सावध! ऐका पुढल्या हाका
कचरा व्यवस्थापन - केंद्रित की विकेंद्रित?
थोडक्यात, डंपिंग ऊर्फ केंद्रित कचरा व्यवस्थापन (सेंट्रलाईज्ड वेस्ट मॅनेजमेंट) पद्धत उपयोगाची नाही. मग विकेंद्रीकरण करायचे तर ते कसे राबवायचे?
थेट व्यक्ती-कुटुंब पातळीवरच कचरा व्यवस्थापन करावे ही कल्पना फारच रोमॅंटिक आहे यात वाद नाही. उध्दरेदात्मनात्मानं वगैरे. पण ती सर्व वयोगटातल्या, सर्व उत्पन्न गटातल्या, सर्व शैक्षणिक स्तरांवरील जनतेसाठी प्रत्यक्षात आणता येईल का?
अर्थातच नाही.
मग कुठल्या पातळीवर हे करावे?
याचे गणिती उत्तर देता येणे शक्य नाही. कारण कचरानिर्मीती ही स्थल, काल, उत्पन्न, संस्कृती, आरोग्य, शिक्षण, वय यापरत्वे बदलत असते.
पण कुठेतरी सुरुवात तर करावीच लागेल. त्यासाठी किती माणसांचा समूह हा एकक मानावा यावर आपण नंतर येऊ.
कचरा वर्गीकरण - का, काय, कधी, कुणी नि कसे?
पहिली पायरी म्हणजे कचऱ्याचे वर्गीकरण. आणि वर्गीकरणाच्या अनुषंगाने का, काय, कधी, कुणी नि कसे या मूलभूत प्रश्नांना भिडले पाहिजे.
कचरा वर्गीकरण का? तर प्रत्येक पदार्थाचे जैव-भौतिक-रासायनिक गुणधर्म वेगवेगळे असतात त्यामुळे प्रत्येक पदार्थाचा विलय वेगवेगळ्या रीतीने नि गतीने होतो. जितक्या प्रकारांत हे वर्गीकरण करता येईल तितके कचऱ्याचे व्यवस्थापन करणे सुलभ होत जाईल.
कचरा वर्गीकरण करणे म्हणजे काय? तर वेगवेगळ्या गुणधर्मांच्या पदार्थांचा कचरा शक्य तितका वेगवेगळा ठेवावा. इथे ‘शक्य तितका’ हा कळीचा मुद्दा आहे. कचरा व्यवस्थापन आपल्यासाठी आहे, आपण कचरा व्यवस्थापनासाठी नाही हे लक्षात ठेवायलाच हवे.
कचरा वर्गीकरण कधी आणि कुणी करावे? कचरा निर्माण झाल्यावर शक्य तितक्या लवकर आणि कचरा निर्माण करणाऱ्या व्यक्तीने.
कचरा वर्गीकरण कसे करावे? ओला नि सुका कचरा हे फार ढोबळ वर्गीकरण झाले. ओल्या कचऱ्यातही नारळाची करवंटी (विघटन व्हायला वर्षे), भुईमुगाची टरफले (विघटन व्हायला महिने), मेथी-पालक-कोथिंबिरीची देठे (विघटन व्हायला आठवडे) अशा अनेक श्रेणी करता येतात. सुक्या कचऱ्यात तर काय? कागद, काच, कापड, धातू, प्लास्टिक, लाकूड आदि नि या सगळ्यांच्या अनंत श्रेणी. कागदामध्येच वहीचा कागद, वर्तमानपत्राचा कागद, मासिकाचा कागद, वहीचा पुठ्ठा, खोक्याचा पुठ्ठा अशा बऱ्याच श्रेणी करता येतील.
तर, व्यवस्थापनाच्या पद्धतीप्रमाणे वर्गीकरण हे त्याचे उत्तर आहे. म्हणजे, वर्तमानपत्राच्या कागदाच्या कचरा व्यवस्थापनाची काही पद्धत स्थापित झाली असेल तर वर्तमानपत्राचा कागद वेगळा नि बाकी सगळे कागद वेगळे असे वर्गीकरण करावे लागेल.
संमिश्र कचऱ्याची समस्या
संमिश्र कचरा म्हणजे काय? तर वेगवेगळ्या गुणधर्मांच्या पदार्थांनी बनलेल्या वस्तूचा कचरा.
एकल वापराच्या मानल्या गेलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचे (ज्याला साधारणपणे ‘बिस्लरी’च्या बाटल्या म्हटले जाते) उदाहरण घेऊ. पारदर्शक बाटल्या पीईटी ऊर्फ पेट (पॉलि एथिलिन टेराफ्थलेट) च्या असतात. झाकणे पीपी (पॉलि प्रॉपिलीन) ची असतात. नि ज्यावर ‘बिस्लरी’ असे छापलेलेअसते ते वेष्टण प्लास्टिसाईज्ड पीव्हीसीचे असते.
आणि या तिन्ही प्रकारच्या प्लास्टिकचे ज्वलनोत्तर रासायनिक गुणधर्म अनुक्रमे विषारी, निमविषारी, नि अतिविषारी असे आहेत.
दुसरे, नि अधिक गंभीर उदाहरण म्हणजे टेट्रापॅक. इथे कागद, मेण, ऍल्युमिनम नि प्लास्टिक या चार विभिन्न पदार्थांची (कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अभद्र) युती झालेली आहे. त्यामुळे टेट्रापॅकचे कचरा व्यवस्थापन अवघडच नव्हे, तर अशक्य श्रेणीकडे जाते.
