गाडी वेगळी फियाट होती - प्रीमियर ११८ एनई.

पांचगणी पुण्याहून सुमारे ११० किमी. पण वाटेत तीन घाट - कात्रज, खंबाटकी नि पसरणी. फारसे न थांबता तीनेक तासांत पोहोचू असा अंदाज होता. पाऊस नि खंबाटकी घाट या दोघांनी फारसा त्रास न देता तो अंदाज बरोबर ठरवला. तेव्हां खंबाटकी घाट दुहेरी होती, खालचा बोगदा झालेला नव्हता. त्यामुळे खंबाटकी घाटात अडकून पडणे ही दाट शक्यता श्रेणीतली गोष्ट होती. पण सुटलो.

वाईला किसन वीर कॉलेज ओलांडले आणि दोन वर्षांमागच्या वाद-विवाद स्पर्धेच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या स्पर्धेत आम्ही चक्क आमच्या कॉलेजला ढाल मिळवून दिली होती.

टेबल लॅंडवर पोहोचेपर्यंत अंधार झाला होता. तंबू लावण्याचे तंत्र जमायला जवळपास अर्धा तास गेला. तंबूत आम्ही सातजण मावू शकत होतो, पण कसेबसे. एक तंबू दुसऱ्यापेक्षा जेमतेमच मोठा होता. पाचफुटी संदर्शकुमारला त्यात चेपावे लागणार होते. शेवटी एकात मी, शिवकुमार नि कोको, दुसऱ्यात उरलेले अशी विभागणी झाली.

तंबूच्या राखणीला कोको नि रमणकुमार यांना ठेवून आम्ही जेवणाची सोय करण्यासाठी पांचगणी गावात जायला निघालो. गॅस होता, पण शिधा पांचगणीतून घेऊ असे ठरले होते.

चिकन वा मटन करावे असा महत्वाकांक्षी बेत होता. पण पांचगणी बाजारात पोहोचेपर्यंत अशोकने शाकाहारावर प्रवचन सुरू केले. तो आणि संदर्शकुमार शाकाहारी. आम्ही बाकीचे सगळे मांसाहारी. पण आवाज चढवून बोलणे आणि बोलत रहाणे या दोन आयुधांनिशी अशोकने आमच्या बहुमतावर मात केली. 'मांसाहारामुळे जग विनाशाच्या गर्तेत ढकलले जात आहे', 'मांसाहार सुरू झाला नि कलियुग सुरू झाले', 'पृथ्वीवरचा सर्वात मोठा प्राणी - हत्ती - शाकाहारी आहे', 'मांसाहारी माणसांचे मेंदू सडके असतात', 'आपल्या भक्तांनी मांसाहार करावा असे देवाला वाटले असते तर प्रत्येक देवळाबाहेर चिकन-मटन विकणाऱ्या दुकानांची रांग असती' असे अनेक तर्कशुद्ध संवाद जवळपास कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात मांडून त्याने अखेर विजय मिळवला.

पावसाळ्याच्या दिवसांत ऐंशी-नव्वद टक्के पांचगणी-महाबळेश्वर बंदच असते. जी चारदोन दुकाने अर्धवट उघडी दिसत होती त्यापैकी एका ठिकाणहून तांदूळ नि डाळ घेतली. दुसऱ्या एका ठिकाणाहून कांदा, लसूण, मिरची नि टोमॅटो मिळाले.

बाबुनने मिलिटरी कॅंटीनमधून 'मॅन्शन हाऊस' ब्रॅंडी मिळवली होती त्यामुळे तो प्रश्न नव्हता. आणि मांसाहाराच्या एवढ्या कडाडून विरोधी असलेला अशोक मद्यपानाच्या बाबतीत मात्र 'आय डोंट केअर' हे पूर्ण वाक्य कपाळावर मिरवत हिंडत असे. किंबहुना आमची विमाने उडायला लागली की मोठ्या आवाजाच्या बोलण्याच्या बाबतीत आम्ही त्याच्याशी स्पर्धा करीत असू हे त्याला आवडे. एकूण आरडाओरडा एका 'लेव्हल प्लेईंग फील्ड'वर होतो असे त्याचे मत पडे.

परतेपर्यंत नऊ वाजले होते. पावसाने विसावा घेतला होता पण हवेत जाणवण्याइतपत थंडी होती. तिचा मुकाबला करण्यासाठी 'मॅन्शन हाऊस' उघडली. माझी मॅन्शन हाऊसशी ती पहिलीच भेट. ती ओळख नंतर घट्ट मैत्रीत रुपांतर पावली.

एकीकडे खिचडीची तयारी करायला घेतली. पाऊस बारीकशा शितडून गेला. शेवटी गॅस तंबूत नेऊन त्यावर खिचडी चढवली.

अशोकने, कुठून कुणास ठाऊक, आई श्रेष्ठ की इतर कुणी (वडील, गुरुजन इ इ) असा वाद उभा केला. खरेतर यात वाद असा नव्हताच. आम्ही सर्वजण 'तू म्हणशील ते तथ्य नि मांडशील ते सत्य' या स्थितीला गेलो होतो. पण अशोकने आरडाओरडा करून घेतलाच. अखेर कंटाळून तो थांबला.

बाबुन स्वतः पिण्यातला लिंबूटिंबू होता. तो प्यायचा म्हणजे काय, तर घशात चार थेंब शिंपडायचा - एक थेंब दारू नि तीन थेंब पाणी. अशोकसारखाच संदर्शकुमारही चहा-गणक. बाबुनने दोन बाटल्या आणल्या होत्या. त्यातली एक बऱ्यापैकी झपकन गेली. दुसरी सुरू झाली नि रमणकुमारची गाडी घाटाला लागली. तो तेलुगु भाषेत राष्ट्रभक्तीपर गीते गायला लागला. आणि जरा वेळाने झोपी गेला. अशोक, संदर्शकुमार नि बाबुनने खिचडी खायला घेतली.

शिवकुमार, कोको नि मी दुसरी बाटली घेऊन हिंडायला निघालो. मध्यरात्र होत आली होती. किर्रर्र काळोखात टॉर्चच्या मिणमिणत्या प्रकाशात आम्ही निरुद्देश भटकत राहिलो. कोकोला पाय खाली सोडून बसण्यायोग्य एक जागा सापडली. तिथे बैठक जमवून आम्ही विस्कळित काही बडबडत राहिलो. लक्षात आहे ते एवढेच की कोकोची 'केनिया एअरवेज'मध्ये एक एअरहोस्टेस मैत्रीण होती अमेलिया वा ऑलिव्हिया वा तत्सम नावाची. तिला तो त्याची गर्लफ्रेंड म्हणत होता. ती फार सुंदर आहे, आणि तिच्या एखाद्या मैत्रिणीबरोबर तो आमचे जुळवून देऊ शकेल असे तो पुनःपुन्हा बरळू लागला. शिवकुमारला गर्लफ्रेंड होती. मी विनापाश होतो. पण मॅन्शन हाऊस कडक असली तरी केनिया एअरवेजच्या हवाईसुंदरीला गर्लफ्रेंड करण्याचा विचार करण्याइतकी कडक नव्हती.

मग आठवते ते एवढेच की कोको नंतर स्वाहिली भाषेत काही गाणी म्हणायला लागला नि मी प्रत्युत्तर म्हणून कन्नड भजनांची दासवाणी सुरू केली. आमचे आवाज (त्यातला कन्नड भजनांचा) ऐकून अशोक नि संदर्शकुमार आले नि आम्हांला सांभाळत तंबूत घेऊन गेले. जेवलो की नाही आठवत नाही.

सकाळी तीव्र हॅंगओव्हरच्या पश्चात्तापदग्ध अवस्थेत जागा झालो. सात-साडेसात झाले होते. तंबूत मी, शिवकुमार नि कोको. बाहेर काही धप्प धप्प फूस्स असे आवाज. उरलेले चौघे कुठे गेले होते कुणास ठाऊक. तंबूतून बाहेर डोकावून पाहिले तर गडद धुके नि त्यात काही काळ्या आकृत्या.

जरा वेळाने हिशेब लागला. त्या चरायला आलेल्या म्हशी होत्या. त्यांच्या नेहमीच्या कुरणाच्या मध्येच आम्ही 'इथेच टाका तंबू' केले होते. त्या म्हशींच्या पावलांचे आवाज धप्प धप्प आणि उच्छवासाचे फूत्कार फूस्स. दोन्ही भीतीदायक होते.

सुमारे अर्धा तास तिघेही भीती दडपून तसेच बसून राहिलो. म्हशींच्यामधून वाट काढत गाडीकडे जाण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे धाडस झाले नाही. त्यात पोटाने 'मॉर्निंग कॉल' द्यायला सुरुवात केली. मग परिस्थिती गंभीर होऊ लागली.

तेवढ्यात आरडाओरडा करीत बाकीचे चार वीर परतले. ते सकाळी पांचगणीत ब्रेकफास्टची सोय बघण्यासाठी गेले होते. 'आम्हांला का उठवले/सांगितले नाही?' या पृच्छेला 'उठवायचा प्रयत्न केला पण तुम्ही उठला नाहीत', 'छान झोपला होतात, म्हटले उठवून कशाला झोपमोड करा', 'अर्ध्या तासात तर येणारच होतो परत, मग कशाला उठवायचे' अशी वेगवेगळी उत्तरे आली.

म्हशी पांगल्या होत्या त्याचा फायदा घेऊन 'मॉर्निंग कॉल'ला उत्तर देऊन आलो. तेव्हा टेबललॅंडजवळ पब्लिक टॉयलेट नव्हते नि निर्मलग्राम योजनाही नव्हती. ब्रिटिशकालीन इंग्रजीत मानवी विष्ठेला 'नाईट सॉईल' म्हणत. तर साध्या मातीत ही रात्रमाती मिसळून टाकली.

या मंडळींनी एका बेकरीतून भरपूरसे पाव आणि अमूल बटर आणले होते. भरपेट खाऊन (भरपेट खाल्ल्याने हॅंगओव्हर लवकर उतरतो - इति अनुभवी शिवकुमार) हिंडायला निघालो. धुके आता विरळू लागले होते.

हिंडायला असे म्हणायचे इतकेच. बहुतेक दुकाने बंदच होती. आणि अधूनमधून धुके नि पाऊस यामुळे फारसे काही दिसतही नव्हते. तरीही तिरतिरणाऱ्या डोक्याने हिंडलो, महाबळेश्वरी चणे विकत घेतले नि दुपारी परतीच्या मार्गाला लागलो. मॅन्शन हाऊसने उठवलेला वळ अजूनही ठणकत होता.

येताना अशोकने सतत बडबड करून डोके उठवले. शिवापूर येईपर्यंत त्याने माझ्या ड्रायव्हिंगबद्दल शेरेबाजी सुरू केली (त्याला स्वतःला सायकल जेमतेम येत होती). कात्रजच्या घाटात उतरताना बॉबी पॉईंटच्या अलिकडे एका जागी वाहतूक तुंबली होती. तेव्हा कात्रजचा घाट दुहेरी मार्ग होता. बायपास/बोगदा अस्तित्वात नव्हते. अशोकच्या सततच्या शेरेबाजीला कंटाळून मी कधी नव्हे तो घुसखोरी करायला सिद्ध झालो. तुंबलेल्या वाहतुकीच्या उजवीकडून (म्हणजे शत्रूपक्षाच्या हद्दीतून) मी गाडी पुढे काढली. आणि पन्नासेक मीटरवरतीच समोरून येणाऱ्या ट्रकने रस्ता अडवला. रिव्हर्स घेऊन झपाट्याने मागे आलो तोवर मागच्या वाहतुकीने रांगेत भर घातली होती. शंभरेक मीटर घाटात रिव्हर्समध्ये गाडी चालवताना अशोकच्या शेरेबाजीला तोंड देणे.... मला उरलेली सगळी 'मॅन्शन हाऊस' एका दमात संपवायची तीव्र इच्छा झाली!

अखेर संध्याकाळी फियाट परत केली नि पहिला चारचाकीतला लांबचा असा प्रवास नोंदला.

पदवीशिक्षणासाठी माझ्यासोबत असलेल्या प्रशांतने पदवी कशीबशी मिळवली होती. एकाच विषयात कुणी दहा वा कमी गुणांनी नापास झाले, आणि सर्व विषयांच्या गुणांची सरासरी काढल्यास पास झाले तर अशा विद्यार्थ्याला पास घोषित केले जाई. हा मानवतावादी नियम 'जयकर रूल' म्हणून प्रसिद्ध होता. पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांच्या नावे. आता हे मुकुंदरावांनी सुचवले की त्यांची आठवण म्हणून या नियमाला त्यांचे नाव देण्यात आले माहीत नाही. पहिली शक्यता क्षीण वाटते. ज्या शिक्षणपद्धतीतून नि शिस्तीतून बॅ. जयकर आले होते त्यात नापास विद्यार्थ्यांना इतके कुरवाळणे बसत नव्हते. असो.

तर बॅ. जयकरांच्या समर्थ साथीने प्रशांत पदवी प्राप्त करता झाला होता. पण पुढे काय करावे याचा विचार होत नव्हता. त्या काळात त्याला न्यूजपेपर टॅक्सी चालवणारे गृहस्थ भेटले. त्यांच्या साथीने तोही त्या उद्योगात शिरायला तयार झाला. त्याचे पिताजी (बांधकाम खात्यात इंजिनियर) त्यासाठी लागणारे लाखभर रुपये घालायला तयार झाले. अशा रीतीने प्रशांत एका टेम्पो ट्रॅक्सचा मालक झाला. एक ड्रायव्हर नोकरीला ठेवून तो टेम्पो ट्रॅक्स त्याने 'इंडियन एक्सप्रेस'च्या कोल्हापूर रूटला लावून दिला.

तेव्हा इंडियन एक्सप्रेसचा पुण्यातला छापखाना नुकताच सुरू झाला होता. खडकी स्टेशनला लागून असलेल्या स्वस्तिक रबर फॅक्टरीच्या जागेत हा छापखाना होता असे आठवते. छापखान्याची नुकतीच सुरुवात झाली असल्याने तांत्रिकदृष्ट्या सर्व गोष्टी जुळल्या नव्हत्या. त्यामुळे पेपर छापून होण्याची वेळ रात्री बारा ते पहाटे पाच यादरम्यान कुठलीही असे.