ओल्या कचऱ्यातून बायोगॅस - उपयोग आणि मर्यादा
ओल्या कचऱ्यातून बायोगॅस तयार करून वापरावा आणि एलपीजी (घरोघरी असलेला गॅस सिलिंडर) वरील अवलंबन संपवावे हे शक्य आहे का?
एक किलो ओल्या कचऱ्यातून साधारण किती मिथेन तयार होतो? ‘साधारण’ म्हणण्याचे कारण कचऱ्यातील घटक पदार्थ बदलते असतात त्यामुळे गणित मांडताना अंदाजेच मांडावे लागेल. तर एक किलो ओल्या कचऱ्यातून साधारणपणे ३० ग्रॅम मिथेन तयार होतो.
आपली रोजची ‘एलपीजी’ ची गरज किती असते? एका सिलिंडरमध्ये १४.२ किलो गॅस असतो. एक सिलिंडर जर एक महिना वापरून संपत असेल तर सुमारे ४७५ ग्रॅम गॅस प्रतिदिवस वापरला जातो. दोन महिने एक सिलिंडर चालत असेल तर हा आकडा २४० ग्रॅम प्रतिदिवस आणि तीन महिने चालत असेल तर १६० ग्रॅम प्रतिदिवस येतो.
तीन महिन्यांसाठीचा हिशेब करू. म्हणजे रोज सुमारे साडेपाच किलो ओला कचरा वापरून मिथेन केला तर ग्रॅममध्ये एलपीजीच्या बरोबरीने मिथेन मिळेल.
यात अजून एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. एलपीजी दाबाखाली भरलेला असल्याने त्याची ज्योत जास्ती उष्णता देते. मिथेन जाळण्यासाठी वेगळा बर्नर लागतो आणि ज्योतीची उष्णता कमी असल्याने त्यावर पदार्थ करण्यासाठी दीड ते दोन पट वेळ लागतो. म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातल्या वावरात वेळेच्या दृष्टीने काही बदल करावे लागतील.
हे बदल अशक्य नाहीत, पण काहीजणांसाठी अवघड असू शकतील.
आता एका कुटुंबात दिवसाला किती किलो ओला कचरा निर्माण होतो? सरासरी अर्था किलो. जास्तीत जास्त एक किलो. म्हणजे, ओल्या कचऱ्याचे बायोमिथेनेशन करून एलपीजीला हद्दपार करायचे झाले तर रोज किमान साडेचार किलो ओला कचरा (कुठूनतरी) गोळा करावा लागेल. याची काही व्यवस्था (रोज) करता येणार असेल तर एलपीजी सिलिंडर हद्दपार होऊ शकेल. हा झाला गॅसच्या गरजेचा हिशेब.
अजून एक लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे या यंत्रातून मिथेन वायू मिळवल्यानंतर साधारण कचऱ्याच्या वजनाएवढे प्रवाही मिश्रण (स्लरी) मिळते, जे अत्यंत उत्तम खत आहे. हे खत वापरले गेले तर अधिक चांगले.
आता यंत्राच्या किंमतीचा हिशेब करू.
आज बाजारात उपलब्ध असलेले बायोमिथेनेशनचे यंत्र किती किंमतीला मिळते? या प्रकारची यंत्रे करून विकणाऱ्या एका कंपनीच्या यंत्रांची किंमत येणेप्रमाणे होती: दिवसाला पाच किलो ओला कचरा विघटन करून मिथेन करणारे यंत्र ७५,००० रुपये आणि दिवसाला दहा किलो ओला कचरा विघटन करून मिथेन करणारे यंत्र १,१०,००० रुपये. अधिक माहितीसाठी इथे संपर्क साधावा.
गॅस सिलिंडर ८०० रुपयांना आहे आणि तो तीन महिने चालतो असे धरून हिशेब केल्यास पाच किलोच्या यंत्राची मूळ किंमत वसूल व्हायला तेवीस वर्षांहून जास्त वेळ लागेल. दहा किलोच्या यंत्रासाठी चौतीस वर्षांहून जास्त. ही मूळ किंमत. यंत्राच्या देखभाली/दुरुस्तीचा खर्च जमेस धरला तर हा कालावधी वाढेल.
थोडक्यात, काही खरे नाही.
असा निष्कर्ष काढण्यापूर्वी एका वेगळ्या दिशेने विचार करू.
२५ फ्लॅट्सची सोसायटी. जर त्या सोसायटीत रखवालदार असेल आणि प्रत्येक फ्लॅट मागे तीन हजार रुपये गोळा केले तर पाच किलोच्या यंत्राची किंमत निघेल. त्यातून निघणारा गॅस त्या रखवालदाराला वापरायला देता येईल. त्या सोसायटीतून ओला कचरा यापुढे बाहेर जाणार नाही आणि डंपिंग ग्राऊंडवर तयार होणाऱ्या मिथेनमध्ये वा लागणाऱ्या आगींतून निघणाऱ्या कार्बन डायॉक्साईडमध्ये सहभागी होणार नाही हे समाधान सोसायटीतल्या प्रत्येकाला.
अर्थात, हे यंत्र रोज धडाक्याने वापरायचे झाले तर या यंत्रातून तयार होणाऱ्या खताचे काय करायचे या प्रश्नाचे उत्तरही शोधावे लागेल.
थोडक्यात, कचरा व्यवस्थापनाबद्दल विचार करताना RoI (Returns on Investment) हा मुद्दा फक्त रुपयांतली किंमत एवढा न ठेवता पर्यावरणाची किंमत असा विस्तारून घ्यावा लागेल.