कोल्हापूर रूटला स्वारगेट, खेड शिवापूर, कापूरहोळ, सारोळा, शिरवळ, खंडाळा, वेळे, सुरूर, जोशी विहीर, भुईंज, उडतारे, सातारा, शेंद्रे, नागठाणे, अतीत, उंब्रज, कऱ्हाड, कासेगांव, पेठनाका, कामेरी, वाठार, शियेनाका, शिरोली आणि कोल्हापूर असे चोवीस थांबे होते. प्रत्येक थांब्याला एक/दोन/जास्ती गठ्ठे उतरवणे, ती वेळ नोंदवून त्यावर स्थानिक विक्रेत्याची सही घेणे आणि पुढे असे ते काम होते. सगळे मिळून सुमारे सहा तास लागत.

गायकवाड आडनांवाचा तो ड्रायव्हर जनवाडीत कुठेतरी राही. चारदोन महिने सुरळीत गेल्यानंतर गायकवाडसाहेबांनी दांड्या मारायला सुरुवात केली. प्रशांत तोवर स्वतः चारचाकी चालवायला शिकला होता. त्याने 'कमी तिथे आम्ही' भूमिका करायला सुरुवात केली. पण प्रशाला गाडी चालवता येत असे, त्याची आवड नव्हती.

मला गाडी चालवायला येते आणि आवडते म्हटल्यावर प्रशा खूष झाला. एकदा गायकवाडसाहेबांनी दांडी मारल्यावर त्याने मला गाठून कोल्हापूरला चलण्याबाबत विचारले. मला पांचगणी दौऱ्यानंतर ड्रायव्हिंगची खुमखुमी आलीच होती, मीही तयार झालो.

त्या रात्री एकला पेपर तयार झाला. जाताना प्रशानेच पूर्णवेळ गाडी चालवली. कारण प्रत्येक थांब्याचा ठिकाणा त्यालाच माहीत होता आणि प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक विक्रेत्याला गाडी नि प्रशा माहीत होता. पहिला महिना गायकवाडसोबत प्रशा दररात्री जात होता त्याचा परिणाम. सकाळी साडेसहा-सातला कोल्हापूर गाठून गाडी रिकामी केली नि प्रशाने सिटा भरायला सुरुवात केली.

परत येताना गाडी रिकामीच येणार तर एस्टीच्या भाड्याइतक्या पैशात नॉनस्टॉप जाणारी ही सर्व्हिस प्रवाशांना चांगलीच परवडे. आणि मी प्रशाला त्याला इंडियन एक्सप्रेसकडून मिळणाऱ्या रकमेचा आकडा विचारला तेव्हा कळाले की हे सिटा भरणे गृहित धरूनच इंडियन एक्सप्रेस पैसे देत असे.

ट्रॅक्स ही 'लाँग चासी'ची गाडी होती. ड्रायव्हरसीटची रांग, त्याच्यामागे अजून एक रांग, त्याच्यामागे पुढल्या सिटांना काटकोनात अशा समोरासमोर दोन सिटा. फ्लोअर गिअर असल्याने ड्रायव्हरशेजारी एकजण आरामात बसे नि दोनजण अवघडून. मागल्या रांगेत तीनजण आरामात बसत नि चारजण अवघडून. त्यामागच्या दोन समांतर सिटांवर दोन-दोनजण आरामात बसत. अशा रीतीने ड्रायव्हरखेरीज आठ ते दहा प्रवासी गाडीत घेता येत.

नंतर नंतर तर प्रशाने जातानाच साताऱ्यापासूनच सिटा भरायला सुरुवात केली कारण तोवर मागल्या चार सिटांवरले गठ्ठे रिकामे झालेले असत.

आम्ही मिसळ खाऊन घेईपर्यंत सातजण जमले होते. तेवढ्यावरच समाधान मानून प्रशाने किल्ली माझ्या हातात दिली. ट्रॅक्स चालवण्याची ती माझी पहिलीच वेळ. किंबहुना कुठलीही डिझेलवर चालणारी चारचाकी चालवण्याची ती पहिलीच वेळ. डिझेल गाडीला पेट्रोल गाडीच्या तुलनेत टॉर्क जबरदस्त असतो. म्हणजे, ऍक्सिलरेटर दिल्यावर गाडी ताकदीने उठते. मग कितीही बोजा असू दे. डिझेल गाडी तिसऱ्या गियरमध्येही जागेवरून उठते. पेट्रोल गाडी बहुधा गचके देत बंद पडते. पण एकदा पळायला लागल्यावर पेट्रोल गाडी डिझेलला ऐकत नाही. पेट्रोल नि डिझेल गाड्यांचे टॉर्क (एनएम - न्यूटन मीटर) आणि पॉवर (एचपी/बीएचपी - हॉर्स पॉवर/ब्रेक हॉर्स पॉवर) हे आकडे पाहिले तर लक्षात येईल.

टाटा नेक्सॉनचे उदाहरण घेऊ. नेक्सॉन पेट्रोल इंजिन आहे ११९९ सीसीचे आणि डिझेल इंजिन आहे १४९७ सीसीचे. म्हणजे डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनच्या सुमारे सव्वापट आहे. पेट्रोल इंजिनची बीएचपी ११८ आणि डिझेल इंजिनची ११३. टॉर्कचे आकडे पेट्रोल इंजिन १७० एनएम आणि डिझेल इंजिन २६० एनएम. १७० च्या सव्वापट होतात २१२.

टेम्पो ट्रॅक्सचे इंजिन होते साक्षात मर्सिडीज-बेंझचे ओएम६१६. पण नावावरून हुरळून जायची गरज नाही, पॉवर होती सुमारे ६६ बीएचपी. आणि टॉर्क सुमारे १३० एनएम.

त्याकाळच्या पुणे कोल्हापूर पुणे रस्त्याला एवढे पुरेसे होते. रस्त्यावरच्या बाकीच्या गाड्याही त्याच कुळातल्या होत्या.

ट्रॅक्स लांबीला फियाटपेक्षा सुमारे तीन-साडेतीन फूट जास्त, रुंदीला दीडेक फूट जास्त आणि दोनेक फूट जास्त उंच. इंजिन फियाटपेक्षा जास्ती ताकदवान होते आणि ते जाणवत होते.

पेठनाका येईस्तोवर मला गाडीचा अंदाज आला. मग जमले. गियर चारच होते. त्यामुळे तो प्रश्न आला नाही. पण चौथा गियर हा ऑटोमोबाईल इंजिनियरिंगच्या भाषेत 'ओव्हरड्राईव्ह' होता. ड्रायव्हिंगच्या भाषेत ताशी साठ किमीचा वेग गाठल्यानंतरच घालायचा गियर. त्याआधीच घातला तर इंजिन गाडी खेचताना तक्रार करी.

अशा रीतीने ट्रॅक्सची पहिली खेप सुरळीत पार पडली.

नंतर प्रशा महिन्यातून एखाददोनदा उगवायला लागला. कधीकधी आठवड्यातून एकदा. मलाही संगणकशास्त्राच्या जोडीने (किंबहुना त्याहून जास्ती) ड्रायव्हिंग भावत होते त्यामुळे मीही खुषीने जात असे. वेळेत काम पार पडले तर मी सकाळी अकराच्या लेक्चरला हजर राहू शकत असे. नाहीतर तसेही संगणकशास्त्र शिकण्यातून मन उडायला लागले होतेच.

नंतर प्रशाऐवजी प्रशाच्या पार्टनर देशपांड्यांसोबत दोनतीन खेपा केल्या. हे एक (आम्हांला) गूढ व्यक्तीमत्व होते. पस्तिशीच्या घरात. मूळचे डोंबिवलीचे पण गेली तीन वर्षे पुण्यात दत्तवाडीत एका दोनखोल्यांच्या घरात देखणी बायको आणि लहान मुलासह. देशपांडेबुवांचे शिक्षण फारसे झालेले नव्हते, बहुधा पदवीही गाठली नव्हती. डोंबिवलीला आता कोण असते, याआधी काय नोकरी/व्यवसाय केला या आणि अशा वैयक्तिक प्रश्नांना देशपांडेबुवा 'आऊटसाईड द ऑफ स्टंप' म्हणून सोडून देत. त्यांच्या तोंडात बहुतेक वेळा गाय छाप जर्द्याचा बार असे तो कामी येई. आम्ही त्यांच्याहून सुमारे पंधरा वर्षांनी लहान त्यामुळे एकदोनदा विचारून आमची सामान्यज्ञानप्राप्तीची जिज्ञासा सोडून देण्याखेरीज पर्याय नव्हता.

देशपांडेबुवा तसेही फारसे बोलत नसत. पण त्यांच्या मनात त्यांची त्यांची काही गणिते चाललेली दिसत. त्यातली आमच्यापर्यंत येण्यासारखी काही असली तर येत.

एकदा ते नि मी होतो. त्या दिवशी रात्री एकच्या आसपास खडकीतून निघालो. वाहतूक थोडी विरळ होती वा मला फाष्टात गाडी हाणण्याची हुक्की आली होती, आम्ही बघताबघता शिरवळला पोहोचलोही. तिथे देशपांडेबुवांनी प्रती उतरवून सही घेण्यासाठी दहा मिनिटे लावली. नंतर प्रत्येक थांब्यामागे त्यांनी दोनपाच मिनिटे जास्तीची घेतली. दोनदा चहाला आणि दोनदा धार मारायला असे नेहमी न घेतले जाणारे थांबेही घ्यायला लावले. अखेर साडेसहानंतर आम्ही कोल्हापूरला पोहोचलो.

मिसळ खाण्यासाठी देशपांडेबुवांनी तोंड मोकळे केले (चहा पिताना ते तोंडातला बार फक्त एका बाजूला गालफडात सरकवून ठेवत, थुंकून वाया घालवीत नसत) आणि कारण उलगडून सांगितले. "तुझं तरुण रक्त आहे, गाडी नवीन आहे, त्यामुळे पळवायला मज्जा येते. आज कोल्हापुरात आपण चार तासांत पोहोचलोही असतो. पण रोजची डिलिव्हरीशीट जमा करून घेणारा जो कारकुंडा प्रेस ऑफिसमध्ये बसलाय तो एव्हढेच पहाणार की एक दिवस गाडी चार तासांत कोल्हापूरला पोहोचली. मग इतर दिवशी एव्हढा वेळ का लागतो असा प्रश्न उपटणार. चार तासांहून जास्ती वेळ लागला की 'त्याची कारणे लिहून द्या, ती पटण्यायोग्य नसली तर पेनल्टी लागेल' असा बांबू लावणार. तुला गाडी पळवायचीच आहे ना, तर मग पुण्याला जाताना काय ती पळव. तीन तासांत पोहोच. कुणी विचारणार नाही, सुखरूप पोहोचलास की".

देशपांडेबुवांनीच मला ओव्हरड्राईव्ह ही भानगड समजावून सांगितली. तोवर मी पेट्रोल गाडीच्या सवयीने पटापट गियर बदलत चौथ्या गियरला पोहोचे आणि मग चौथ्या गियरला गाडी वेग पकडायला इतका वेळ का घेते असा अचंबा करीत बसे.

तेव्हां देशपांडेबुवांनी टोमणा म्हणून मारलेली तीन तासांची वेळ नंतर काहीवेळा मी गाठली. एकदा मारुती झेन (जुनी), एकदा टोयोटा करोला आणि दोनदा मारुती एस-क्रॉस अल्फा या गाड्यांनी.

पुण्यात पेपर टॅक्सी व्यवसायात तेव्हा रानडे नावाचे बुजुर्ग होते. बुजुर्ग म्हणजे चाळिशीला पोहोचलेले. पण शिक्षण मॅट्रिकपुरते करून पोटापाण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय करत त्यांनी दहाएक वर्षे न्यूजपेपर टॅक्सी आणि इतर ट्रान्सपोर्ट हा व्यवसाय धरून ठेवला होता. त्यांची पत्नी टेलिफोन एक्स्चेंजमध्ये काम करीत असे. दोनांतले एक चाक स्थिर पगार आणीत असे.

रानडेंचीही एक ट्रॅक्स होती. प्रशा रानडेंच्या संपर्कात शाखेच्या माध्यमातून आला आणि रानडेंनी त्याला या व्यवसायात रुजवले. देशपांड्यांची प्रशाशी ओळख रानडेंनीच करून दिली होती. रानडेंकडे दुसरे चारचाकी वाहन होते डीसीएम टोयोटा ट्रक. पण तो त्यांनी कुठल्याशा कंपनीला लावून दिला होता. अजून एक गाडी होती असे अंधुक आठवते, खात्री नाही.

रानडे ओंकारेश्वरजवळ एका गल्लीत राहत. पत्नीकृपेने त्यांच्याकडे कायम चालू असलेला टेलिफोन होता. आणि वदंता होती की त्याचे एसटीडीचे बिलही नगण्य होते. याचा फायदा त्यांना झाला जेव्हा त्यांचा डीसीएम टोयोटा ट्रक काहीतरी गंभीर दुखण्याने स्थानबद्ध झाला तेव्हा. त्या ट्रकचा कुठलातरी एक पार्ट बदलावा लागणार होता आणी तो इथे सहजी उपलब्ध नव्हता. रानडेंनी भारतभर चौकशा करून तो पार्ट अखेर हैदराबादच्या डीलरकडे आहे ही माहिती मिळवली आणि तो पार्ट आणवून ट्रक परत चालू केला.

रानडेंनी सांगितलेला एक किस्सा: त्यांच्या पत्नीची एक मैत्रीण तिच्याबरोबर टेलिफोन एक्स्चेंजमध्ये काम करीत असे. तिच्या नवऱ्याचा आयशर मित्सुबिशी ट्रक होता. तो ट्रक एकदा असाच कुठलातरी पार्ट मिळत नाही म्हणून उभा राहिला. तो पार्ट अखेर मैत्रिणीने पार जपानपर्यंत फोनाफोनी (अर्थातच फुकटात) करून मिळवला.

त्याकाळात एलसीव्ही (लाईट कमर्शिअर व्हेईकल) या श्रेणीत भारतात घुसण्याचा प्रयत्न टोयोटा (डीसीएम टोयोटा), मित्सुबिशी (आयशर मित्सुबिशी), निस्सान (ऑल्विन निस्सान) आणि इसुझू (हिंदुस्तान इसुझू) या चार महारथींनी केला. पण औरसचौरस पसरलेल्या या देशात सर्व्हिस नेटवर्क उभारणे न जमल्याने त्यांनी गाशा गुंडाळला. एक बरे झाले, या स्पर्धेला घाबरून म्हणा वा काही, टाटा नि लेलॅंड दोन्ही कंपन्यांनी आपली मॉडेल्स सुधारली. आता त्यात महिंद्रा नि आयशरचीही भर पडली आहे. आयशरने कात टाकली आहे. वोल्वोबरोबर भागीदारी करून त्यांनी प्रीमीयम एलसीव्ही मार्केटमध्ये पाय रोवले आहेत. एकूण एलसीव्ही मार्केट आता चांगलेच 'यूजर फ्रेंडली' झाले आहे.

रानडे शिंगे मोडून वासरांत घुसायला तयार असत. एकदा पुण्यात पेट्रोल पंपांचा संप होता की काहीतरी तत्सम झाले होते. रानडेंच्या बायकोच्या कायनेटिक होंडामधले पेट्रोल पार तळाला गेले होते. तिला नोकरीवर सोडा-आणायला येण्याची ऑफर रानडेंनी दिली पण बायको शहाणी होती. आपला नवरा म्हणजे बारा पिंपळावरचा मुंजा. नोकरीवर जाताना सोडेल एक वेळ, आणायच्या वेळी कुठे असेल कुणास ठाऊक? तो सेलफोनचा जमाना नव्हता. आणि रिक्षाने येण्यासाठी पैसे खर्चणे हे त्या मूळच्या गोखलेकुलीन आणि आता रानडेकुलीन महिलेला सुचणे शक्य नव्हते. पहिल्या अपत्याच्या जन्माच्या वेळी प्रसूतीवेदना सुरू झाल्या तेव्हा रानडे कुठेतरी भरकटले होते म्हणून रानडेवहिनी रिक्षाने मॅटर्निटी होमला गेल्या होत्या अशी वदंता होती.

तर कात्रजच्या घाटात मध्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत होते अशी खबर आली होती. संध्याकाळ-रात्रीच्या उंबरठ्यावरची वेळ. प्रशा ट्रॅक्समध्ये रानडे (मागे) नि मेढेकर (पुढे) यांना घालून माझ्याकडे आला. मेढेकर आमचा कॉलेजचा मित्र आणि प्रशाचा शेजारी. बीएस्सी झाल्यावर तो कॉलेजमधूनच एमएस्सी इलेक्ट्रॉनिक्स करीत होता. मी कधी नव्हे ते अभ्यासाला बसलो होतो.

"अरे चौथा असलेला बरा म्हणून तुला घ्यायला आलो" इति प्रशा.

मला काही कळेना. "अरे पेट्रोल आणायला जायचेय की कुणाला पोहोचवायला? चौथा माणूस कशाला?"

"चल तू, कळेल. रात्री उशीर होईल असे सांगून ठेव घरी".

ट्रॅक्समध्ये तेव्हा कॅसेट टेप प्लेअर होता. आम्ही कर्वेनगरमधून बाहेर पडलो आणि रानडेंनी मागल्या सीटवरच्या पिशवीतून 'हेवर्ड्स २०००'ची बाटली काढली. 'हेवर्ड्स ५०००', 'कॅनन १००००' पेक्षा सौम्य आणि 'लंडन पिल्सनर', 'किंगफिशर' पेक्षा कडक अशी ही बियर आमची आवडती होती. त्याकाळी (आणि आताही) उपलब्ध असलेल्यांपैकी सर्वात कडक बिअर्स म्हणजे 'खजुराहो' आणी 'नॉक आऊट' (उच्चारी 'खजुरा' आणि 'नाकाट') यांच्या वाटेला आम्ही कधी जात नसू.

प्रशाने त्या काळात गाजत असलेली हसन जहांगीरची टेप लावली. 'हवा हवा ऐ हवा खुशबू लुटा दे', 'आ जाना दिल है दिवाना' ही गाणी वाजायला लागली आणि रानडेंनी बियरच्या बाटलीवरच अंगठीने ताल धरला.

घाटातला पंप चालू होता. तिथून पाच लिटरचा कॅन भरून घेतला आणि आम्ही घाटाच्या पायथ्याला गुजरवाडीतल्या एका ढाब्यावर थांबलो. तिथे तेव्हा तरी मटन मसाला नि रोटी हे पदार्थ स्वस्त नि मस्त मिळत. आणि आपापली दारू आणून प्यायला परवानगी होती. आम्ही ट्रॅक्समध्ये बसूनच बियर संपवली आणि जेवायला उतरलो.

मग कळाले की पेट्रोल पंपांचा संप वगैरे जे काय होते ते निमित्तमात्र. रानडेंच्या बायकोची ड्यूटी दुसऱ्या दिवशी सकाळी होती आणि संप मध्यरात्री संपणार होता. पण ते निमित्त साधून रानडेंनी मैफल जमवून घेतली. आणि त्यांना माझ्याबरोबर 'हमप्याला हमनिवाला' होण्याची इच्छा बराच काळ होती तीही साधून घेतली. विद्यापीठातल्या संगणकशास्त्र विभागातला विद्यार्थी बनारस १२० आणि विल्स किंगच्या साथीने कोल्हापूर रूट मारतो म्हणून त्यांना माझ्याबद्दल कुतूहल होते. त्या मैफलीत कळले की त्यांचे मूळ गांव कस्बा संगमेश्वर. मग काय जुळलेच. पुढे अधून मधून भेटी होत राहिल्या. पण गेली वीसपंचवीस वर्षे संपर्क नाही.

नंतर एका कोल्हापूर खेपेला एक नवीन अनुभव मिळाला. कोल्हापूरहून निघालो नि शिरोली एमआयडीसीपासूनच उसाच्या गाड्यांचे थवे आडवे यायला लागले. दर वेळेस दातओठ खाऊन आणी जीव मुठीत धरून ओव्हरटेक करताना मी बेजार झालो.

तेवढ्यात एक वळवाच्या पावसाची सरही येऊन रस्ता निसरडा करून गेली.

एका थव्याला ओलांडताना दोन-तीन गाड्याच उरल्या नि तेवढ्यात समोरून एक ट्रक बऱ्यापैकी वेगात येताना दिसला. अजून वेग वाढवून उरलेल्या गाड्या पार करणे धोक्याचे वाटले म्हणून मी ब्रेक दाबला. स्टिअरिंग किंचित उजवीकडे वळलेले होते. ब्रेक दाबल्यावर गाडी घसरली. घसरली म्हणण्यापेक्षा सरकायला लागली म्हणणे योग्य ठरेल कारण टायर नि रस्ता यांच्यामध्ये असलेल्या पाण्याचा थर तेल लावलेल्या काचेवरून गोटी घसरावी तसे आम्हांला फिरवत होता. त्याला ऍक्वाप्लेनिंग/हायड्रोप्लेनिंग म्हणतात हे नंतर कळाले.

स्टिअरिंग थोडेसे उजवीकडे कललेले असल्याने गाडी उजवीकडे सरकू लागली. आणि समोरून येणाऱ्या ट्रकला आडवी जात रस्त्याच्या उजवीकडच्या साईड स्ट्रिपमध्ये पोहोचून थांबली. ट्रकवाल्याने जिवाच्या आकांताने ब्रेक मारला म्हणून आम्ही थोडक्यात वाचलो. गाडीतल्या यच्चयावत सिटांनी सामूहिक निःश्वास सोडला.

एकदा कोल्हापूरला मी नि मेढेकर दोघेच गेलो होतो, प्रशा नव्हता. सकाळी आठच्या दरम्यान परत निघालो. प्रवासी सिटांमध्ये एक पन्नाशीच्या काकू होत्या. एकारान्ती आडनांव चेहऱ्यामोहऱ्यावर मिरवणाऱ्या. आम्ही चहापानासाठी अतीतला आमच्या ठरलेल्या ठिकाणी थांबलो. मेढेकर हाफशर्ट फुलपॅंट अशा मध्यमवर्गीय सभ्य अवतारात होता. मी मळकट टीशर्ट नि जीन्स. तसाही मेढेकर नाकीडोळी नीटस बामण दिसे. आणि त्याचे बोलणेही गरजेबाहेर शुद्ध असे, सुधीर फडक्यांच्या शब्दोच्चारांसारखे.

काकूंनी दबक्या आवाजात त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. "ड्रायव्हर कोण आहे तुमचा? आपल्यासारख्या घरातला दिसतो. शिक्षण वगैरे सोडून असली कामे करायला लागताहेत बिचाऱ्याला." मेढेकरने जेव्हा त्यांना मी विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतो असे सांगितले तेव्हा 'काहीही काय' असा भाव चेहऱ्यावर थापून त्या ज्या गप्प बसल्या त्या पुण्याला उतरेपर्यंत.

ट्रान्सपोर्टच्या धंद्यात प्रशाची ओळख मुंबईच्या एका समवयस्काशी झाली. सुनील जोशी. त्याची एफ ३०७ मालवाहू मेटॅडोर होती. पुढे ड्रायव्हर कॅबिन नि मागे ताडपत्री लावून बंद करण्याचा सामानाचा हौदा.

एकदा प्रशा गोवा ट्रिपची ऑफर घेऊन आला. सुनीलला ओनिडा टीव्ही पुण्यातून गोव्याला म्हापशाला पोहोचवायचे होते. एकास दोन ड्रायव्हर बरे म्हणून त्याने प्रशाला विचारले. दोनास तीन बरे म्हणून प्रशाने मला विचारले. तसा सुनीलबरोबर त्याचा बाबू म्हणून एक मित्र असे. पण तो नैतिक पाठबळापुरता. बाबूला गाडी चालवता येत नसे. सिगरेट पेटवून देणे, तंबाकू मळून देणे, गाडीला जॅक लावणे/काढणे अशा कामांत तो उपयोगी पडे.

आम्ही टीव्ही उतरवल्यानंतर गोव्यात दोन दिवस थांबायचे, येताना गणपतीपुळे मार्गे यायचे असा बेत होता.

एफ ३०७चे इंजिनही टेम्पो ट्रॅक्ससारखे मर्सिडीज-बेंझचे ओएम ६१६ हेच होते. पण बॉडीचा बोंगा खूपच मोठा होता. मी कधी चालवली नव्हती. या निमित्ताने मेटॅडोर चालवणे होईल आणि फुकटात गोवा खेप पदरी पडेल म्हणून मी सहर्ष तयार झालो.

रात्री नऊच्या दरम्यान निघालो. मागच्या सामानाच्या हौद्यात पन्नासेक टीव्ही सेट्स होते. त्याला ताडपत्रीने झाकून दोरखंडाने बांधून टाकले होते पण ते सील केलेले नव्हते. गरज पडल्यास मागे जाऊन एकदोन जणांना झोपता येईल असा त्यामागे सुनीलचा उद्देश होता.

निघताना तरी आम्ही चौघे ड्रायव्हर कॅबिनमध्येच बसलो. ड्रायव्हर नि क्लीनर दोघांना दोन स्वायत्त सीट्स आणि मागे एक स्पंजभरल्या फळकुटाचे बाकडे ज्यावर दोघेजण नीट बसू शकत. सातारा ओलांडेपर्यंत बारा वाजून गेले. मी नि प्रशा त्या फळकूट-बाकड्यावर डुलक्या मारत बसलो होतो. बाबू क्लीनर नि सुनील ड्रायव्हर.

उंब्रजच्या नि कराडच्या मध्ये कुठेतरी डिझेल भरायला थांबलो. आम्ही खाली उतरून पाय मोकळे केले नि पंपाच्या आवाराबाहेर जाऊन सिगरेटीही फुंकल्या. परतलो तर सुनील जांभई देत म्हणाला, "चालवतोस का आता?". मी वाटच बघत होतो. पंपावरून गाडी बाहेर काढताना थोडी मागे घेऊन मग काढायची होती. ते करताना लक्षात आले की ह्या मोठ्या बोंग्याचा अंदाज यायला वेळ लागेल. मी रिव्हर्समध्ये गाडी पेट्रोलपंपाच्या खांबालाच ठोकणार होतो. हळूहळू करीत गाडी बाहेर काढून हायवेला घेतली. सरळ जायला एवढेसे अवघड वाटले नाही. वळणे जमायला थोडा वेळ लागला. मागे भरलेला लोड आमच्या पेपरच्या गठ्ठ्यांपेक्षा भरपूर जास्ती होता. गाडी चाळीस-पन्नासच्या वेगाला ठीक पोहोचली. साठाचा वेग गाठेस्तोवर 'आता पुरे', 'बास आता' असे संदेश इंजिनकडून येऊ लागले. तसेही एवढे वजन घेऊन जास्ती वेग घेणे ठीक नव्हते. मोमेन्टम = मास X व्हेलॉसिटी हे आठवले. मी पन्नास ते साठ या दरम्यान कुठेतरी घुटमळत राहिलो. पेठनाक्याला पोहोचेपर्यंत भरंवसा वाटायला लागला. एक चहा-सिगरेट थांबा घेतला. मग चहामुळे बाबूला 'मॉर्निंग कॉल' आला. त्याच्यापाठोपाठ आपणही उरकून घेऊ म्हणून आम्ही सगळेच पोट मोकळे करून आलो.

कोल्हापूरला पोहोचेपर्यंत चार वाजत आले होते. हायवे सोडून आत वळलो नि ऑक्ट्रॉयवाल्याने अडवले. तसे शिरवळ नि कराडलाही अडवले होते. पण दहा रुपयांचा एस्कॉर्ट पास घेऊन सुटलो होतो. जेव्हा ऑक्ट्रॉयची पद्धत होती तेव्हा माल जर गावातून फक्त जाणार असेल, गावात उतरणार नसेल, तर 'एस्कॉर्ट पास' घेऊन जाता येई. तो एस्कॉर्ट पास गावातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावरील ऑक्ट्रॉय पोस्टवर जमा करावा लागे.

कोल्हापूरवाल्याने दहा रुपयांचा एस्कॉर्ट पास द्यायला साफ नकार दिला. कारण? मागील ताडपत्रीवरून बांधलेल्या दोरखंडांवरून सील केलेले नव्हते. कायद्यानुसार ते पुण्यात सील करून गोव्यात उघडायला हवे होते.

नेहमीचा पेपरटॅक्सीवाला आहे असे सांगून प्रशाने मध्यस्थीचा प्रयत्न केला. पण तो जाम ऐकेना.

"च्यायला, पुढल्या वेळेपासून फुकट पेपर देतो का बघच" प्रशा दबक्या आवाजात गुरगुरला. न्यूजपेपर टॅक्सीमध्ये पंधरावीस वृत्तपत्रे ठिकठिकाणच्या ऑक्ट्रॉय, पोलिस आणि तत्सम खाबूलोकांना फुकट वाटण्यासाठी ठेवलेली असत. प्रशाचा संताप वांझ होता. फुकट पेपर दिला नसता तर त्याची टॅक्सी पुण्यातून बाहेर पडू शकली नसती. नगरपालिका नि पोलिस यांनी त्याच्या गाडीत पंधरा त्रुटी काढून पंचवीस पावत्या फाडल्या असत्या.

आता काय करायचे? ऑक्ट्रॉयवाला तर हटायला तयार नव्हता. शेवटी त्याने एक अशक्य अट घातली. गाडीतल्या मालाची एकूण किंमत सुमारे दोन लाख होत होती. त्याच्या दोन टक्के, म्हणजे चार हजार रुपये, डिपॉझिट भरावे आणि गाडी कोल्हापुरातून न्यावी. डिपॉझिट परत मिळवण्यासाठी नगरपालिकेत सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळात यावे.

हे शक्य नव्हते. मुळात आमच्याकडे चार हजार रुपये नव्हतेच. कोल्हापुरात कुणाला उठवून त्यांच्याकडून ते गोळा केलेच असते, आणि डिपॉझिट परत मिळवण्यासाठी थांबलो असतो तर दिवस गेला असता. शिवाय त्या दिवशी कुठली सरकारी सुटी वगैरे असती (सेकंड/फोर्थ सॅटर्डे, महावीर जयंती, पारशी नववर्षदिन इ) तर संपलेच.

ऑक्ट्रॉय नाक्यावरच्या चहावाल्याने आम्हांला सल्ला दिला. "जावा सरळ कागलपोत्तर. थितून मुरगुडास्नं सरवडं, नर्तावडं, सोळांकुर करत दाजीपूरच्या घाटातनं उतरा". गावांची नावे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत आम्ही गाडी हाणली. दुसरा इलाज नव्हता.

कागलपासूनचा उजवीकडे उतरणारा रस्ता अगदीच चिंचोळा होता. मेटॅडोर जेमतेम मावेल असा. मुरगूड गाठेस्तोवर फटफटायला लागले होते.

तेव्हा गाडी परत सुनीलने चालवायला घेतली होती नि बाबू क्लीनर. मी आणि प्रशा ड्रायव्हर कॅबिनच्या टपावर बसलो होतो.

मागून एक फटफटीवाला आम्हांला ओलांडून जायचा प्रयत्न करीत होता. पण मेटॅडोरचा धडधडाट एव्हढा होता की आम्ही आपापसात जेमतेम बोलू शकत होतो (टपावरले आपापसात नि कॅबिनमधले आपापसात - टप ते कॅबिन लाईन चालू नव्हती). अखेर मुरगूडच्या आधी दोनतीन किलोमीटर फटफटीवाल्याने शेजारच्या शेताडीतून घुसून ओव्हरटेक केलाच. पुढे आल्यावर त्याने मोटरसायकल थांबवली आणि शिव्यांचा भडीमार केला. "खुटं निगाला?" या त्याच्या प्रश्नाला मी बावचळून "मुरगूड" असे सांगून टाकले. मग त्याने धमकी दिली "यावा आता मुरगुडात, बगतो कसं जित्तं जाताय त्ये". प्रशाला सगळा विषय बहुधा नीट समजलाच नाही. तो निर्विकारपणे ओरडून म्हणाला, "चहा तयार ठेवा, आम्हांला चहा गरम लागतो".

फटफटीवाला फर्रर्र करीत गेला. मी हबकलो. मारामारीची वेळ आलीच तर आम्ही चार शहरी कुमार कुठे पुरे पडणार? आणि मुख्य म्हणजे मागे भरलेल्या दोन लाखांच्या मालाचे काय?

त्यातून नशिबानेच सुटलो. पुढे एके ठिकाणी पाटी होती त्यानुसार मुरगूड डावीकडे नि दाजीपूर उजवीकडे होते. थोडक्यात सटकलो.

फोंडाघाट उतरून करूळ ओलांडून गोवा हमरस्त्याला लागलो तेव्हा नऊ वाजून गेले होते. गोवा हमरस्त्यावर तेव्हा फारशी वर्दळ नसे. दहा किलोमीटरमध्ये एखादे वाहन दिसले तर. वाटेतली गावेही छोटी छोटीच. काही काही टप्प्यांत रस्त्याच्या दुतर्फा झाडी. त्यात बरीचशी जांभळांची.

मी आणि प्रशा टपावरच बसून होतो. ऊन चटकायला लागल्यावर खाली आलो. येण्याआधी एका जांभळाखाली गाडी उभी करून पिशवीभर जांभळे काढून घेतली.

म्हापशात पोहोचलो तेव्हा एक वाजून गेला होता. टीव्ही एजन्सीला गाडी लावली आणि सुनीलला काम होते म्हणून आम्ही तिथल्या बॅंकेत गेलो.

बॅंकेत काय काम तर सगळे पैसे जवळ नकोत म्हणून त्याने दोनेक हजाराचे ट्रॅव्हलर्स चेक्स आणले होते. खरेतर ते कुठेही वटवता यायला हवे होते, पण उगाच भानगड नको म्हणून आम्ही बॅंक शोधली. बहुधा स्टेट बॅंक ऑफ इंडिया. बॅंकेत सांगितले की कॅशियर लंचब्रेकला गेला आहे. पाऊण तासात येईल.

आम्ही बॅंकेसमोरच्या एका बारमध्ये घुसलो नि किंग्ज बिअरने सुरुवात केली.

बारमध्ये आम्ही सोडून अजून एकजण होता. तो समोरची फेणी आणि बांगडा यावर पद्धतशीर हल्ला चढवीत होता. तीस मिनिटांत दोन फेणी, एक तळलेला बांगडा नि ताटभर भात-कालवण यांचा त्याने फडशा पाडला. आम्ही किंग्ज बिअर नि विल्स किंग्ज सिगारेट गोंजारत पुढल्या दोन दिवसांचा बेत आखत राहिलो.

पाऊण तासाने सुनील बॅंकेत गेला नि पैसे घेऊन आला. त्याचे डोळे विस्फारलेले होते. कारण? 'दोन फेणी एक बांगडा'वाली व्यक्ती हीच कॅशियर होती.

माझे वडील बॅंकेत होते. त्यामुळे 'स्वदुःख हिमालयासमान, परदुःख शीतल' या न्यायाने बॅंक सोडून इतर सर्व नोकऱ्या त्यांना अतीव सौख्यकारक भासत असत. "तू काय वाटेल ते कर, बॅंकेत नोकरी करू नको" अशी त्यांची तंबी होती.

मिलिटरीतल्या मामाने हाच मंत्र जपल्याने भारत एका सैन्याधिकाऱ्याला मुकला.

मी बॅंकेत नोकरी केली नाही, पण 'वाटेल ते' करायला सुरुवात केल्यावर मात्र पिताजींचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती.

पण गोव्यातल्या या कॅशियरने 'बॅंकेत नोकरी का नाही घेतली?' अशी हुरहूर लावली. दुपारच्या जेवणाला दोन पेग, रात्रीच्या जेवणाला चार नि सकाळी ब्रेकफास्टला बिअर. अजून काय पाहिजे आयुष्यात?

टीव्ही उतरवून झाले होते. बियर चढवून झाली होती. सूर्यास्त होण्याआधी आम्ही थेट कोलवा बीच गाठला. गाडीतच मागे झोपायचे असे ठरले होते. त्यामुळे दारू नि जेवण हाच काय तो खर्च. कोलवा बीचवर पब्लिक टॉयलेट्स होतीच.

ती रात्र, पुढला दिवस नि पुढली रात्र डोक्यावरून ढग सरकावेत तसे निघून गेले. त्यापुढला दिवस उजाडला. आज परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची असा मूळ बेत होता.

याची आठवण ठेवली होती बाबूने. तो केवळ गाडी चालवू शकत नसे एव्हढेच नव्हते. तो न पिणाऱ्यांतलाही होता. तंबाकू आणि सिगरेट एवढ्यावरच त्याचे भागे. त्यामुळे तारीख वार त्याच्या नीट लक्षात होते.

आमच्या जाणीवेत तारीख नि वार नव्हते, पण पैसे संपत आले आहेत एवढे कळत होते. अखेर संध्याकाळी निघू असे ठरवून आम्ही परत किनारा गाठला.

त्या दिवशी प्रशा नि सुनीलने सकाळपासूनच फेणीवर आडवा हात मारला. मी 'ब्लू रिबंड' जिन धरून ठेवली होती. मी त्या दोघांसारखा आडवा नव्हे, पण थोडा तिरका हात मारलाच. बाबू बिचारा गालफडाला तंबाकू लावून बसून होता.

मध्यान्हीला प्रशा नि सुनील किनाऱ्यावरच्या शॅकमधल्या खुर्चीतच पेंगायला लागले. अर्ध्या-पाऊण तासाने पेंग उतरली की परत फेणी, परत पेंग. मी त्यामानाने हुशारीत होतो. गाडी चालवणार कोण असा विचार करीत होतो.

बाबूने दुपारी तीनलाच 'चला चला' करायला घेतले. ते सगळ्यांच्या जाणीवेत उतरून गाडीच्या दिशेने पावले पडली तेव्हा पाच वाजत आले होते. प्रशा नि सुनील घट्ट मैत्री सिद्ध करण्यासाठी एकमेकांना घट्ट धरून चालत होते. चालत होते म्हणण्यापेक्षा घरंगळत होते. गाडीपाशी पोहोचल्यावर दोघांनी कसेतरी मागल्या हौद्यात स्वतःला पोहोचवले आणि "गणपतीपुळ्याला पोचल्यावर उठवा" असे सांगून ते दोघेही गाढ झोपी गेले.

मी 'जमेल तेवढी मी चालवेन. नाहीतर रस्त्याकडेला उभी करून मीपण झोपेन' असे जाहीर करून स्टार्टर मारला. बाबूने मुकाट मान्य केले.

तिथून पुढे आठवते म्हणजे मेटॅडोरच्या इंजिनाचा रॅंव रॅंव आवाज, कॅबिनमधली गर्मी, आणि दर अर्ध्या-पाऊण तासाने थांबायला भाग पाडणारा बाबू. बाबू हा आयडियल क्लीनर मटेरियल होता. दर अर्ध्या पाऊण तासाला थांबवून तो मला पाणी तरी पाजे, वा सिगरेट तरी. धार मारायला खाली उतरलो की हा तत्परतेने डिस्ट्रेस लाईटचे ब्लिंकर्स चालू करे.

मध्ये एकदा गोव्यात कोलवाळच्या पुलाजवळ, एकदा कुडाळ गावाआधी आणि एकदा राजापूर गावाआधी मी स्पीडब्रेकरवरून गाडी दणकवली. पहिल्यांदा तसे झाल्यावर बाबून घाबरून मागे पाहिले. त्याच्या म्हणण्यानुसार मागचे दोघेही किमान दीड फूट वर उडून परत आपटले. पण झोपमोड काही झाली नाही.

निवळी फाट्यावरून गणपतीपुळ्याच्या दिशेने वळालो तेव्हा पहाटेचे तीन वाजून गेले होते. अर्ध्या तासात जाकादेवीला पोहोचलो. आता आलोच म्हणून हुश्श वाटू लागले होते. तीसच्या आसपास वेग होता कारण कोंकणातले वळणवाकणाचे रस्ते. एक घाटी लागली.

वरपासून पाहिले तर बोरघाट/खंडाळ्याचा घाट, वरंध/भोर घाट, आंबेनळीचा घाट, कोयनानगर/पोफळीचा घाट, आंबा घाट, अणुस्कुरा घाट, गगनबावडा घाट, दाजीपूर/फोंडा घाट आणि आंबोलीचा घाट एवढ्या नऊ घाटांनाच कोंकणात घाट म्हणतात. बाकी सगळ्या घाट्या.

त्या घाटीत एका वळणावर अचानक डोळ्यांसमोर मिट्ट अंधार झाला. प्रतिक्षिप्त क्रियेने मी ब्रेक मारला नि गाडी वेळेत थांबली. घाटी फार उंच नव्हती, पण गाडी कलंडण्याइतकी होती. मिनिटभर बसून राहिलो. डोळे जरा सरावले. मग कळले की गाडीचे हेडलॅंपचे दोन्ही बल्ब फ्यूज झाले आहेत.

मेटॅडोरच्या बाबतीत हे घडणे मधून अधून होत असावे वा सुनील फार सावध माणूस असावा. गाडीत दोन स्पेअर बल्ब होते. आणि आयडियल क्लीनर बाबूला ते माहीत होते. बाबूनेच बल्ब बदलले नि सूर्योदय होताना गणपतीपुळे गाठले.

एव्हाना मागल्या कुंभकर्णांची बारा तासांहून जास्त झोप झालेली होती. जांभया देत ते भाविकपणे उतरले आणि देवळाकडे चालू लागले. "आंघोळी करून मग चला" बाबूने चमकावले. ते सार्वजनिक न्हाणीघराच्या दिशेने गेले.

मी मागचा हौदा गाठला नि पुणे येईस्तोवर माझा झोपेचा कोटा पूर्ण करून घेतला.